Friday 10 April 2015

काळजाचं पुस्तक !!

कधी वाटते या ह्रदयाचे
हळवे कोरे पुस्तक व्हावे
त्याने अलगद सारे काही
पुढ्यात डोळ्यांच्या ठेवावे

चुरगाळल्या जुन्या क्षणांचे
पान पुन्हा पालटता यावे
घडी पाडल्या पानांना मग
सावकाश मी सरळ करावे

भिजल्या ओल्या शब्दांवरती
हळुच कवडसा सोडुन द्यावा
गर्द जांभळ्या शब्दांनाही
नवस्वप्नांचा रंग चढावा !

कडक बोचऱ्या शब्दांना मी
तळहातावर उचलुन घ्यावे,
स्पर्श कोवळा देउन त्यांना
मायेने रेशमी करावे !

आनंदाचे गंध हवेसे
पानांवर अलगद शिंपावे
आयुष्याचे हळवे पुस्तक
सृजनाने गंधाळुन जावे … !!!

©रश्मी..

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...