Sunday 12 April 2015

सोनं खूप तापलं ना कि अधिकच चकाकतं म्हणतात. आयुष्याचही तसंच काहीसं असतं आयुष्यात कधीतरी खूप चटके खावे लागतात होरपळून निघतोय आपण असे वाटत असतांनाच आपण तावून सुलाखून बाहेर पडलेले असतो.…. एकदा दोनदा आणि अनेकदा प्रत्येकवेळी नवे चटके आणि त्याबरोबर आलेली नवी झळाळी. इतकं सगळं पाहून, भोगून, सोसून झाल्यावर एक काळ येतो आयुष्यात जेव्हा आपसूकच अंतर्गत विश्वास इतका प्रगाढ झालेला असतो कि पुढे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही दुःखाच, संकटाच अप्रूप वाटेनासं होतं. कुठलीही भीती आता भीती म्हणून उरतच नाही. दुःखाला दुःखाची किनारच नसते आणि संकट नावालाही हादरवत बिदरवत नाही. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना निव्वळ संधी वाटू लागते स्वतःला लिफ्ट करायला. तांदळातून खडा काढून सरकवावा किंवा दुधातून माशी काढून फेकावी इतक्या शुल्लक वाटू लागतात आयुष्यातल्या अडचणी. मग रोजचे चाललेले आयुष्य त्यात रोजच्या व्यापासोबत, संसाराच्या रहाटगाड्या सोबत स्वतःला खुश ठेवण्याचं स्किल आपसूक आत्मसात होत जातं … इकडे समांतर अडचणीचा गाडा पिच्छा पुरवत असतो. तो काही पाठ सोडत नाही. साथ सोडत नाही, पण आताश्या त्याला सोयीस्करपणे लेट गो करता यायला लागतं किंवा वेळात वेळ काढून त्याचाही पत्ता लावता येऊ लागतो. जगता जगता या स्तराला या स्थितीला येउन पोचणे हि साधारण अवस्था नाही. यासाठी खरच आयुष्याचे अनेक तप पार करावे लागते. हे घडू लागले कि समजावे आपण आयुष्यात खूप मोठ्या साधनेतून 'वर' प्राप्त केला आहे. आपल्या आयुष्यातले समुद्र मंथन पार पडले आहे… आणि आता कुठलाही विषाचा प्याला आपल्याला पचवता येऊ शकतो. आयुष्याच्या अनेकानेक परीक्षा पार करून आता आपण पदवीधर होऊन आचार्य पदवी घेऊन बाहेर पडलो आहोत. याही पुढे आयुष्य सरकत जाणार आहे आणि आपण यात सिद्धी प्राप्त करणार आहोत. आयुष्याच्या या घडीला आपण पार केलेल्या या प्रवासाच्या या वळणावर जरां थांबून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतलीच तर त्यात काहीच गैर नाही. या वळणावर येणाऱ्या वाटेवर आनंद उचलत जाऊच, फुलांचे ताफे पाहू, पहाड, हिरवळ आणि सौंदर्य नव्या सुखद अनुभवांचा पुढे नवा सिद्धांत मांडू. समांतर येणाऱ्या वाटेवर अनुभूतींचा खजाना आहेच, अडचणींचा, समस्यांचा नवा अनुभव आहे. या वळणावर हातात हात घेऊन पुढे निघू  ….  रस्त्याच्या टोकाला आत डोकावतांना काय गवसतं हे बघण्यात सुख असणार आहे हे नक्की…                               

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...