'पॅकर्स अँड मूव्हर्स'चा ट्रक दुपारीच निघून गेला. घरातलं आवश्यक सामान काळजीपूर्वक बांधून, पेट्यांमध्ये बंद करून, तो मुंबईहून नागपूर शहराच्या रस्त्याला लागला. उरलेल्या काही वस्तू कुणाकुणाला द्यायच्या होत्या, काहींची निरवानिरव बाकी होती. त्यामुळे आम्ही अजून काही तास त्या घरात थांबलो. ट्रेन रात्रीची होती. घाई नव्हती.
एकेक खोली रिकामी होत गेली तसं घराचं रूप बदलत गेलं. भिंती तिथल्याच होत्या, खिडक्या त्याच होत्या, पण त्यांच्यावरचा आपलेपणाचा हात निसटत चालला होता. घर जणू हळूहळू घरपण उतरवून ठेवत होतं.
सगळं आटोपलं. शेवटचं कुलूप लावण्याआधी आम्ही एकदा घरभर नजर फिरवली. तेव्हा नवरा सहज म्हणाला,
"सगळं घेतलंय ना? काही राहिलं तर नाही?"
मी क्षणभर काहीच बोलले नाही. काय सांगणार होते त्याला? सामान म्हणजेच सगळं नसतं ना...
या घरात एक कोपरा आहे. अगदी साधासुधा. कुठल्याही आगंतुकाच्या नजरेत न भरणारा. पण माझ्यासाठी तो घराचा आत्माच जणू. त्या कोपऱ्यात बसून कितीतरी संध्याकाळ पाहिल्या आहेत. उगवता चंद्र, मावळता सूर्य, हवेची झुळूक, पावसाच्या सरी, मृदगंध, पाखरांची किलबिल, कुणाचातरी निरोप, कुणाकुणाची प्रतीक्षा आणि कसे सांगू कायकाय अनुभवले आहे तिथे... कितीतरी लेख तिथे जन्माला आले. कितीतरी आनंदाचे क्षण, कितीतरी हळवे अश्रू, कितीतरी एकांत आणि कितीतरी स्वप्नं त्या कोपऱ्याने निःशब्दपणे जपून ठेवली आहेत.
एका जाहिरातीत या ओळी होत्या...
' 'कुछ घर सिर्फ रहने के लिए होते हैं, कुछ घर उम्रभर याद रहने के लिए।''
घर बदलताना कपाटं उचलता येतात, टेबल-खुर्च्या नेता येतात, पडदे, भांडी, पुस्तकं सगळं सोबत नेता येतं. पण एखाद्या जागेशी जडलेला जीव कसा न्यावा?
''मला तो कोपरा सोबत हवाय रे...'' कसे सांगू त्याला ?
त्या खिडकीतून दिसणारा प्रकाश, त्या भिंतींवर वावरलेली माझी वर्षानुवर्षांची सावली, त्या घरात स्थिरावल्यावर मनात साठलेला शांततेचा स्पर्श... हे सगळं कसं बांधायचं एखाद्या पेटीत?
घर बदलणं म्हणजे फक्त पत्ता बदलणं नसतं; त्यासोबत बदलतात भिंती, खिडक्या, आतबाहेरचं दृश्यं आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणीही. मुंबईच्या वास्तव्यादरम्यान आम्ही तीन घरं बदलली. प्रत्येक घराने काही ना काही दिलं, पण एका घरातली एक खिडकी मात्र माझ्या मनात कायमची घर करून राहिली.
हॉलमधली ती साधीशी खिडकी. तिच्यात विशेष असं काही नव्हतं, पण तिच्या पलीकडे उलगडणारं जग मात्र विलक्षण होतं. खिडकीतून नजर बाहेर गेली की सर्वप्रथम दिसायचा रस्त्याच्या त्या कडेला खळाळत वाहणारा ओढा. त्याच्या पाण्यावर सतत पडणारे प्रकाशाचे कवडसे, अधूनमधून त्यात डोलणाऱ्या झाडांच्या सावल्या... त्यापलीकडे रेल्वेचे ट्रॅक. दिवसातून कितीतरी वेळा धडधडत जाणाऱ्या गाड्या, त्यांच्या शिट्ट्या आणि काही क्षणांत पुन्हा पसरून जाणारी शांतता. ट्रॅकच्या पलीकडे दूरवर दिसायचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे. लहानशा खेळण्यांसारखी धावणारी वाहनं पाहताना वेळ कसा जायचा कळत नसे. आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे, क्षितिजाच्या कडेवर विसावलेले उंच रावडी डोंगर.
पावसाळा आला की त्या डोंगरांचं रूपच बदलून जायचं. हिरवाईची शाल पांघरलेल्या त्या टेकड्यांवरून पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा सतत खाली झेपावत असत. जणू डोंगराने आपले केस मोकळे सोडले आहेत आणि त्यातून पाण्याचे झरे वाहत आहेत. तीन महिने हा देखावा केवळ डोळ्यांसाठी नव्हे, तर मनासाठी एक उत्सव असायचा. मी तासन्तास त्या खिडकीशी बसून राहायचे. हातात चहाचा कप असायचा, तर कधी पुस्तक असायचं, कधी निवडायला भाजी किंवा एखादी कामाची फाईल... पण नजर बाहेरच्या दृश्यात हरवलेली असायची. त्या खिडकीने माझे कितीतरी एकांत पाहिले, कितीतरी विचार ऐकले आणि कितीतरी शब्दांना जन्म दिला.
विशेष म्हणजे पावसाळा संपला तरीही त्या खिडकीचं महत्त्व कमी होत नसे. उलट मग तिथे बसून मी पुढच्या पावसाळ्याची वाट पाहायचे. कोरड्या डोंगरांकडे पाहताना मनात ओलसर आठवणी जाग्या व्हायच्या. जणू ती खिडकीच ऋतूंची रखवालदार होती. पावसाळा आला की त्याचं स्वागत करायचं आणि गेला की त्याच्या पुनरागमनाची आस धरून बसायचं. आज ती खिडकी, ते घर, तो परिसर मागे पडला आहे. पण काही जागा सोडूनही आपल्याला सोडत नाहीत. त्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात कायम उघड्या राहतात. डोळे मिटले की अजूनही ती खिडकी दिसते, समोर वाहणारा ओढा दिसतो, दूरवरून जाणारी रेल्वे दिसते आणि डोंगरावरून कोसळणारे ते शुभ्र धबधबेही...
घरातला आवडता एखादा कोपरा हा जागेमुळे आवडता नसतो. त्या जागेने आपल्याला दिलेल्या अनुभवामुळे, शांततेमुळे, आनंदामुळे आणि जपलेल्या आठवणींमुळे तो प्रिय बनत असतो. माझ्यासाठी ती खिडकी म्हणजे फक्त एक खिडकी नव्हती; ती ऋतूंच्या येण्या-जाण्याची साक्षीदार होती, आणि माझ्या मनाच्या अनेक पावसाळ्यांचीही.
घर से निकले थे घर बसाने को,
उम्र सारी लगी घर भूलाने को
किंवा
गुज़र जाते हैं .... खूबसूरत लम्हें
यूं ही मुसाफिर की तरह....
यादें वहीं खडी रह जाती हैं .....
रूके रास्तों की तरह...*_
*"हर घर चुपचाप से ये कहता है... अंदर इसमें कौन रहता है..."* ही Asian Paints ची जाहिरात आठवते ? ती फक्त घर रंगवण्याबद्दल नव्हती. ती घरांच्या स्वभावाबद्दल होती. कारण प्रत्येक घर बोलत असतं. त्याला आवाज नसतो, पण तरी त्याची एक भाषा असते, त्या घराशी घट्ट नातं जुळणाऱ्याला ती समजते. घरात पाऊल टाकताच त्या घरात राहणाऱ्या माणसांचा स्वभाव कळू लागतो. कुठे पुस्तकांचे ढीग दिसतात, कुठे भिंतीवर मुलांनी काढलेली वाकडी-तिकडी चित्रं, कुठे देवघरातला दिवा शांतपणे तेवत असतो, तर कुठे खिडकीतल्या कुंड्यांतून हिरव्या पानांची गजबज दिसते. घरातल्या वस्तू, त्यांची मांडणी, पसारा किंवा नीटनेटकेपणा, भिंतींचे रंग, पडद्यांची निवड सगळंच काहीतरी सांगत असतं. काही घरांत पाऊल टाकताच उब जाणवते. जणू त्या घराने आपल्याला हसून स्वागत केलं आहे. काही घरं मात्र मोठी, सुंदर, ऐश्वर्यसंपन्न असूनही अलिप्त वाटतात. जसं माणसांचं असतं, तसंच घरांचंही असतं. घर हे केवळ विटा, सिमेंट आणि लाकडाचं बनलेलं नसतं; ते तिथे राहणाऱ्या माणसांच्या सवयी, आठवणी, स्वप्नं, संघर्ष आणि प्रेम यांनी घडलेलं असतं. काही घरं माणसांना जन्म घालतात, काही माणसं घरांना.
म्हणूनच एखादं जुनं घर रिकामं झालं की त्याची हुरहूर लागते. कारण तिथून फक्त माणसं गेलेली नसतात; त्यांचं हसणं, रडणं, भांडणं, सण, वाढदिवस, स्वप्नं आणि आयुष्याचे कितीतरी तुकडे तिथे शिल्लक राहिलेले असतात. घरं खरंच खूप काही सांगतात. फक्त त्यांची भाषा ऐकण्याइतका वेळ आणि संवेदनशीलता आपल्याकडे असायला हवी. कधी कधी वाटतं, घरांच्या भिंतींना बोलता आलं असतं तर त्यांनी तिथे राहणाऱ्या माणसांच्या किती सुंदर, कधी वेदनादायी आणि किती विलक्षण कथा सांगितल्या असत्या.
काही घरं सोडूनही ती मागे पडत नाहीत, ती आपल्यातच राहतात. घर बदललं की पत्ता बदलतो, पण मनातला मुक्काम तसाच राहतो....आणि मग आयुष्याच्या एखाद्या निवांत वळणावर, नकळत मन पुन्हा त्या जुन्या दाराशी जाऊन उभं राहतं... जिथे आता कोणी आपली वाट पाहत नसतं, पण आपल्या तिथे राहून गेलेल्या आठवणी मात्र अजूनही उंबरठ्यावर बसलेल्या असतात...
रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment