Monday, 27 April 2015

'स' संवेदनेचा कि सहानुभूतीचा !



सामाजिक कामाच्या अनुषंगाने वर्ष २००३ मध्ये नागपूर शासकीय मनोरुग्णालयात जाण्याचा योग आला. ओघाने झालेल्या चर्चेत मानसोपचारतज्ञ डॉ. सोनल देशमुख म्हणाल्या होत्या 'मानसिक आजार हि खरतर मुख्य समस्याच नाहीये, मुख्य समस्या आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची. मानसिक रोग बरा करता येतॊ पण समाजातल्या लोकांच्या मानसिकतेला औषध नाही ' किती खरंय ना… … एखादी विकलांगता किंवा मानसिक आजार हे ज्याचे त्याने स्वीकारले असते. अश्यातही त्यातून बाहेर पडण्याची आणि त्यांच्या परीने जमेल तसे चांगले जीवन जगण्याची धडपड त्यांची चालू असते. त्यांना फक्त  मानाने वागवण्याची आणि खरतर सामान्य वागणूक देण्याची गरज असते. पण असे घडत नाही एखाद्याचे एखाद्या बाबतीत सामान्य नसणं किंवा आपल्यासारखं नसणं हे आपण सहज स्वीकारतच नाही. अमक्याला काहीतरी व्यंग आहे किंवा होते हे आपण विसरूच शकत नाही.

२००३ चे डॉ. सोनल यांचे वक्तव्य प्रकर्षाने आठवले त्याला कारण ठरली काल-परवा वाचलेली सोनाली मुखर्जी हिची बातमी आणि तिच्या नवरयाच्या कौतुकाने भरलेल्या आता या क्षणापर्यंत सुरु असलेल्या सोशल मिडिया वरच्या पोस्ट. जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोनालीवर एसिड अटॅक झाला. त्यात ती ७२ टक्के भाजल्या गेली पूर्वीचे देखणे स्वरूप क्षणात बदलले. त्यानंतर इच्छामृत्युची मागणी करणारी सोनाली मुखर्जी पुढे धैर्याने लढत राहिली तिचे हे  धाडसी व्यक्तिमत्वच मग विकृतीला, क्रोर्याला आणि अन्यायाला बळी पडलेल्या पण न हारता लढा देणाऱ्या महिलांचा प्रातिनिधिक चेहेरा ठरला. 

आता तिचे लग्न झाले. अतिशय सुस्वरूप, उच्चशिक्षित आणि कर्तृत्ववान पुरुष तिच्या आयुष्यात आला. हा विषय प्रेमाचा असू शकतो हा चांगल्या मैत्रीचा विषयही असू शकतो पण यासाठी त्या पुरुषाला साहसी म्हणून बघणे आणि हे लग्न सहानुभूतीतून अवतरले असावे असे तर्क करणे हे आपल्या संकुचित वृत्तीचे अतिउत्तम उदाहरण नाहीये का ? सोनालीच्या चेहेऱ्याशिवायही तिच्यावर प्रेम करावे असे अनेक गुण तिच्यात असावेत. तिचे धैर्य, तिचा आत्मविश्वास तिचे साहस आणि बरच काही. पण या कशाचाही विचार न करता जेव्हा आपण त्या पुरुषाला सलाम करायला धजतो, म्हणजेच सोनालीचे लग्न होणे शक्यच नव्हते किंवा तिच्यावर कुणी प्रेम करावे हे शक्य नाही …. का तर ती कुरूप आहे ?? म्हणजेच तिच्यावर अत्याचार झालाय त्यात ती भाजली गेलीय याहून अधिक ती आता कुरूप आहे हे आधी आपणच विसरलेले नाहीयोत का ? तिनं साधारण माणसासारखं आयुष्य जगावं हे आपण गृहीतच धरलेलं नव्हतं ? किंवा तिला ते जगता येऊ शकतं हेच आपल्याला पटत-पचत नाहीये. तिच्याकडे फक्त सहानुभूतीनेच बघितले पाहिजे, आणि तिने सुद्धा सहनुभूतीचीच अपेक्षा समाजाकडून केली पाहिजे हि आपली अपेक्षा असावी. त्यांतही तिच्यात प्रेम हि भावना अजून जागृत आहे तिच्यातील  इतर चांगुलपणावर कुणीतरी प्रेम करू शकतं यात आपल्याला रस नाही आपल्याला रस आहे तो एखाद्याचे व्यंग दाखवण्यात ते स्वतःसकट जगाला विसरू न देण्यात. 

खरतर असे काहीतरी आदर्श कृत्य करणाऱ्याचे कोण कौतुक करतोय आपण … पण असे आदर्श प्रस्तुत करण्याची वेळ आली कि आपल्या आत्ता दाखवत असलेल्या सर्व संवेदना लोप पावतात. म्हणजे हळवेपण जपावं ते शेजाऱ्याने संवेदना जोपासाव्या त्या इतरांनी आम्ही आयत्या वेळी येउन सहानुभूती तेवढी दाखवून जाणार. असंच काहीसं होतंय आपल्या बाबतीत का? संवेदना गमावतोय आपण आपल्याच जगण्यातल्या असं घडतंय का तपासून पाहायला हवे.

(फोटो आंतरजालावरून साभार)


सोनाली मुखर्जी मनस्वी अभिनंदन सखे तुझे ..Happy Married Life 


Sunday, 26 April 2015

कुठे नेऊन ठेवलंय माणूसपण माझं ….



 थोडा विचार करा

ज्योती सिंग वर बलात्कार होतो तिच्या मित्रासोबातही क्रौर्याच्या सर्व सीमा पार केल्या जातात. आणि त्यांना तसेच नग्न, जख्मी रस्त्यावर फेकून दिले जाते. त्यांना तातडीने मदत करावी अशी रस्त्यावरून जाणारया येणाऱ्यांना गरज वाटत नाही… त्या बळी पडलेल्या निर्दोष अबलेचा बळी गेल्यावर हीच लोकं त्याच रस्त्यावरून आंदोलनं करतात.

गुन्हेगारांना आम्ही तातडीने शिक्षा देत नाही. विदेशातून त्यांच्यावर सिनेमा बनवायला लोकं येतात ती गुन्हेगारांना हिरो ठरव्ल्यासारखे त्यांना लाखो रुपये देऊन महिनोमहिने त्यांची शुटींग करतात त्यांना हवे ते बोलण्याची मुभा देतात ते सगळं जगासमोर ठेवतात… हे सर्व होतांना आम्ही मुग गिळून गप्प असतो. मिळणारा पैसा खिश्यात कोंबून वाटेल तशी परवानगी देतो. आणि ते जगासमोर आल्यावर 'मोठ्ठा' नियम काढून आमच्या देशापुरती त्यावर बंदी ठोकून मोकळे होतो. बंदी आणण्यासारखा विषय होता तर तो अस्तित्वात येउच का दिला अन अस्तित्वात आलाय तर बघू का देत नाही ? यावर आम्हाला उत्तर द्यायचे नाहीये … आम्ही आमच्या सोयीप्रमाणे वागतो.              

हजारो लोकांच्या गर्दीत एक माणूस एक 'शेतकरी' जीव देण्याचा प्रयत्न करत असतो … हजार माणसातल्या हजार 'शेतकऱ्यातला' एकही मायकालाल त्याच्या मदतीला धावत नाही ती सर्व भाषण ऐकण्यात अन आंदोलन मोर्चेबाजी नारेबाजी करण्यात दंग आहेत. शेतकऱ्याने शेतकऱ्याच्या अश्या कृत्याबद्दल इतके कोरडे राहावे आणि सरकार असंवेदनशील आहे हे कुठल्या तोंडाने बोलावे?

राज्याचा मुख्यमंत्री ज्याच्या हातात पावर आहे तो डोळ्यादेखत मरणाऱ्या एका शेतकऱ्याला वाचवू शकला नाही आणि तो अक्ख्या देशातील शेतकऱ्याच्या जीवना-मरणाच्या गोष्टी करतो… मरणाऱ्याला तसेच मरत सोडून भाषणबाजी कायम ठेवतो….राज्याच्या उच्च पदावर बसूनही हातभर अंतरावरच्या मरत्या माणसाला न वाचवू शकणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या संवेदनशिलतेवर अन प्रामाणिकतेवर किती विश्वास ठेवता येऊ शकतो ??

नेपाळ मध्ये भूकंप आलाय ५००० लोकं जीवाने गेली. कित्तेकांच्या डोक्यावरचा आश्रय संपला. कित्तेकांचा परिवार संपला लहान मुलं अनाथ झाली शहर च्या शहर उजाडली …इतकं सगळं होत असतांना नेपाळचे प्रसिद्ध मंदिर ऐतिहासिक इमारती कश्या क्षतिग्रस्त झाल्या हे रंगवून दाखवतांना माध्यमांचे करावे तितुके (अ)कौतुके कमीच….
 गिर्यारोहक चमू सगळ्यांची शवं मिळालीय म्हणजे आता ती जिवंत नाहीयेत, त्यांच्या परीवारासोबातच देशाचीही ती क्षति आहे. पण अजूनही हिमालयावर 'तिरंगा' कसा छान लहरावतोय हे उरभरून सांगतांना हि वेळ नाहीये हे सांगण्याची आपण कुठेतरी चुकतोय हि कल्पना कुणालाच कशी येत नसावी ??       

माणसांच्या भल्यासाठी निर्माण केलेल्या सिस्टम आज त्याच माणसांच्या मृत देहावर राजकारण खेळतंय.मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणं ह्यालाच म्हणतात ना ? स्मशानातल्या गौऱ्यांवर आपली भाकरी भाजून घेणे याहून वेगळे नसावे…  माणूस म्हणून आपल्याला मन दिलंय बुद्धी दिलीय त्याचा उपयोग आपण कशासाठी करतोय??

किती विरोधाभासी जगणे जगतोय आम्ही माणुसकी च्या शोधत आम्हीच इतके असंवेदनशील का होत चाललोय ??

  

Thursday, 23 April 2015

अजूनही..

अजूनही श्वास मनाचा खाली अन वर झुलते रोज
अजूनही गालामधल्या खळीत हसणे फुलते रोज
अजूनही स्वप्नांना ते पंख रुपेरी फुटतांना
आकाश गवसणी बाहू मुक्त अन खुलते रोज

अजूनही देह देखणा पोकळीत त्या दिसे व्याकूळ
अजूनही हर्षित होता नाच नाचतो मनमयूर
अजूनही पिवळा चाफा गंध घेउनि फुलतांना
गंधामध्ये रंग वेगळा भासत जातो सुमधुर 

अजूनही देठावारती सरसरत ते पिवळं पान
अजूनही ओल्या धारा हरपून घेतं उन्हकोवळं भान
अजूनही स्पर्श तरुचा मोहवतो अन जीव जाळतो
हिरवळ होऊन सारे रंग उधळत जातं सोवळं रान 
खरतर आपण काहीतरी लिहितो यात अप्रूप असं काहीच नाही ते तेव्हाच जेव्हा आपण अंतःकरणातून लिहिलेलं काहीतरी, कुणीतरी 'मनापासून' वाचत असेल. आपण जीवओतून  रचलेली कविता मनलावून ऐकत असेल. एखादं आवडत असलेलं पुस्तक एवढं का आवडतं सांगतांना रटाळ होत चाललेलं आपलं बोलणं सुद्धा कंटाळा न करता समजून घेत असेल. एखाद्या पुस्तकातला नेमका परिच्छेद वाचून दाखवतांना आपल्या इतकाच तल्लीन होत असेल. आपल्याला आवडत असलेलं गाणं, गझल आपल्याला का आवडतं हे जाणून घ्यायला म्हणून मुद्दामहून ऐकून बघत असेल मग त्यावर आपण रमून बोलतांना हिरीरीने चर्चेत सहभागी होत असेल. आपल्या समाजसेवेच्या आस्थेपोटी मनाला स्पर्शलेल्या घटना हळव्या होऊन सांगतांना तोही गुंगून जात असेल. आपण खुश असतांना तो सुद्धा खुश होत असेल. फार नको पण असा एखादाच अगदी एखादाच मित्र/मैत्रीण जवळ असेल तर … या जगात येउन भरून पावलो असं समजावं आणि या मैत्रीला जिवापलीकडे जपावं.

Friday, 17 April 2015

कुठेतरी वाचलंय
'सर्वांना काही काळ मूर्ख बनवता येते
काहींना सर्व काळ मूर्ख बनवता येते
पण
सर्वांना सर्व काळ मूर्ख बनवता येत नाही'

कर्तृत्वाचा आव आणता येत नाही तसा मोठेपणाचा देखील नाही.
मोठेपणा आणि सन्मान कर्तृत्वाने आपोआप मिळत असतो
कर्तृत्व अंगात असेल तर सन्मान बोलून मागावा लागत नाही तो आपसूक मनातून दिला जातो पुढल्याकडून
मोठेपण अन सन्मानासाठी कुणापुढे हात पसरून कष्ट घेऊन प्रयत्न करण्यापेक्षा कर्तृत्व जागवायला लागणारे कष्ट निश्चितच परवडेबल आहेत आणि समाधानकारक देखील.

Thursday, 16 April 2015

फुटपाथवर पसरलेली वाचनसंस्कृती !

ग्रंथालयं, बुक शॉप`पहिलीत कि लहानपणी फार हेवा वाटायचा.  वाटायचं आपल्या भोवतालही अशी विविधांगी,  विविधरंगी विविध विषयांची पुस्तकं पसरलेली असावी आणि वाटेल तेव्हा वाटेल ते पुस्तक उचलून वाचता यावे. असे झालेच तर किती सुखी होऊ आपण लहानपणाच्या सुखाच्या कल्पना अश्याच स्वप्नील तरीही वास्तववादी असायच्या.  वाचनाची प्रचंड आवड पण सगळच छान छान वाचायला ते आपल्याजवळ असायला लागतं आणि आपल्या जवळ असायला ते विकत घ्यायला लागतं आणि त्याहून महत्वाचं त्यासाठी पैसा देखील लागतो. पैसा कमवायला कष्ट लागतात आणि जमवायला तडजोड करणे गरजेचेच आहे हे संस्काराने समजायला लागले. पण उमजायला कठीणच गेले… वाचनाची ओढ काही कधी कमी झाली नाही किंबहुना ती वाढतच गेली. इतकं वेड होतं वाचनाचं कि मी मोठी झाले ना कि एखाद्या पुस्तकाच्या दुकानदाराशी लग्न करेन म्हणजे मग पुस्तक वाचायला मला पैसे मोजावे लागणार नाही अश्या बालपणीच्या बाळबोध कल्पना देखील तेव्हा तेव्हा करून झाल्या. मला आठवतं सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व सख्या एका मैत्रिणीकडे खेळायला जमायचो. भातुकली, घर-घर, ऑफिस- ऑफिस, लपाछापी असे काहीबाही खेळत असायचो. त्या मैत्रिणीकडे मराठी मासिकं किंवा विशेष त्या भावडांना सुट्टीत वाचता यावेत म्हणून मागवलेली बालसुलभ विशेष पुस्तकं टेबल खाली ठेवलेली असायची. आमच्या आईबाबांना असं काही का सुचत नाही ह्याचं वैषम्य तेव्हाही वाटायचं पण त्यामागची कारणं समजून घ्यायची किंवा निदान तशी मागणी तसा हट्ट करून बघायचा अशी समज तेव्हा त्या वयात नव्हतीच.….  तर खेळायला नेमके आम्ही (मीच हो) त्याच मैत्रिणीचे घर निवडायचे. मग खेळाखेळात मी ऑफिस ची क्लार्क व्हायचे, कधी टीचर, कधी पुस्तक विक्रेता तर कधी गृहिणी कधी ग्रंथपाल सुद्धा … म्हणजे अशीच भूमिका ज्याच्याशी वाचनाचा संबंध असायचा … नव्हे तो तसा निर्माण करायचा आणि इतर काहीही न करता निव्वळ वाचत बसायचे…. वाचनाची असोशी एवढी असायची कि उद्या यायला मिळाले नाहीतर हे पुस्तक पुन्हा जणू मिळणारच नाही, म्हणून ते आजच संपवायला हवं हि ओढ लागून राहायची. पुढे पुढे तर माझ्या या अश्या वागण्याची मैत्रिणीनी इतकी धास्ती घेतली कि मी पोचायच्या आत दिवाण खोलीतली मासिकं, कॉमिक्स, पुस्तकं कुठेतरी अडगळीत लपवून ठेवली जायची.… मी पुस्तकांच्या नाहीतर त्यांच्या सान्निध्यात वेळ घालावा अशी त्यांची निर्मळ निरागस अशी इच्छा असायची .… आज हे सारं आठवलं कि खरंच हसायला येतं.

नंतर शाळा, कॉलेजेसमधून तिथल्या तिथल्या ग्रंथालयांचा, परिसरातल्या सार्वजनिक ग्रंथालयांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. बरीच पुस्तकं वाचली. अनेक भाषेतील अनेक विषयांची पुस्तकं. अनेक नावाजलेल्या लेखकांच्या कादंबऱ्या वाचल्या, लोकप्रिय कवी-कावियीत्रींच्या कवितेचा आस्वाद घेतला. जगप्रसिद्ध बेस्टसेलर पुस्तकांचा साठा केला. पण ते सर्व मर्यादितच. स्वतः कमावती असतांना आजही एखाद्या बेस्टसेलर पुस्तकाची किमत बघून हात आखडता घ्यावा लागतो. आणि बरेचदा ते पुस्तक वाचण्याची प्रचंड इच्छा पुढल्या महिन्यापर्यंत थोपवून धरावी लागते. आईने न घेऊन दिलेल्या एखाद्या आवडत्या पुस्तकाची तेव्हाची ती आठवण मग पुन्हा जागृत होते. 

वाचनप्रेम आणि पुस्तकांच्या किमतीचे गणित बसवण्यात, ते प्रयत्नपूर्वक जुळवून आणण्यात बराच काळ काढल्यानंतर आयुष्याची गाडी मुंबईकडे वळली. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या नौकरी पाण्याचा जोम बसवतांनाच कधीतरी आपल्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पुस्तकांच्या बाबतीत घटना घडली ….  मुंबईच्या फुटपाथवर पसरलेली वाचनसंस्कृती पाहून एकवेळ हादरलेच. मुंबईच्या मुख्य काही परिसरातल्या लोकल स्टेशनला उतरून आपण बाहेर पडलो कि रस्त्यालगतच्या फुटपाथवर मोकळी जागा बघून किंवा एखाद्या ब्रिजच्या खाली एखाद्या मॉलच्या शेजारी रस्त्याच्या कडेने, कपड्याच्या मार्केट मध्ये सिग्नलच्या ओट्यावर कुठेही कशीही आणि कितीही ,,,, अगाध प्रतिष्ठेची युगं पाहिलेली, लोकप्रियतेची गोडी चाखलेली वर्षानुवर्ष वाचकांच्या मनाचा ठाव घेतलेली, बुद्धिवंतांच्या चर्चेचा विषय ठरलेली. आणि कितीतरी दिवस तुमच्या आमच्या उशीखालची जागा हक्काने ओक्युपाय करणारी अशी हि बेस्टसेलर पुस्तकं फाटक्या साडीत, मळकट चादरीत पसरून पडलेली दिसली.

 'अरेरेरे काय होतंय हे' एक पुस्तक हातात घेऊन पाहतांना ते समजायच्या आत 'फक्त पन्नास रुपये' शब्द  कानावर पडले आणि पुस्तकही हातातून पडलंच … 'पन्नास रुपये फक्त' अहो सातशे पानांचं किमान साडे चारशेच पुस्तक आहे हे. हा वेडगळ काहीतरीच सांगतोय मूर्ख आहे कि काय असाच काहीसा डोळ्यातल्या एका कोपऱ्यातला जरासा रागातला कटाक्ष मी त्याच्यावर टाकला आणि मानेला हलकीच लचक देऊन पुस्तकाचे पहिले पान उघडले. आता दचकायची पाळी माझीच होती ...आणि 'पता नही कहा कहा से चले आते है' अश्या नजरेने ओठांच्या कोपऱ्यातली खवचट स्माइल देण्याची पाळी त्या चालत्या फिरत्या वाचनसंस्कृतीचा डोलारा डोईवर उचलून फिरणाऱ्या विक्रेत्याची होती.... त्याने तसे काहीही न करता 'पचास रुपये, पचास रुपये' म्हणणे सुरु ठेवले. एक एक पान पुढे पुढे पालटत असतांना खऱ्या जिवंत  पुस्तकांची डमी मी हाताळतेय हे भान येत गेले. तेव्हा वाटलेले आश्चर्य आज कधीतरी निराशेचं रूप घेतं. कुठेतरी कुणाच्यातरी आयुष्याचं सार ठरलेलं, कुणाच्या आयुष्याची कमाई असणाऱ्या, कुठल्या लेखकाच्या भावनांशी बांधल्या गेलेलं आयुष्यभर कष्ट घेतलेलं कुणाचतरी प्रसृत हे असं कवडी मोलानं विकलं जावं. आणि ज्याला खरच त्याचा मोबदला मिळायला हवा त्याला न मिळता दोन पैशांसाठी तत्व, नियम आणि माणुसकी सगळंच गहाण टाकून ती अशी रस्त्यावर आणून पसरवाव हे दुखद आहे तितकंच चीड आणणारं … काही गोष्टींवर मात्र आपलं नियंत्रण नसतंच हे जरी मानलं तरी निदान आपल्या सारख्या संवेदनशील वाचकांनी तत्व पाळावेत. आणि आपल्याला आदरणीय अश्या लेखकांची पुस्तकं पायरेटेड होऊन जमिनीवर आली तरी ती वाकून विकत न घेता त्यांचा मान राखून अन आपली मानही ताठ राखून ती ओरीजनल कॉपी दुकानातूनच विकत घ्यावी महाग असली तरी तिचे महत्व समजून घ्यावी.  सृजान वाचक म्हणून आणि सुजाण नागरिक म्हणून वाचनसंस्कृतीचे जतन म्हणून किमान एवढा नियम आपण आपल्या पुरता पाळू शकतोच …होय ना ??        


  

(''विकासकर्मी अभियंता मित्र'' या पुण्यावरून प्रकाशित होणाऱ्या मासिकात ऑक्टो. २०१५ या अंकात प्रकाशित झालेला लेख. )  

Wednesday, 15 April 2015

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!!

आजच वाचण्यात आलेला एक अप्रतिम लेख...

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या …!!!!
मी २००१ च्या ३१ डिसेंबर ला पंडित हृदयनाथ मंगेशकर (बाळासाहेब) यांचा भावसरगम कार्यक्रम बघायला गेलो होतो.
तसा मी भावसरगम डोंबिवली, ठाणे, दादर येथे अनेक वेळा पहिला होता (डोम्बिविली वासी मित्र नितीन जोशी याची कृपा!!).
पण हा कार्यक्रम विशेष लक्षात राहिला कारण रात्रभर पंडितजी गायले आणि त्यांनी सुरेश भट यांच्या बद्दल एक विशेष आठवण सांगितली !!
जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले, तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच लिहिले होते.
जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते.
त्यांनीच बाळासाहेबांना सांगितले की गीतकार तुम्ही निवडा. बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे).
त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले.
१-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक ही गाणे लिहिले नाही.
पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नही रहा है, तो क्या लिखू!!!"( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत).
४ दिवस झाले पण नो चेंज !!
जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या, कारण हॉटेलचे बिल वाढतं होतं आणि चित्रपटाचे बझेट कमी. पण भट साहेब जैसे थे !!
७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला."
बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है, मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हूँ ।"
बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले, रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेलचे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले "आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल".
बाळासाहेबांनी हॉटेलचे बिल भरलं आणि ट्याक्षी बोलाविली. ट्याक्षीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले, माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले, त्या हॉटेलवाल्याकडून एक कागद आण.
बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले, त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर …
शब्द होते
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!
सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला.
बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले. त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्यांनी १५००० रुपयांचा चेक्क फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला, पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही.
ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे".
भट साहेब तसेच निघून गेले.
पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.
कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा".
ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले.
फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला.
शब्द होते
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे
पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण चित्रपटाची नायिका, एक विवाहित स्त्री आहे. लोक काय म्हणतील?
परत गाडी अडकली.
बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो। मेरे काम मे दखल अंदाजी न करो।".
रेकॉर्डिंग ची वेळ आली.
भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात.
चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते.
इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या. त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले की एका शब्दाची अडचण आहे.
त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घाल.
त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह, शांता वाह" असे उदगार काढले.
शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.
कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे
एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि एका अजरामर गाण्याचा जन्म झाला .
हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.
अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान.
अजरामर चाल आणि अजरामर आवाज.
एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदयावरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ……….
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या !!!! (फोटो आंतरजालावरून साभार)



सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

 सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा                                              
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

-उंबरठा,
-सुरेश भट,

Sunday, 12 April 2015

सोनं खूप तापलं ना कि अधिकच चकाकतं म्हणतात. आयुष्याचही तसंच काहीसं असतं आयुष्यात कधीतरी खूप चटके खावे लागतात होरपळून निघतोय आपण असे वाटत असतांनाच आपण तावून सुलाखून बाहेर पडलेले असतो.…. एकदा दोनदा आणि अनेकदा प्रत्येकवेळी नवे चटके आणि त्याबरोबर आलेली नवी झळाळी. इतकं सगळं पाहून, भोगून, सोसून झाल्यावर एक काळ येतो आयुष्यात जेव्हा आपसूकच अंतर्गत विश्वास इतका प्रगाढ झालेला असतो कि पुढे भविष्यात उभ्या ठाकणाऱ्या कोणत्याही दुःखाच, संकटाच अप्रूप वाटेनासं होतं. कुठलीही भीती आता भीती म्हणून उरतच नाही. दुःखाला दुःखाची किनारच नसते आणि संकट नावालाही हादरवत बिदरवत नाही. आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना निव्वळ संधी वाटू लागते स्वतःला लिफ्ट करायला. तांदळातून खडा काढून सरकवावा किंवा दुधातून माशी काढून फेकावी इतक्या शुल्लक वाटू लागतात आयुष्यातल्या अडचणी. मग रोजचे चाललेले आयुष्य त्यात रोजच्या व्यापासोबत, संसाराच्या रहाटगाड्या सोबत स्वतःला खुश ठेवण्याचं स्किल आपसूक आत्मसात होत जातं … इकडे समांतर अडचणीचा गाडा पिच्छा पुरवत असतो. तो काही पाठ सोडत नाही. साथ सोडत नाही, पण आताश्या त्याला सोयीस्करपणे लेट गो करता यायला लागतं किंवा वेळात वेळ काढून त्याचाही पत्ता लावता येऊ लागतो. जगता जगता या स्तराला या स्थितीला येउन पोचणे हि साधारण अवस्था नाही. यासाठी खरच आयुष्याचे अनेक तप पार करावे लागते. हे घडू लागले कि समजावे आपण आयुष्यात खूप मोठ्या साधनेतून 'वर' प्राप्त केला आहे. आपल्या आयुष्यातले समुद्र मंथन पार पडले आहे… आणि आता कुठलाही विषाचा प्याला आपल्याला पचवता येऊ शकतो. आयुष्याच्या अनेकानेक परीक्षा पार करून आता आपण पदवीधर होऊन आचार्य पदवी घेऊन बाहेर पडलो आहोत. याही पुढे आयुष्य सरकत जाणार आहे आणि आपण यात सिद्धी प्राप्त करणार आहोत. आयुष्याच्या या घडीला आपण पार केलेल्या या प्रवासाच्या या वळणावर जरां थांबून स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेतलीच तर त्यात काहीच गैर नाही. या वळणावर येणाऱ्या वाटेवर आनंद उचलत जाऊच, फुलांचे ताफे पाहू, पहाड, हिरवळ आणि सौंदर्य नव्या सुखद अनुभवांचा पुढे नवा सिद्धांत मांडू. समांतर येणाऱ्या वाटेवर अनुभूतींचा खजाना आहेच, अडचणींचा, समस्यांचा नवा अनुभव आहे. या वळणावर हातात हात घेऊन पुढे निघू  ….  रस्त्याच्या टोकाला आत डोकावतांना काय गवसतं हे बघण्यात सुख असणार आहे हे नक्की…                               

Friday, 10 April 2015

काळजाचं पुस्तक !!

कधी वाटते या ह्रदयाचे
हळवे कोरे पुस्तक व्हावे
त्याने अलगद सारे काही
पुढ्यात डोळ्यांच्या ठेवावे

चुरगाळल्या जुन्या क्षणांचे
पान पुन्हा पालटता यावे
घडी पाडल्या पानांना मग
सावकाश मी सरळ करावे

भिजल्या ओल्या शब्दांवरती
हळुच कवडसा सोडुन द्यावा
गर्द जांभळ्या शब्दांनाही
नवस्वप्नांचा रंग चढावा !

कडक बोचऱ्या शब्दांना मी
तळहातावर उचलुन घ्यावे,
स्पर्श कोवळा देउन त्यांना
मायेने रेशमी करावे !

आनंदाचे गंध हवेसे
पानांवर अलगद शिंपावे
आयुष्याचे हळवे पुस्तक
सृजनाने गंधाळुन जावे … !!!

©रश्मी..

Wednesday, 8 April 2015

होऊन जाऊ दे ..

परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली ' अगं पुरणपोळी केलीय, तुला आवडते ना म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला' मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली. पण फोन ठेवता ठेवता ती फार निरागसपणे म्हणाली& 'तू चविष्ट अस काहीतरी मिस करतेय हा बघ' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते पण आजच तिला मला बोलवावं का वाटलं किंवा स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच पन्नास वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेले पुरण तिच्यालेखी सर्वोत्कृष्ट असेल का?

मागल्या आठवड्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलो होतो. तिथे गाणाऱ्या गायिकेच्या एकएका सुराने आम्ही धुंद होत होतो. तिनं असं काही आम्हाला तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं कि कशा कशाचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वा' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. शेवटच्या संबोधनात मात्र तिनं तिच्याच घेतलेल्या कुठल्याश्‍या गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं& आणि मागच्या रो मधून आवाज आला...'अपने मूंह मियां मिठ्ठू..स्वतःला लता समजते ही बाई' &
अवाक ! ... का ? तिन गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियम बियम आहे कि काय?

आणि मनात विचार आला...आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्यांच निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात परफेक्‍ट बसवायला मग जीवाचे रान करतो. इतकं सगळं करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या कलेचं आपण स्वतःच कौतुक केलं तर तो गुन्हा का ठरावा?


आपण कलाकाराच्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना हि त्याच्याच आधीच्या कलाकृतीशी करत असतो.....ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व कलेच्या उत्तुंगतेची जाणीव होते आणि त्यातून खरे मानसिक समाधान मिळते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?


एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो अश्‍या वेळी पूर्वीपेक्षा ती त्याने यशस्वीपणे पार केलेली असते किंवा तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्याही दोन पावले पुढे झेपावलेला असतो. आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला माहित असणार ...एखादा आलाप घेतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री तुम्ही आम्ही बघू शकतो , अनुभवू शकत नाही....तसेच एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली अनुभूती किंवा आनंदाची परिमिती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी किंवा कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, कुणीतरी रंगवलेले एखादे चित्र किंवा कोणीतरी आळवलेला एखादा स्वर त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी ठरतोच. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चीत्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी. तुलना केली तर कदाचित फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण विशेष आहे.


मग अश्‍या विशेष अनुभूती अनुभवलेल्या त्या खास क्षणी विशिष्टतेची परिमिती गाठलेल्या त्या खास वेळेचं आपणच आपल्या लेखी केलेल्या कमाल अश्‍या गुणांचं स्वतःच मनभरून कौतुक केलंच तर बिघडलंय कुठं ?? होऊन जाऊ दे...

Sunday, 5 April 2015

पेशवा सरकार!

नर्मदेच्या भयाण वाळवंटात फिरून फिरून अगदी वैतागून
गेलो होतो आम्ही… रणरणत ऊन भाजून काढत होतं…
उष्ण हवा तर सतत वाहत होती…कुठे निवाऱ्याला
सावली सापडत नव्हती…
आमच्या गाडीचा ड्रायव्हर मूळचा इंदोरचा पण त्याने
देखील कधी गाडी इतक्या आत आणली नव्हती…
शोध होतं तो एकच गोष्टीचा…पण ती देखील कुठे आहे
कोणालाच माहित नव्हती…
आणि ही अशी परिस्थिती फक्त ‘हिंदुस्तानातच’
आपल्यावर येऊ शकते..
१५ मे २००९ च्या लोकमत मधील एका लेखाने
खाड्कन डोळे उघडले आमचे…
शिवाजी शिवाजी करत बसणारे आम्ही ….
मराठ्यांच्या पूर्ण इतिहासाला शिवाजी पुरताच मर्यादित करून
बसलो होतो!
हा लेख होता
श्रीमंत बाजीराव पेशव्यांवर,
त्या लढवय्या पेशव्याच्या समाधीच्या अस्तित्वाचा!
बाजीराव पेशव्यांचा अकाली मृत्यू आम्हाला माहित होतं…
पण त्यांची समाधी कुठे असेल हा साधा विचारच आम्ही केला नाही! कसा करणार?
आपलं सरकार तरी कुठे मान्यता देतं?
शिवाजी
महाराजांचे समुद्रात पुतळे उभारतील, पण त्यांचे गड किल्ले भाग्नावास्तेत पडू देतील, असलं
हे विचित्र सरकार! शाळेतील
इतिहासाच्या पुस्तकात दोन पानात संपवलेला बाजीराव
खरोखर किती मोठा होता हे
आम्हाला कोण सांगणार? ‘लढवय्या पेशवा’ पेक्षा
‘बाजीराव – मस्तानी’ ह्या प्रकरणाला जास्त महत्व
देऊन महाराष्ट्रातील जनतेनेच
ह्या पेशव्याच्या कर्तृत्वाला दाबून टाकले!
ह्या मर्द गड्याचा पराक्रम सांगावा तो तरी किती!
"जो गती भयी गजेंद्र की, वही गती हमरी आज
बाजी जात बुंदेल की , बाजी रखियो लाज!"
बुन्देलखंडचा राजा छत्रसाल ह्याने मोहम्मद बंगश
ह्या मोगल सरदाराखिलाफ बाजीरावाची मदत मागितली.
संदेश पोहोचला तेव्हा बाजीराव जेवत होते. असे म्हणतात की हातातला घास तसाच ठेवून बाजीराव उठले
आणि थेट घोड्यावरून मोजक्या स्वारानिशी निघाले.
बाकीचे सैन्य त्यांना नंतर येऊन मिळाले.
“ उशीर केल्यामुळे छत्रसाल पराजित झाले तर
इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते म्हणून उशीर झाला!"
ह्याला म्हणतात मराठी बाणा! मैत्रीचं राजकारण खेळावं तर ते असं! पोकळ दंडावर फुकटचे षड्डू
थोपटत बसणाऱ्या राजकारण्यांनी आणि सरकारी यंत्रणेने काहीतरी शिकावे ह्यातून!! ह्या कृत्यानंतर बाजीरावाने बंगाशाला पराभूत तर केलेच, पण छात्रासालाच्या
राज्याचा १/३ हिस्सा जहागीर म्हणून मिळवला…
आणि मराठी तितुका बुन्देल्खंडी फडकला!!
अशा ह्या पराक्रमी पेशव्याची समाधी रावेरखेडी नावाच्या एका गावात आहे असे आम्हाला कळते काय आणि ती लवकरच नर्मदेच्या पाण्याखाली जाणार
असल्याचे कळते आणि तिचा शेवटचा दर्शन घ्यावा
म्हणून आम्ही लगेच निघतो काय…सगळं अगदी घाईघाईत घडलं…
इंदोरहून गाडी घेऊन आम्ही निघालो ते थेट
सनावादला नर्मदा ओलांडली…मनात एक विचार
येऊन गेला..
जेव्हा मराठ्यांनी नर्मदा ओलांडली तेव्हा नावांचा पूल बांधून ओलांडली होती…आज आम्ही सिमेंटच्या
पुलावरून ती ओलांडली…घोड्यांच्या टापांनी हादरून
उठणारा हा परिसर आज रेल्वे आणि गाड्यांच्या
आवाजाने भरून गेला होता!
बडवाह! मध्य प्रदेशातील एक छोटासा जिल्हा! ह्या
जिल्ह्यात कुठेतरी लपल होत रावेरखेड़ी! सुमारे पंधरा
मिनिटे
एक खडबडीत रस्त्यावरून आमच्या इंडिका आम्ही
बलजबरी नेली तेव्हा एक कच्चा रास्ता लागला….
आणि नंतर लागल ते एक छोट गाव! हेच रावेरखेड़ी
असणार असा आम्ही एक अंदाज़ बांधून घेतला!
अगदी कोणीही न सांगता चुकीचे अंदाज़ बांधणे व ते
बरोबर आहेत अशी स्वतःची समजूत घालण्यात आम्ही
पटाईत!
गावात आम्ही आमच्या अस्खलीत हिंदी मध्ये विचारल,
"इधर कोई समाधी है क्या?"
" सचिन तेंडुलकर १००वी सेंच्युरी कधी मारणार?"
असा प्रश्न विचारल्यावर समोरचा कसा क्लीन बोल्ड होतो
अगदी तशीच अवस्था तिथल्या ग्रामस्थांची झाली!
कोणालाच माहित नहीं! मग मूळ मुद्द्यावर आलो,
"ये रावेरखेड़ी किधर है? ये नहीं है क्या?"
रावेरखेड़ी हे गाव समोरचा नाला ओलांडून पलिकडे
आहे असे कळले व आम्ही पुढे निघालो…
पण पुढच्या गावी देखील हेच चित्र…समाधी कुठे आहे
कुणालाच ठाऊक नहीं…आता करायचे काय…
मग विचारले की बाबा नदी किधर है? आणि त्या दिशेने
आम्ही कूच केली…
ह्या गावातून जाताना एक गोष्ट मात्र ध्यानी आली…
गावातील घरांचे दरवाजे एकदम जुन्या पद्धतीचे…
भक्कम लाकडाची बांधणी आणि सुन्दर नक्षीकाम…
जणू बाजीराव पेशव्यांच्या काळी बांधलेली घर असावीत!
सुमारे ३०० वर्षांपूर्वी ते देखिल ह्याच रस्त्याने घोड़दौड़ करीत नर्मदा तीरी आपल्या छावणीत गेले
असतील!
अचानक अवतीभवती सेना सागर उभा राहिला,
सरदारांचे डेरे, सैनिकांची चाललेली धावपळ आणि
आपल्या डेरयात मसलती करीत बसलेला एक दिमाखदार मराठी तरुण! महाराष्ट्राला महाराष्ट्राबाहेर
नेणारा हाच तो!
बाजीराव!
गरुडाची भेदक नजर, पिळदार मिश्या, तोंडावर किंचित
स्मित, कमावलेल मजबूत शरीर आणि तितकीच मजबूत
विचारशक्ती!
कुशल व्यवस्थापक, अजिंक्य योद्धा आणि आकर्षक
व्यक्तिमत्व असा हा सर्वगुणसम्पन्न मराठ्यांचा
पंतप्रधान!
तर आम्ही समाधी शोध चालू ठेवला..असे करता
करता गाव संपल! पुढे नुसता सपाट जमीन!
डोक्यावर अंड फोडल असता तर त्याचा हाफ-फ्राय
तयार होइल इतकी भाजून काढणार ऊन!!
आता काय करायच ह्या विचारत असताना एक
उजवीकडे शेड दिसली! शेतीच्या कामासाठी
वापरली जात होती बहुदा! म्हट्ल पहु इथे विचारून!
भात्यातील शेवटचा बाण उरले तो मारून पाहू!
असे म्हटले आणि मी गाडीतुन उतरलो!
पुढे लिहिण्या अगोदर एक वस्तुस्थिति सांगतो! ह्याची
जाणीव त्या दिवशी झाली!
आपल्या मध्ये का कोण जाणे आपल्याच इतिहासाबद्दल एक कमालीचा न्यूनगंड असतो!
आणि त्याच्या जोडीला असते ती कमालीची उदासीनता!
आपल्यालाच आपला इतिहास माहित नसतो आणि
आपण तो जाणूनदेखील घेत नहीं! भारताबाहेर कोणाला इथले पराक्रमी माहित असेल आपण अपेक्षा ठेवत नहीं! तीच गोष्ट आमच्याबाबतीत खरी ठरली!
महाराष्ट्राबाहेर मराठ्याला ओळखत कोण? म्हणून आम्ही कधीच, "पेशवा बाजीराव की समाधी कहा है?
" असे विचारले नाही! का कोण जाणे! अगदी नकळत ही
गोष्ट घडली खरी!
असो!
मग मी त्या शेड पाशी गेलो आणि एक माणसाला
विचारल, "इधर कोई समाधी है क्या?"
"मुझे पता नाही साहब, दादासाहब से पूछो!", असे
म्हणताच एक माणूस आतून बाहेर आला!
हा माणूस म्हणजे दादासाहब!
नाव दादासाहब पण त्याच दिसण अगदी उलट! एकदम
बारीक, दाढ़ीची खुंट वाढलेली
आणि साधारण उंचीचा हा माणूस ‘दादासाहब’ ह्या
खिताबाला साजेसा बिलकुल नव्हता!
मी म्हट्ल, " दादासाहब, इधर कोई समाधी है क्या?"
आपल्या लुंगीला हाथ पुसत त्याने उत्तर दिले,
"समाधी? पेशवा सरकार की समाधी? वो….."
पुढचे शब्द मी ऐकलेच नाहीत जणू!!
पेशवा सरकार!
पेशवा सरकार!!!
इतका मान! इतका आदर!! ते देखील पुण्याहून शेकडो
मैल दूर ह्या उजाड़ रावेरखेड़ी मध्ये!!
आश्चर्य!
मी अक्षरशः बावरुन गेलो आणि नकळत डोळ्याच्या
कडा पाणवल्या!
ज्या महाराष्ट्र देशासाठी हा बाजीराव लढ़ला तिथे
देखील त्याला इतका मान नाही!
महाराष्ट्रात बाजीराव कोण आहे हे देखील माहित नसलेली लोक राहतात आणि माहीत असला तरी
"अरे तो का बाजीराव – मस्तानी वाला?" असे प्रश्न
विचारणारे महारथी देखील आहेत!
आपल्या इतिहासाची काय किम्मत करतो आपण हे निर्लज्जपणे सांगणारे आपण कुठे
आणी ह्या नर्मदेच्या वाळवंटात उभा असलेला हा
गावठी ‘दादासाहब’ कुठे !
मन विषण्ण झालं! आपल्या मराठीपणाची थोडी का
असेना लाज वाटली! जणू ह्या ‘दादासाहब’ ने नकळत
आमच्या अस्मितेचा पोकळ फुगा त्याच्या दोन शब्दांनी फोडला होता. एक सणसणीत चपराकच
गालावर पडली होती!
कोण कुठली इंग्लंडची राणी पण तिला आपली लोकं,
क्वीन एलीझबेथ म्हणतात. अमेरिकेसारखा स्वार्थी देश,
पण त्याच्या राष्ट्रपतीला आपण प्रेसिडेंट ओबामा म्हणतो! जसं कि हा भारताचाच प्रेसिडेंट आहे!
पण जेव्हा आपल्याच देशातील वीरांना आदर देण्याची
पाळी येते तेव्हा आपली जीभ जड होते!
शिवाजी, संभाजी, बाजीराव अशी राजरोस पाने आपण नवे घेतो! तेव्हा कुठे जातो हा मराठीचा अभिमान?
कुठे जाते आपली मराठी अस्मिता? आणि हा कोण
कुठला ‘दादासाहब’! त्याला काय घेणं देणं नसताना
इतका आदर करतो!
पेशवा सरकार!!
ह्या नंतर आम्हाला समाधी सापडली देखील आणि
आम्ही ती पाहून देखील आलो! महाराष्ट्राच्या पुत्राला वंदन केले
आणि नर्मदेच्या पात्रातील जुन्या घाटावर जाऊन स्नान करून आलो!
तिथे काही अवशेष आहेत ते पाहिले, ३०० वर्षे मागे जाण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि परत
निघालो!
परत येताना मी विचारांच्या अधीन झालो होतो! ते नर्मदेच निळ पात्र, एका सच्च्या पण विस्मरणात गेलेल्या योद्ध्याची त्याच्या नावाला न साजेशी अशी पण दुर्लक्षित समाधी
आणि त्या वाळवंटात उभा असलेला तो ‘दादासाहब’!
बाहेर वाऱ्यामुळे मातीचे लोळ उठले होते, आकाशात धुरळा उडाला होता. माझ्या मनात देखील
असाच कल्लोळ मजला होता. दोनच शब्द मनात परत
परत ऐकू येत होते!
पेशवा सरकार!!
पेशवा सरकार!


(लेखकाचे नाव माहिती नाही)

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...