Tuesday, 7 December 2021

काळ्या मातीतल्या स्त्रिया !



'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life - Follow your Passion' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) आठवतो का ? एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात हे नुकतच पार पडलेल्या पद्म पुरस्कार प्राप्त सन्मानार्थींची यादी पहिली की लक्षात येते... त्यातही ती स्त्री असेल तर ? ही एक विशेषच बाब ठरते.


आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात तसे काहीसे विना रोकटोक करायला मिळणे ह्याला नशीब लागतं.. अनेकदा तर जे करायला आवडतं ते करायला काही माणसं आयुष्याच्या अनेक अग्निपरीक्षा देतात, अनेक दिव्यातून प्रवास करतात, कष्ट उपसतात, अवहेलना सहन करतात, तरी अखंड मार्गक्रमण करीत राहतात आणि म्हणून त्या त्या गोष्टीत कौशल्य प्राप्त करतात. एक दिवस उगवतो कोणीतरी ह्याची दखल घेतो आणि त्यांच्या चिकाटीने केलेल्या कामाला मग प्रतिष्ठाही प्राप्त होते. असं होत असेल तर किती आनंद आहे.. नाही ? पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या 'पॅशन' जोपासायला, त्यातून आनंद घ्यायचा निवांतपणा आहे कोणाला ? आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात, अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही. कधीकधी त्या कळतातही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं कसंही,कुठेही, पण मनाची खळगी मात्र इतकी सहज भरत नाही. वास्तविक जगण्यासाठी अंतर्मनाचं समाधान,आत्म्याची तृप्ती जास्त महत्वाची हे कित्येकांना शेवटपर्यंत कळतंच नाही. आपल्याला आवडतात त्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे, त्या अनुषंगाने समाजहित घडवता येणे, त्याबदल्यात उदरनिर्वाहापुरता मोबदला आणि खंडीभरून समाधान मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?


याच महिन्यात देशातील प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राजधानी दिल्लीत वितरण करण्यात आले. यंदा सात मान्यवरांचा 'पद्म विभूषण', १० मान्यवरांचा 'पद्मभूषण' आणि १०२ जणांचा 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव करण्यात आला. १६ जणांना मरणोत्तर 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यंदाचे पद्म पुरस्कार हे नामवंतांचे पुरस्कार नसून ते सामान्य जनतेचे पुरस्कार आहेत अशी चर्चा आहे, ही चर्चा घडण्यामागे मुख्यत्वाने काही मानकरी कारणीभूत ठरले आहेत. यात बहुचर्चित ठरलेल्या अशाच काही ध्येयवेड्या-छंदवेड्या महिलांबद्दल आवर्जून सांगावं वाटतंय.


विपुलतेतही काहीतरी चांगले करण्याची इच्छाशक्तीच नसणारी 'मी' पुरते गुरफटून जगणारी माणसे आपण पहिली आहेत. प्रचंड अभावात जगूनही जवळ आहे ते समाजहितासाठी लुटून देण्याची ही वृत्ती म्हणूनच वाखाणण्यासारखी आहे. शिक्षणाच्या फारश्या संधी उपलब्ध नसताना स्वतःच्या हट्टावर जमेल तेवढे शिक्षण घेतलेल्या, ते अपुरे आहे म्हणून निराश न होता उपलब्ध साधनांतून आवडत्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान मिळवून ते समाजासाठी उपयोगात आणणे हे दिसते तेवढे सोपे असणे शक्य नाही, त्यासाठी प्रचंड मनोबल वापरून संघर्ष या महिलांनी केला आहे. आदिवासी मागासलेल्या जमातीत जन्म घेऊन उदर्निर्वाहापुरते जंगल हुंदळत मळलेली वाटच चोखाळत जगने त्यांच्यासाठी अधिक सोयीचे ठरले असते कदाचित. भोवतालची माणसे अशिक्षित, बाहेरच्या जगाचा फारसा स्पर्श नसणारी मागासलेली असताना आपल्या कार्याचे महत्व त्यांना समजावत किंवा त्यांच्या विरोधाला न जुमानता, लढा देत अनेक दशके तत्वांवर कायम राहत अविरत मार्गक्रमण करत राहणे.. या प्रवासात येणाऱ्या अनेक आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक संकटांना-अडचणींना तोंड देत, मागे सारत न डगमगता कार्य करत राहणाऱ्या या महिलांच्या धैर्याचे आणि चिकाटीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.


या महिलांना पाहून पहिल्या भेटीत त्या वेड्या, अवलिया वाटण्याचीच शक्यता जास्त. या सगळ्या निसर्ग प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि त्या अनुषंगाने आपापल्या छंदांना वाहून घेतलेलया, स्वतःच्या नियमांवर पॅशनेटली जगणाऱ्या स्त्रिया. यांची नैसर्गिक जडणघडणदेखिल निसर्गाला वाहिलेली. निसर्गातूनच घेऊन निसर्गालाच समर्पित करणाऱ्या पण ते करण्याआधी अनेकांचे भले करणाऱ्या या महिला नेमक्या आहेत तरी कोण?



१. वनमुतशी लक्ष्मी

तिला लोकं ''वनमुतशी'' म्हणजे 'जंगलातली मोठी आई' म्हणून ओळखतात, तिला दुसऱ्या बाजूने अनेकजण 'जहर निवारक' असेही संबोधतात. तिचे खरे नाव मात्र लक्ष्मी कुट्टी आहे. लक्ष्मी ७५ वर्ष वयाच्या आहेत. त्या तिरुअनंतपुरममधील कल्लर जंगलात असलेल्या आदिवासी गावात ताडाच्या पानांनी झाकलेल्या एका छोट्या झोपडीत राहतात. लक्ष्मी एक आदिवासी महिला आहे जी डिटॉक्सिफायर (विष उतारवणाऱ्या वैद्य) असण्यासोबतच केरळ फोकलोर अकादमीमध्ये शिक्षिका आणि कवयित्रीदेखिल आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ५०० हून अधिक जडीबुटीच्या औषधांचे सूत्र माहिती आहे. कुठेही लिखित स्वरूपात नसलेल्या या औषधींच्या माध्यमाने अनेक वर्षांपासून फक्त आठवणींच्या आधारे त्या विष भिनलेल्या मरणासन्न रुग्णांवरदेखिल उपचार करतात आणि त्यांचे उपचार रामबाण ठरतात. त्यांच्या छोट्या झोपडीभोवती त्यांनी विविध वनौषधी लावल्या आहेत. जंगलातील औषधांनी विष काढण्यासाठी लांबून शेकडो लोक लक्ष्मी कुट्टी यांच्याकडे पोचतात. परंतु त्यांची उपचारपद्धती केवळ औषधांपुरती मर्यादित नाही, तर त्या रुग्णांशी अत्यंत मायेने आणि नम्रतेने तासनतास बोलतात आणि शरीरासोबतच मनावरही सकारात्मक उपचार करतात.


1950 च्या दशकात तिच्या परिसरातून शाळेत जाणारी ती एकमेव आदिवासी मुलगी होती. गावातील आणखी दोन मुलांबरोबर १० किलोमीटरपर्यंत चालत जावे लागे. गावातून घरून विरोध असतानाही जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी आठवी इयत्तापर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे शिक्षण बंद झाले कारण त्यापुढे शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते. वनस्पती औषधींचे सर्व ज्ञान मात्र त्यांना गावात दाई म्हणून काम करणाऱ्या आईकडून मिळाले. लक्ष्मी कुट्टी आणि तिची आई या दोघींनीही हे ज्ञान कधीही लिखित स्वरूपात मांडले नसल्याने केरळ वन विभागाने त्यांच्या ज्ञानावर आधारित एक पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे योगदान या भूमिकेपुरते मर्यादित नाही. दक्षिण भारतातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी निसर्गोपचाराबद्दल भाषणे दिली आहेत. देशविदेशाचा प्रवासदेखिल केला आहे; मात्र त्यांचे मन त्यांच्या जंगलातल्या छोट्याशा झोपडीतच रमते. लक्ष्मी कुट्टी यांचे स्वप्न आहे की एके दिवशी त्यांची ही झोपडी एक छोटेसे रुग्णालय व्हावे, जिथे लोक दीर्घकालीन उपचारांसाठी येऊ शकतील.


पण निसर्गोपचाराच्या पलिकडे, लक्ष्मी कुट्टी त्यांच्या व्यंगात्मक कविता आणि लेखनासाठीदेखिल ओळखल्या जातात. त्यांनी आदिवासी संस्कृती आणि जंगलाचे वर्णन अशा विविध विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत जे डीसी बुक्सने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कविता समरसून वाचता येतात. त्याचा शब्दसंग्रह सोपा आहे, जो कोणीही गाऊ शकतो.


२. बीजमाता राहीबाई

दुसऱ्या पद्म पुरस्कारार्थी महिला आहेत देशी वाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे. राहीबाईंना पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा राष्ट्रपती कोविंद त्यांना म्हणाले होते ''तुम्हाला काळ्या मातीच्या सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या कार्याला सलाम''. नारीशक्ती पुरस्काराच्या वेळेस पंतप्रधान मोदींनीदेखिल तोंडभरून कौतुक केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच 'बीजमाता' असा उल्लेख केला आणि त्या 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आपण शहरात राहणाऱ्या माणसांना बँक म्हटले कि आठवते ती पैशांची बँक. पण पैशांपेक्षाही महत्त्वांचे काहीतरी असते आणि ते जतन केले पाहिजे असे शहरातील माणसांच्या ध्यानीही येणार नाही. हे महत्त्वाचे जे काही आहे ते जतन व संवर्धन करण्याचं काम राहीबाई ह्यांनी केलं. त्यांच्याच मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली आहे. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५५ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. आपण ज्या पिकांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या पिकाचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना 'बीबीसीच्या १०० वुमन' यादीतसुद्धा स्थान मिळाले आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान तर मिळतेच आहे पण त्यांच्यासारख्या माणसांमुळे भविष्याबद्दलही दिलासा वाटू लागला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.


३. वनदेवी तुलसी गौडा

त्या जंगल संगिनी आहेत. त्यांना जंगलाची भाषा समजते.. त्या जंगलाशी अखंड संवाद साधू शकतात. त्या पद्म पुरस्कार स्वीकारायला तशाच जुनाट पारंपरिक पोशाखात, अनवाणी पायाने दाखल झाल्या आणि चक्क पंतप्रधानांनी त्यांना प्रणाम केला. हा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर वायरल झाला आणि 'कोण त्या?' असा प्रश्न सर्वत्र दुमदुमू लागला. कोण होत्या त्या? त्या होत्या कर्नाटकातल्या होनाली या गावात राहणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञ 'वनदेवी' नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध तुलसी गौडा. 'इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' म्हणजेच ''वनांचा विश्वकोश'' अशी त्यांची ओळख. कर्नाटकातल्या हलक्की या आदिवासी जमातीशी त्यांचा जन्माचा संबंध. या समाजाला वनस्पती आणि त्यांच्या विविध गुणांबद्दल कमालीचे ज्ञान असतं, असे म्हणतात. त्यात एरवी अशिक्षित असणाऱ्या तुलसी ह्यांनी विशेष ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग सामाजिक हिताच्या दृष्टीने त्या गेली अनेक वर्ष करीत आहेत.



तुलसी गौडा आज ७२ वर्षांच्या आहेत, त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. घरात प्रचंड गरिबी. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाहच जंगलाच्या भरवशावर. थोडेफार पैसे कमवायला आई नोकरीवर जात असे, ती नोकरीपण नर्सरीची होती. सतत निसर्गाच्या सान्निध्यात आणि वनस्पतीच्या संगोपनात राहिल्याने वयाच्या १२ व्या वर्षापासूनच त्यांनी या कार्याला सुरुवात केली होती. गेली सहा दशके त्या पर्यावरणासाठी अविरत झटतात आहेत. आजवर त्यांनी ३० हजारांहून अधिक पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी, औषध गुणांनी युक्त झाडे लावलीत. त्यांचे संगोपनही केले. झाडांच्या प्रत्येक भागाचा सखोल परिचय, गुणवत्तेची माहिती त्यांना आहे. या झाडांच्या रोपट्यांपासून ते बियांपर्यंत संगोपन, लागवड आणि जतन करण्याचे कार्य त्या करतात. एवढेच नाही तर तुलसी गौडा त्यांच्या आदिवासी गावातील महिलांच्या अन्यायासाठी देखील त्यांच्या पाठिशी उभ्या राहतात, लढा देतात.



हे अख्खं व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या, निसर्गात राहणाऱ्या अनेक भटक्यांबद्दल मला फार आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी आयुष्यभर मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियाभराचं ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुखा-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत आणि लाखमोलाचं दान आपल्या झोळीत घालत आहेत.. म्हणून तर पुढल्या पिढीच्या वाट्याला शुद्धतेचं वाण पडण्याची शाश्वती वाटते.. नाही ?

अशा जगावेगळ्या मातीतल्या माणसांचा शोध घेऊन त्यांना देशातील सर्वोत्तम पुरस्काराचे मानकरी बनवणे हा देशाचाच तर सन्मान आहे...!



- रश्मी पदवाड-मदनकर  

(27/11/2021 महाराष्ट्र टाईम्सला (आॅल एडीशन) प्रकाशित लेख..)



 हल्ली मी लिहित नाही तुझ्यावर काही 

उल्लेख तुझा ... हवाय कशाला ?? 


पूर्वी असायचा कवितेतल्या प्रत्येक ओळीत 

शब्दाशब्दा मागे छुप्या भावनेच्या खोलात

अलगद हसून केलेला तुझा उल्लेख… 


पण तेव्हा त्या ओळीत असूनही कुठे असायचास तू ?  

अन आज कुठेच नसतोस … तरीही असतोच ना ?

  

उर्दू गझलेच्या काही शब्दांचे अर्थ संदर्भकोशातून शोधावे,  

नाहीच मिळाले तर जुळवून घ्यावा अर्थ लागतो तसा .. 

तसेच काहीसे … 


तसेच काहीसे … 


तुझ्या असण्याचे अन नसण्याचे संदर्भ 

शोधूनही लागत नाही हल्ली… 


संवेदना जाणवत राहतात …. फक्त 


अन त्या संवेदनांचा न लागलेला अर्थ 

शोधत राहते मग मी … प्रत्येक ओळीत 

आणि म्हणूनच … 


जाणून असणाऱ्या या संवेदनांचा 

उल्लेख करायचे सोडून दिलेय मी 


कळतंय का ? 

हल्ली लिहित नाही मी तुझ्यावर काही …


रश्मी पदवाड मदनकर

Thursday, 30 September 2021

विस्मृतीचा शाप ...

 विस्मृतीचा शाप ... 


अंधारलेल्या एखाद्या बोगद्यात शिरावे 

आणि एक एक पाऊल पुढे चालताना 

घूप्प अंधार गवसत रहावा ... 

आकाश, जमीन, प्रकाश 

आणि सजीवांचे भास-आभास 

सगळंच दूर-दूर पुसट होत, 

ठिपका होत नाहीसे होईपर्यंत येऊन पोचावे .. 


नाव, गाव ओळख मिटू लागावी, 

भूत, वर्तमान भविष्याचा संदर्भच कळू नये 

माणसांच्या भेटण्याच्या, त्यांच्या निघून जाण्याच्या,  

घट्ट झालेल्या नात्यांच्या, निसटलेल्या हातांच्या कथा, 

कणकण आनंद, क्षणक्षण दुःखाच्या व्यथा.. आणि

या सर्वात धडपडत तगून-जगून दाखवण्याच्या निष्ठुर प्रथा ..बाष्प होऊन उडून जाव्यात  ..


 रंग, गंध, दृष्टी, स्पर्शाच्या पलिकडे कुठेतरी

वैचारिक, बौद्धिक- मानसिक आंदोलनं

गहिवरलेली स्पंदनं ... विरावीत 

इच्छा-आकांक्षा,अपेक्षांची वाफ व्हावी.  


अनोळखी होत जावे सारे,

आपण चालत रहावे...


अंधाराच्या पटलावर पुढे चमकताना दिसेल काहीतरी

धाव घेऊ नये मृगजळ असेल ते ..


काळाकभिन्न परिसर, फसव्या दिशा 

अनिश्चित अंतरे, अनाकलनीय स्थिती 

अनासक्त प्रवास ... आणि 

अनवट भिवतीच्या अंधार वाटा .. 


कुठे घेऊन जातील... ?


बोगदा अनादी नसतो तसा अनंतही नसतो..

अफाट नसतो आणि अथांगही नसतो .. 

आपण चालत राहावे ... 

प्रकाशाचे किरण चमकून शेवटचे टोक गाठेपर्यंत

आकाश, जमीन, वारा, गवताची हिरवी गार कुरणं 

आणि सजीवांचे भास-आभास परत मिळवेपर्यंत 


पुन्हा गाणी स्फुरेपर्यंत, पुन्हा सूर फुटेपर्यंत 

चालत राहावे .. अनिमिष .. 


बोगद्यातून बाहेर पडलो की मात्र ..  


मन निष्ठूर अन बुद्धी निबर होण्याआत 

भावनांचा चोळामोळा अन संवेदनांचा पाचोळा होण्याआत..


मागून घ्यावा बोगद्यातील भोगकाळाला 'विस्मृतीचा शाप' ... 


© रश्मी पदवाड मदनकर




Tuesday, 28 September 2021

२ विरोधाभासी अनुभव -


आमच्या ऑफिसजवळ म्हणजे दीक्षाभूमीच्या समोरच्या रस्त्याचे काम गेले अनेक महिने चालू आहे. ऑफिसच्या अगदी शेजारी फुटपाथवर याच रस्त्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलची थप्पी ठेवलेली असायची. त्याचाच वापर करून छोटीशी अगदी एकमाणूस नीट उभेही राहू शकणार नाही इतक्या उंचीलांबीरूंदीची झोपडी बांधून एक महिला तिथे राहत असल्याचे लक्षात आले.. पुढे आणखी काही दिवसात दीक्षाभूमीच्या पुढल्या भागाला थोडं समोर गेल्यावर तशीच रस्त्याला लागणाऱ्या ब्लॉकचा उपयोग करून दुसरी झोपडी बनलेली दिसली. आधी असा समज झाला की यात राहणारे ती बाई आणि हा इसम रस्त्यासाठी काम करणारे कामगार असतील.. कामगार असले तरी इतक्याश्या जागेत हे राहत कसे असतील ही जिज्ञासा होतीच म्हणून रोज दुपारच्या जेवणानंतर आम्ही २-३ सहकारी मैत्रिणींनी तिथून फेरी मारायचा शिरस्ता सुरु केला. शिवाय रोजचाच जाण्यायेण्याचा रस्ता असल्याने नकळत आत डोकावले जाऊ लागले.
त्यात असे लक्षात आले की बाई जरा विक्षिप्त आहेत. तिला काहीतरी मानसिक समस्या असावी ती सतत कुणालातरी शिव्या घालत असते.. कुठेतरी पाहत कुणाकुणाची उणीदुणी काढत असते, अगदी सरकारला, प्रशासनाला, कामगारांनाही शिव्या घालते. आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी तर बिचकूनच असतात. ती कुणाशीही सरळ तोंडाने बोलत नाही. ती कधी त्या छोट्याश्या झोपडीत कधी बाहेर बसलेली दिसते. मारायला धावेल की काय अशी सारखी भीती वाटत राहते. पण हिची वाखाणण्यासारखी बाब अशी की ही अत्यंत नीटनेटकी राहते. व्यवस्थित स्वच्छ साडी नेसलेली, कपाळाला टिकली, हातात काचेच्या बांगड्या अगदी पायात सॉक्स आणि त्यावर चकाकत्या जाड्या तोरड्या. तिचं अंगण स्वच्छ, आत सगळं नीटनेटकं. ही स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून खाते.. झोपडीबाहेर दोरीवर धुतलेले कपडे सुकत असतात. आत एखादी चूल असावी, इंधनाची लाकडं तिने झोपडी बाजूला जमा करून ठेवली आहेत. एकदा मी बोलायला गेले.. माझी सहकारी ती मारेल म्हणून घाबरत मला ओढत होती, तरी मी तिच्याजवळ जाऊन बोलून आले. 'आम्ही तुम्हाला काही मदत केली तर चालेल का विचारले?' मात्र सगळ्या जगावर सूड उगवायला आल्यासारखे सर्व जगाला शिव्या घालत तिने ते सपशेल नाकारले. (तिच्या अश्या वागण्याचीही काहीतरी ठोस कारणे असावीत..ती माहिती व्हायला हवीत हा विचार आता स्वस्थ बसू देणार नाहीये.)



हा अनुभव गाठीशी असल्याने पुढे असणाऱ्या झोपडीतल्या या इसमाशी बोलायची बरेच दिवस हिम्मत झाली नाही. पण जेव्हा बोलले तेव्हाचा अनुभव पूर्णतः उलट होता. एकमेकांची अजिबात ओळख नसलेली दोन टोकाची ही दोन माणसे अगदी एकमेकाविरोधी वाटलीत. ती टापटीप - हा गचाळ, ती वाचाळ-हा शांत संयमी हसरा, तिचं घर नीटनेटकं याचं पसाऱ्याचं.. ती साऱ्या जगाला दूषणं लावणारी-हा साऱ्या जगावर भाळलेला. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्याने हसत छान उत्तर दिलीत. इथे का, कसे, एकटे ? त्यावर तो जे बोलला ते अंतर्मुख करणार होतं. तो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळच्या एका छोट्या गावातून पैदल चालत इथवर आलाय. मी विचारलं घरदार नातीगोती सोडून नेमकं कशासाठी? एका वाक्यात उत्तर आलं 'गौतम बुद्ध ज्या कारणासाठी निघाले होते तेवढ्याचसाठी' .. मी स्तब्ध.



तुम्हाला काही मदत केली तर चालेल का ? त्यावर मोठ्या मनानं त्यानं होकार दिला.. त्यातली पूर्ण जेवणाचा डबा देऊन आज मी माझी पहिली इच्छा पूर्ण केली. उद्या थोडे तांदूळ आणि डाळ घेऊन जाणार आहे.
इथून बाजूलाच म्हणजे अगदी दीक्षा भूमीच्या पुढ्यात एक जख्ख म्हातारे आजोबा थेट उस्मानाबादहून एकटे आले होते, ते एकटेच रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. त्यांना एक जेवणाचा डबा दिला तेव्हा त्यांना पाणी हवं होतं. मी पाणी घेऊन गेले नव्हते या व्यक्तीला मी त्यांना पाणी हवे असल्याचे सांगितले, त्याने लगेच त्याच्याजवळचे पाणी एका स्वच्छ बाटलीत भरून त्यांना देण्यासाठी दिले. ज्याला स्वतःलाच मदतीची गरज आहे तो लगेच मोठ्या मनाने इतरांनाही मदत करतो हा अनुभव खूप मनाला भिडला.


अशी माणसे भेटत राहतात असे अनुभव येत राहतात म्हणून आपण बदलत जातो पूर्वीपेक्षा अधिकाधिक प्रगल्भ, अधिक समृद्ध होत राहतो..


- रश्मी पदवाड मदनकर

Saturday, 18 September 2021

म्हणी

सत्यभामा सौंदरमल यांचा संग्रही ठेवावा असा लेख -


 #सिंदळकी_करणार्या_महिलांना_म्हणीतुन_नावं_कशी_ठेवली_जातात

महिलांना नावं ठेवताना ज्या (अर्थात लोक काय म्हणतील) म्हणी वापरल्या जातात त्या कदाचित साहित्यिक भाषेत आढळणं तसं दुर्मिळ.या म्हणी मी माझ्या वस्तीत घरात ऐकत लहानाची मोठी झाले.माझ्या आजीच्या तोंडुन आमच्या शेजारी रहाणार्या बाया यांच्या तोंडुन या म्हणी सतत कानावर पडत असत यालाच #ठिवणीतल्या किंवा दलित साहित्यातील शिव्या असं ही म्हणता येईल.कोणत्या स्त्रियांवर कोणत्या म्हणी लागु होतात याबाबतची ही कंसात माहीती देण्याचा हा प्रयत्न.एखादी महीला दुसर्या पुरुषाच्या(नवरा असताना) प्रेमात पार वेडी झालेली असेल तर आणि ती या प्रेमासाठी काही ही करायला तयार असते तेव्हा तिला काय म्हणतात,
#फिरली_नार_कोषा_मार_फिरली_नार_भ्रतार_मार म्हणजेच नवरा किंवा भाऊ यांचा खून करणे (प्रियकराच्या मदतीने) ती तिच्या प्रेमाच्या आड जे येतात त्यांना ती आपले दुश्मन समजत असते आणि यात अशा महिलांना विरोध करणारे पुरूष म्हणजे एक तर भाऊ असतो किंवा नवरा असतो यालाच नाकात वारं भरलेली बाई असं ही म्हणतात. #नि_नांदीला_बारा_बुधी_अन_फुटलयं_कपाळ_बांधली_चिंधी म्हणजे जी बाई नांदत नाही तिची बूद्धी जास्त चालते ती सारखी फिरत असते ती मागचा म्होरचा कसलाच विचार न करणारी आपल्या न नांदण्यामूळे स्वतः वर लेकरांवर नवर्यावर काय परिणाम होतील,याचा जराही सारासार विचार न करणारी स्त्री या अर्थाने ही म्हण वापरली जाते.#हुरळली_मेंढी_लागली_लांडग्याच्या_मागं ही म्हण साधारणतः एखादी स्त्री एखाद्या अशा पुरुषाच्या प्रेमात पडत असते जो #बाबु_जेवला_पतर_पालथं_अन_झोकुन_देलय_गावाच्या_खाल्तं अशा व्रतीचा असतो जो एका स्त्री वर कधीच टिकुन रहात नाही अनेक स्त्रियांना फसवण्यात तो तरबेज असतो तरीही त्याच्या प्रेमात ही पार वेडी असते तिला तिचं उध्वस्त आयुष्य होणार याची कल्पना असताना देखील. #शिकविन_ते_दुखविन_अन_झोप_ण_तो_मायबाप म्हणजे म्हंजी एखादी बाई मुलगी वाईट वकटं वागायला लागली की,तिला घरातुन काही लोक असं करू नकू तसं करू नकु म्हणत #इज्जतजाईल लोकं काय म्हणतेल बाप भाऊ जीव देतेन,बहिणीचं लग्न होणार नाही,आपल्यात असं नसतं तसं वागणार्या बाया चांगल्या नसतात असं पद्धतशीरपणे संस्कार(बंधने)शिकवले जातात.तर काही लोक तिला तिच्या प्रेमासाठी मदत करतात मग यात प्रियकराची भेट घालून देणं,भेटण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं प्रियकराला भेटताना तिला सर्व मदत करणं यामुळे अशा परिस्थितीत त्या स्त्रीला संस्कार शिकवणारे आवडत नसतात आणि मदत करणारे आवडत असतात.#मी_गेले_खाल्ल्या_घोणं_अन_चाव्हडीत_होते_पन्नास_जणं(खाली मुंडी अन पाताळ धुंडी) एखादी बाई,मुलगी तिच्यावर कितीही बंधणं घातली संस्कार शिकवले बाईचं आयुष्य चूल अन मुल एवढच आयुष्य असं कितीही शिकवलं तरी ती आजुबाजुला काय चाललयं हे जाणुन घेते माहीती घेत असते या अर्थाने (आजच्या परिस्थितीत) #काशा_उपटून_बावच्या_पेरणारी म्हणजे एखादी स्त्री जी मुळातच अगुचर स्वभावाची(स्वतःच्या हक्क मिळवण्यासाठी तत्पर असणारी) तिच्यावर घरात अन्याय होत असेल तर ती घरातल्या त्या सर्वाना पुरून उरत असते. #मी_नाही_त्यातली_अन_कडी_लावा_आतली ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी म्हटली जाते जी बाई दिसताना कशी साधी भोळी वचवच नाही पचपच नाही शांत स्वभाव वगैरे असं असतं पण अचानक कळतं की,तिला एखाद्या पुरुषासोबत ऊसाच्या फडात,तुरीच्या कापसाच्या पाट्यालागवत आणताना, डागवनात सरपण आणायला गेल्यावर परक्या पुरुषाबरोबर #एकावर_एक धरलं जातं.तेव्हा असं बोललं जातं #बडबडीचा_बोभाटा_अन_झिपरीमारी_झपाटा ही म्हण या अर्थाने बोलली जाते जेव्हा एखादी बाई भंडग असते मोकळं खरं बोलणारी असते ती चुकीला चुक खर्याला खरं खोट्याला खोटं ओळखुन ते स्पस्टपणे बोलुन दाखवण्याची तिच्यात धमक असते.पण तिच्या नावाचा वाईट स्त्री म्हणूनच गावभर बोभाटा होत असतो पण जिच्यावर विश्वास असतो किंवा हिला कोण इचारील ?असं जिच्याबद्दल वाटत असतं ती मात्र कार्यक्रम उरकुन येत असते.
#खाय_माझी_भाकर_अन_भोक_माझं_उखर ही म्हण एखादी बाई जी विधवा परित्यक्ता असते तरुणपणात एकटीला आयुष्य जगायचं असतं अशा वेळी ती तिला जो पुरूष हवा असतो ती त्याला कसलाही पैसा धन न मागता जवळची सर्व संपत्ती लावत असते या अर्थाने ही म्हण बोलली जाते.
ही म्हण या अर्थाने त्या बाईसाठी बोलली जाते जी एकत्र अनेक पुरूषांसोबत प्रेमसंबध,एक दोन लग्न करते किंवा वेश्याव्यवसाय करते आणि हे सगळं करूनही तिची परिस्थिती अतिशय हालबेहाल पुर्वीसारखीच रहाते
#घालून_घोरायचं_अन_उठुन_बोम्ब_मारायचं ही म्हण या अर्थाने वापरली जाते जेव्हा बाई गडी सहमतीने संबंध ठेवतात पण जेव्हा त्यांना कुणीतरी पकडलं की मग बाईला लोक नावं ठेवतील म्हणुन यातुन सहिसलामत बाहेर पडण्यासाठी बाई मग त्या गड्यावर आळ घेते की ह्याने मला धरलं किंवा जबरदस्ती केली वगैरे #आली_अंगावर_तर_घेतली_शिंगावर. ही म्हण या अर्थाने वापरली जाते जेव्हा एखादी स्त्री स्वतःहुन एखाद्या पुरुषासोबत झोपण्यासाठी पुढाकार घेत असते आणि जेव्हा ह्या गोष्टीचा बोभाटा गावात होतो तेव्हा बाईला दोष देत गड्याला चहात पडलेल्या माशी सारखं अलगद बाहेर काढलं जातं तेव्हा,त्यो गडी हाय त्याच काय,बाईचं बळच मागं लागल्यास गडी थोडाच नाही म्हणेल!या अर्थाने ती म्हण वापरली जाते सिंदळकी लादली तर लादत असती नाही तर मग #वाळुत_मुतलं_फेस_ना_पाणी अशी गत होत असते असं म्हणतेत की,चोरी अन सिंदळकी झाकता झाकत नसते नाहीत तर मग #आंधळं_उरावर_घ्या_अन_भवताली_बघत #गरगर_फिरे_अन_आपुन_आपला_कंड_आपोआप_जिरे अशी गत होते अन मग #इच्च्याचं_बिर्हाड_पाठीवर म्हणल्यासारखं बाईला लेकरांबाळासहित घराबाहीर हाकलून दिलं जातं.
अशा बर्याच म्हणी आमच्या वरती मध्ये बोलताना वापरलेल्या जायच्या ज्या मी काही विसरले पण मी बोलताना काही म्हणीचा वापर करते.अर्थात या म्हणी वापर महिलांचं दमन करण्यात मोठी भुमिका निभवतात या म्हणी आधारेच महिलांना बंधनात ठेवलं जातं कारण या म्हणीतुन बायांनी सिंदळकी केली तर लोक काय म्हणतील याचा अर्थबोध होतो. बाकी महिलांच्या भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही आजही खेडेगावात महिलांच्या कानावर या म्हणी शब्दाच्या कमी शिव्यांच्या स्वरुपात जास्त पडतात....
सत्यभामा सौंदरमल
निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था
बीड
दिनांक 16/9/2020
Like
Comment
Share

Thursday, 26 August 2021

 या आहेत त्या चारमधल्या दोघी -

स्थळ - शताब्दी चौक, रिंग रोड
विषय - #SaveChildBeggars
वेळ - ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला

शताब्दी चौकात दोनदोनच्या जोडीत या चौघी आळीपाळीने दिसत राहतात. पहिली जोडी आहे १३-१४ वर्ष वयाची आणि हा जो फोटो टाकलाय त्या दोघी असाव्यात २२-२५ तल्या. विशेष म्हणजे चौघींजवळ चार बाळ आहेत.. अगदी छप्पर फाड के दिलंय बघा त्यांना देवाने. ही बाळं एकतर झोळीत निपचित पडलेली असतात किंवा कडेवर रडत, पेंगत बसलेली असतात. दुसऱ्या १३-१४ वर्ष वयाच्या आणखी दोघी मुली आहेत. त्या स्वतःच चिमुकल्या असताना त्यांच्याजवळ प्रत्येकी एकेक चिमुकलं असतं. तुम्ही 'ये किसका बच्चा उठाकर घुमते हो' असं विचारलं की त्या ' मेरा बच्चा है' असं सांगतात आणि तुम्ही पुढला प्रश्र्न विचारण्याआत भरभर भरभर चौक सिग्नल ओलांडून निघून जातात. मग दोन-तीन दिवस गुडूप होतात.
प्रश्र्न असा की प्रत्येकीकडे एक या दराने असे किती चिमुकले असतात यांच्याकडे.. इतक्या ठोकच्या भावाने कुठे मिळतात इतकी लहान मुले ?? एका चौकात इतकी तर शहरात किती .. आणि राज्यात.. देशात ? ही मुले जरा मोठी झाली की काय होतं यांचं.. कुठे जातात ही ? यात मुली असतील तर त्यांचं काय होतं ? यांचं भविष्य काय ? दिवसा असे अत्याचार तर रात्री काय होत असेल ?
या प्रश्नांना उत्तरं नाहीत, त्यांचे कोणीच वाली नाही हे माहीत असूनही गप्प बसवत नाही. ही लोकं, ती छोटी बाळं दिसलीत की छळत राहतात प्रश्र्न.. आपल्याला फक्त बोलता लिहिताच येतं.. निदान तेवढं तरी करावं, ही तळमळ मांडावी पुढे तुमच्या.. म्हणून हा प्रपंच ..
यापुर्वी देखील यावर अनेकदा लिहिलंय त्याच्या लिंक देतेय खाली-
रश्मी पदवाड मदनकर

होऊन जाऊ दे ..


परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली, पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं वाटलं आणि त्यातही स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच तिच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेली पुरणपोळी सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं. मन पुन्हा विचारांच्या हिंदोळ्यावर दोलायमान झाले..


आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्याचं निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे रान करतो. कधीतरी पोचतो तिथवर. इतके कष्ट करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या गुणाचं आपण स्वतःच कौतुक केलं तर ते चुकीचे का ठरावे ?

असाच एक प्रसंग आठवला मागल्या महिन्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलेलो आम्ही. शास्त्रीय गायिका जीव ओतून एकेक बंदिश गात होती आणि ... आणि आम्ही आरोह, अवरोह, मुरक्या, आलापात धुंद होत होतो. तिनं असं काही तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं की कश्याकश्याचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वाह' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्याचे आमंत्रण आले. शेवटच्या संबोधनात तिनं तिच्याच गायलेल्या कुठल्याश्या गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं आणि अनेकजण अवाक झालेत. शेजारी कुजबुज सुरु झाली, काही ठिकाणी हशा पिकला काहींनी चक्क उद्धट टोमणे मारायला सुरुवात केली. का ? तिनं गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियमबियम असतो की काय ?


आपण एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना त्याच्याच आधीच्या सृजनाशी-सर्जनाशी किंवा सादरीकरणाशी करीत असतो... ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व सादरीकरणाहून एखाद्या क्षणात अनवट अनुभवाची अनुभूती होते, उत्तुंग आनंद-समाधानाची जाणीव होते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?


एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो एखाद्या गज़लकाराचा एखादा शेर, कवितेचा काव्यार्थ, लेखकाचा अन्वयार्थ आणि चित्रकाराला अभिप्रेत भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. रसिकांच्या पसंतीस उतरणारे कलेचे सादरीकरण व्हावे हा ध्यास असतो.. अनेकदा तो चाहत्यांच्या नजरेत खराही उतरतो, ही शर्यत त्याने यशस्वीपणे पार केलेली असते. पण स्वानंदाचं काय ? आत्मतृप्तीचा एखादाच असा क्षण उद्भवतो तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्या पुढे सरसावून आत्मिक समाधानाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन गेलेला असतो..


आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला बरे माहित असणार... एखादा आलाप आळवतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री, त्याला लाभलेले तादात्म आपण बघू शकतो, अनुभवू शकत नाही....एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली आनंदाची अनुभूती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी, कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, एखादं काव्य, एखादी कथा त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी असू शकतो. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चित्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी, तुलनेने फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, सृजन केलंय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण कौतुकास पात्रही आहे.


मग अश्या आत्मिक तृप्तीच्या अनुभूतीची परिणिती आपण स्वतःचच मनभरून कौतुक करण्यात झाली तर बिघडलंय कुठं ??

होऊन जाऊ द्यायचे ...निःसंकोच !!


रश्मी पदवाड मदनकर







Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...