Thursday 26 August 2021

होऊन जाऊ दे ..


परवा दुपारी फोन आला मावशींचा, म्हणाली 'अगं पुरणपोळी केलीय, आवडते ना तुला, म्हणून खास फोन केला. संध्याकाळी ये जेवायला'. मी बाहेरगावी होते. नाही येऊ शकणार बोलले तिला. त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली, पण फोन ठेवतांना ती जरा नाराजीतच म्हणाली 'बघ तुला कळत नाहीये तू अत्यंत चविष्ट अस काहीतरी मिस करतेय.' मी निव्वळ हसले. मावशी स्वयंपाक छानच करते हे नाकारता येणारच नाही, पण आज तिला मला बोलवावं वाटलं आणि त्यातही स्वतःचच असं कौतुक करावं वाटलं. खरच तिच्या पन्नास-पंचावन्न वर्षांच्या आयुष्यातील या वेळी तिने केलेली पुरणपोळी सर्वोत्कृष्ट असेल? की उगाच मग स्वतःचीच पाठ थोपटणं. मन पुन्हा विचारांच्या हिंदोळ्यावर दोलायमान झाले..


आयुष्य जगतांना आपण अनेक आवडत्या गोष्टी वेचत पुढे जात असतो. पाहिलेल्या, रुचलेल्या, स्पर्शलेल्या बाबी अंगात भिनवत असतो. एखाद्याचे अंगीभूत गुण नाही आत्मसात करता आले तरी त्याचं निदान तोंडभरून कौतुक करीत असतो. एखाद्या छंदाने नाद नाहीच सोडला तर ते मिळवायला, आत्मसात करायला आयुष्याचा कित्तेक काळ खर्ची घालतो. स्वतःला त्या त्या तंत्रात फिट बसवायला, परफेक्ट व्हायला मग जीवाचे रान करतो. कधीतरी पोचतो तिथवर. इतके कष्ट करून मिळवलेल्या आपल्याच एखाद्या गुणाचं आपण स्वतःच कौतुक केलं तर ते चुकीचे का ठरावे ?

असाच एक प्रसंग आठवला मागल्या महिन्यात एका सांगीतिक कार्यक्रमात गेलेलो आम्ही. शास्त्रीय गायिका जीव ओतून एकेक बंदिश गात होती आणि ... आणि आम्ही आरोह, अवरोह, मुरक्या, आलापात धुंद होत होतो. तिनं असं काही तिच्या स्वरात, आवाजात गुंतवून ठेवलं की कश्याकश्याचंच भान नव्हतं. प्रत्येक आलापाला तोंडून 'वाह' बाहेर पडायचं आणि ते अगदी सहज घडायचं. कौतुक करायची वेळ आलीच तर कुठला तुकडा वगळावा आणि कुठल्याचे तोंडभरून कौतुक करावे हा प्रश्नच पडला असता. गाणी संपली आणि गायिकेला व्यासपीठावर बोलण्याचे आमंत्रण आले. शेवटच्या संबोधनात तिनं तिच्याच गायलेल्या कुठल्याश्या गीताच्या विशिष्ट आलापाचं मनमोकळं कौतुक केलं आणि अनेकजण अवाक झालेत. शेजारी कुजबुज सुरु झाली, काही ठिकाणी हशा पिकला काहींनी चक्क उद्धट टोमणे मारायला सुरुवात केली. का ? तिनं गायलेलं तिनं आवडून घ्यायचं नाही असा नियमबियम असतो की काय ?


आपण एखाद्या कलेचा आस्वाद घेतांना त्याच्या कलेची इतर कलाकारांशी तुलना करीत असतो...परंतु कलाकार स्वतः त्याच्या कलेची तुलना त्याच्याच आधीच्या सृजनाशी-सर्जनाशी किंवा सादरीकरणाशी करीत असतो... ज्या दिवशी त्याला त्याच्या पूर्वीच्या सर्व सादरीकरणाहून एखाद्या क्षणात अनवट अनुभवाची अनुभूती होते, उत्तुंग आनंद-समाधानाची जाणीव होते त्यावेळी त्याने त्याच्या नजरेतल्या त्या उत्कृष्ट कलाकृतीला 'वाह' दिलीच तर त्यात गैर काय?


एखादा क्षण त्या कलाकाराच्या गुणांची परीक्षा घेणारा ठरतो एखाद्या गज़लकाराचा एखादा शेर, कवितेचा काव्यार्थ, लेखकाचा अन्वयार्थ आणि चित्रकाराला अभिप्रेत भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. रसिकांच्या पसंतीस उतरणारे कलेचे सादरीकरण व्हावे हा ध्यास असतो.. अनेकदा तो चाहत्यांच्या नजरेत खराही उतरतो, ही शर्यत त्याने यशस्वीपणे पार केलेली असते. पण स्वानंदाचं काय ? आत्मतृप्तीचा एखादाच असा क्षण उद्भवतो तो क्षण आत्तापर्यंतच्या सर्व क्षणांच्या पुढे सरसावून आत्मिक समाधानाच्या अनुभूतीपर्यंत घेऊन गेलेला असतो..


आतापर्यंतच्या कालावधीत आपल्याच कलागुणांची आपल्याच तुलनेतली उत्कृष्टता आपण आत्ताच गाठू शकलो आहोत हे त्या कलाकाराशिवाय कुणाला बरे माहित असणार... एखादा आलाप आळवतांना त्याचे हरपलेले भान किंवा लागलेली तंद्री, त्याला लाभलेले तादात्म आपण बघू शकतो, अनुभवू शकत नाही....एखाद्या चित्रकाराला एखादे चित्र काढतांना आलेली आनंदाची अनुभूती आपल्या उघड्या डोळ्यांना दिसणाऱ्या दृष्याहून वेगळी, कल्पनेच्या पलीकडची असू शकते. कुणीतरी बनवलेला एखादा पदार्थ, एखादं काव्य, एखादी कथा त्यांच्या त्यांच्या लेखी त्यांच्या त्यांच्या आयुष्याचा मुकुटमणी असू शकतो. त्या पदार्थाहून चविष्ट, त्या चित्राहून सुंदर आणि त्या गीताहून श्रवणीय इतरांना बरच काही मिळेल एरवी, तुलनेने फार उल्लेखनीयही वाटणार नाही कारण आपण फक्त पदार्थ चाखलाय, चित्र पाहिलंय, गाणं ऐकलंय पण ज्यांनी ते प्रत्यक्ष प्रसवलय, सृजन केलंय, अनुभवलंय त्यांना येणारी अनुभूती काही और आहे. त्या क्षणाची प्रचीती खास आहे. आणि म्हणून तो क्षण कौतुकास पात्रही आहे.


मग अश्या आत्मिक तृप्तीच्या अनुभूतीची परिणिती आपण स्वतःचच मनभरून कौतुक करण्यात झाली तर बिघडलंय कुठं ??

होऊन जाऊ द्यायचे ...निःसंकोच !!


रश्मी पदवाड मदनकर







No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...