Tuesday 28 September 2021

२ विरोधाभासी अनुभव -


आमच्या ऑफिसजवळ म्हणजे दीक्षाभूमीच्या समोरच्या रस्त्याचे काम गेले अनेक महिने चालू आहे. ऑफिसच्या अगदी शेजारी फुटपाथवर याच रस्त्यासाठी लागणाऱ्या मटेरिअलची थप्पी ठेवलेली असायची. त्याचाच वापर करून छोटीशी अगदी एकमाणूस नीट उभेही राहू शकणार नाही इतक्या उंचीलांबीरूंदीची झोपडी बांधून एक महिला तिथे राहत असल्याचे लक्षात आले.. पुढे आणखी काही दिवसात दीक्षाभूमीच्या पुढल्या भागाला थोडं समोर गेल्यावर तशीच रस्त्याला लागणाऱ्या ब्लॉकचा उपयोग करून दुसरी झोपडी बनलेली दिसली. आधी असा समज झाला की यात राहणारे ती बाई आणि हा इसम रस्त्यासाठी काम करणारे कामगार असतील.. कामगार असले तरी इतक्याश्या जागेत हे राहत कसे असतील ही जिज्ञासा होतीच म्हणून रोज दुपारच्या जेवणानंतर आम्ही २-३ सहकारी मैत्रिणींनी तिथून फेरी मारायचा शिरस्ता सुरु केला. शिवाय रोजचाच जाण्यायेण्याचा रस्ता असल्याने नकळत आत डोकावले जाऊ लागले.
त्यात असे लक्षात आले की बाई जरा विक्षिप्त आहेत. तिला काहीतरी मानसिक समस्या असावी ती सतत कुणालातरी शिव्या घालत असते.. कुठेतरी पाहत कुणाकुणाची उणीदुणी काढत असते, अगदी सरकारला, प्रशासनाला, कामगारांनाही शिव्या घालते. आंबेडकर कॉलेजचे विद्यार्थी तर बिचकूनच असतात. ती कुणाशीही सरळ तोंडाने बोलत नाही. ती कधी त्या छोट्याश्या झोपडीत कधी बाहेर बसलेली दिसते. मारायला धावेल की काय अशी सारखी भीती वाटत राहते. पण हिची वाखाणण्यासारखी बाब अशी की ही अत्यंत नीटनेटकी राहते. व्यवस्थित स्वच्छ साडी नेसलेली, कपाळाला टिकली, हातात काचेच्या बांगड्या अगदी पायात सॉक्स आणि त्यावर चकाकत्या जाड्या तोरड्या. तिचं अंगण स्वच्छ, आत सगळं नीटनेटकं. ही स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून खाते.. झोपडीबाहेर दोरीवर धुतलेले कपडे सुकत असतात. आत एखादी चूल असावी, इंधनाची लाकडं तिने झोपडी बाजूला जमा करून ठेवली आहेत. एकदा मी बोलायला गेले.. माझी सहकारी ती मारेल म्हणून घाबरत मला ओढत होती, तरी मी तिच्याजवळ जाऊन बोलून आले. 'आम्ही तुम्हाला काही मदत केली तर चालेल का विचारले?' मात्र सगळ्या जगावर सूड उगवायला आल्यासारखे सर्व जगाला शिव्या घालत तिने ते सपशेल नाकारले. (तिच्या अश्या वागण्याचीही काहीतरी ठोस कारणे असावीत..ती माहिती व्हायला हवीत हा विचार आता स्वस्थ बसू देणार नाहीये.)



हा अनुभव गाठीशी असल्याने पुढे असणाऱ्या झोपडीतल्या या इसमाशी बोलायची बरेच दिवस हिम्मत झाली नाही. पण जेव्हा बोलले तेव्हाचा अनुभव पूर्णतः उलट होता. एकमेकांची अजिबात ओळख नसलेली दोन टोकाची ही दोन माणसे अगदी एकमेकाविरोधी वाटलीत. ती टापटीप - हा गचाळ, ती वाचाळ-हा शांत संयमी हसरा, तिचं घर नीटनेटकं याचं पसाऱ्याचं.. ती साऱ्या जगाला दूषणं लावणारी-हा साऱ्या जगावर भाळलेला. मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना त्याने हसत छान उत्तर दिलीत. इथे का, कसे, एकटे ? त्यावर तो जे बोलला ते अंतर्मुख करणार होतं. तो यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड जवळच्या एका छोट्या गावातून पैदल चालत इथवर आलाय. मी विचारलं घरदार नातीगोती सोडून नेमकं कशासाठी? एका वाक्यात उत्तर आलं 'गौतम बुद्ध ज्या कारणासाठी निघाले होते तेवढ्याचसाठी' .. मी स्तब्ध.



तुम्हाला काही मदत केली तर चालेल का ? त्यावर मोठ्या मनानं त्यानं होकार दिला.. त्यातली पूर्ण जेवणाचा डबा देऊन आज मी माझी पहिली इच्छा पूर्ण केली. उद्या थोडे तांदूळ आणि डाळ घेऊन जाणार आहे.
इथून बाजूलाच म्हणजे अगदी दीक्षा भूमीच्या पुढ्यात एक जख्ख म्हातारे आजोबा थेट उस्मानाबादहून एकटे आले होते, ते एकटेच रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. त्यांना एक जेवणाचा डबा दिला तेव्हा त्यांना पाणी हवं होतं. मी पाणी घेऊन गेले नव्हते या व्यक्तीला मी त्यांना पाणी हवे असल्याचे सांगितले, त्याने लगेच त्याच्याजवळचे पाणी एका स्वच्छ बाटलीत भरून त्यांना देण्यासाठी दिले. ज्याला स्वतःलाच मदतीची गरज आहे तो लगेच मोठ्या मनाने इतरांनाही मदत करतो हा अनुभव खूप मनाला भिडला.


अशी माणसे भेटत राहतात असे अनुभव येत राहतात म्हणून आपण बदलत जातो पूर्वीपेक्षा अधिकाधिक प्रगल्भ, अधिक समृद्ध होत राहतो..


- रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...