'सारी उम्र हम मर मर के जी लिये… एक पल तो अब हमें जिने दो, जिने दो' असं म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांना 'When your passion becomes your profession, you will be able to lead up to excellence in life - Follow your Passion' हे सांगून प्रोत्साहन देणारा 'थ्री इडियट' चा रँछो (रणछोडदास) आठवतो का ? एखाद्या ध्येयाने पछाडलेली माणसं इतिहास बदलू शकेल असं कर्तृत्व करून दाखवतात आणि एखाद्या छंदाने वेडी झालेली माणसं प्रत्यक्ष इतिहास घडवून दाखवतात हे नुकतच पार पडलेल्या पद्म पुरस्कार प्राप्त सन्मानार्थींची यादी पहिली की लक्षात येते... त्यातही ती स्त्री असेल तर ? ही एक विशेषच बाब ठरते.
आपल्याला ज्या-ज्या गोष्टी आवडतात, आपण ज्यात रमतो.. पॅशन वगैरे म्हणतात तसे काहीसे विना रोकटोक करायला मिळणे ह्याला नशीब लागतं.. अनेकदा तर जे करायला आवडतं ते करायला काही माणसं आयुष्याच्या अनेक अग्निपरीक्षा देतात, अनेक दिव्यातून प्रवास करतात, कष्ट उपसतात, अवहेलना सहन करतात, तरी अखंड मार्गक्रमण करीत राहतात आणि म्हणून त्या त्या गोष्टीत कौशल्य प्राप्त करतात. एक दिवस उगवतो कोणीतरी ह्याची दखल घेतो आणि त्यांच्या चिकाटीने केलेल्या कामाला मग प्रतिष्ठाही प्राप्त होते. असं होत असेल तर किती आनंद आहे.. नाही ? पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या 'पॅशन' जोपासायला, त्यातून आनंद घ्यायचा निवांतपणा आहे कोणाला ? आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असतो जो कधीच सुटत नाही आणि आयुष्यभर मनातल्या इच्छा मनातच विरून जातात.आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात, अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही. कधीकधी त्या कळतातही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं कसंही,कुठेही, पण मनाची खळगी मात्र इतकी सहज भरत नाही. वास्तविक जगण्यासाठी अंतर्मनाचं समाधान,आत्म्याची तृप्ती जास्त महत्वाची हे कित्येकांना शेवटपर्यंत कळतंच नाही. आपल्याला आवडतात त्या गोष्टी पूर्ण वेळ करायला मिळणे, त्या अनुषंगाने समाजहित घडवता येणे, त्याबदल्यात उदरनिर्वाहापुरता मोबदला आणि खंडीभरून समाधान मिळणार असेल तर क्या बात है .. हे कुणाला नको असेल?
याच महिन्यात देशातील प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते राजधानी दिल्लीत वितरण करण्यात आले. यंदा सात मान्यवरांचा 'पद्म विभूषण', १० मान्यवरांचा 'पद्मभूषण' आणि १०२ जणांचा 'पद्मश्री' पुरस्काराने गौरव करण्यात आला. १६ जणांना मरणोत्तर 'पद्म पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यंदाचे पद्म पुरस्कार हे नामवंतांचे पुरस्कार नसून ते सामान्य जनतेचे पुरस्कार आहेत अशी चर्चा आहे, ही चर्चा घडण्यामागे मुख्यत्वाने काही मानकरी कारणीभूत ठरले आहेत. यात बहुचर्चित ठरलेल्या अशाच काही ध्येयवेड्या-छंदवेड्या महिलांबद्दल आवर्जून सांगावं वाटतंय.
विपुलतेतही काहीतरी चांगले करण्याची इच्छाशक्तीच नसणारी 'मी' पुरते गुरफटून जगणारी माणसे आपण पहिली आहेत. प्रचंड अभावात जगूनही जवळ आहे ते समाजहितासाठी लुटून देण्याची ही वृत्ती म्हणूनच वाखाणण्यासारखी आहे. शिक्षणाच्या फारश्या संधी उपलब्ध नसताना स्वतःच्या हट्टावर जमेल तेवढे शिक्षण घेतलेल्या, ते अपुरे आहे म्हणून निराश न होता उपलब्ध साधनांतून आवडत्या क्षेत्राचे पूर्ण ज्ञान मिळवून ते समाजासाठी उपयोगात आणणे हे दिसते तेवढे सोपे असणे शक्य नाही, त्यासाठी प्रचंड मनोबल वापरून संघर्ष या महिलांनी केला आहे. आदिवासी मागासलेल्या जमातीत जन्म घेऊन उदर्निर्वाहापुरते जंगल हुंदळत मळलेली वाटच चोखाळत जगने त्यांच्यासाठी अधिक सोयीचे ठरले असते कदाचित. भोवतालची माणसे अशिक्षित, बाहेरच्या जगाचा फारसा स्पर्श नसणारी मागासलेली असताना आपल्या कार्याचे महत्व त्यांना समजावत किंवा त्यांच्या विरोधाला न जुमानता, लढा देत अनेक दशके तत्वांवर कायम राहत अविरत मार्गक्रमण करत राहणे.. या प्रवासात येणाऱ्या अनेक आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक संकटांना-अडचणींना तोंड देत, मागे सारत न डगमगता कार्य करत राहणाऱ्या या महिलांच्या धैर्याचे आणि चिकाटीचे म्हणूनच कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
या महिलांना पाहून पहिल्या भेटीत त्या वेड्या, अवलिया वाटण्याचीच शक्यता जास्त. या सगळ्या निसर्ग प्रेमात आकंठ बुडालेल्या आणि त्या अनुषंगाने आपापल्या छंदांना वाहून घेतलेलया, स्वतःच्या नियमांवर पॅशनेटली जगणाऱ्या स्त्रिया. यांची नैसर्गिक जडणघडणदेखिल निसर्गाला वाहिलेली. निसर्गातूनच घेऊन निसर्गालाच समर्पित करणाऱ्या पण ते करण्याआधी अनेकांचे भले करणाऱ्या या महिला नेमक्या आहेत तरी कोण?
१. वनमुतशी लक्ष्मी
तिला लोकं ''वनमुतशी'' म्हणजे 'जंगलातली मोठी आई' म्हणून ओळखतात, तिला दुसऱ्या बाजूने अनेकजण 'जहर निवारक' असेही संबोधतात. तिचे खरे नाव मात्र लक्ष्मी कुट्टी आहे. लक्ष्मी ७५ वर्ष वयाच्या आहेत. त्या तिरुअनंतपुरममधील कल्लर जंगलात असलेल्या आदिवासी गावात ताडाच्या पानांनी झाकलेल्या एका छोट्या झोपडीत राहतात. लक्ष्मी एक आदिवासी महिला आहे जी डिटॉक्सिफायर (विष उतारवणाऱ्या वैद्य) असण्यासोबतच केरळ फोकलोर अकादमीमध्ये शिक्षिका आणि कवयित्रीदेखिल आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना ५०० हून अधिक जडीबुटीच्या औषधांचे सूत्र माहिती आहे. कुठेही लिखित स्वरूपात नसलेल्या या औषधींच्या माध्यमाने अनेक वर्षांपासून फक्त आठवणींच्या आधारे त्या विष भिनलेल्या मरणासन्न रुग्णांवरदेखिल उपचार करतात आणि त्यांचे उपचार रामबाण ठरतात. त्यांच्या छोट्या झोपडीभोवती त्यांनी विविध वनौषधी लावल्या आहेत. जंगलातील औषधांनी विष काढण्यासाठी लांबून शेकडो लोक लक्ष्मी कुट्टी यांच्याकडे पोचतात. परंतु त्यांची उपचारपद्धती केवळ औषधांपुरती मर्यादित नाही, तर त्या रुग्णांशी अत्यंत मायेने आणि नम्रतेने तासनतास बोलतात आणि शरीरासोबतच मनावरही सकारात्मक उपचार करतात.
1950 च्या दशकात तिच्या परिसरातून शाळेत जाणारी ती एकमेव आदिवासी मुलगी होती. गावातील आणखी दोन मुलांबरोबर १० किलोमीटरपर्यंत चालत जावे लागे. गावातून घरून विरोध असतानाही जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी आठवी इयत्तापर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे शिक्षण बंद झाले कारण त्यापुढे शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते. वनस्पती औषधींचे सर्व ज्ञान मात्र त्यांना गावात दाई म्हणून काम करणाऱ्या आईकडून मिळाले. लक्ष्मी कुट्टी आणि तिची आई या दोघींनीही हे ज्ञान कधीही लिखित स्वरूपात मांडले नसल्याने केरळ वन विभागाने त्यांच्या ज्ञानावर आधारित एक पुस्तक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे योगदान या भूमिकेपुरते मर्यादित नाही. दक्षिण भारतातील अनेक संस्थांमध्ये त्यांनी निसर्गोपचाराबद्दल भाषणे दिली आहेत. देशविदेशाचा प्रवासदेखिल केला आहे; मात्र त्यांचे मन त्यांच्या जंगलातल्या छोट्याशा झोपडीतच रमते. लक्ष्मी कुट्टी यांचे स्वप्न आहे की एके दिवशी त्यांची ही झोपडी एक छोटेसे रुग्णालय व्हावे, जिथे लोक दीर्घकालीन उपचारांसाठी येऊ शकतील.
पण निसर्गोपचाराच्या पलिकडे, लक्ष्मी कुट्टी त्यांच्या व्यंगात्मक कविता आणि लेखनासाठीदेखिल ओळखल्या जातात. त्यांनी आदिवासी संस्कृती आणि जंगलाचे वर्णन अशा विविध विषयांवर अनेक लेख लिहिले आहेत जे डीसी बुक्सने प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कविता समरसून वाचता येतात. त्याचा शब्दसंग्रह सोपा आहे, जो कोणीही गाऊ शकतो.
२. बीजमाता राहीबाई
दुसऱ्या पद्म पुरस्कारार्थी महिला आहेत देशी वाणांचे संवर्धन करणाऱ्या बीजमाता राहीबाई पोपेरे. राहीबाईंना पद्म पुरस्कार मिळाला तेव्हा राष्ट्रपती कोविंद त्यांना म्हणाले होते ''तुम्हाला काळ्या मातीच्या सेवेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. तुमच्या कार्याला सलाम''. नारीशक्ती पुरस्काराच्या वेळेस पंतप्रधान मोदींनीदेखिल तोंडभरून कौतुक केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा 'सीड मदर' म्हणजेच 'बीजमाता' असा उल्लेख केला आणि त्या 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आपण शहरात राहणाऱ्या माणसांना बँक म्हटले कि आठवते ती पैशांची बँक. पण पैशांपेक्षाही महत्त्वांचे काहीतरी असते आणि ते जतन केले पाहिजे असे शहरातील माणसांच्या ध्यानीही येणार नाही. हे महत्त्वाचे जे काही आहे ते जतन व संवर्धन करण्याचं काम राहीबाई ह्यांनी केलं. त्यांच्याच मातीच्या घरावर काही पत्रं टाकून त्यांनी आपली बॅंक उभी केली आहे. राहीबाईंच्या बँकेत आदिवासी परंपरेने जपलेल्या ५५ पिकांचे ११४ गावरान वाण आहेत. आपण ज्या पिकांबद्दल कधी ऐकलंही नाही त्या पिकाचं वाण त्यांनी पारंपरिक पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. देशी वाणांचं जतन आणि संवर्धन करणाऱ्या राहीबाई पोपेरे यांना 'बीबीसीच्या १०० वुमन' यादीतसुद्धा स्थान मिळाले आहे. पारंपरिक पिकांचे शेकडो देशी वाण जतन करण्यासाठी राहीबाई यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे शाश्वत शेतीला मोठं वरदान तर मिळतेच आहे पण त्यांच्यासारख्या माणसांमुळे भविष्याबद्दलही दिलासा वाटू लागला आहे. एवढेच नाहीतर त्यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवलाय. त्यांच्या मार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मडक्यात जतन केले जाते. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मूळ नैसर्गिक स्वरूपात जगात कोणत्याही कंपनीकडे नाही.
३. वनदेवी तुलसी गौडा
त्या जंगल संगिनी आहेत. त्यांना जंगलाची भाषा समजते.. त्या जंगलाशी अखंड संवाद साधू शकतात. त्या पद्म पुरस्कार स्वीकारायला तशाच जुनाट पारंपरिक पोशाखात, अनवाणी पायाने दाखल झाल्या आणि चक्क पंतप्रधानांनी त्यांना प्रणाम केला. हा व्हिडीओ झपाट्याने सोशल मीडियावर वायरल झाला आणि 'कोण त्या?' असा प्रश्न सर्वत्र दुमदुमू लागला. कोण होत्या त्या? त्या होत्या कर्नाटकातल्या होनाली या गावात राहणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञ 'वनदेवी' नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध तुलसी गौडा. 'इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट' म्हणजेच ''वनांचा विश्वकोश'' अशी त्यांची ओळख. कर्नाटकातल्या हलक्की या आदिवासी जमातीशी त्यांचा जन्माचा संबंध. या समाजाला वनस्पती आणि त्यांच्या विविध गुणांबद्दल कमालीचे ज्ञान असतं, असे म्हणतात. त्यात एरवी अशिक्षित असणाऱ्या तुलसी ह्यांनी विशेष ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग सामाजिक हिताच्या दृष्टीने त्या गेली अनेक वर्ष करीत आहेत.
तुलसी गौडा आज ७२ वर्षांच्या आहेत, त्या दोन वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारले. घरात प्रचंड गरिबी. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाहच जंगलाच्या भरवशावर. थोडेफार पैसे कमवायला आई नोकरीवर जात असे, ती नोकरीपण नर्सरीची होती. सतत निसर्गाच्या सान्निध्यात आणि वनस्पतीच्या संगोपनात राहिल्याने वयाच्या १२ व्या वर्षापासूनच त्यांनी या कार्याला सुरुवात केली होती. गेली सहा दशके त्या पर्यावरणासाठी अविरत झटतात आहेत. आजवर त्यांनी ३० हजारांहून अधिक पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी, औषध गुणांनी युक्त झाडे लावलीत. त्यांचे संगोपनही केले. झाडांच्या प्रत्येक भागाचा सखोल परिचय, गुणवत्तेची माहिती त्यांना आहे. या झाडांच्या रोपट्यांपासून ते बियांपर्यंत संगोपन, लागवड आणि जतन करण्याचे कार्य त्या करतात. एवढेच नाही तर तुलसी गौडा त्यांच्या आदिवासी गावातील महिलांच्या अन्यायासाठी देखील त्यांच्या पाठिशी उभ्या राहतात, लढा देतात.
हे अख्खं व्यापलेलं क्षीतिज, निसर्ग, त्यातील जीवजंतू यांच्या प्रेमात पडून त्यांचा ध्यास घेत त्यांच्या शोधात बाहेर पडलेल्या, निसर्गात राहणाऱ्या अनेक भटक्यांबद्दल मला फार आदर वाटतो. यांच्या पायाला भिंगरी असल्याने ह्यांनी आयुष्यभर मुशाफिरी करून गोळा केलेलं दुनियाभराचं ज्ञान आणि दर्शन आपण बसल्या जागी घेऊ शकतो. आजही असेच अनेक भटके आपला सुखा-समाधानातला जीव धोक्यात टाकत कुठल्या तरी विषयाचा ध्यास घेत जगभर फिरत आहेत आणि लाखमोलाचं दान आपल्या झोळीत घालत आहेत.. म्हणून तर पुढल्या पिढीच्या वाट्याला शुद्धतेचं वाण पडण्याची शाश्वती वाटते.. नाही ?
अशा जगावेगळ्या मातीतल्या माणसांचा शोध घेऊन त्यांना देशातील सर्वोत्तम पुरस्काराचे मानकरी बनवणे हा देशाचाच तर सन्मान आहे...!
No comments:
Post a Comment