सुरेश आकोटकर यांची प्रतिक्रिया आणि केलेल्या काही सुचना. माझ्या शिकण्याच्या प्रवासात या अनुभवी आणि जाणकार माणसांचे शब्द खुप महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत.
मन:पुर्वक धन्यवाद सर ! 🙏🙏 Suresh Akotkar
रश्मी, नमस्कार .
बीट्स अँड बाईट्स वाचलं .द्वादशीवार दादांनी थोडक्यात एकूणच लेखांच्या संदर्भात छान प्रस्तावना लिहिली .आपल्या मनोगतातूनही आपण या लेखांबद्दलची आपली भूमिका मांडली .जगभरातल्या स्त्रियांच्या शोषणाच्या कथा आणि व्यथा आपण अतिशय तळमळीने मांडल्या आहेत .बहुतेक अनुभव मन विषण्ण आणि विदीर्ण करणारे आहेत .आणि हे शोषण थांबावे असे बहुतेक लेखांच्या शेवटी आपण इच्छा व्यक्त केली आहे .परंतु कितीही निर्मळ मनाने आपण या प्रार्थना केल्या तरी पुढील काळात असे घडेल याची शाश्वती नाही .हजारो वर्षापासून हे घडते आहे .आपण अनेक देशातले संहारकतेचे हिंस्र स्वरूप अनेक लेखातून दाखवले आहे , ते आणखी कोणते आणि कसे संहार घडवून आणतील हे सांगणे अशक्य आहे .वाघासारखे हिंस्र पशू पोटासाठी बळी घेतात पण माणूस नावाच्या जातीला लागलेली ही माणसाच्याच हत्येची भयावह भूक कुठे घेऊन जाईल हे सांगता येत नाही .कितीही कायदे आले आणि आजच्या युगात स्त्री कितीही पुढे गेली तरी महिलांवरचे लैंगिक अत्याचार थांबतील असे वाटत नाही .कारण आजही स्त्रीपुरुष म्हणजे नरमादी हीच भावना अशा घटनांतून दृष्टीस पडते .यातून बलात्कार , हत्या , स्त्री विक्री अशा घटना घडून येतात . सकारात्मकतेपेक्षा मानवाला नकारात्मक गोष्टींचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे .' ब्याडव्यागन इफेक्ट' मधे मरीनाने माणसाची मानसिकता तपासून पाहण्यासाठी अफलातून प्रयोग केला , त्यांतून हेच सिद्ध होते .एखादे दुष्कृत्य करण्याची संधी मिळाली नाही म्हणून तुम्ही सन्मानाने राहता, अशी संधी मिळाली तर भलेभलेही मागेपुढे पाहणार नाहीत हे आपण प्रकर्षाने मांडले आणि ते खरे आहे .स्त्री कितीही विद्वान असो , शालीन असो तिच्याकडे सगळेच आदर्श महिला म्हणून बघतील हा निव्वळ भ्रम आहे .आपण हे सारे मोठ्या पोटतिडिकेने मांडले आहे .धर्मांधता ही पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे आणि तिला आज भयानक स्वरूप प्राप्त झाले आहे .आपण यासाठी ज्या तथाकथित संतांची आणि त्यांच्या भक्तगणांची उदाहरणे दिली आहेत ती सर्वांना माहीत आहे . आसारामची कृत्ये जगासमोर येऊनही त्यांना पूजणारी माणसे आजही ठायी ठायी आढळून येतात .कुमारी मातांचे प्रश्न आपण मांडले आहेत .त्यालाही समाजच जबाबदार आहे .आजही थोड्या रुपयाच्या वा धनधान्याच्या मोबदल्यात एखादी आदिवासी कन्या भोगायला मिळते .तिची ती पोटाची गरज आहे म्हणून दातृत्वाने पुढे येणाऱ्या व्यक्तींची कमतरता नाही . पण आपली विषयवासना तृप्त करणारेही कमी नाहीत .घरातले एक मूल कुपोषित रहावे हेही पोटातल्या भुकेचे द्योतक आहे . केटीची कहाणी आणि तिचा एकूण संघर्ष वाचताना ' ' अरुणाची गोष्ट' आठवली .केटीला संघर्षाला तोंड देता आले , अरुणा बिचारी आयुष्यभर कोमातच जगली आणि गेली . नादियाची कथाही अशीच चित्तथरारक ! बलुचिस्तानमधील जीवघेणी परिस्थिती सर्वांनाच माहीत आहे .एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या हत्या किंवा एसिड हल्ले यावर आपण विस्तृत लिहिले आहे .हे अत्यंत घृणास्पद असले तरी याला एक दुसरी बाजूसुद्धा आहे .मुलांना स्वतःकडे आकर्षित करणे ,त्याला सर्वस्व अर्पण करणे , त्याच्यावर जिवापाड प्रेम दर्शवणे, ..इतके की त्याला दिनरात तिच्याशिवाय काहीच सुचू नये .तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला आणि वेड्यागत मनोवस्था झालेल्या मुलाच्या या अवस्थेला मुलीही तेवढ्याच जबाबदार आहेत .तू माझी नाही तर कुणाचीच नाही या अवस्थेला पोचल्यावर नीती अनिती या साऱ्या गोष्टीला त्याच्या लेखी काहीही मोल नसते . कौटुंबिक कलहालाही अशीच दुसरीही बाजू आहे .अनेक सुस्वभावी माणसांचे संसार निव्वळ बायकोच्या संशयी स्वभावामुळे मोडले आहेत किंवा कसेबसे सुरू आहेत .ही दुसरी बाजू कदाचित आपणांस पटणार नाही पण मला जे दिसते ते प्रांजळपणे मांडतो आहे. आपण काही आशादायक स्वरूपाचेही स्त्रीचित्रण केले आहे .उच्च पदांवर पोचलेल्या महिला , साकोली भागातल्या महिलांनी उभ्या केलेल्या संघर्षात त्यांना मिळालेले यश, शरबत गुल , सुनंदा मोकाशी आदी लेख सुंदरच ! पत्रावरचा लेखही जुन्या आठवणींना उजाळा देणारा . आत्महत्येचे उदात्तीकरणकरण होत आहे का या विषयावरचा लेख विचार करायला लावणारा आहे . सोशल नेटवर्किंगचा उपयोग कसा व्हावा हेही आपण चांगले मांडले आहे .सोशल मीडिया जेवढा उपयोगाचा तेवढाच अनेक वाईट गोष्टी घडवून आणणारा .आजच्या तरुण पिढीला याचे जबरदस्त व्यसन जडले आहे हे सांगायला नकोच .यातून खूप चांगले शिकण्यासारखे असले तरी यातून मोठ्या प्रमाणावर ज्या अनैतिक गोष्टी चालतात त्याला कुठलाही निर्बंध राहिला नाही .लैंगिकतेचे माणसाला पूर्वापार आकर्षण असले तरी आपण कसे व्यक्त व्हावे हे सांगण्यापलीकडे झाले आहे .भावना उद्दिपित करणारे स्वतःचे फोटो टाकण्यास आपण कसे धजावतो हे कळत नाही . गुलजार , स्मिता पाटील व मुबारक बेगम हे लेख आणखी विस्तृत लिहिता आले असते असे वाटते .या निमित्ताने राखी व गुलजार , स्मिता व राज बब्बर यांचे परस्पर वैवाहिक नाते मांडता आले असते आणि ते पुस्तकातल्या लेखांना आणखी जुळले असते .मुबारक बेगमने उतार वयात अतिशय हालअपेष्टा भोगल्या .शिलाई मशीनवर त्या काम करत होत्या असे ऐकून आहे , पण खरे खोटे माहीत नाही .एके काळी ऐश्वर्य भोगलेल्या माणसाचा पडता काळ त्याला कुठल्या गर्तेत नेईल , नेम नाही . एकूणच आपले लेखन आवडले . आपण पत्रकार म्हणून काम केले आहे , त्याचा अनुभव अनेक लेखांतून प्रत्ययास येतो .काही लेख आणखी विस्तृत करता आले असते .प्रत्येक लेखाच्या शेवटी त्याचे पूर्वप्रकाशन देणे आवश्यक नव्हते , कारण हे लेख त्या त्या काळातील असले तरी त्यात उदघ्रुत केलेली परिस्थिती सर्वकालीन आहे . मुखपृष्ठ खूपच छान, पुस्तकाला साजेसे ! एकूणच आपण मांडलेले विचार , त्या विषयीचे आकलन या सर्व गोष्टी वाचनीय आहेत . या पुस्तकाच्या रूपाने आपण एक उत्कृष्ट वैचारिक ऐवज वाचकांस उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !
- सुरेश आकोटकर
No comments:
Post a Comment