(वृत्त - लवंगलता वृत्त)
कोण्या एका संध्याकाळी
भलते घडले होते
रविकिरणांना अलगद कोणी
हाती धरले होते
हाती धरल्या किरणांना मग
अर्पण केले कोणी
नदीकाठच्या कडेकपारी
उजळत गेले होते
त्या मातीचा गंध पसरला
गंधित झाला वारा
रानोमाळी हर्ष दाटला
रंग पसरले होते
आकाशाशी सलगी केली
परतून पक्षी गेले
सांजसावळ्या नभ वेलीवर
चैत्र कोरले होते
अंधाराच्या पटलावर का
थरथर झाला चंदा
चांदण ओले कवेत घ्याया
मन व्याकुळले होते
मिठीत घेण्या दिठीत यावे
अवघे एकच व्हावे
शुभ्र फुलांचा शेला ओढत
नभ पांघरले होते
©रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment