दोन दिवसाआधी 'माया मेमसाब' मुद्दाम शोधून काढून अर्ध्या रात्रीपर्यंत पाहत बसले होते. खूप भावभावनांचा विचारांचा कल्लोळ या सिनेमाने पुन्हा एकदा मनात निर्माण केला. मला वाटतं प्रत्येक कलाकाराची ठरली असते तशी प्रत्येक कलाकृतीची देखील एकेक नियती ठरलेली असते. एखाद्या कलाकृतीचा तिच्या चाहत्यांच्या मनातले स्थान-आदर किंवा प्रसिद्धीच्या झोतात कुठवर जाणार कि मग तशीच विरून जाणार, अडगळीत फेकली जाणार हे कुणालाही सांगता येत नाही. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचे उद्देश वेगळे त्याचा आशय वेगळा त्यातून निघणारा अर्थही वेगळा पण रसिकांना गवसलेला किंवा त्यांनी काढलेला अर्थ वेगळा होतो आणि निर्मात्याच्या मनातली कलाकृती लोकांपर्यंत पोचतच नाही. 'माया मेमसाब' बद्दल मला असेच वाटले. फार पूर्वी एकदा ओझरता पाहिला होता कुठे कसा फारसं आठवत नाही. पण त्यातली गाणी गाण्यांचे शब्द खोलवर आत उतरले होते.
खयाल चलते है आगे आगे
मै उनकी छांव में चल रही हूं…
न जाने किस मोमसे बनी हूं
जो कतरा कतरा पिघल रही हुं
मै सहमी रहती हूं नींद में भी
कही कोई ख्वाब डस न जाये…..
मेरे सरहाने जलावो सपने
मुझे जरासी तो नींद आये….
कसले शब्द आहेत किती डेप्थ. पण इतक्या अर्थपूर्ण गाण्यांचा चित्रपट बाजारू का ठरावा ?? हा तेव्हापासून सतावत आलेला प्रश्न. मग पुन्हा पहिला आणि प्रश्नानं अधिकच भन्नावून सोडलं. 'मिर्च मसाला' 'हिरो हिरालाल' सारखे हटके चित्रपट आणि अनेक माहितीपर डाक्युमेंट्रीज बनवणारे केतन मेहता यांच्या निर्देशनात, पंडित सत्यदेव दुबेंसारख्या थिएटर कलावंत दिग्दर्शकाच्या मदतीने बनविलेला, शब्दांचे जादूगार गुलजारसाब त्यांच्या शब्दांना लयीत बसवणारे हृदयनाथ मंगेशकर आणि या लयींना सुरात गाणारे लतादी आणि कुमार शानू, शिवाय दीपा साही, फारूख शेख, राजबब्बर, शाहरुख आणि परेश रावलसारखे कसलेले सिनेकलावंत, संपूर्ण सिनेमाभरच सौन्दर्याचे व्हिज्युअल ट्रीट देणारे सिनिऑटोग्राफर अनुप जोतवानी .. इतकी दिग्गज मातब्बर कलाकार मंडळी निव्वळ शारीर पातळीवरच्या सीग्रेड बाजारू चित्रपटासाठी एकत्र आले असतील ?? की त्यांना यापलीकडे खूप गहेराई असलेलं अनुभूतीच्या पातळीवरचं वेगळं काहीतरी सांगायचं होतं ? ही संवेदनशील बुद्धिवान माणसं निव्वळ इहवादी भूमिका सांगणारा नव्हे तर काहीतरी शाश्वत, चिरंतन सत्य, भोगवादाच्या पलीकडे असणाऱ्या आत्मिक भावनिक पातळीला स्पर्शणारे तत्वज्ञान सांगू इच्छित असावे असे मला उगाचच वाटत राहिले. हा तो काळ होता जेव्हा संस्काराच्या जोखडाला बांधून घेऊन फरफटत चाललेली माणसे डोळ्यावर झापड बांधून चालत असावी म्हणूनच त्यांना अर्थाच्या खोलात डोकावून पाहता आलेच नसावे त्यांच्या आकलनशक्तीला न झेपलेला आणि म्हणून बाजारू ठरून उगाचच बदनाम झाला असावा; आता सिनेमा पाहिल्यावर असे वाटायला खूप वाव मिळाला.
अगदी सुरुवातीच्या एका सिनमध्ये चारू (फारूख शेख) मायाला म्हणतो ''तेरे नीली आँख के भँवर बड़े हसीन हैं, डूब जाने दो मुझे, ये ख़्वाबों की ज़मीन है'' सारा सिनेमाच या गुलजारच्या 'ख़्वाबों की ज़मीन' वर बेतलेला. कोण आहे ही ख्वाबोची माया ? माया म्हणजे निव्वळ तारुण्याने सौन्दर्याने मुसमुसलेली बाई नव्हे...माया हे रूपक आहे..यात ती स्त्री होती तीच्या ऐवजी मोह वाटणारं काहीही असू शकलं असतं का ? ती खरतर फक्त माध्यम होती प्रत्येकात ठासून भरलेल्या मोहमायाचे खरे स्वरूप उघड करणारी. फ्लॉबेर या फ्रेंच लेखकाची ”मादाम बोव्हारी” नावाच्या कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा असला तरी त्याला भारतीय स्वरूप देतांना दिग्दर्शकाने केलेल्या प्रयत्नांना काही प्रेक्षकांच्या मान्यतांनी अश्लील नाव देऊन त्याकाळात पाणी फेरले हे निश्चित. विदेशी कादंबरी हा पुर्वग्रह ह्याला कारणीभूत असावा. असे असले तरी 'माया मेमसाब'ला एक अजरामर कलाकृती म्हणून स्थापित व्हायला कोणीच रोखूही शकले नाही हे सत्य नाकारता येत नाही.
गुलजारच्या '‘भीगे भीगे मौसम में, क्यूं बरखा प्यासी लगती है, जी तो खुष होता है पर एक उदासी रहती है’' या शब्दांतून माया उलगडू लागते.
''खुद से कहना जाती हूँ मैं
खुद से कहना आई मैं
ऐसा भी तो होता है ना
हल्की सी तनहाई में
तनहाई में तस्वीरों के चेहरे भरते रहना
खुद से बातें करते रहना, बातें करते रहना''
बालपणीच आई गमावलेली, एकटेपणात हरवलेली पण जगण्याची जिजीविशा अशी कि सतत स्वप्नांच्या हिंदोळ्यावर झुलणारी सुखाच्या मागे धावणारी, नीतीनियम, परंपरा झुगारुन प्रेमाच्या शोधात मर्यादा ओलांडणारी माया. 'इस दिल में बसकर देखो तो ये शहर बड़ा पुराना है हर सांस में एक कहानी है हर सांस में अफ़साना है' म्हणत शहर शहर भटकणारी माया..तिचे अनेक रूप आहेत. ज्याने जशी बघावी तशीच दिसते माया... एका ठिकाणी माया स्वतःशीच बोलताना म्हणते, "बहोत थक हार गयी हूं मैं, यह माया मुझें बहोत थकाती है" यावरूनच कळतं माया नुसतंच स्त्रीनाम नाही.
''धूप से छनती छाँव ओट में भरना चाहूँ, आँख से छानते सपने होंठ से चखना चाहूँ'' म्हणत ती कधी तुमच्या मनाचा ठाव घेते तुम्हालाही कळत नाही.
माया हवीहवीशी, अप्राप्य, जगावेगळी, स्वप्नासारखीच भासते. पाय जमिनीला टेकतात, स्वप्न तुटतात, विश्वास गमावते, नाती हरवतात, जगण्यातली सापेक्षता समजलेली माया, तरी शेवटालाही तिलस्मी जल पिऊन काहीतरी जादू घडेल असे वाटणारी माया. 'मन साफ होगा तोही जादू काम करेगा' असे जादूगाराने सांगितले असते., प्रेक्षकांनी नावे ठेवलेल्या या मायावर मात्र ही जादू काम करते आणि ती पूर्ण प्रकाशमान झालेली आरश्यात दिसते आणि नाहीशी होते...असं का होतं? कारण माया सत्य होती, तुमच्या आमच्यातले सच्चे प्रतिबिंब तीनं दाखवले, मुखवटे घालून वावरणाऱ्यांचे बुरखे फाडले, वास्तवाचे भान दिले.. मोहमायेत अडकलेली माणसे राहिलीत इथेच शिल्लक; माया मात्र वास्तवात, स्वप्नात या तकलादू आयुष्यपलीकडे तिच्या कल्पनेच्या दुनियेत विलीन झाली. खूप सारे प्रश्न मात्र तिने तसेच अनुत्तरित ठेवले.. न जाने यह कैसी माया है.
“इक हसीन निगाह का दिलपे साया है.. जादू है जुनून है, यह कैसी माया है..”
©रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment