पाषाणागत उभी सावली
गर्द काजळी शून्य एकटी
भग्न मनाच्या गुहेत दडली
एक कहाणी घुसमटलेली
अर्ध्या उघड्या दाराआडी
कंकणांची होते किणकिण
अगतिक अन उदास पोकळ
भरल्या डोळी भकास मिणमिण
आर्त कोवळी हाक अनावर
थिजून आहे आत अधांतर
वाट पाहता थकले लोचन
स्वप्नांमधली वाटच धूसर
आकाशवेदना उष्ण कवडसे
अंगणभर बघ बसले पसरून
तू जाता मग सारेच विझले
आले वादळ उगाच उसळून
कितीक वळणे या वाटेवर
अंधारलेली काळीकभीन्न
कितीही येवो वादळवारा
एक ज्योत जपलीय पेटवून.
रश्मी मदनकर
२३.०२.18
No comments:
Post a Comment