Thursday, 1 February 2018

धर्मा... तू का मेलास बाबा ??


 धर्मा पाटील यांचा मृत्यू ही संवेदनशील जीवाला चटका लावून जाणारी घटना आहे. पण समाजात अश्या घटनांनंतर माणसांची जी रुप पाहावयास मिळतात ती अधिक क्लेशकारक आहे. काहींच्या पोस्ट वाचल्या आणि मन फार उद्विग्न झालं. इतका काय स्वार्थी झालाय साधारण माणूस सुद्धा. राजकारणाचेही राजकारण करण्याइतका.. प्रत्येक घटनेचे भांडवल करून, आग लावून त्या निखाऱ्यांवर पोळी भाजून घेण्याइतका स्वार्थी. एवढाच काय तो आयुष्याचा उद्देश राहिलाय का ? किती मुखवटे घालायचे अजून  .. अंतर्मुख करायला लावणारी हि घटना आहे...
विचार करायला हवा.


*********************************************************
धर्मा
तू का मेलास बाबा..

दुनिया अशीच आहे .. हे ठावूक नव्हतं का तुला ?

तुझ्या जगण्यात ज्यांना तीळमात्र रस नव्हता
ते तुझ्या मरणाचं आता भांडवल करत सुटतील
तुझ्या माती झालेल्या जिवावर हे स्वतःची चांदी करतील.
तुझ्या जगण्याच्या संघर्षात वाऱ्यालाही न येणारे
तुझ्या मरणाला हवा देत राहतील..
निखारा पेटता राहो म्हणून फुंकर घालतील ..
हे ठावूक नव्हतं का तुला ?

तुझ्या भुकेची काळजी दाखवून शब्द शब्द पेरतील
तुझ्या फाटक्या संसाराची गत पाहणार नाही
तुझी जात हुडकून काढतील.
तू जात धर्माच्या मुद्द्यावर का मेला नाहीस
याचं दुःख ओळीओळीत  मांडतील ...
तू मेलास याहून अधिक तू त्यांच्या फायद्याचा फार ठरला नाहीस
याची तडफड होईल भुरट्या कवींची ..कारण
जातीवर भाकर भाजून घेणं यांच्या नसनसात भिनलंय
हे ठावूक नव्हतं का तुला ?

धर्मा ...तू का मेलास बाबा ..??

तुझ्या मरणानं समाजकंटकांच्या मेंदूचे दिवे पेटतील
ते रस्त्यावर उतरून दोन पाच मोर्चे काढतील
आंदोलनं छेडतील...दंगे घडवून आणतील..
जाळ-पोळ करतील, मारामारी होईल 
साधारण माणसांचं जगणं दुर्धर करून सोडतील ..
बातम्यांच्या चौकटीत बसून हिरिरीनं प्रतिवाद मांडतील 
भांडभांड भांडतील आणि अॅक्टीविस्ट म्हणून नाव कमावून
पुरस्कारावर पुरस्कार झेलत जातील..
हे ठावूक नव्हते का तूला ??

आता राजकारण पेटेल..
शासनदरबारी तुझे कुणालाच सोयरसुतक नव्हतेच कधी
आता खुर्चीवर बसलेली माणसं परत मुग गिळत राहतील
खुर्चीला हपापले डावे-उजवे, तुझं गाडलेलं-जाळलेलं कलेवर
खांद्यावर घेऊन मिरवत राहतील.. अखंड..
तुझ्या नावाचा जप करत प्रसन्न करतील
जनता जनार्दनास ..आणि मागून घेतील वर
शासक होण्याचा ...
ठावूक नव्हते का तुला ??

तुझ्या मृत टाळूवरचे लोणी ओरबाडून
संपन्न होतायत ही लोकं ..
काही लेखक-कवींचं फावतंय बघ ..बंडखोर म्हणून नावाजले जाताहेत...
प्रतिष्ठित होत चाललेत काही तथाकथित अॅक्टीविस्ट ..
राजकारणात खुर्च्या हलायला लागल्या ..शासन पालटतंय
इतका तर तू बलशाली होतास  .. महत्वपुर्ण होतास
हे ठावूक होतं का तुला ??

धर्मा
तू का मेलास बाबा..

रश्मी पदवाड मदनकर
१ फेब. २०१८ 


No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...