Wednesday, 16 July 2014

नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...!!!



स्त्रियांच्या अनुषंगाने पाहिले तर सध्या सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले दिसत आहे...नुसते बघत राहून बदलाची अपेक्षा करत बसने; परिस्थिती सध्या यापलीकडे वळसा घालून पोचलेली आहे. आता बदल अनिर्वार्य आहे यापुढे एकतर आपण आपल्या आवडीचा मार्ग बदल म्हणून निवडायचा आहे किंवा परिस्थिती तिच्या अनुषंगाने आपल्याला बदलायला भाग पाडेल.... अजूनही वेळ आहे, अजूनही जरुरी नाही परिस्थितीच्या ओघानेच वाहवत गेले पाहिजे. दुसरा कुठला तरी जास्त चांगला आणि सामाजिक परिस्थितीला पोषक असा ऑप्शन असेल तर कठीण आणि दूरचा असला तरी आवर्जून तो मार्ग निवडायला हवा. प्रत्येकवेळी आपल्या पुरता सोपा मार्ग तात्पुरता सोयीचा असू शकतो पण पुढे हीच सोय मोठ्या प्रमाणात गैरसोय घेऊन येईल आणि मग परत परिस्थितीचा पालट आपल्यालाच परवडणारा राहणार नाही.....


मला अजूनही आठवतं ....वर्षभरापूर्वी मुंबईला लोकल ने प्रवास करतांना एक गोड चिमुकली तिच्या आई कडे गजरा हवा म्हणून हट्ट करत होती. तसे तिच्या आईने डोळे वटारले. पुढे पैंजण,ब्रेसलेट विकणारी आली तशी चीमुक्लीची वळवळ परत सुरु झाली हे सर्व बघून मी जरा हसले तशी तिची आई सांगू लागली ...पहा ना कॉन्वेंट मधे मुलीना बांगड़या, गजरे, मेंदी, पैंजण अलाऊ करत नाहित, कानातलेपण अगदि छोटेसे सोन्याचे चालतात....सोन्याचे कानातले 2,3 वेळा कोणीतरी काढुन घेतले...कोणावरही विश्वास ठेवावा वाटत नाही अगदी पाळणाघरातल्या लोकांवर पण नाही,.तिला कामवालीने स्कूलबस मध्ये बसवले की कामवालीला लगेच मला ऑफिस ला फोन करुन सांगायला लावते,,मुलीला मी अजिबात न लाजता आपलं शरीर, पुरुषांच्या नजरा, लोकांचे अनावश्यक स्पर्श, गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो सारं सांगितलंय, शाळेचा शिपाई, बस चा ड्राइवर, आजुबाजुचे दादा, चाँकलेट देणारे काका … सारं सारं समजावलं !. एक सांगु.. अगदि तिला एकटं असतांना मी तीच्या वडिलांसोबत सुद्धा एकटं सोडत नाही .माणसाच्या मनाचा काय भरोसा? भीती वाटते सारखी, तिला दिवसभर मी नसते म्हणुन कराटे क्लास, डान्स क्लास, स्केटिंग, स्विमिंग अश्या ठिकाणी बिझी ठेवते. कामावरुन येऊन मी तासभर तिच्यासोबत खेळतें,! मुलीची जात आहे जपलं पाहिजे ! हल्ली खुप काळजी वाटते" एवढ़यात तिचं स्टेशन आलं आणि ती उतरली.....ट्रेन धावू लागली आणि माझे विचारचक्र सुद्धा गती घेऊ लागले..चिमुकलीचा तो निरागस चेहेरा डोळ्यासमोरून हलत नव्हता ..किती कठीण आहे हे सगळं. मलाच कळेना काय करावं. त्या मुलीला जपणाऱया आईचं कौतुक करावं की त्या झाकोळलेल्या कळीची दया करावी.... या 8 वर्षाच्या अपुऱया वयात आपल्याच लोकांबद्दल, आजू-बाजूच्या परिसराबद्दल पर्यायाने जगाबद्दल किती अविश्वास पेरला जातोयं! त्या चिमुकल्या वयात खेळायला- बागडायला संपूर्ण अवकाश मोकळं असायला हवं खरतर ...सगळीकडून लाड होणारे वय, कुठेही जगाचे हेवे-दावे न समजणारे वय...शंका, भीती, चूक-अचूक कसलाही नामशेष मनात राहायला जागा आहेच कुठे या चीटूकल्या मनात ...आणि सामाजिक वातावरण गढूळ झालंय यात त्या निरागस जीवाचा काय दोष?

पण... पोरीसाठी जीव तुटणाऱ्या त्या आईचा तरी काय दोष??

मुलीची अब्रू हि तिच्या शरीराच्या एका छोट्या भागावर अवलंबून आहे असे मानणारा आपला समाज...आणि जन्मभर त्याचीच काळजी करत सुटलेला पण त्या शरीरात असलेल्या मनाचं काय? शरीर स्पर्शाने बाटले तरी मनावर जन्म भरयाचा परिणाम होणारच असतो.....फक्त 'स्पर्शामुळे' नाही तर हि समाजमान्य बाब नाही आता समाज काय म्हणेल आपल्याला हिनवेल या भीतीपोटी पण शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून त्यासाठी जपणूक होतांनाही मनावर परिणाम होत आहेच ना...क्षणाक्षणाला ते तुटते आहे, दुखते आहे, मोकळं राहायला आनंदी राहायला झुरते आहेच ना??..... ...मग परिस्थिती गढूळ झालीय म्हणून एका निश्चल-निष्पाप जीवाला कोंडून ठेवणे, दाबून ठेवणे हा उपाय आहे काय?...कोणीतरी बाहेर मुलीच्या मनाचे तुकडे करू नये म्हणून आपणच तिच्या मनाला वेगळ्या मार्गाने मारत नाहीयोत का?? आणि हे सर्व अगदी जन्मापासून ..का तर मुलगी आहे म्हणून....हा मार्ग आपण का स्वीकारला?? या समस्येच्या उत्तरादाखल दुसरे कोणतेच ऑप्शन दुसरे मार्ग नाहीच आहेत का ?? कि आपल्यालाच हा मार्ग जास्त सोयीचा वाटतो?


समस्या अनेक आहेत, तसे आपल्या मनात साठलेले प्रश्न देखील अनेक आहेत....पण नुसते प्रश्न उपस्थित करून कसे चालेल...प्रश्न निर्माण झाला आहे तर उत्तर शोधायलाच हवे...प्रत्येक पिढी सामोरचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती सुद्धा वेगवेगळी ...शेजारच्या घरी मुलगी दुखावली किंवा शेजारच्या मुलाने कुणाची तरी मुलगी दुखावली तर 'मला काय त्याचे' हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही किंवा स्वयंकेंद्री झाल्याने लागलेल्या आगेतून आपण आपले घर बचावले एवढीच भावना उपयोगाची नाही आग पसरणार असेल तर त्याची झळ तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोचणारच....आसपासच्या घटनांचे आपल्यापासून अलिप्त राहणे सुद्धा आपल्याला झेपणारे नाही...तेव्हा वेळीच जागे झालेले बरे...प्रश्नांची उत्तर शोधायला किंवा पर्याय म्हणून तरी एक नवी पिढी उभी करायला हवी आणि जशी प्रत्येक स्त्री एक संसार उभा करते तसे तिने पोषक समाज घडवून आणायला हाथभार लावायला हवा ....प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा अस वाटत असेल तर प्रत्येक आईला आधी जिजाऊ म्हणून जन्म घ्यावा लागेल...


स्त्री हि जन्मदात्री आहे. जन्मदात्री म्हणजे नर किंवा मादी जन्म देणारी नाही, तर नर किंवा मादीच्या माध्यमातून 'माणूस' जन्माला घालणारी. संस्काराचं बीज पेरून पोषक, समंजस पिढी घडवणारी....स्त्री ने मनाशी ठरवले तर काय नाही होणार ? पदराला गाठ बांधून पदर खोचून तयार होन्याचीच काय ती वाट आहे.......मुलगी मुलगा भेद न करता एकमेकांबद्दल आदर, बाहेरील शारीरिक आवरण बघून आकर्षित होऊ नका तर त्या आवरणाच्या आतल्या खर्या माणुसरुपी मनाला आकर्षित व्हा, त्यावर प्रेम करा हि पहिली शिकवण आपण आपल्या घरून मुलांना देऊया ...मुलीकडे 'वासना' या दृष्टीकोनाने बघणाऱ्या आपल्या पुढल्या पिढीतला 'पुरुषी दृष्टीकोन' चेंज करायचा पूर्ण प्रयत्न करूया एवढेच नाही तर मुलगा हा निव्वळ बलात्कारी किंवा दृष्ट असतो असेही नाही त्याच्या हृदयात देखील बापासारखे आणि भावासारखे निर्मळ एक मन असते हे मुलींना समजून सांगूया...उद्याच्या तरुण पिढीच्या प्रेम आणि मैत्रीच्या व्याख्या बदलण्यास मदत करूया. शरीराच्या पलीकडे मन जुळणे आणि नाती टिकवणे हाच खरा सौख्याचा गाभा आहे हे या पिढीत ठासून भविष्यासाठी पेरणी करता येईल असे काहीतरी करून दाखवण्याची वेळ आता आलेली आहे .....चला सख्यांनो नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...



No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...