Thursday 31 July 2014

स्केटिंग वरून विश्वविक्रमी झेप !!

















" आज कुछ तुफानी करते है " किंवा मग "डर के आगे जीत है " तसे पाहिले तर नुसत्या जाहिराती; पण अगदी शब्दशः असे वागणारे आणि विक्रमी दौड मारणारे आपल्यातच कुठेतरी दडलेले असतात...गरज असते नजर उचलून बघण्याची....हल्लीच नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास पार पाडला....केवळ अकरा दिवसात हा प्रवास यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या चमूच्या विक्रमाची नोंद आता जागतिक स्तरावरील 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक' मध्ये करण्यात येणार आहे....

विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली हि मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते...त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या...काही दुखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जाव लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे हि मुल कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्यात त्यांनी केलेल्या साहसी कृत्याच्या अभिमानाची झळक जाणवत नव्हती तर जाणवत होता तो त्यांचा ओथम्बुन वाहणारा आनंद....

या विक्रमी मोहिमेचे सूत्रधार होते इंडियन स्केटिंग अकादमीचे कोच श्री गजेंद्र बनसोड..गजेंद्र बनसोड हे मागल्या अनेक वर्षांपासून मुलांना स्केटिंग चे नवनवे टेक्निक शिकवण्यात गुंतले आहेत..या मुलांसोबत मिळून काहीतरी नवीन करून दाखवण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी या आधी सुद्धा केले आहेत..पण यावेळी काहीतरी 'धाडसी' अविश्वसनीय अस करून दाखवायचं यांच्या मनात होतं आणि 'चाह है तो राह है' या उक्ती नुसार मार्ग सापडत गेले...कुठल्याश्या एका प्रसंगात नागपूर महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी यांचेशी भेट झाली...योगायोगाने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती निमित्त्य काहीतरी वेगळे करायचे मानस यांच्या मनात देखील होते..तसे त्यांनी बोलून दाखवले...स्वामी विवेकानंदाची समाधीस्थळ असणारे कन्याकुमारी या पवित्र स्थळापासून ते आपल्या नागपूर पर्यंतचा प्रवास स्केटिंग वरून करायचा अशी कल्पना गजेंद्र बनसोड यांनी मांडली आणि संपूर्ण कार्यक्रमाची जवाबदारी स्वीकारून दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम संपूर्ण तयारीनिशी सोबतीला उभे राहिले...

ते क्षण आठवून गजेंद्र बनसोड म्हणतात "हे सगळं जुळून आल तो क्षण आनंदाचा होता पण हरकून जाऊन चालणार नव्हतं..आणखी बरीच काम होती बरेच चालेन्जेस होते, लोकांचे टोमणे सुरु झाले होते..कुणालाही या मोहिमेच्या यशस्वीतेवर विश्वास नव्हता..मला अनेकांनी मुर्खात काढले..पण मला हे चाल्लेंज स्वीकारून यशस्वी करूनच दाखवायचे होते आणि त्यासाठी कुठल्याही अग्निदिव्याला सामोरे जावे लागले असते तरी आता मी त्याला तयार होतो" मग सुरु झाली रोज १५० ते २०० किलोमीटर ची प्रवासी प्रक्टिस...मुलांची स्ट्रेन्थ वाढावी म्हणून पालकांचे प्रयत्न सुद्धा सुरु होतेच...प्रक्टिस बरोबरच काही मुख्य जबाबदारया सुद्धा पारखून घ्यायच्या होत्या त्यासाठी म्हणून मग दयाशंकर तिवारी गजेंद्र बनसोड आणि काही पालकांची एक चमू मार्ग निश्चिती, थांबे, जेवणाची सोय, संरक्षणाची माध्यमे, परवानगी या सर्व तयारी करण्यास कन्याकुमारीला जाउन आले...मनाशी खुणगाठ पक्की असल्याने आता सर्व अडचणींना दूर सारून सगळ निट ठरलं होतं...पण अजूनही एक मुख्य अडचण होती ती म्हणजे पालकांचा विश्वास संपादन आणि या मोहिमेशी जुळलेल्या त्या साहसी बहाद्दूर मुलांचे मनोबल खचू न देणे...हे प्रयत्न पूर्वक करत राहावे लागले...त्यातही एका खेळाडूचा या दरम्यान अपघात झाला त्याच्या हाताला इजा झाली आणि त्याचे येणे टळले..अश्याही प्रतिकूल परिस्थितीमधून इतर मुलांना मानसिक स्थैर्य देत मोहिमेसाठी तयार केले गेले....

शेवटी तो दिवस उगवला...२३ विक्रमवीर, श्री दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम, पालकव्रुंद, डॉक्टर्स आणि कॅटरिंग असा एकूण ५५ जणांचा ताफा बाय रोड कन्याकुमारीला पोचला...संरक्षणाच्या दृष्टीने मुलांबरोबर प्रवास करता यावा म्हणून काही पालकांच्या दुचाकी गाड्या ट्रान्सपोर्ट ने पुढे पाठवण्यात आल्या होत्या...एक तारखेला पोचून रात्रभर्याच्या विश्रांती नंतर लगेच दुसरे दिवशी म्हणजे दिनांक २ जानेवारी २०१3 रोजी सकाळी ८ वाजता कन्याकुमारीच्या (तामिळनाडू) मंदिरासमोरून आमदारांनी हिरवी झेंडी देताच विश्वविक्रमाच्या दिशेने पहिले पाउल टाकत वैदर्भीय झेंडा रोवण्यास उत्सुक होत सुरुवात झाली....पहिल्या दिवसाचा अनुभव सांगतांना स्वप्नील समर्थ हरखून जात सांगतो.."पहिल्या दिवशी कशाचाही अंदाज नव्हता..कुठलीही पर्वा न करता स्केटिंग करत पुढे जात राहायचं एवढच आमच्या ध्यानात होतं..५०किलोमीटर चा पहिला पाडाव पार झाल्यावर आमच्या लक्षात आले समुद्रसपाटीच्या तप्त उन्हाची सवय नसल्यामुळे सगळ्याच स्केटर ची हाता पायाची कातडी चक्क सोलून निघाली होती....चेहेरे काळवंडले होते,आणि अतिशय वेदना सहन करायला लागल्या होत्या पण त्यावरही खचून न जाता आम्ही सोल्युशन शोधले आणि पुढे निघालो"

या विक्रमवीरांच्या चमूत प्रणय, सौरभ, चैतन्य हे ११-१२ वर्ष वयाचे चिमुकले होते आणि वैष्णवी देवल नावाची एकमेव मुलगी ती सुद्धा १२ वर्षाची..हि लहान मंडळी असूनही यांचे मनोबल मात्र वाखण्याजोगे होते...गोल्ड मेडलीस्ट आकाश साठवणे सांगतो "प्रवासात प्रचंड गरम वारा होता विरुध्द दिशेने वाहणारा, मागे ओढणारा, गती वाढू देण्यास अडसर निर्माण करणारा पण आमच्या सर्वांचाच उत्साह या सर्वांना पुरून उरणारा होता" पालकही सांगू लागले..या प्रवासात बरीच लोकं भेटलीत..कित्येक गावातून, शहरांमधून, राज्यांतून प्रवास अविरत चालूच होता..लोक स्तिमित होऊन बघत होते, मदतीला म्हणून विचारात होते, त्यांचा आनंद बघण्यासारखा असायचा..कोणी गाड्यांवर उभे राहून फोटो शूट करायचे तर कोणी घरापर्यंत चला म्हणून आग्रह धरायचे..एका ठिकाणी एका उत्साही व्यक्तीने तर चक्क या धावत्या मुलांना नोटा वाटल्या.. चारुदत्त आणि लालसिंग म्हणाले "वेगवेगळ्या राज्यातून प्रवास घडतांना देखील आम्हाला कधीही भाषेचा अडसर जाणवला नाही भेटणाऱ्या सगळ्यांच्या भावना इतक्या उत्कट होत्या कि हृदयापासून हृदयापर्यंत आपसूक पोचत होते"

काही अनुभव तर अनाकलनीय आहेत हेद्राबाद मध्ये प्रवेश झाला आणि लक्षात आले कि भडकावू भाषण प्रकरणात अकबरुद्दिन ओवैसी यांना अटक करण्यात आली होती आणि म्हणून त्या संपूर्ण परिसरात तणाव होता पोलिस बंदोबस्त, दंगे, जाळपोळ आणि बरेच काही..याच वेळेस निर्मल येथून प्रवास करायचा होता सगळेच चिंतेने ग्रासले होते...काहीही अपरिमित घडू नये म्हणून काळजीत पडले होते पण स्केटर्स येताच साऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले, सगळीकडे आनंद पसरला आणि क्षणात तणावपूर्ण वातावरण निवळले गेले... याक्षणात जाती-धर्म असे बिनबुडाचे भेदच संपले होते.

प्रत्येक गाव शहराच्या सीमेवर यांचे स्वागत केले गेले यांना अक्षरशः डोक्यावर घेतले भरभरून प्रेम यांच्या झोळीत टाकत गेले..आणि म्हणूनच पुढच्या प्रवासासाठीची उर्जा आपसूकच साठत गेली...या स्केटर्स बरोबर पालकांच्या दुचाकी पण प्रवास करत होत्या..दुसर्या बाजूने पाहिले तर या पालकांनी सुद्धा दुचाकीने २००० किलोमीटरचा प्रवासी विक्रमच पार पाडला आहे..सोबत काही स्त्री-पालक त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सर्वांच्याच काळजीत मग्न होत्या मुलांना एनर्जी ड्रिंक बनवून दे तर त्यांच्या जखमांवर मलम पट्टी करू दे त्यासाठी सतत सज्ज राहिल्या..... मोठ्या मुलांनी लहानांची काळजी घेतली तर लहानांनी मोठ्यांना प्रेमाचा आधार दिला या सर्वांतून एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं तेच खरतर लाख मोलाचं आहे....नागपूर महानगर पालिकेने या कामी दिलेले सहकार्य तर विसरता येण्या जोगेच नाही.....

अश्यापद्धतीने २ जानेवारी ते ११ जानेवारी असा दहा दिवसांचा हा चाकांवरचा विश्वविक्रमी प्रवास फुलांच्या वर्षावात, रंगीत प्रकाशाच्या झोतात आणि नागपूर करांच्या प्रेमळ सहवासात गांधीबागेत येउन यशस्वीपणे पूर्ण झाला....त्यानंतर अनेक सत्कार, अवार्ड, बक्षिसं आणि विक्रमाच्या नोंदी होत राहिले पुढेही होत राहतील पण प्रवासा दरम्यान घेतलेले अनुभव, लुटलेला आनंद, आणि विविध प्रांतीय विविध भाषिक लोकांशी जुळलेले बंध अनमोल आहेत आणि हृदयाच्या कुपीत सदैव जपून ठेवले जातील. असे भारलेले वाक्य शेवटच्या क्षणी सर्वच पालक आणि खेळाडूंनी काढले...

संपूर्ण भारतात अजूनही एवढ्या धाडसाची विश्वविक्रमी मोहीम राबव्ण्यासाठीचे प्रयत्न कोणीही केलेले नव्हते गजेंद्र बनसोड यांनी हे पहिले पाउल उचलले आणि असा हा साहसी विक्रम वैदर्भीय गुणाच्या आपल्या नागपुरी मुलांनी करून दाखवला...यांची शारीरिक- मानसिक तयारी करवून घेणारे यांचे कोच, त्यांचे मनोबल जपणारे आणि त्यांच्या पाठी उभे असणारे त्यांचे पालक आणि यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचे गुण ओळखून त्यांना सहकार्य देणारी नागपूर महानगर पालिका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साहसी विक्रमवीर या सर्वांचेच आपणा सर्वांच्या वतीने कौतुक मिश्रित अभिनंदन .....








सहभागी खेळाडू :-
१) स्वप्नील समर्थ २) आकाश साठवणे ३) चारुदत्त बांते ४) महेश लोणारे ५) वैष्णवी देवल
६) अमित इंगळे ७) लालसिंग यादव ८) प्रणय अहेर ९)सौरभ दवे १०) नितीश कुमार ११) पवन दंदे
१२) परेश भांडारकर १३) राहुल निखारे १४) सागर चावडे १५) परेश चौहान १६) आदित्य परमार
१७) दिपक चौहान १८) धीरज चावडे १९) विशाल बांगरे २०) चैतन्य देशमुख २१) सैयद असलम अली
२२) क्रिष्णा राठे







(वरील बातमी दैनिक सकाळच्या युवा पानावर प्रकाशित झाली आहे )






No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...