खरतर आता म्हणता येईल काळ खूप पुढे गेलाय.… पुढे??…. कि दूर?
सामाजिक अडचणी समस्या कधी नव्हत्या हो? होत्याच ...पूर्वीही होत्या आजही आहेत, पण समस्येकडे पाहण्याचे दृष्टीकोन आणि समस्यांना तोंड देण्याच्या आपल्या पद्धती प्रचंड बदलल्यात. खरतर समस्यांची वर्गवारी करण्यातच आपण चुकतोय कुठेतरी. शिक्षणाची टक्केवारी भलेही वाढत जात असेल परंतु आमची बुद्धिवादी समजूतदारीची संकल्पना फारच संकुचित होत चालली आहे. जाणीव बोथट होत चाललेल्या आहेत. आपल्याला जगण्यासाठी काय महत्वाचे आहे हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. आम्हाला काय हवंय हे आम्हाला माहितीच नाही. पिढ्यान पिढ्या धर्म, जाती, श्रद्धा आणि त्यातून फोफावणारा विसंगतवाद या काही गोष्टी एका बोचक्यात बांधून बिंबवण्यात आल्या मनावर आणि आम्ही सुद्धा ते बोचकं आमच्या शेंड्याला बांधून घासत ओढत चालत आहोत. आमच्या आदल्या पिढीने ते आमच्या शेंड्याला बांधले आम्ही पुढच्या पिढीच्या शेंड्याला बांधू. पण आमच्या मागच्या पिढीचे अन आमच्या पिढीचे तरी काय बर भलं झालय यातून हे थांबून विचार करण्याची सद्सद विवेक बुद्धी ना आधी होती न आज अजून कुणाला सुचलेली आहे.
'धर्म' हा एकच शब्द अनेकांचे मुडदे पाडण्यास भारी. तथाकथित सनातनी असू दे नाहीतर 'सेक्युलरिज्म' ची टिमकी वाजवणारे सांप्रदायिक बुरखाधारी... दोघांचाही हेतू एकच धर्माच्या नावावर वाटण्या.....
आणि आम्ही काय करतो?
आम्ही वाटले जातो, कापले जातो, छाटले-जाळले जातो आणि मग आमच्या मुडद्यांचे पण धार्मिक राजकारण केले जाते. आशचर्य तर हे आहे कि हे आपण बेमालूम पने होऊ देत असतो. करणारही काय म्हणा यामागेही दडपलेली काही कारणे आहेच…. महत्वाची कारणे
धर्माला .. किंबहूना दंभिकतेला मिळालेली राजकीय प्रतिष्ठा
- कायद्याची भीती नसणे
- समाजातली उदासीनता
या पूर्वीही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे समाज सुधारक घडलेच कि, त्यांना विरोधही व्हायचा दगड मारले जायचे, चिखलफेक व्हायचा पण विरोध खचितच गोळ्या झाडून व्हायचा आज स्वतःला सुशिक्षित बुद्धिवादी समजणारा समाज वैचारिक विरोधासाठी यांची वैचारिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता इतकी कमी पडावी कि त्यासाठी हत्यारांचा आसरा घ्यावा लागावा आणि वरून धर्माच्या नावाने उदोउदो…. अहो कोणत्या धर्माची शिकवण आहे हि? कोणता धर्म जीव घेऊन धर्म निभवा असे शिकवतो?
म्हणजेच न आम्ही धड आमचा धर्म पाळू शकतोय ना माणुसकी… मग कशासाठी आलोय आपण इथे?
थोडं थांबून विचार करूया …. आपण काय करतोय?
आपल्या आई बहिणींची अब्रू गाजर उचलून खावे इतकी स्वस्थ झाली आहे
रोजच्या आवश्यक जीवनाला लागणाऱ्या आपल्या मुलभुत गरजा मात्र आवाक्याबाहेर महाग... आणि आपण अजूनही गप्प बसलो आहोत.
आमच्या मतांसाठी आम्हालाच वेठीस धरले जाते आमचे राजकारण खेळले जाते … आम्ही गप्प.
आमचे हवे तसे वैचारिक मागासीकरण केले जाते किंवा सहेतुक त्यापासून दूर ठेवले जाते … आम्ही स्वतःस सुशिक्षित म्हणवून घेणारे मुग गिळून गप्प च असतो.
आमच्या कष्टाच्या पैशांचे काळ्यात विलीनीकरण होते, भ्रष्टाचार होतो आम्ही थंड
आमचे देश बांधव सीमेवर बळी पडतात …. आणि आम्ही …
आणि मग कधीतरी अचानक धर्माच्या नावावर कोणीतरी एखादे वाक्य बोलून जातात आणि सुन्न पडलेल्या आमच्या सर्व जाणीवा, इतर वेळी झोपलेला आत्मसन्मान, वैचारिक अभिमान खडखडून जागा होतो.
हो … धर्माचा नशाच काही और असतो … नाही?.
कुणाच्या उपाशी पोटापेक्षाही गरजेचा , जीवापेक्षाही महान, एखाद्याच्या दुखापेक्षाही मोठा.
आमच्या पानातली भाकरी ओढणार्याला आम्ही माफ करतो, आमच्या पोरींची अब्रू लुटणाऱ्या नराधमांसाठी फक्त शाब्दिक मार पण आमच्या धर्मावर केवळ बोट ठेवला तो संपला ….
काय हवंय आपल्याला? कशासाठी आलोय आपण इथे? आपल्या खर्या गरजा खर्या मागण्या काय आहे, एकदा या सर्वांवर पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे….आत्मपरीक्षण …बुद्धीला मनाला पटत नाही ते नाही करणार हा एक संकल्प घेऊया … मी,माझं नि माझ्यासाठी ही वृत्ती जरा दूर सारुया. धर्मांधतेच्या खोल अंधारातून अलगद बाहेर पडून आपल्या खऱ्या गरजांसाठी तेवढ्याच पोटतिडकीने लढता येईल का? थोडा प्रयत्न तरी करूया.... स्वतःसाठी नाही तर निदान आपल्या पुढल्या पिढीसाठी तरी सुधारणेला जरा वाव ठेऊया, पटतंय का बघा
No comments:
Post a Comment