स्त्री
प्रवास … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे
ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी
रडून, कधी ओरडून तर कधी मंचावर उभे राहून ताठ मानेने …तरीही मुसमुसतच
विचारतेय
ती.
स्त्री
म्हणून होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कुठे संपेल,
अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिचं तिला हक्काचं जिनं ?… या
प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. …. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच.
महाभारतातली
पाच पांडवांची बायको द्रौपदी, रामायण मधल्या रामाची आई कौसल्या, बायको
सीता, लक्ष्मणाची बायको
उर्मिला, किंवा मग रावणाची बायको मंदोदरी …. आई गांधारी किंवा कौरवांच्या
बायका तरी सुखी होत्या का हो ? देवकी -यशोदा कि मग राधा…. मीरा तरी ?
हे सगळं पुराण समजून सोडून दिले तरी मग इतिहास तरी मागे आहे का ? सावित्री बाई फुले, अहिल्या होळकर …. आत्ताच्या सिंधुताई सपकाळ?
आजही
प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि
,झाशीची राणी
तेअफगान ची मीना केश्वार कंवल , माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे, अजूनही
वाट बिकटच आहे. आजही स्त्री लढतेच आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी
…
आजही
'युसुफ्जाई मलाला' अंगावर गोळ्या झेलते. मारणारा तिचं वय बघत नाही तिचे
म्हणणे समजून तर दूर ऐकूनही घेत नाही. ती फक्त स्त्री आहे आणि
स्त्रियांसाठी आवाज उचलतेय एवढंच पुरे …तिचा जीव घ्यायला …
पण ती तगली- जगली अजून लढतेय …. बलात्कार पिडीत 'अरुणा शानबाग' गेल्या ३७
वर्षांपासून मानसिक, शारीरिक सर्वच स्तरावर खचून गेलीय पण धुकधुकी आहे अजून
जीवात एवढंच काय ते शिल्लक …तिचा आरोपी जेल मधून सुटून रुजलाय परत
समाजात, संसार थाटलाय त्यानं…. पण हि रोज मरून जगते आहे. मरण येत नाही तोवर
जिवंत राहणार आहे. अॅसिड हल्ल्यातून वाचल्यावर समोर असलेले जगणे मरणप्राय
आहे म्हणून दया
मृत्यु मागणारी 'सोनाली मुखर्जी'…. कुरूप चेहेरा लपवत तडफडत जगतेच आहे …
ती काय किंवा मग लष्कराचे अनिर्बंध अधिकार कमी करा म्हणून गेली तेरा वर्षे
उपोषणावर असणारी अन्न नाकारणारी तरीही अजूनही अन्यायाला बळी पडणारी 'इरोम
शर्मिला' काय. …'तस्लिमा नसरीन' सारखी गाजलेली लेखिका सुद्धा देशोधडीला
लागते … वर्षानुवर्ष जीव मुठीत घेऊन इथे तिथे लपत पळत राहते ….
'फुलन
देवी' चा कित्तेक दशका आधीचा बलात्कार असू दे कि आजची 'निर्भया'…. तंदूर
मध्ये जाळली गेलेली नैना साहनी किंवा मग शिवानी भटनागर, प्रियदर्शनी मट्टू,
जेसिका लाल किंवा आरुषी तलवार ……… गर्भाशयातच भ्रूण हत्या, बलात्कार, ऑनर
किलिंग, अॅसिड अटेक, हुंडाबळी आणि काय काय …. जन्मापासून ते मरेपर्यंत भीत
भीत जगतांना निदान एका दिवसाचं भयमुक्त जगणं शोधू पाहणारी कालची स्त्री
आणि आजचीही स्त्री …
शेतात
राबणारी गरीब, कार्यालयात सेवा देणारी उच्च शिक्षित, घरात खेळणारी
चिमुरडी, शाळेत-महाविद्यालयात जाणाऱ्या युवा…. रस्त्यात, बस मध्ये, ट्रेन
मध्ये, शाळेत, शेजारी, कार्यालयात, सासरी, माहेरी आपल्या माणसांत,
परक्यांमध्ये कुठेतरी निर्धास्त, नि:संदेह, निर्विवाद जाऊ शकेल. न अडखळता
मोकळा श्वास घेऊ शकेल अशी परिस्थिती आहे
का अजून ? एवढ्या वर्षांपासून नाहीच अजून …पण का ?
हिंदू,
मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू दे … भारत, अफगान, अमेरिका, पाकिस्तान देश
कोणताही असू दे …. दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्धे होऊ दे ,
धर्मयुद्ध होऊ दे सर्वात आधी बळी पडते ती 'स्त्री' जात.
काय होईल व्यासपीठ देऊन …. भाषण करून, प्रश्न मांडून ? काय होईल मागण्या करून ?
वर्षानुवर्ष
ह्याच समस्या आहेत …. ह्याच अडचणी आहेत …कालही तिची जगण्याची तगमग होतीच
आजही आहे. कधीतरी परिस्थिती बदलेल म्हणून तिने अशाही सोडलेली नाही. …….
आजही
स्त्रिया स्वप्न बघतात त्या आदर्श समाजाची …. जेव्हा स्त्रियांना
शरीरापलीकडे एक भावना म्हणून बघायची आणि आदराने वागवायची बुद्धी आपल्या
समाजात रुजेल. स्त्रियांचा आदर, त्यांचा
आत्मसम्मान जेव्हा मना-मनातून आपसूक जपला जाइल. हि जागा, हे वातावरण आणि
इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाही समान वाटा असेल. आणि असा आंतरिक बदल
जेव्हा घडेल, तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी वर्षातला एखादा विशिष्ट दिवस
साजरा करण्याची गरजही उरणार नाही.
(प्रस्तुत ललित २३ sept १४ रोजी दैनिक सकाळच्या fast track पानावर प्रकाशित झाले आहे)
(प्रस्तुत ललित २३ sept १४ रोजी दैनिक सकाळच्या fast track पानावर प्रकाशित झाले आहे)
No comments:
Post a Comment