Wednesday, 16 July 2014

पाऊस मन ..

खरं सांगू पाऊस मला नको नको वाटतो
तुझी आठवण होऊन पुन्हा डोळ्यामध्ये दाटतो
पावसाचं हे असंच असतं तुझ्यासारखाच वागतो
दिवसा स्वप्नी रमतो आणि रात्र रात्र जागतो.. 

पाऊस पाऊस होतं मन, झिरपत राहतो डोळ्यातून
आतून भिजलं असलं तरी, चेहेऱ्यावरती कोवळं उन
जुन्या काही सरी होत्या मनात आभाळ भरून
वाहता वाहता वाहून गेल्या, गेले दिवस सरून

पुन्हा फिरून उजाडतं डोळे होतात कोरडे ठाण
ओल्या सुक्या वेलीवरचं गळतं पुन्हा एकच पान
ओठातल्या शब्दांनाही मिळत नाही तुझे कान
पाऊस पाऊस म्हणत म्हणत, सुकत जातं सारं रान

खरं सांगू पाऊस मला आता भिजवत नाही
चांदण ओले स्पर्श सुद्धा रात्री निजवत नाही
गंध भरल्या फुलांनीही हृदय उमलत नाही
पावसा तू नकोच येऊ, तुझं येण सोसवत नाही

तुझं येणं सोसवत नाही !!!

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...