समाजात स्त्री-पुरूष असा भेदभाव आहे. यात बदल होईल अशी आशा आहे. अनेकांचा या दृष्टीने प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र हेमांगी कवीने ज्या पद्धतीने विषय चव्हाट्यावर मांडला आहे ते मांडण्याची गरज होती का ? असाही एक सूर यानिमित्ताने आळवला जातो आहे. स्त्री म्हणून आपल्याला खरंच स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ कळाला असता तर लोकं काय म्हणतात ह्याला इतकं महत्व देत बसण्याची गरज उरली नसती. आपल्याला जे योग्य आहे असे वाटते आणि तसे वागावे वाटते ते कुठलीही बाष्कळ बडबड न करता कुणाच्याही आरोप-प्रत्यारोपांना महत्व न देता, उत्तरं न देता करत-वागत राहणं जास्त रास्त ठरत असतं. याबाबत मला ऑगस्ट २०१५ साली घडलेला एक किस्सा मुद्दामहून सांगावासा वाटतो. किरण गांधी नावाच्या २६ वर्षीय क्रीडापटूने तिची मासिक पाळी सुरु असतांना पॅड न घेता मॅरेथॉनची स्पर्धा पूर्ण केली होती. स्पर्धा पूर्ण होऊन ती गंतव्यस्थळी पोचली तेव्हा तिचा गुलाबी ट्रॅकपॅन्ट रक्ताने पूर्णपणे माखलेला होता. हे फोटो जगभर वायरल झाले तेव्हा किरण ह्यांनाही अनेक माध्यमातून ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. या सगळ्या प्रश्नांना प्रत्युत्तर देतांना ती म्हणाली कि '' वर्षभर स्पर्धेसाठी प्रचंड कष्ट आणि अभ्यास केल्यावर फक्त मासिक पाळी आलीय म्हणून स्पर्धेतूनच बाहेर पडणे किंवा काढून टाकले जाणे संयुक्तिक नाही, उलट ते अन्यायकारक आहे. एवढेच नाही तर वर्षभराच्या इतक्या मेहनतीनंतर फक्त पॅड घेतल्यामुळे स्पर्धेत धावतांना निर्माण होणाऱ्या अडथळ्यामुळे मागे पडणं मी का मंजूर करावं ? पॅड न घेतल्याने माझ्या कष्टाला मला न्याय देता येणार असेल तर मी साहजिक तसे वागायला हवे. फारफारतर काय होईल कपड्यावर ओघळणारे डागच दिसतील आणि हे नैसर्गिक आहे याची जाणीव बघणाऱ्यांनी ठेवायला हवी '' किरण गांधींच्या या वक्तव्यावरही उलट-सुलट चर्चा झडल्या मात्र नको त्या ठिकाणी नको त्या क्रिया न करता, नको तशी वायफळ बडबडही न करता, तेव्हाच्या गरजेच्या वेळी तिला जे वाटतंय ते तिने निःसंकोच करून दाखवले होते..आणि स्पर्धा जिंकून त्याचे महत्वही उदाहरणासह सिद्ध केले होते. स्त्रीस्वातंत्र्याचा खरा अर्थ बोलण्यापेक्षा वागण्यात आहे हे अश्याच पद्धतीने सिद्ध केले गेले पाहिजे अशी हि घटना होती. .
एकीकडे स्वतःचे स्त्रीत्व नैसर्गिकपणे मान्य करून ते सांभाळत आपले हक्क ओळखून, त्यासाठी लढा देऊन ते मिळवून शैक्षणिक-वैचारिक-बौद्धिक-आर्थिक उन्नती करून घेत अधिकाराने सन्मानाचे-आदराचे आयुष्य जगणाऱ्या स्त्रिया आहेत. तर दुसरीकडे स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली आणखी एक वेगळा गट तयार होत चालला आहे जो स्त्रीत्वाची संपूर्ण कातडीच ओरबाडून काढून नवा उन्मादी मुखवटा चढवण्याला किंवा पुरुषांसारखे वागण्याला स्त्री-स्वातंत्र्य समजून बसल्या आहेत. पुरुषांसारखे कपडे घालणे, सिगारेटी फुंकणे, मोटार-बाईक उडवणे किंवा दारू पिऊन धिंगाणे घालणे हे सर्रास दिसू लागले आहे. या बाबत मधल्या काळात विद्या बालनने देखील ''स्त्री-पुरुष समानतेसाठी लढा देणे म्हणजे स्त्रीने पुरुषी होणे नव्हे; तर जन्मतः मिळालेले स्त्रीतत्त्व सांभाळत माणूस म्हणून जगण्याचे समान अधिकार मिळवणे आहे'' अशी मोहीम चालवली होती.
नुकतच युरोकप-२०२० ची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेनंतर इटली जिंकल्याच्या आनंदात एका इटालियन महिलेने टॉपलेस होत नाच करतानाच एक व्हिडिओ वायरल झाला होता.. आनंदाच्या भरात उर्स्फुर्तपणे घडलेली ही एक प्रतिक्रिया असू शकते, अनेकदा अश्या प्रतिक्रियांविषयी आक्षेप घेतला जात नाही कारण त्या अनैसर्गिक नसतात. मात्र पूनम पांडे सारख्या काही अभिनेत्रीचे जाणीवपूर्वक असं घडवून आणणं किंवा त्यासाठी गाजावाजा करणं मात्र अनैसर्गिक आणि तत्वाला धरून नसल्याने त्यावर साहजिक गदारोळ उडतो.
१९६८ साली ७ सप्टेंबर रोजी अमेरिकेतील एका सौन्दर्यस्पर्धेत स्त्री-समानतेच्या हक्कासाठी २०० स्त्रीवादी महिलांनी अंतर्वस्त्र जाळून निषेध व्यक्त केला होता, अमेरिकेतील 'ब्रा बर्निंग' या प्रातिनिधिक घटनेला ५३ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निषेध आंदोलनाचा उद्देश ''स्त्रियांच्या शरीरापेक्षा तिच्या बुद्धीवर लक्ष केंद्रित व्हावे आणि तिच्याकडे मानवतावादी दृष्टीने पाहिले जावे'' असा होता. आज ५३ वर्षांनंतरही हेमांगी आणि सोनामसारख्या स्त्रियांना वेगवेगळ्या कारणांसाठी 'जगू द्या' अशी आरोळी ठोकत स्वातंत्र्याची मागणी करावी लागते याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
काळ सरता सरता आज इथवर पोचेपर्यंत अश्या चळवळीचे स्वरूप बदलत गेले असले तरी समस्या सुटली नाही, मुद्दा कायम आहे बदललेल्या काळाचे स्वरूप समजून घ्यायला अलीकडच्या काळात होऊन गेलेल्या स्त्री आंदोलनांची काही उदाहरणं पाहणं महत्वाचं ठरेल.
> २०१० ऑगस्टमधे लॉस अॅन्जलेसच्या सुप्रसिध्द व्हेनिस बिचवर एक मोठा चळवळीचा ग्रुप, विशेष म्हणजे स्त्री -पुरुष दोन्ही समान संख्येनी एकत्र जमला होता. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देणारे हे संघटन होते. 'गो टॉपलेस इक्वालिटी राइट्स' हा या आंदोलनाचा विषय होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार 'अॅज लाँग अॅज मेन आर अलाउड टु गो टॉपलेस इन पब्लिक विमेन शुड हॅव द सेम कॉन्स्टिट्युशनल राइट ऑर एल्स मेन शुड हॅव टु वेअर समथिंग टु कव्हर देअर चेस्ट्स.' त्यांच्या वेबसाइट वर लिहिलल्याप्रमाणे, अमेरिकेसारख्या समान हक्काचा दावा करणार्या देशात स्त्रियांना या गोष्टीसाठी दंड होणे, हाकलून लावणे, अपशब्द ऐकावे लागणे अश्या अपमानास्पद गोष्टींना सामोरे जावे लागते त्याच गोष्टीसाठी पुरुषांना मात्र पूर्ण मान्यता आहे ही गोष्ट त्यांना इक्वल राइट्सवर आणलेली गदा वाटते.
> बळजबरी किंवा परंपरेच्या नावाखाली बुरखा घालायला लावणे यावर अनेकदा आंदोलनं झाली मात्र या विरुद्धही काही पाश्चात्त्य देशात 'बुरखा न घालु देणे' ही मुस्लिम स्त्रियांच्या हक्कावर आणलेली गदा असे वाटणार्या बऱ्याच मुस्लिम महिला आहेत, 'इफ आय कान्ट वेअर बुरखा, इट्स नॉट माय रिव्हॉल्युशन' या विचारांच ते समर्थन करतात. त्या स्वतः बुरखा घालतातच असेही नाही, काही हिजाबही घालतात. पण पाश्चात्य लोकांनी बुरख्यावर बन्दी घालणे हे त्यांना कट्टरपंथीय मुस्लिम देशांच्या बुरखा कंपलसरी करणे, किंवा इतर कडक कायद्या इतकेच अन्याय झाल्यासारखे वाटते हे विशेष.
हा सुरुवातीपासूनचा सगळा काळ स्त्रीअधिकाराच्या आंदोलनाच्या संघर्षाचाच काळ नव्हता तर प्रस्थापितांच्या आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेला मोडणारी स्त्री म्हणून त्या मोबदल्यात पुरुषसत्ताक समाजाकडून अवहेलना सहन करण्याचाही काळ होता. ही जखडलेली बंधने झुगारतांना तिने उचललेला पवित्रा हा त्या स्त्रियांना पुरुषविरोधी स्त्री किंवा समाज चौकट लांघणारी बाई असं संबोधन करू लागली तिच्याबाबत नकारात्मक भाव पोसू लागला. इतकेच कशाला, तिच्या केसांच्या-कपड्यांच्या लांबीवरून, लिपस्टिकच्या रंगावरून किंवा चपलांच्या हिलवरून, एवढेच नाहीतर आता चक्क अंतर्वस्त्रांवरून तिच्या चारित्र्याचे मोजमाप करण्याची मानसिकता आजही दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणूनच सुरुवातीपासून समानतेचा लढा देतांना स्त्री-पुरुष समान कसे ह्याचे पुरावे देण्यासाठी अनेक सोंगे तिला घ्यावी लागली. पुरुषांच्या सवयी स्वीकारण्यापासून त्याच्यासारखा पेहेराव करण्यापर्यंत.. त्याच्यासारखी नोकरी-व्यवसाय करण्यापासून ते त्याच्यासारखी व्यसनं कारण्यापर्यंतही तिने मजल मारली. मात्र हे करतांना स्त्रीची नकारात्मक छबी प्रस्थापित होऊ लागली. या सर्वांपलीकडे पाहणारी आजची स्त्री पुन्हा बदलतांना दिसते आहे. मी पुरुषासारखीच आहे म्हणून मला समान अधिकार द्या असे म्हणून लढा देणारी स्त्री आज मी स्त्री आहे मला त्याचा अभिमान आहे एवढेच नाही तर स्त्री म्हणून पूर्ण स्वतंत्र आणि मनासारखे जगायचा अधिकारही आहे हे निक्षून सांगते आहे. आज तिचा लढा प्रथा-परंपरा किंवा पुरुषविरोधी नाही, तर त्या पलीकडचा कायदेशीर हक्कांचा आहे तसा तो तिच्या जन्मजात मिळालेल्या नागरिकत्वाचा, मानवी हक्कांचा आणि अस्तित्वाचा आहे आणि त्याची आत्मप्रतिष्ठा, बाईपणाचं स्वत्व जपण्याचा देखील आहे.
(लेख ७ जुलै २०२१ च्या महाराष्ट्र टाइम्स दैनिकातील मैफल पुरवणीत सर्व आवृत्तींमध्ये प्रकाशित झाला आहे)
No comments:
Post a Comment