Tuesday, 6 July 2021

कशाकशाला पारखे झालोय आपण..?



अक्खी दुनिया, प्रेम, मैत्री नाती सगळं काही फक्त 'विश्वास' या एका गोष्टीवर टिकून आहे. कुणावर तरी पूर्ण विश्वास असणं, विश्वासाची माणसं आपल्या अवतीभवती असणं, आपल्यावर विश्वास ठेवणारी अनेक माणसं आयुष्यात असणं या गोष्टी आनंददायी जगण्यासाठी खूप खूप आवश्यक असतात. विश्वास गमावणं, विश्वासघात होणं .. कुणावर विश्वास ठेवूच न शकणं अश्या गोष्टी घडायला लागल्या तर जगणं किती कठीण होऊन बसेल ह्याची कल्पनाही न केलेली बरी ...
सध्या होतंय मात्र असं ..
 
किती कशाकशाला पारखे होतोय आपण. कोरोना संक्रमण काळानं जगण्यात अनेक बदल घडवून आणले चांगल्या सवयी भिनवल्या पण काही गोष्टी निष्ठुरपणे हिरावूनही घेतल्या... त्यातली महत्वाची गोष्ट हिरावली गेलीय ती म्हणजे विश्वास - स्पर्शातला विश्वास, एकमेकांवरचा विश्वास .. आपल्याच माणसांवरचा विश्वास... अगदी स्वतःवरचाही विश्वास.
लाॅकडाऊनमुळे एकमेकांच्या भेटीगाठी बंद झाल्या होत्या.. व्हिडीओ कॉलवर एकमेकांना पाहता येत असले तरी भेटीतली स्पर्शातली जादूच न्यारी असते. मधे माझ्या ५ वर्षाच्या भाचीची खूप आठवण येत होती. तिला भेटावं जवळ घ्यावं लाड करावे वाटत होते, पण मी बाहेर निघून काम करत असल्याने ती रिस्क घ्यावी वाटत नव्हती. मग अनेकदा आईच्या घराजवळ जाऊनही तिच्या सुरक्षेचा विचार येऊन आईच्या घरी गेलेच नाही. पण एकदिवस उगवला पिल्लाची अतिशय आठवण आल्याने जाऊन ठेपले.. पिल्लाला भेटायला खूप व्याकुळ होऊनही तिला स्पर्श करायचा नाही दुरून बघून निघून जायचे असेच ठरले होते. डोळे भरून आले 'मनू तुझी फार आठवण आली गं' असे म्हणताच ती धावत येऊन बिलगली हे इतक्या क्षणभरात झाले कि भीती वाटत असूनही या मिठीची उब दोघींनाही जास्त गरजेची वाटली होती. आपल्याच लेकरांना आपण जवळ घेऊ शकत नाही हा स्वतःवरचाच विश्वास गमावून बसणं किती वाईट आहे...असाच दुसरा प्रसंग एवढ्यातच कुठल्याश्या व्यवहाराचे पैसे नेऊन द्यायला संध्याकाळी ऑफिस नंतर एका मैत्रिणीकडे गेले होते. एरवी आम्ही भेटलो की एक छान झप्पी वगैरे व्हायची .. हात धरून आत घेऊन जाणं, अगदी ओट्यावर बसून खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करत गप्पा मारणं व्हायचे. मला दारात पाहून सखी आनंदीही झाली पण मीच तिला बाहेर अंगणात बसायला खुर्ची मागितली. पाणी-चहा दूरच ठेवायला सांगितले. आम्ही खूप दूर दूर राहून बोलत राहीलो. दोघींच्याही डोळ्यात नकळत पाणी आले...हातातले पैसे तिच्या कारच्या टॉपवर ठेवून हे तासाभराने उचल सांगून मी अंगणातूनच निघून गेले..नंतर कित्येक तास मन भारी होत राहीलं.
बरेचदा रस्त्याने जाताना गरजू दिसणाऱ्या स्त्रियांना लिफ्ट द्यायची आधीची सवय. परवा भर उन्हात छोटं तान्हुलं कडेवर घेऊन चालत रखडत जाणाऱ्या त्या आईला मात्र मदत करावी वाटली नाही .. आपल्यामुळे तान्हुल्याला रिस्क नको. लाॅकडाऊन नंतर इतक्या महिन्यानंतर एक एक मैत्रीण ऑफिसला जॉईन होतेय पण एकमेकींना पाहून कितीही आनंद झाला तरी झप्पीबिप्पी सोडाच प्रत्येकजण तोंडाला मास्क लावलेले आणि अंतरावर उभे राहून बोलतायत .. चेहेऱ्यावर ओसंडणारा आनंद तर सोडा साधे स्मित बघायला एक दिवस तरसायला लागणार हा विचारही किती भीतीदायक वाटतो. काल आईला बरे नसताना डॉक्टरकडे नेण्यात आले ज्या डॉक्टरांच्या मायेच्या स्पर्शानेही बरेचदा मानसिक आजारपण पळून जायचे .. आज तिनं साधी नाडी तपासणी देखील केली नाही बीपी तपासले नाही, मग कितीही महागडे औषध देऊन काय उपयोग रोग्याला स्पर्शातला दिलासा बरा करणार होता त्याला तर तो पारखाच राहिला.
 
कामावरून थकून भागून गेलेल्या बापाचा थकवा घरात पाय ठेवताच चिमुकल्यांच्या मिठीत विरघळून जायचा. दिवसभर डोळ्यात तेल घालून वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या आई-वडिलांच्या जवळ हातात हात घेऊन बसले की त्यांना समाधान मिळायचे. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पाठीवर टीचर्सची शाबासकी पडली की केवढे प्रोत्साहन मिळायचे. एखाद्या मित्राची आधाराची थाप मिळाल्याने केवढे बळ दाटून यायचे. प्रियेच्या मिठीत, आईच्या कुशीत, बापाच्या खांद्यावर सहज विसावता यायचे, मित्रांच्या हातावर टाळ्या देता यायच्या- खांद्यावर हात घालून दूरवर न अडखळत चालत जाता यायचे.
 
कशाकशाला पारखे झालोय आपण.. प्रेम, मिठी, कुशी, विश्वास, आधार, शाबासकी, आधाराची थाप, हातात हात, हातावर टाळी.. आणि रडायला खांदा. मरण्यापासून दूर पळताना जिवंत राहायच्या संघर्षात.. संघर्षाला बळ देणाऱ्या गोष्टीच हिरावले जातायेत कि काय असे वाटायला लागले आहे... असे जगणे जगणे नव्हेच केवळ जिवंत राहणे होईल.. नाही का ?
©रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...