Friday, 6 August 2021

कोवळा स्नेह !


आपलं आयुष्य म्हणजे एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखं असतं.. आयुष्याच्या आरंभापासून आपण काही नात्यांच्या-मैत्रीच्या माणसांचा गोतावळा सोबत घेऊन निघतो. जसेजसे पुढे जात राहतो काही नाती घट्ट होतात, काही निखळतात मग पुढल्या थांब्यावर ही काही माणसं उतरतात, काही नवे चढतात. या चढलेल्या माणसांसोबत आपली गाडी पुन्हा कधी गतीने तर कधी संथपणे पुढे सरकत राहते. काही ठिकाणी गाडी जास्त वेळ रेंगाळते, काही थांबे सोडून पुढे पळत राहते. या थांब्यांवर चढणाऱ्या प्रवाश्यांना आपण वेगवेगळी नात्यांची लेबलं चिकटवत राहतो. कुठल्यातरी थांब्यावर माणसे उतरली कि ही लेबलं आपोआप गळून पडतात किंवा शिल्लक उरतात; पुन्हा काही माणसांना तीच ती चिकटवली जातात. नाती अनेक प्रकारची असतात. रक्ताची नाती, प्रेमाची नाती, मैत्रीची नाती, विचारांची नाती आणि काही तर गरजेची सुद्धा. या सगळ्यात सर्वात जास्त वाखाणलं जाणारं नातं म्हणजे मैत्रीचं नातं.


माझ्या अत्यंत आवडत्या लेखिका अरुणा ढेरे ह्यांनी त्यांच्या अनोख्या मैत्रीच्या नात्यांवर असणाऱ्या 'प्रेमातून प्रेमाकडे' या त्यांच्या पुस्तकात लिहिलेली अर्पण पत्रिका मला खूप भावली होती. त्या लिहितात..

''मैत्र

जे होतं आणि आता नाही

त्याला स्मरून

आणि

जे आहे, असण्याचं आश्वासन आहे

त्याचा हात धरून... ''



बस्स, इतकंच. एवढ्या इनमीन तीन-साडेतीन ओळी जगण्यातलं सगळं सार सांगून जातात. प्रत्येकवेळेला आपली आयुष्याची पॅसेंजर जिथेजिथे थांबते तिथे तिथे या साडेतीन ओळींचे स्मरण करावे आणि हातात उरलेल्या हातांसह पुढे पुढे चालत राहावे. मैत्रीतला सगळ्यात सुखाचा काळ कुठला असतो सांगू.. जेव्हा ती अगदी कोवळी असते आणि नंतर ती जेव्हा सगळ्यात जून होते. कोवळ्या मैत्री नंतरचा आणि मैत्री मुरेपर्यंतच्या मधला जो काळ असतो हाच सगळ्यात घातक असा काळ असतो.


मैत्रीचं नातं जुळतानाचे सुरुवातीचे दिवस म्हणजे कोवळा स्नेह. मैत्री होण्याच्या पूर्वीचा काळ. कधी कधी पुढे हा स्नेह मैत्रीत परावर्तित होतो, पुढे ही मैत्री चांगली घट्ट जमते किंवा कधी कधी हा स्नेह मैत्री होण्याआधीच क्षीण होत होत उगीचच तुटूनही जातो. पण तरीही कोवळ्या नात्याचे ते अलवार दिवस आयुष्याला वेगळ्या अनुभवाचं देण मात्र देऊन गेलेली असते..


या कोवळ्या स्नेहील मैत्रीला नेहेमीच्या दोस्तीतले नियम लागू पडत नाही...कारण या कोवळ्या मैत्रीने अजून कुंपणं ओलांडलेलीच नसतात. तिची प्रकृती वेगळीच आणि म्हणून त्यातला वावर आणि त्यातली देणीघेणीही वेगळी. पुढे ती मैत्री जून परिपक्व झाली कि त्यावेळी रुसवे-फुगवे, मानापमान, बुद्धीसंपत्तीची तुलना अशा यादीबाहेरचे सर्व शत्रू मनात वसतीला आलेले असतात..... पण कोवळ्या मैत्रीत मात्र कुठल्याही आशा-अपेक्षांच्या पल्याड, वचनबद्धतेच्या पलीकडची एक अनिश्चितता असते आणि त्यामुळे अनिवार ओढ लागून राहते...


मैत्रीतला सुरुवातीचा हा कोवळेपणाचा मऊ निरागस स्पर्श त्या त्या काळातलं अवघं जगणंच बदलून टाकणारा असतो.. विशिष्ट जातीतल्या गवतांच्या पातीला विलक्षण धार असते. पण त्याची कोवळी पाती म्हणे नेहेमीच्या गवतासारखीच मऊ, लुसलुशीत असते .. कोवळ्या स्नेहाचीही तीच अवस्था ! जवळकीच्या नात्यात हमखास येणारी इर्षेची, मानापमानाच्या जाणिवेची धार त्यात नसते. उलट त्याला अर्धकच्चेपणाची खास आंबटगोड ओली चव असते. कोवळ्या मैत्रीतल्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीत ज्ञानीपणाचा आव आणलेला नसतो. त्या अल्पकाळातील सोबतीच्या प्रवासात पुढे जाण्यासाठीची चढाओढ नसते. असते ती सोबत चालत राहण्याची निरपेक्ष मनीषा. एखाद्या चिमुकल्याला बघून गालाची कळी उमलावी इतकी सहजता असते त्यात..



आपल्या आयुष्यातील नाती पुढे वेळेपरत्वे बदलत जातात .मुख्य म्हणजे नात्यातल्या प्रायोरीटीज बदलतात. अर्धवट उमललेले, उमलता उमलताच खुरडले गेलेले, होरपळून निघालेले असे असंख्य स्नेहांकूर अल्पावधीचे वाटेकरी ठरतात. कोवळ्या स्नेहांकुरातून उमललेले मोजक्याच मैत्रीचे पुढे रोप होऊन परिपक्व होत वटवृक्ष होतात. कोवळेपणा एवढी जपायला कठीण गोष्ट दुसरी नसते कारण या कोवळेपणाला फक्त आणि फक्त तुटणं माहीत असतं..अजिबात पीळ नसलेल्या दोऱ्यासारखं, पण दोऱ्याचा शेवटचा तुकडाही कोवळे पण जपून असतो. या धाग्यापासूनच पुढे मजबूत तलम सुरक्षित वस्त्र विणता येतं. ते तुटू न देण्याची काळजी त्यापुरती, त्यासाठी घ्यावीच लागते.


आयुष्याच्या अवघे पणापासून क्षणासारख्या भंगुरतेपर्यंत हा कोवळेपणा, स्वतःच्या जगण्यात झिरपला पाहिजे. मैत्रीच्या आरंभ-क्षणापासून ते परिपक्वतेचा अंतिम क्षणापर्यंत नात्यांचा प्रवास होईस्तोवर मैत्रीतला हा कोवळा स्नेह जपला गेला पाहिजे. शिखरांच्या कठोरतेतूनही हिरवाई निवडत-जपत शुभ्र कोसळत्या धबधब्यासारखे जगता आले पाहिजे.




रश्मी पदवाड मदनकर












2 comments:

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...