Monday 24 May 2021

प्रगल्भ जाणिवांचा अविष्कारी संग्रह 'उन्हात घर माझे'



नितीन भट यांना मी प्रत्यक्ष व्यासपिठावरून ऐकलंय. त्यांच्या गझलांतील आशय अर्थात गझलियत, त्यातील अंतर्भाव आणि त्यांचे आकर्षक सादरीकरण सगळंच प्रगल्भ जाणिवांतून अवगत झालेले असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. एकाच माध्यमांचे प्रवासी असल्याने पुढे वाढत गेलेल्या ओळखीतून त्यांचे संवेदनशील असलेले माणुसपण देखील पुढ्यात येत राहीले. अश्या जाणून असलेल्या कवीमित्राचा अत्यंत देखणा आणि वाचनीय असा 'उन्हात घर माझे' नावाचा गझल-कविता संग्रह हातात आला तेव्हा आनंद होणं सहाजीकच होतं. पुस्तकाचे ओढ लावणारे आकर्षक शिर्षक, साधेच पण देखणे मुखपृष्ठ, त्यावर लिहिलेली कोरीव सुंदर शब्दरचना आणि कवीची आत्ममग्न छबी. बघताक्षणीच एक सुंदर वाचनमेजवानी आपल्याला मिळणार आहे हे लक्षात आले. हातात आॅलरेडी दोन पुस्तकं वाचायची असल्याने 'उन्हात घर माझे' वाचायला जरा उशीर झाला पण वाचायला हातात घेतला तेव्हा अधाशासारखे एका बैठकीत वाचून काढला. त्यानंतर आजारपण आल्यानं लिहायचं मात्र राहीलंच, पण हा संग्रह स्वस्थ बसू देत नव्हता यावर लिहायचंय ही अस्वस्थता सतत छळत राहीली.
 
पुस्तकातल्या लक्ष वेधून घेणाऱ्या बाबी म्हणजे पुस्तकाला लाभलेल्या दिग्गजांच्या प्रस्तावना. गायक-संगीतकार सलिल कुलकर्णी, गझलनवाज भिमराव पांचाळे यांच्या शब्दांनी नटलेला.. याबद्दल विशेष वाटले ते म्हणजे नुसतीच औपचारिकता म्हणून नाही तर या प्रस्तावनेतील शब्दाशब्दात जिव्हाळ्याचा ओलावा जाणवतो. त्यानंतर सुरू होतो तो थेट वाचकांच्या मनाचा ताबा घेणाऱ्या गझल कवितांचा धुंद करणारा प्रवास..
 
त्यातल्या एका गझलेतील हा शेर -
कारणे नाहीत आता द्यायला माझ्याकडे
आणि विश्वासासही आहेत गेलेले तडे
एकतर नाही जिव्हाळ्याचा गिलावा‌ राहीला
त्यात पडले कोरड्या काही मनाचे पोपडे

बोथट झालेल्या संवेदनेच्या काळात, आरोप-प्रत्यारोपांची बीजे कविता गझलेत शिरण्याच्या काळात हळव्या कातर गझल‌ व कविता लिहीणारे नितीन म्हणूनच या सगळ्या कंपूशाहीपासून दुर व फार वेगळे जाणवतात. त्यांच्या संग्रहातील काही गझल खरोखरच वाचकांना मोहित करतात,विचारांना प्रवृत्त करतात..

एका गझलमध्ये ते म्हणतात...
जळतो चितेत माझा मृतदेह चंदनाचा
बघ मंद मंद त्याचा दरवळ सुटेल आता

आणखी एक मतला मला आवडलेला ...
जो जिवाचा खास झाला
तो गळ्याचा फास झाला

नितीन यांच्या प्रतिभेचा स्पर्श‌ झालेल्या काही चिंतनशील गझला रसिक वाचकांना देखील अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. ते म्हणतात ...
गणे इतके शाश्वत ठेवा
हर एक इच्छा जगवत ठेवा
वैऱ्याच्या रात्री निजताना
फक्त उशाशी करवत ठेवा

या संग्रहातील अनेक गझल परीस्थितीतून पाझरणाऱ्या खंतानुभुतीच्या शब्दशिल्पातून अवतरीत झालेल्या असाव्या असा साक्षात्कार होतो इतक्या त्या भावोत्कट उतरल्या आहेत. की,
 
झाला सुरू धरेचा उलटा प्रवास आता
माणूस माणसाचा घेईल घास आता
ठरवून पाश सगळे तोडून टाकतो मी
जो काय व्हायचा तो होईल त्रास आता

आणखी हा दोन ओळींचा श़ेर बघा ..
आपुलकीचे सोंग आणता येते मित्रा
प्रेम, जिव्हाळा, माया, ममता उपजत असते.

नितीन यांच्या गझलेचे सामाजिक विषय पाहिले म्हणजे लक्षात येते, की हा माणूस नुसते कोरडे कवित्व गाजविणारा नसून विस्कटलेल्या आणि ढासळत्या सामाजिक परिस्थितीत फोफावणाऱ्या विकृतींना पायबंद बसावा, या समाजाचा पुरुषार्थ जागृत व्हावा आणि त्या अनुषंगाने कणखर स्पष्ट होत जाणारे त्यांचे शब्द कुठलाही मुलाहीजा न बाळगता आहे त्या धारेत वार करतात ...
 
ते म्हणतात..
खोट्या कथानकांचे पोथीपुराण बदला
ठरवून भेद करते ते संविधान बदला
माणूस जात जंगल ताब्यात घेत आहे
निष्पाप श्वापदांनो तुम्हीच रान बदला !

संस्कारमुल्य आणि जाणिवमुल्य जपणाऱ्या या एकंदरीतच सगळ्या गझलेतून व्यासंग, चिकित्सक-अभ्यासू वृत्ती, साधारण माणसाच्या जगण्याचे कंगोरे गोळा करत, उद्भवणाऱ्या सामाजिक परिस्थितीचे अवमुल्यन करण्याची त्यातील वेदना आणि आनंद वेचून त्यांना सुरेख शंब्दांच्या कोंदणात रचण्याची क्षमता नितीन भट यांच्यात आहे हे त्यांनी या गझलसंग्रहाद्वारा दाखवून दिले आहे.

एक उत्कृष्ट आणि कविता व गझलप्रेमींच्या संग्राह्य असावेच असे हे मला आवडलेले पुस्तक आहे.

*********
संग्रहाचे नाव - उन्हात घर माझे
लेखक - नितीन भट
प्रकाशक - मेधा पब्लिशिंग हाऊस, अमरावती
किंमत - १२०/- रू फक्त
संपर्क - ९८५०९५१८१४


- रश्मी पदवाड मदनकर





No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...