Monday 22 March 2021

#भुजंगप्रयात 


अशी सांज येते पुन्हा रात्र होते

तुझ्या आठवांना पुन्हा जाग येते

सुटावे सभोतीे सुगंधीत वारे

तुझे नाव घेता असे आज होते


जसा पावसाचा नसे ना भरोसा 

तसे घेरती मेघ माझ्या मनाला

तुला पाहण्याची मना ओढ लागे

पळे सारखे ते तुला भेटण्याला

 

जरा थांबना तू नको आज जाऊ

जरा सूर लावू नवे गीत गाऊ 

धरावास तू हात हातात माझा

तमोधुंद आकाश बाहूत घेऊ


तुझे श्वास माझे जरा आज व्हावे

जणू चांदरात्री नभाने झरावे

मला स्पर्श व्हावा तुझा प्रेमवेडा 

तनाने मनाने असे धुंद व्हावे


जगाशी नसावे कश्याचेच नाते 

हवाली तुझ्या देह अस्तित्व माझे 

जशी चातकाला तृषा पावसाची

तुझ्या पावलांशी तसे प्राण माझे 


अशी आसवे ही बळे झेलताना

तुझ्या अंतरीचा हले श्वास थोडा

तुझी काळजी प्रेम आभाळ माया

तुझा संग वाटे जणू ध्यास वेडा


©रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...