एका तक्रारीवरून ट्रॉल झालेल्या नाझ कपूर एका प्रचंड वायरल झालेल्या ट्विटने अत्यंत दुखावल्या गेल्या.. त्यात लिहिले होते ''छोट्या केसांच्या स्त्रिया एकनिष्ठ नसतात'' ती म्हणाली मी ट्रॉलर्सना सांगू इच्छिते की, 'लॉकडाउनच्या काळात मी एका स्त्रीला मरणाच्या दारातून वाचवलं होतं आणि नंतर तिच्यासोबत मलाही क्वारंटाईन व्हावे लागले या काळात डोक्यात उवा झाल्या होत्या म्हणून मला माझे केस पूर्ण काढून टाकावे लागले होते''
मिंत्राच्या लोगोवरून झालेल्या वादानंतर लोक सोशल मीडियावर अत्यंत हिंसकपणे वागू लागले आहेत. त्यांनी नाझ पटेल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. कोणी त्यांच्या केसांच्या लांबीवरून त्यांच्या चरित्राची परिभाषा मांडतंय तर कोणी त्यांना स्त्रीवादी भूमिकेबद्दल दूषणं लावतायेत. त्या काम करीत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचीही यातून सुटका झालेली नाही. त्यांच्याविरुद्ध फेमिनिझम असण्यावरून टोकाच्या टिप्पणी अविरत चालू आहेत. तिच्या संस्थेच्या वेबसाइटवरून तिचा फोटो घेऊन तो वेगवेगळ्या मिम्स करत वायरल करण्यात आला. जणू काही मिंत्राच्या निमित्ताने नाझच्या रूपात लोकांना स्त्रीवादाविरुद्ध जाण्याची संधीच चालून आली आहे. महिलांच्या हक्कासाठी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी आवाज उठविणे इतके वाईट होऊन बसले कि आवाज उठवणाऱ्या महिलेच्या विरुद्धच संपूर्ण नेटकरी ट्रॉलिंग-रोस्टिंगच्या माध्यमाने तिच्यावर तुटून पडलेत. तिला स्वतःला घरात कोंडून घ्यावे लागते आहे.. घरातून बाहेर पडली तरी 'हीच ती मिंत्रा वाली बाई' किंवा 'बाई असून हिलाच असे कसे दिसले' म्हणत लोकं टोमणे मारतायत. काही खरेदी करायला गेले कि दुकानदार म्हणतात 'आमचा लोगो नका बदलू हं मॅडम !' .. हे अत्यंत मानसिक त्रासाचे होत जात असल्याचे नाज सांगताहेत. यापुढे जाऊन या सगळ्या विकृत वागण्यावर आणि त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांविरुद्ध कायदेशीर कारवाही करायचे आता तिने ठरवले आहे.
कोण आहेत नाझ :
नाझ पटेल गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करताहेत. त्याचं पूर्ण नाव नाझ एकता कपूर आहे. नाझ ''अवेस्ता फाउंडेशन'' नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात. ही स्वयंसेवी संस्था कुटुंबाकडून नाकारल्या गेलेल्या वृद्धांची काळजी घेते. या ज्येष्ठ मंडळींच्या सेवेसाठी नाज अनेक उपक्रम अनेक कार्य करीत असते. ३१ वर्षीय नाझ पटेल ज्येष्ठ नागरिकांसाठी अन्नसेवा देखील चालवतात.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाझ ह्यांनी ई-कॉमर्स फॅशन कंपनी मिंत्राच्या लोगो संदर्भात तक्रार दाखल केली होती. मिंत्राचा लोगो हा नग्न महिलेच्या पायांसारखा दिसत असून तो महिलांसाठी अपमानजनक आणि आक्षेपार्ह असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. मुंबई सायबर पोलिसांनी मिंत्रा या कंपनीला ही तक्रार पाठवली आणि महिन्याभरातच मिंत्राने त्यांचा जुना लोगो बदलून नवा लोगो बाजारात लॉन्च केला.
खरतर एखाद्या संवेदनशील माणसाने सामाजिक जबाबदारीचे भान राखत आपण करीत असलेल्या सामाजिक कार्याच्या बाबतीत प्रामाणिक राहून एखाद्या आक्षेपार्ह बाबीवर तक्रार नोंदविणे आणि पुढ्ल्याने ती तक्रार स्वीकारून, चूक सुधारून सामाजिक जबाबदारीचे भान राखून त्यावर लगेच कारवाही करून बदल घडवणे हि घटनाच किती कौतुकास्पद होती... दोन्ही बाजू आपापल्या कार्याला, कर्तृत्वाला जागलेल्या. व्हायचेच होते तर चारही बाजूने स्तुतीसुमने देखील उधळता आली असती परंतु नेटकरांनी हाती आलेल्या फुकटच्या कोलिताने सगळीकडे आग फुंकायला सुरु केले .. स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाबत प्रचंड जागृत असलेले आपण इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत जागृत असणे सोडाच सहिष्णूदेखील होऊ शकत नाही हे एकत्र एक समाज म्हणून जगतांना किती घातक आहे ह्याची कल्पना आपल्याला का येत नाही ? असभ्य लोगोबद्दल तक्रार करणाऱ्या महिलेविरुद्ध अखंड असभ्य वागणाऱ्या नेटकरींचे काय करावे ? लोगो सहज बदलला गेला, तसे हि मानसिकता बदलता येऊ शकेल का ?
भारतात महिलांची सुरक्षा हा अनेक महत्वाच्या मुद्द्यांसारखाच एक महत्वपूर्ण मुद्दा आहे. महिला कुठे सुरक्षित असतात ?? असा प्रश्न विचारला तर काय उत्तर आहे आपल्याकडे ? महिलांविरुद्ध हिंसाचार किंवा असभ्य वागणूक जणू सार्वजनिकपणे सहज वागण्याची गोष्ट असल्यासारखी घडत राहते. कार्यालय, महाविद्यालय, प्रवासात किंवा सार्वजनिक ठिकाणी महिलेशी असभ्य वागणूक होणार नाही ह्याची हमी देता येतच नाही पण आता तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसुद्धा यातून अलाहिदा राहिलेले नाहीत. त्या व्हर्च्युअल पडद्यामागेही एक जिवंत व्यक्ती बसली आहे हे का विसरतो आपण? एखाद्याविषयी इतका विखार इतका वाईटपणा पसरवायचा अधिकार कुणी दिला आपल्याला ?? इंटरनेटने सोय करून दिली आहे म्हणून, संधी प्राप्त झाली म्हणून शाब्दिक मार हाणणारे..अपमानास्पद शब्द शस्त्रांनी वार करून गर्दीपुढे एकट्या पडलेल्या पुढल्याच्या मनोबलाचे चीरहरण करून त्याला पूर्णतः नेस्तनाबुत करण्याचे व्यूहच नाहीये का हे ? आणि आपण काहीतरी चुकीचे करतो आहे असे हजारोच्या संख्येतल्या एकालाही वाटू नये हि केवढी शोकांतिका. कुठे जातोय आपला समाज ? मिंत्रा लोगोवर चाललेल्या गदारोळाच्या निमित्ताने नाझ पटेल हिला ज्या पद्धतीने ट्रॉल केले जात आहे त्यावरून महिलांच्या सुरक्षेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ट्रेंडिंग-ट्रॉलिंग-रोस्टिंग सारख्या अत्यंत हिणकस पद्धतींसाठी आता वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनांची गरज आहे का हा प्रश्न देखील ऐरणीवर उभा राहिला आहे.
भारतातील महिला चळवळीचा इतिहास फार मोठा आहे. महिलांविरुद्ध होणारे गुन्हे, गुन्ह्यांसाठी तयार केली जाणारी परिस्थिती, केवळ महिला आहे म्हणून भेदभावातून होणारे अत्याचार-मानापमान आणि डोकं उंचावून सन्मानाने जगण्यासाठी पिढ्यानपिढ्या दिला जाणारा लढा .. केला जाणारा संघर्ष नवा नाही. हे जितकं सवयीचं तितकच तिच्या हालचालींवर, निर्णय क्षमतेवर, आवड-निवडीवर एकंदरीत स्वातंत्र्यावरच मर्यादा लादण्याचा इतिहासही फार फार जुना आहे.. जुना म्हणण्यापेक्षा या सगळ्यांचे 'मूळ'च तर ते आहे. स्त्री जिथे जाईल तिथे तिच्या कार्यक्षमतेवर, अभिव्यक्तीवर, तिच्या विचारांवर आणि त्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या निर्णयांवर अंकुश लावण्याची मानसिकता सोशल मीडियाच्या माध्यमाने अधिक ठळकपणे पुढे येऊ लागल्याचे लक्षात येत आहे.
मिंत्राच्या लोगोबद्दल तक्रार नोंदवण्याचे आणि हा लेख लिहितांना माझ्या विचारांची दिशा एकच, कि महिलांना ती असेल तिथे खऱ्या जगात किंवा अगदी व्हर्च्यूवल जगात तिला स्वातंत्र्याने आणि सन्मानाने जगण्यासाठी पोषक आणि सुरक्षित वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे.. समाजातील कुठल्याही घटकांमुळे आपण असुरक्षित असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होणे, आपल्यावर हल्ला होईल किंवा आपला शारीरिक मानसिक छळ केला जाईल अशी भीती सतत तिच्या मनात असणे हे एक समाज म्हणून जगतांना आपल्यासाठी अत्यंत लज्जास्पद बाब आहे. सामाजिक किंवा सांस्कृतिक जीवनात आपण पूर्ण स्वतंत्र आणि हक्काचे भागीदार आहोत, आपले निर्णय आपल्याला घेता येतात आणि त्यावर अंमलबजावणी देखील करता येते..हे करतांना कुठेही गेलो तरी पूर्ण सुरक्षित असू हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होऊ शकेल इतकी विश्वासार्हता मिळवणे आपला उद्देश असायला हवा. त्यासाठी प्रत्यक्ष जगतांना असेल किंवा तिचा वावर असणाऱ्या सोशल मीडियासारखे माध्यम अश्या प्रत्येक ठिकाणी समाजातील प्रत्येकाने त्यांना पाठबळ देणारे सामाजिक वातावरण निर्माण करण्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.
मिंत्रा आणि नाझच्या निमित्ताने पुन्हा एवढेच कि, तरुणांमध्ये एखाद्या घटनेकडे पाहण्याचा सार्वजनिक दृष्टिकोन सकारात्मक होण्याकडे कल वाढावा, झुंडीने नकारात्मक गोष्टींसाठी एकत्र होण्यापेक्षा सहिष्णुता वाढून वैचारिक प्रगल्भता, समजूतदारी, इतरांच्याबाबतीत अधिक सहिष्णू होण्याची आणि काहीतरी समाजहिताचे करण्याची इच्छा व क्षमता वाढीस लागावी ह्याच सदिच्छेसह ...
UN-HABITAT ने जगातील प्रमुख शहरातील विद्यमान स्थितीवर प्रकाश टाकणारा एक अहवाल सादर केला होता, त्यात म्हंटले आहे कि संपूर्ण जगात विशेषतः विकासनशीलदेशात स्त्रियांबरोबर होणाऱ्या असभ्य वागणुकीच्या व हिंसाचाराच्या घटनेचा आकडा चिंता वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे.. असे वागणाऱ्या मानसिकतेत पुरुषांचा सहभाग महिलांपेक्षा दुप्पटीने जास्त आहे. याबाबत योग्य ते धोरण, उपाययोजना आखून ह्याचे प्रमाण कमी केले जाऊ शकते. गेल्या वर्षात पुणे पोलिस आयुक्तालयातील सायबर सेलकडे सोशल मीडियावरून होणाऱ्या गुन्ह्याच्या तब्बल तीन हजार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींमध्ये ९० टक्के तक्रारी महिलांबाबतच्या आहेत. त्यामध्ये बनावट प्रोफाइल, बदनामीकारक मजकूर टाकणे, अपमान करणे, टोळीने पाठलाग करीत राहणे असे सर्वाधिक प्रकार आहेत. सोशल मीडियावरून महिलांसंदर्भात होणाऱ्या गुन्ह्याचे प्रमाण प्रचंड गतीने वाढत असल्याचे लक्षात आले आहे. यासाठी योग्य उपाययोजना वेळेत झाल्या नाही तर ह्याचे दूरगामी परिणाम अत्यंत वाईट होतील हे निश्चित.
No comments:
Post a Comment