खरेतर या निर्मात्याचे आभारच मानायला हवेत कि ही दुनिया अनेक प्रकारच्या वेड्यांनी भरून आहे .. या वेड्यांच्या असण्यानेच तर शहाण्यांच्या जगण्यात रस आहे. शहाण्यांमुळे दुनियेचा व्यवहार नीटनेटका चालतही असेल पण वेड्यांमुळे दुनियेत जिवंतपणा आणि जगण्याची उर्मी सतत पेरली जाते. मी स्वतःला अत्यंत सुदैवी समजते मला सदैव अशी वेडी माणसे वळणावळणावर भेटत राहतात .. आणि माझ्या जगण्याला नवे बळ नवा आनंद देत राहतात.
हा फोटोत दिसतोय तोही असाच एक ध्यासवेडा आहे - नाव आहे Santosh Balgir
संतोष लातूरचा आहे, एक हुशार मॅथेमॅटिशिअन आहे पण त्याहून अधिक सायकलिस्ट आहे. लातूरहून सायकलने निघून त्याला आज ७३ दिवस झाले आहेत. १४० दिवसांचा ११,००० किमीचा प्रवास तो करणार आहे....त्याला १५ राज्य कव्हर करायचे आहेत त्यापैकी कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगनासारखे ७ राज्य आणि ५००० किमीचा सायकलवरून प्रवास पूर्ण करून तो काल १ मार्चला नागपुरात दाखल झाला. हे २-३ दिवस तो नागपूर एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे नागपूरच्या पुरातन गोष्टी पाहून त्याच्या मेमरीत साठवून घेऊन जाणार आहे. संतोष मला भेटला तेव्हा माझ्या अख्त्यारीतल्या गोष्टी दाखवायच्या म्हणून दीक्षा भूमी पाहून झाल्यावर नागपूर मेट्रोचे ऑफिस, नंतर एक मस्त मेट्रो राईड आणि लिटिल वूड पाहायचे आमंत्रण दिले. त्यानंतर आम्ही रात्री घरी डिनरला भेटलो... या प्रवासातले संतोषचे अनुभव ऐकून मज्जा आली, ते जेवढे अचंभित करणारे होते तेवढेच प्रेरित करणारे देखील होते. एकंदरीत देशातील ऐतिहासिक, पुरातन धरोहर जपल्या गेल्या पाहिजेत, सांभाळल्या पाहिजेत या उदात्त हेतूने निघालेला हा २४ वर्षांचा तरुण ऊन-थंडी-पाऊस, लॉकडाऊन-अनलॉक, कोरोना कशाकशाचा धाक न बाळगता ज्या धाडसानं भारत भ्रमंतीला निघालेला आहे त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. या वेड्या मुलाचा सहवास माझ्या कुटुंबाला लाभला आणि त्याच्या पोतडीभर वेचून आणलेल्या गोष्टींचे रसिक होता आले ह्याचा खूप आनंद वाटला.
संतोषची ओळख करून देणारा आपल्याच शहरातला Vishal Tekade हा आणखी एक सायकलवर भारत पालथा घालायला निघालेला वेडा सायकलिस्ट - (ह्याची कथा घेऊन येतेय लवकरच). तोवर विशाल तुझे धन्यवाद... संतोष आणि विशाल काळजी घ्या आणि तुम्ही ज्या उदात्त हेतूने सायकलवर स्वार होऊन भटकत आहात ते तुमचे उद्देश सफल होऊ देत ह्याच भरभरून शुभेच्छा !!
रश्मी ..

No comments:
Post a Comment