Sunday 8 March 2020

सरिता कौशिक -

#महिलादिन #WomensDay
#भेटलेलीमाणसे

सरिता कौशिक

मी तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला होते. एका रिक्षाचालकाच्या मुलीला (वैशाली वानखेडे) वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मला आठवतं..तेव्हा मी पोलीस आयुक्तांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पाठवले होते. एका अत्यंत हुशार आणि होतकरू मुलीचे भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न केवळ गरिबीमुळे,पैशांअभावी दुर्लक्षित राहू नये असे मनापासून वाटत होते...वैशालीबद्दल का कुणास ठाऊक खूप जिव्हाळा निर्माण झाला होता, तिला कुठून काही मदत मिळू शकेल का आपला काही हातभार लागू शकेल का म्हणून मी धडपडत होते. तेव्हा सरिता कौशिक ह्यांचा ह्याच विषयाला घेऊन वृत्तपत्रातून चाललेला पाठपुरावा मी वाचत होते...आपल्यासारखंच कुणीतरी या विषयाला गांभीर्याने घेताय म्हणून न पाहता न भेटता सरिता कौशिकबद्दल आपसूक एक ऋणानुबंध वाटू लागले होते. दारोदार भटकणाऱ्या वैशालीची स्टोरी सरिताने ज्या ताकदीने लिहिली त्यानंतर देशभरातून हजारो मदतीचे हात वैशालीसाठी पुढे आले. लिखाणात केवढी ताकद असते हे अश्याच अनेक उदाहरणांमुळे मग मनावर कोरत गेले. त्यानंतर अनेक वर्षांनी त्या टीव्हीवर दिसू लागल्या ‘स्टार माझा’ वाहिनीची नागपूरची ब्युरो चीफ म्हणून इलेक्ट्रॉनिक मिडियात त्यांनी प्रवेश केला होता. सरिताच्या अनेक बातम्या अजूनही आठवतात. एका अभागी भिकारणीवर रस्त्यावर झालेल्या बलात्काराची खळबळजनक स्टोरी प्रकाशित करून पोलीस प्रशासनालाही हादरवून सोडणारी सरिता, अल्पवयीन मुलींची कुंटणखान्यात होणारी विक्री आणि त्यांच्याशी होणारा अमानवीय व्यवहार चव्हाट्यावर आणणारी सरिता, नक्षलवादावर प्रखरपणे प्रकाश टाकणाऱ्या बातम्या, शेतकरी, अन्यायग्रस्तांची अवस्था त्यांच्या मागण्या शासनापुढे लोकांपुढे आणणारी सरिता..तीच्या बायलाईन वाचता वाचता हळूहळू फार जवळची वाटू लागली. वार्ताहरांच्या चमूचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला पत्रकार आहेत हे किती छान आहे.. क्राईम बीट सारखी महिलांसाठी दुरापास्त असणारी बीट हाताळणारी महिला पत्रकार म्हणून त्यांना लोक ओळखतात, पण तीथवर पोचण्यासाठी त्यांनी बऱ्याच भल्या-बुऱ्या अनुभवातून प्रवास केला असेल.. तीच तावून सुलाखून निघालेली ही झळाळी आहे हे निश्चीत.



दशकांपासून पत्रकारितेतील प्रख्यात नाव असलेली सरिता स्वभावानेही तितकीच मनमिळावू आणि सालस आहे., महर्षी नारद पत्रकार सन्मान पासून ते गौरवास्पद अश्या अनेक पुरस्काराने सन्मानित, बेधडक ब्रेकिंग करणारी सरिता कौशिक सध्या 'ABP माझा' च्या संपादक आहेत.. नागपूरचे ज्येष्ठ गायक दिवं. गोपाळ कौशिक आणि प्रवीणा यांची हि कन्या पत्रकारितेत उतरली,.इंडियन एक्सप्रेस, हितवाद, हिंदुस्तान टाईम्स, टाईम्स ऑफ इंडिया सारख्या विविध वृत्तपत्रांमध्ये काम करताना राजकारण, क्राईम, कृषी, विज्ञान, क्रीडा, आणि फॅशन असे विविध बीट यशस्वीपणे कव्हर केले. ते करत असतांना सरिताने प्रिंट मिडियात ह्य़ूमन इंटरेस्ट स्टोरीजवर नेहमीच भर दिला. तिच्या लेखनातून उमटलेल्या वास्तवाची अनेक घटनांची शासनाला दखल घेणे भाग पडले, हेच तिच्या पत्रकारितेचे यश. आज मेट्रोच्या बातम्या कव्हर करण्याच्या निमित्ताने, पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सरिताच्या अनेकदा भेटी होतात , गप्पाही होतात आता आम्ही फ्रेंडली झालो असलो तरी तिची ती मनातली तेव्हाची आदरयुक्त छबी तशीच कायम आहे किंबहुना तिचे अत्यंत साधेपणाने वागणे मनास अधिक भावले आहे. आजही त्या टीव्हीवर दिसलेल्या की उर आनंदाने भरून येतो. यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने या धडपड्या, होतकरू, स्वकष्टानं पुढे आलेल्या लोकप्रिय झालेल्या मैत्रिणीचे आजवरच्या यशासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढेही  यशाच्या अनेक पायऱ्या चढत शिखर तिने गाठावे यासाठी सदिच्छा !!

Happy Women's Day Girl ..😍🌹

1 comment:

  1. तेथे कर माझे जुळती
    मुर्ति लहान अन कीर्ति महान

    ReplyDelete

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...