Tuesday 17 March 2020

कहता ये पल-खुद से निकल-जीते हैं चल ....


आताशा चित्रपटातील नवऱ्याच्या प्रेमासाठी झुरणाऱ्या सासुरवाशीणी 'झुबेदा' आठवत नाही. परित्यक्ता होऊन 'अस्तित्व' शोधत फिरणाऱ्या नात्यांचा 'अर्थ' हरवलेल्या, त्यागमूर्ती अन्यायग्रस्त 'बंदिनी', नवऱ्याचा 'अभिमान' जपत स्वतःच्या आकांक्षा गमावून बसलेल्या, बलात्कार पीडित 'इन्साफ का तराजू' साठी संघर्ष करणाऱ्या, माजघराचा कोंडमारा सहन करणाऱ्या, परंपरेच्या जोखडात अडकलेल्या, विधवेचा 'प्रेमरोग' अमान्य म्हणून समाजाने छळलेल्या, आयुष्य रडत घालवणाऱ्या 'कटी पतंग' सारख्या, 'सखाराम बाईंडर' पुढे असहाय, शोशिक, परीस्थितीने पिचलेल्या 'साहेब, बीबी और गुलाम' आणि कोण कोण.... सिनेमा नाटकातली ही पात्रे फार गाजली, ह्यातल्या अभिनेत्रींनीं सशक्त अभिनय केला असला तरी त्यांनी साकारलेल्या प्रतिमा आजच्या पिढीला प्रेरित करीत नाही हल्ली .. उलट ते समाजाचं रूप ठरू नये असं वाटत राहतं... आता परित्यक्ता होण्यापेक्षा स्वखुशीने स्वबळावर 'उंबरठा' ओलांडणारी सुमित्रा (स्मिता पाटील) उगाचच आठवत राहते रात्र रात्र.. 'इंग्लिश-विंग्लिश' शिकून अपमानाला आत्मविश्वासाने, सकारात्मकतेने उत्तर देणारी शशी (श्रीदेवी) हळूच डोकावून जाते मनात. प्रियकराने ऐन लग्नाच्या दिवशी दगा दिलाय म्हणून दुखावलेली पण एकटीच हनिमूनला निघून प्रगल्भ झालेली जग जिंकणारी राणी 'क्वीन' (कंगना राणावत) 'स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिक वेडे' म्हणत कानात फुसफुसत निघून जाते. स्वतःच्याच अत्याचारी मुलाला गोळी झाडणारी 'मदर इंडिया' (नर्गिस) असुदे, मुलीला शिकून सवरून कलेक्टर बनवायला झटणारी 'निल बट्टे सन्नाटा' ची आई (स्वरा भास्कर) किंवा मुलीवर झालेल्या अत्याचाराचा सूड घेणारी 'मॉम' (श्रीदेवी), पीडितेला न्याय मिळवून द्यायला आपल्याच माणसांशी लढणारी दामिनी (मीनाक्षी शेषाद्री), मृत्युदंड (माधुरी दीक्षित), कहाणी (विद्या बालन)  ते मर्दानी (राणी मुखर्जी) पर्यंत स्त्रीशक्तीच्या किती किती प्रतिमा आणि त्यांच्या अभिनयातून येणारी प्रचिती आजच्या पिढीला प्रोत्साहित करते आहे... तेवढीच ठळकपणे आठवणीपासून इतिहास घडवेपर्यंत पुरून उरते आहे.

एक महिला म्हणून मी जेव्हा जेव्हा सिनेमाच्या जगाकडे पाहते.. अनेक प्रश्न सुम्भ बनून पुढ्यात उभे राहतात.

'तू अमला अविनाशी कीर्ती
तू अवघ्या आशांची पूर्ती
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वा ते नेई'
अशी प्रार्थना माय भवानीस करताना आपण स्त्रीला परिपूर्ण आदिमायेच्या स्वरुपात पाहतो तिच्यासमोर नतमस्तक होतो... आणि दुसऱ्याच क्षणाला
चिकणी चमेली, शीला कि जवानी, जलेबीबाई, झंडू बाम अश्या आयटम सॉंग मधून आपण स्त्रीकडे कुठल्या भावनेने पाहतो? आपल्याला स्त्रीला एकतर अबला पाहायला आवडते किंवा आयटम म्हणून.. प्रत्यक्ष स्पर्शाने, अश्लाघ्य शब्दाने, नाहीच काही तर नजरेने देखील उपभोगायला हवी असते ..असे तर नाही ना ? आपण स्त्रीकडे कोणत्या रूपात पाहतो यावरून समाजाची मानसिकता स्पष्ट होत असते.

'बंदिनी स्त्री हि बंदिनी
हृदयी पान्हा नयनी पाणी
जन्मो जन्मीची कहाणी ...
बंदिनी स्त्री हि बंदिनी'
या ऐवजी ...
'सत्यता शोधण्या घेऊनि लेखणी
जाहली दामिनी मूर्त सौदामिनी
दामिनी ...दामिनी'
या रुपात स्त्रीकडे पाहणे केवढे अभिमानाचे वाटते..नाही ? अनेक चित्रपटांनी महिलांना अबला, गरीब बिचारी, अन्यायाने पिचलेली दाखवली पण ह्याच माध्यमाने स्त्रीतील शक्तीचे खरे रूप देखील समोर आणले. खऱ्या आयुष्यापेक्षा त्या मानाने चित्रपटातील महिलांचे रूप खूप आश्वासक वाटते. आपल्या स्त्रीत्व व्यक्त करणा-या (फेमिनाइन) भूमिका. खऱ्या स्त्रीने कसे असावे, कसे वागावे या अपेक्षेतली स्त्री वास्तवात तशी वागू शकत असली नसली तरी अनेक चित्रपटांनी तश्या स्त्री व्यक्तिरेखा फार प्रभावीपणे साकारून दाखवल्या. त्या कधी लोकप्रिय झाल्या कधी नाही पण प्रत्येकाच्या मनावर छाप मात्र सोडून गेल्या. सिनेमा…पडद्यावर रंगणारा कधी काल्पनिक, तर कधी वास्तवरुपी जगाचा खेळ...खरं तर समाजाचा आरसाच तर असतो.. ह्या काही विशेष सिनेमात साडी-गजरा- बिंदी यापलीकडे वास्तवापेक्षाही वास्तवाला कारणीभूत ठरणारी पार्श्वभूमी आणि त्याला संघर्ष करून पुरून उरणारी स्त्री. या चित्रपटांमधली स्त्री व्यक्तिरेखा नेहमीच आधुनिक विचारसरणीची, बंडखोरीची वा एक्स्ट्रिमिटीची भाषा करणारी वाटत असली तरीही आजपर्यंतच्या परंपरेच्या जोखडातून बाहेर पडू पाहणाऱ्या, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या किंवा न्याय अन्यायासाठी संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिनिधी आणि प्रत्येक स्त्रीच्या कल्पनेतल्या पात्र म्हणून यशस्वी ठरल्या. मार्क ट्वेनने म्हटलंय, “Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.”

महिला दिवस जवळ यायला लागला कि का कुणास ठाऊक कालवाकालव होते मनात.  नेमक्या काय भावभावना असतात हे आजवर कळलेलंच नाही. सणवार येतात तसा आनंद तसा उत्साहही जाणवत नाही, पूर्वीपेक्षा आजच्या महिलांची स्थिती फार बरी आहे असे मनात आणले तरी आज रोजच्या होणाऱ्या घटना पहिल्या कि मन पुन्हा सुन्न होतं.. परिस्थिती बदलाची सुरुवात झालीय म्हणून ना धड समाधान मानता येत आणि विशेष दिवस म्हणून ना पूर्ण दुःखी राहता येत. आठवत राहतं काही बाही... आणि दिवसभर मनाचा लोलक दोलायमान होत राहतो. समाजानं गेल्या २ दशकात स्त्रियांना अनेक रूपानं हिम्मत देण्याचं काम केलंय..तीनंही तिची क्षमता तिची ताकद सिद्ध करून दाखवली, पृथ्वीपासून ते आकाशापर्यंत तिनं गवसणी घातली आणि आज असे कुठलेच क्षेत्र तिच्यासाठी अनवट राहिलेले नाही... हे खरे असले तरी दुसऱ्या बाजूने अजूनही तिच्या गोटात अंधार आहे..ती चाचपते आहे, उजेडाकडे येण्यासाठी धडपडते आहे. तिचा संघर्ष अजून कायम राहणार आहे.

आपण समाज म्हणून तिला तिची ओळख निर्माण करायला, तिचं वेगळेपण जपायला, स्वतंत्र-निर्णयक्षम व्हायला  आणि शारीरिक बौद्धिक गुलामगिरी सोडून मनासारखं जगण्यासाठी स्वातंत्र्य द्यायला हवे. चित्रपट आणि समाज माध्यमांचा यावर सकारात्मक नकारात्मक प्रखर परिणाम होतो हे मानले तर, त्याच्या निर्मितीपासून प्रेक्षकांनी करावयाच्या निवडीपर्यंत सगळंच अंधानुकरण न करता तिच्या दृष्टिकोनातून केलं गेलं पाहिजे ..जपलं पाहिजे .. एक निकोप समाज निर्मितीची हि गरज आहे असे समजून हि जबाबदारी स्वीकारली जाईल ह्याच अपेक्षेसह महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा ..

- रश्मी पदवाड मदनकर



No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...