Monday 27 May 2019

प्लेटॉनिक लव्ह ..

सदर - नाद-अनाहद
आपण जागृत अजागृत अवस्थेत असतांनाही आपल्या मनाला भावणाऱ्या विषयांशी घट्ट जुळलेले असतो. रोज उल्लेख होत नसला तरी ते मनात सदैव तरळत राहतात आणि अचानक कुणीतरी संथ पाण्याला स्पर्श केल्यावर पाणी डुचमळतं आणि तरंग उठून ते विषय पुन्हा मनःपटलावर येऊन ठाकतात. अमृता -साहिर- इमरोजच्या विषयाएवढाच राधा-कृष्ण-मीरेचा किंवा कृष्ण-राधा-अनय हे विषय माझे अत्यंत आवडते विषय आहेत. रोज रोज बोलावे, वाचावे, लिहावे, चर्चावे असेच. 'एक सुरत दिवानी,एक मूरत दिवानी,एक प्रेम दिवानी,एक दरस दिवानी' हे असो किंवा  'सावरे की बन्सी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूही बदनाम' हे. अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या, चिंतन स्तरावर आणून सोडणाऱ्या काही कल्पनातीत भक्तीच्या अनोख्या रूपातील कहाणीच्या अध्यात्मिक अंगाचा शोध घेतांना आत्मपातळीवर प्रेमाच्या अनुभूतीची कंपन अनुभवायला लावणाऱ्या मीरेबद्दल मी पामराने काय लिहावे ... मला तर वाटतं मीरा लिहायची नसते, मीरा संवेदनेच्या तरल स्तरावर, अलगद शिरकाव करून अंतर्मनाच्या खोल तळाशी मिटल्या डोळ्याने ध्यान-साधनेच्या शारीरिक - मानसिक अवस्थेत जाऊन ठिबकत ठिबकत आत आत डोहात साठवायची, जपायची असते. आयुष्याच्या उष्ण-आर्द्र क्षणाच्या, वेदनेच्या शिखरावर, एकलकोंड्या भावनेचा आवेग सुटला कि मनाची सारी कवाडे लावून घेऊन, शांत, स्तब्ध पोकळीतून मीरेला हाक घालायची, हि आतली मीरा डोकावली पाहिजे ... तादात्म्याच्या ताकदीवर पुढ्यात येऊन बसली पाहिजे ... उत्कट प्रेमाच्या अनुभूतीवर निराकार प्रेमाच्या प्रतिकृतीचा अनुभव घ्यायचा असेल तर मीरा कळली पाहिजे... असं कधीतरी लिहून ठेवलं होतं ते अश्यावेळी उगाच आठवत राहते.

राधा अन कृष्ण या आवडणाऱ्या संकल्पना, पण आजवर आपण त्यांच्या किशोरवयीन आणि तारुण्यातल्या कथा वाचल्या आहेत. झालेच तर अगदी बालपणीच्याही कथा ऐकल्या वाचल्या आहेत. पण कधी राधा कृष्णाची उतारवयातली कथा वाचली आहे?? .. ती फार रोचक आहे बघा. अरुणा ढेरे यांच्या 'कृष्ण किनारा' पुस्तकात त्यांनी लिहिले आहे, ''आयुष्याच्या उत्तरार्धात राधा कृष्णाला भेटायला येते. कंसवधासाठी गोकुळ सोडल्यानंतर ते भेटलेलेच नसतात. तो प्रसंग फारच सुंदर आहे ... ती अनयबद्दल सांगत असते, तिच्या प्रत्येक सासूरवासाच्या वेळी तोच तिच्या सोबत असतो. कृष्णावरून जेव्हा सासू बोल लावत असते तेव्हा तोच तिला धीर देत असतो ...अनेकदा तिच्या जखमांवर लेपही तो न बोलता लावतो, कोणतीही तक्रार न करता तो सदैव हसत तिच्या सोबत वावरतो ..राधेचा एक क्षणही कृष्णाच्या आठवणी शिवाय जात नसे हे सारं तो आनंदानं सहन करतो'' हे सगळं वाचल्यावर अनयबद्दल आपसूक एक संवेदना जागृत होते सहानुभूती वाटू लागते..

राधा ही अतिशय लोभसवाणी कविकल्पना आहे. माझ्या वाचनात तर आलंय कि कृष्णाविषयीच्या हरिविजय या व्यासरचित ग्रंथात राधा हे पात्र नाहीचेय. पांडुरंग शास्त्री आठवले राधा हे एक रुपक आहे असे मानतात. रा...म्हणजे रास आणि धा...म्हणजे धावणे असे त्यानी सांगितले आहे. पण भागवतात दशमस्कंदात भ्रमरगीतात गोपी आणि राधेच्या रूपाने उद्धवाशी संवाद साधत सगुणभक्ती रुजवण्याच्या व्यासांच्या अल्पशा बीजाचा सूरदास आणि नंतरच्या संत कवीनी त्याचा वटवृक्ष करत नेला कारण त्या विषयीच आकर्षण हे त्यामागचं कारण असावं  ..मधुराभक्तीचा तो कळसाध्यायच म्हणावा लागेल. अनय ...राधेचा नवरा ही तर फार नंतरची भर ...इरावती कर्वे ,दुर्गा भागवत यांनी यावर प्रकाशझोत टाकला आहे ...अरुणा ढेरे यांनी कृष्णकिनारा या त्यांच्या पुस्तकात राधा, कुंती आणि द्रौपदी चित्रणात राधा आणि अनय यांच्या नात्याचे अतिशय सुंदर कंगोरे दाखविले आहेत.

मला वाटतं राधेचं प्रेम एक अनन्यसाधारण प्रेम आहे. यात मिळवणे किंवा कमावणे यापलीकडचा उद्देश अन आशय आहे. Its a platonic love. तिचा कृष्ण शारिरीक बाबतीत जवळ नाही. पण आत्म्याचे मिलन कृष्ण राधेबरोबर आहे तसे ना पुराणात ना इतिहासात सापडू शकेल.. ते एकमेवाद्वितियच.  मला आठवते मी कुठेतरी वाचलं होतं एकदा कृष्ण राधेचे कपडे घालतो आणि तिला प्रेमाचे पुर्णत्व समजावुन देतो. दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात असतांना एकमेकांत इतके विरघळतात कि पुरूषामध्ये स्त्री गुण येणे आणि स्त्रीमध्ये पुरूष गुण येणे हि प्रेमाच्या पुर्णत्वाकडे जाण्याची एक पायरी वाटावी.  राधा मोहन हे प्रेम म्हणजे beyond any kind of gain  शिवाय कृष्ण अलौकिक अनन्यसाधारण पुरूष त्यामुळे राधा शारीरिक दृष्टीने त्याच्याजवळ नसली तरी  आत्मिक पातळीवर ते एकमेकांत विलीन झालेले होते.

राधा-कृष्णा सारख्या दोन पात्रांच्या निरलस निरागस निस्वार्थी प्रेमाच्या प्रतिकांबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे, पण  मला कृष्णाचं राधावरच्या प्रेमापेक्षाही अनय हे पात्र आणि त्याचं प्रेम निस्वार्थ अतुलनीय आहे असं वाटतं.  इथे अनय आणि इमरोजच्या आयुष्याची घडी का कुणास ठाऊक सारखी आहे असंही वाटत राहतं आणि म्हणून माझं मत असं कि, राधा असणं किंवा अमृता मिळणं फार कठीण नाही पण राधा किंवा अमृता मिळूनही अनय होणं किंवा इमरोज असणं त्यांचं शेवटपर्यंत तसंच टिकून राहणं अतिशय कठीण काम आहे. यांचं असणं अनन्यसाधारण आहे शतकानु शतकात जन्मलेले हे चमत्कार आहेत आणि म्हणून बरेचदा ते आहेत किंवा होऊन गेले हा विश्वास बसत नाही आणि त्यांच्या न पटणाऱ्या अस्तित्वाच्या आड पटणारे कुठलेतरी तर्क सापडतील म्हणून शोधत राहतात अनेकजण आणि त्यातून निर्माण होतात अनेक तर्क अतर्काच्या कहाण्या.

या संदर्भात धर्मवीर भारतीच्या 'कनुप्रिया' संग्रहातल्या रचना मला अतिशय आवडतात. कनुप्रिया म्हणजे कान्हाची प्रिया. यात वर्णनं आहेत राधेची, कृष्णाची, त्यांच्या प्रेमाची अशी अनेक गोष्टींची जी वाचत राहावी वाटतात. यातल्या एका दीर्घ कवितेतल्या काही ओळी ईथे देतेय ...

कौन था वह
जिस ने तुम्हारी बाँहों के आवर्त में
गरिमा से तन कर समय को ललकारा था!
कौन था वह
जिस की अलकों में जगत की समस्त गति
बँध कर पराजित थी!
कौन था वह
जिस के चरम साक्षात्कार का एक गहरा क्षण
सारे इतिहास से बड़ा था, सशक्त था!
कौन था कनु, वह,
तुम्हारी बाँहों में
जो सूरज था, जादू था, दिव्य था, मन्त्र था
अब सिर्फ मैं हूँ, यह तन है, और याद है।
मन्त्र-पढ़े बाण-से छूट गये तुम तो कनु,
शेष रही मैं केवल,
काँपती प्रत्यंचा-सी
अब भी जो बीत गया,
उसी में बसी हुई
अब भी उन बाहों के छलावे में
कसी हुई
जिन रूखी अलकों में
मैं ने समय की गति बाँधी थी -
हाय उन्हीं काले नागपाशों से
दिन-प्रतिदिन, क्षण-प्रतिक्षण बार-बार
डँसी हुई
अब सिर्फ मैं हूँ, यह तन है -
- और संशय है
- बुझी हुई राख में छिपी चिन्गारी-सा
रीते हुए पात्र की आखिरी बूँद-सा
पा कर खो देने की व्यथा-भरी गूँज-सा ......


- रश्मी पदवाड मदनकर 

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...