काही गोष्टी दिसतात, भिडतात...सरळ आत शिरतात अन् दबकून बसतात तिथंच..सलत राहतात.
तगमग करतात जीवाची. धड आत राहत नाहीत अन बाहेरही पडत नाहीत.
कुठूनही कसंही अगदी गर्दीतूनही अलगद निघून जाता यायला हवं.. काहीही न पाहता, न लावून घेता, न जुळवून-भिनवून घेता, न भिडता ...कुठेच,कुणीच, काहीच अडकून न पडलेलं. स्वच्छ- निर्मळ शरीर मन घेऊन. आयुष्य कसं ना आत बाहेर ट्रान्सपरंट असायला हवं. कसलंच ओझं नसलेलं आयुष्य जगणं अन सोडूनही जाणं सोप्प असतं मग .. असं सगळं कळतं पण वळत मात्र नाहीच.
तो एमबीबीएसचा मुन्नाभाई 'केमिकल लोचा' आहे असं म्हणाला होता तेव्हा ती गम्मत वाटली होती. पण केमिकल लोचा काय असतो ते कळायला लागण्याआत आपल्या डोक्यातच केमिकल लोचा झाला हे लक्षात आले. गम्मतच वाटते कधीकधी, आणि प्रश्नही पडतो.. आपल्यालाच हे असं होतं का? मनात शिरलेले पण नकळत बुद्धीच्या कुठल्याश्या कोपऱ्यात वर्षानुवर्षे अडकून पडलेले, अडगळीतले असे कित्तेक जुने विचार त्याचा गुंता अजून सुटत नसतांना नव्या विचारांच्या धाग्यावर गाठी सोडवण्याचा प्रयत्न करत बसतो आपण. हे काही विचार पुसता आले तर किती बरे ? कोरी करकरकरीत पाटी काळीकभीन्न असली तरी मिळावी ना पुन्हा एकदा.... पुन्हा रेघोट्या ओढता याव्यात आपल्या मनासारख्या. हव्या त्या आकारात-रंगात .. पण असे होते कुठे?
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अगदी रात्री बेरात्रीही कुठल्यातरी विचारांचा किडा मनात शिरतो. हळूहळू डोकं वर काढत जातो; त्या किड्याला पाय फुटतात, तो रेंगाळत बुद्धीत प्रवेश करतो. त्या चिवट किड्यातून चिकट स्त्राव स्त्रवू लागतो तो भटकत राहतो आणि त्या स्रावाचे तार तयार होतात, एकात एक गुंतत जातात आणि त्या एका चिमुकल्या विचाराचे डोक्यात कोळिष्टकं तयार होऊ लागतात. बरं इतक्यावर कुठे सगळं थांबतं ?? त्या कोळिष्टकांवर दुसऱ्या कुठकुठल्या विचारांचे किडे येऊन बसू लागतात, खोल रुतत जातात, गुंतागुंत होते सगळी आणि बुद्धीचा भुगा होतो. विचारांच्याही अनेक छटा असतात नाही ? काही विचार आपले आपल्यालाच आलेले, काही हसवून-रडवून, दुखावून वगैरे कुणीतरी थोपलेले तर काही कल्पनेच्या अवकाशातून बरसलेले. कधी कधी वाटतं... नसतोच आपण शिकलो बिकलो तर, नसतेच पाहिले रंग जगाचे, नसते दुःख मानून घेतले वाईटाचे, आनंदाच्या उकळ्या नसत्या फुटू दिल्या, वेदनेचे कढ थोपवले असते, सौन्दर्य बिंदर्य दृष्टी नसतीच जोपासली कधी ...तर काय बरं बिघडलं असतं? कुठे काय .... बेगडी माणसं जगतातच ना सुखाने? असे मस्त उंच उंच उडतांना पक्षी कुठे करत असतील विचार बिचार..झाडे डोलतातच ना विचाराविना. उन्ह-सावल्यांचा खेळ चालतोच ना ? पाऊस वारा, दिवस रात्र, चंद्र तारे सगळे सगळे युगानुयुगे कायम आहेत. ते कुठे शोधतात बुद्धीला खाद्य? ते कुठे करतात तत्वांचा विचार? आपणच मेले अतिशहाणे...
मानवशरीरातला हा 'बुद्धी' नावाचा प्रकार फार त्रासदायक असतो खरतर. 'अज्ञानात सुख' आहे असं म्हणतात ते उगाच नाही. बुद्धीचा संबंध नेमका कशाशी असतो.. वयाशी असतो का.. कि ज्ञानाशी ? नाही नाही तो अनुभवाशी असावा. माहिती नाही पण फार बुद्धीचा वापर व्हायला लागला कि इतरांना त्याचा कितीसा फायदा होतो माहिती नाही पण ज्याला ती सतत वापरावी लागतेय किंवा ती उगाचच प्रगल्भ झाल्याने छोट्या छोट्या गोष्टीतही डोकं वर काढत आपलीच वापरली जातेय त्या व्यक्तीला मात्र त्याचा सतत त्रास होतो हे तितकेच खरे आहे. फार वैचारिक किंवा तात्विक बित्त्विक असू नये माणसाने ही समज येईपर्यंत त्या टोकाला पोचलेला असतो माणूस आणि या टोकापासून परतीचा मार्ग नाही हे लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अवती भवती होणाऱ्या प्रत्येकच वाईट गोष्टी चटकन निदर्शनात येत असतील, आसपास दिसणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी बदलण्याची जबाबदारी आपलीच आहे असं वाटत असेल. चांगल्या गोष्टी रुजाव्यात म्हणून आपल्याकडून वारंवार प्रयत्न होत असतील. सतत बौद्धिक वैचारिक गोष्टींची ओढ लागली असेल. वागणे-बोलणे पचत नसेल आणि त्याहून अधिक त्यामुळे मनःस्ताप होऊ लागला असेल. माणसांना पारखायची सवय लागली असेल ... एकटेपणा आवडायला लागला असेल ? कमी बुद्धीक्षमतेची, बाळबोध विचारांच्या माणसांचं सान्निध्य नकोस व्हायला लागलं असेल. गप्पांहून अधिक पुस्तकं, चित्रपटसारख्या गोष्टीत मन रमायला लागले असेल. शांतता चोहीकडे असूनही जन्माची अस्वस्थता लागून राहिली असेल तर आपण त्या स्टेजला पोचतोय असे समजायला हरकत नाही.
बघा, आताही नेमकं करतोय काय आपण.. विचारांचे 'फुगेच' फुगवत बसलोय...पोकळ विचार निव्वळ हवा असलेले. धावतोय धावतोय आपण कायम धावतोय विचारांच्या मागे... थांबायला हवं. विसावायला हवं जरा वेळ.
(हिंगोलीहून प्रकाशीत होणारे 'दैनिक गाववाला' वृत्तपत्रातील 'नाद-अनाहद' या सदरातला या आठवड्यातला हा माझा दुसरा ललित लेख )
-रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment