Saturday 1 June 2019

निघून गेलेली माणसे

सदर- नाद-अनाहद


ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता !

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता ... 




कवी ग्रेसच्या या मार्मिक कवितेचं गाणं झालं नसतं तर कदाचित ती कित्येकांपर्यंत पोचलीच नसती. आपल्या जवळच्या कुणाचेतरी आयुष्यातून असं अचानक नाहीसं होणं...या वेदनेच्या तळाशी नेणारी ही कविता आहे. आपल्या माणसाच्या जाण्याचे ग्रेसांना जाणवले तसे दुःख सगळ्यांनाच जाणवतं खरतर, पण त्या भावना  ग्रेसांसारख्या उत्कटतेने प्रत्येकाला मांडता येतातच असे नाही. अशीच काही नाती असतात, रक्ताने जुळलेली, जवळची दिसणारी या नात्यांनी तशी लेबलं लावून घेतलेली असतात पण त्या नात्यांना जन्मतःच चिकटून आलेली कर्तव्य किंवा हक्क ते निभावू शकलेले नसतात, आयुष्यभर हवं असलेलं न देऊ केलेलं प्रेम, बालपणात घ्यावयाची.. न घेतलेली काळजी, गरजेच्या वेळी भासलेली त्यांची उणीव, संकटात न मिळालेला सहारा  ...एकटेपणात न मिळालेली आधाराची साथ आणि आशीर्वादासाठी डोक्यावर कधीच न ठेवलेला हात या गोष्टी मनात रुतून बसलेल्या असतात, या अपेक्षा असणाऱ्या नात्यातली माणसंं नाहीशी झाली की खूप आठवू लागतात. ही माणसे असतात तोवर सगळं आलबेल वाटत असलं तरी निघून गेली की नात्यातली धग अधिकच गडद होत जाते...खूप त्रास देतात 'न' लाभलेली हक्काची नाती. तशीच ती लाभलेली असतील तर खूप खोलवर जाऊन बसतात त्यांचा चांगुलपणा जीवाला घोर लावत राहतो. आठवणी त्यांच्यावरून पार झालेल्या वर्षांची, ऋतूंची, तमा न बाळगता तश्याच ताज्या, टवटवीत राहतात. आपल्याला कधीतरी सहवास घडलेली माणसे त्यांच्याशी झालेले संभाषण, काही वाद-विवादातून, काही घटना, त्यांचे स्वभाव-लकब, भावभावनांच्या देवाणघेणीत शिल्लक राहिलेल्या संवेदनेतून जागत राहतात आपल्या दिवसरात्रीत. आठवणी सलतात फार चिवट असतात त्यातून डोकं वर काढत निघून गेलेली माणसं पिच्छा पुरवत राहतात अखंड. काही माणसांचं आपल्या आयुष्यात फार गहिरं स्थान असतं, आपल्याला घडवण्यात, जगायला-तगायला लागणाऱ्या गोष्टीत त्यांचा फार मोठा वाटा असतो.. अशांचं आयुष्यातून निघून जाणं बरेचदा कोलमडून टाकणारं असतं. त्या धक्क्यातून सावरायला मग बराच काळ जातो .. त्यातून बाहेर पडलेले आपण मात्र पुन्हा पहिल्यासारखे उरत नाही पार बदललेले असतो, आणि काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाच्या लहानमोठ्या आठवणी गोळा करून मनांत छोटी छोटी पक्की घरं बांधून जातात.

शाळेतली मैत्रीण होती एक मृणाल.. खूप जिवाभावाची. माझ्यावर जीव ओवाळून टाकणारी. शिक्षणात फार रस नव्हता म्हणून शाळेनंतर दोनचार वर्ष अधिक शिकवून लग्न करून दिले होते आई-वडिलांनी. दूरच्या गावी होती कुठल्याशा. तीचं सगळं छान चाललंय असंच कळत राहिलं बरीच वर्ष. दरम्यानच्या काळात आम्हीही मुंबईला शिफ्ट झालो. सातेक वर्षांनी परत आलो. एकदा तिची आई भेटलेली रस्त्यात.. बाकी सगळं बोलणं झालं पण मृणाल कशीये विचारल्यावर फक्तच डोळ्यात पाणी आणून गप्प राहिल्या. माझ्या जिवात कालवाकालव झाली पण ह्या गप्प राहण्याचा अर्थ कळला नव्हता. काही दिवसांनी दुसऱ्या एका मैत्रिणीकडून कळले ती निघून गेलीये आमच्यातून... त्याक्षणी आलेला आवंढा मला अजूनही गिळता येत नाही. तो तसाच अडकलाय असा भास होतो. खूप आठवते मृणाल.. छानदार, गोरीपान, खळीदार अशी तिची प्रसन्न छबी माझ्या मनात कायम घर करून असणार आहे. असाच माध्यमिक शाळेत सोबतीने शिकणारा, खळखळत राहणारं चैतन्य असणारा, अतिशय हुशार वर्गमित्र एके संध्याकाळी क्षणाच्या अपघातानंं हिरावुन घेतला होता... तेव्हाचा तो अजूनही डोळ्यासमोर दिसतो जसाचा तसा. शाळेजवळच्या बसस्टँडवर शेजारी किराण्याच्या दुकानात काहीबाही निवडून देणारी, सामान नीटनेटकी करत राहणारी, आपुलकीनंं चौकशी करणारी, कधीतरी साडीच्या घोळात थोडे मुरमुरे नि कांदा खात बसलेली म्हातारी दिसायची येताजाता. अनेक वर्ष जशीच्या तशीच त्याच अवस्थेत, शाळा संपली, कॉलेज शिकून झाले, नोकरी देखील सुरु झाली पण त्या रस्त्याने जाताना वाकून तिला पाहण्याची सवय काही सुटेना.. ती दिसत राहिली की आपण अजूनही शाळेच्याच दिवसात वावरतो असा भास होत राहायचा.. ती मायमाऊली दिसली की आपल्याही नकळत आपल्याला हायसं का वाटतं ह्या प्रश्नाला उत्तर नव्हते. त्यानंतर एकेदिवशी ती अचानक नाहीशी झाली. कुठे कशी माहीती नाही.. का कुणास ठाऊक आता तो रस्ता फार ओळखीचा वाटतच नाही. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आजोळी जायचो राहायला जशी अनेक जिव्हाळ्याची माणसे तिथे भेटायची तशीच एक वेडी बेबी भेटायची. वय पस्तिशीच्या घरात. नवऱ्यानं दुसरी बाई केली म्हणून मानसिक संतुलन हळूहळू बिघडत नंतर नंतर वेड वाढत गेलेली. असंबंध बडबडणारी, कपड्यांचं भान नसलेली, केस कातरल्यासारखे विस्कटलेले.. पण आम्ही गेलो की आम्हाला आवर्जून भेटायला येणारी.. हातात एखादा आंबा किंवा चार भुईमुगाच्या शेंगा खाऊ म्हणून आणणारी. आम्ही शेवटपर्यंत तिला नावानिशी लक्षात होतो. असेच एकेवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात गेलो तेव्हा बेबी कुठे दिसलीच नाही. ती सुटली होती जाचातून, पण त्या वर्षी दरवर्षीप्रमाणे आजोळ मात्र रम्य वाटलंच नाही. आजही बेबी आठवणीत तिच्या दुखाचं गा-हाणं सांगत जगतेच आहे. माझ्या लहानपणी आम्ही राहायचो त्या भागात आसपासच्या परिसरात कधीही कोणत्याही गल्लीत दिसणारा, रस्ता फुंकर घालून स्वच्छ करून, चौकट आखून वेगवेगळ्या रंगीत खडूने देवी-देवतांचे सुंदर रेखाचित्र आखणारा बंडू दिसायचा. आमच्याच मोहोल्ल्यात त्याचे चांगले घर होते. हा घरी का जात नाही हा प्रश्न मला पडायचा. फाटका पॅन्ट, त्यावर मळलेली लक्तर झालेली बनियान, बाजूला ठेवलेली गरजेच्या वस्तूंपुरतं भरलेली कळकटली पिशवी. इतर वस्तूंपेक्षा त्यात रंगीत खडूच भरलेली असतील असा माझा ठाम विश्वास होता. प्रॉपर्टीच्या वादातून आणि मानसिक संतुलन गमावल्यानं त्याला घरातून बाहेर काढलंय असं लोकं बोलायचे. तो कुणाला काहीच मागायचा नाही मात्र ओळखणारी लोकं त्याला येताजाता हाका मारून काहीबाही देत राहायची. त्याच्या हातात कला होती. रेखा-रंगात तो मग्न राहायचा. वेडा दिसायचा पण त्याने कधीच कुणाला त्रास दिला नव्हता. बंडू कधी कसा नाहीसा झाला हे कळले देखील नाही. त्याला शोधून आणणारं कोणीच नव्हतं पण बंडू पूर्णपणे विस्मृतीत जाणंही शक्य नव्हतं. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन बंडू त्याच्या चित्रांसह अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने कोरून निघून गेला होता.

कधी कधी असे वाटते की, कुणाच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही फरक पडत नसला तरी एखाद्या विशिष्ट क्षणी, एखाद्याच जागी गेलेल्यांच्या आठवणी का ताज्या होत असतील ? ही नसणारी माणसे आपल्याही स्मृतीतून पूर्णतः नाहीशी का होत नाहीत ..काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टींना संपण्याचा शाप असतो पण ही परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत आठवणीत टिकून कशी राहतात? निघून गेलेल्या माणसांच्या रूपरेषा, स्वर-सुगंधाची द्रव्ये धरून ठेवण्याची किमया त्या त्या वातावरणात कायम साठवली जात असावी, त्यांच्याशी संबंधित माणसे त्याच जागेवर तश्याच समान परिस्थितीत एकत्र आली की ती द्रव्ये उधळून आठवणींचे वातावरण निर्माण होत असावे का? कुणीतरी निघून गेलंय म्हणून त्याचे संपूर्ण अस्तित्वच पुसून कसे काढावे ? त्यांच्या अस्तित्वाचे, जगण्या-वागण्याच्या कणाकणांचे क्षणक्षणांचे इथे शिंपण झाले असते ते दरवळत राहतात तोपर्यंत जोपर्यंत त्याच्या भोवतालच्या माणसांचे आणि त्यांच्याही भोवतालचे अस्तित्व संपूर्णतः संपणार नाही. अश्या पद्धतीने विरत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवण्याचे, स्मृतीत का असेना त्यांची जाणीव जिवंत ठेवण्याचे प्रामाणिक प्रयत्न ही नियती करीत असली पाहिजे असं वाटतं..  पण हेही जाणवतं की गेलेली सगळीच माणसं अंशाने उरतातच असेही नाही.. काही राहतात, सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात...कायमची ! अश्यावेळी संदीप खरेंच्या ओळी प्रकर्षाने आठवतात..


तू जो समझा अपना था, वो लम्होका सपना था,
हमने दिलको समझाया, अब हमको समझाए कौन ।
दिवानों की बातें हैं, इनको लबपर लाए कौन,
इतना गहेरा जाए कौन, खुदको यूं उलझाए कौन ।



- रश्मी पदवाड मदनकर

(हिंगोली येथील 'दैनिक गाववाला' वृत्तपत्रातील 'नाद-अनाहत' सदरात प्रकाशित)

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...