Thursday, 29 March 2018

ऊन्हाचं झाड !


हे असं होतं..

ऑफीसमधून रोज रोज अंधार पडल्यावर बाहेर पडताना एकच दृष्य दिसतं; ऑफीसदारातलं झाड अंधार लपेटून झाकोळून घेत असतं स्वतःला. काळ्या, करड्या, वाळक्या फांद्यांचं अंधार लपेटलेलं काळकभीन्न झाड.. कधी फार लक्ष जात नाही त्याकडे..कधी गेलच तर अंधाराचं झाड स्वतःला गडद करून घेतं अधिक... अंधाराचं काय ते अपृप..

कलता दिवस पाहणं नसतच नशिबी..पण कधीतरी उतरणीचं ऊन पाहायची, अनुभवायची उर्मी होते.. नाहीच जमत..पण एखाद्यावेळी अंधार दाटण्याआधी निश्चयानं बाहेर पडावंच तर ऊन असं खोडसाळ होत राहतं, ऑफीसदारातल्या झाडाचा आडोसा घेत लपंडाव मांडतं.... झाडही आखडून वाकोल्या दाखवत अंगभर उन्ह पांघरून घेतं अन स्वर्णरंगानं तेजाळून निघतं...सायंकाळचा फारसा अनुभव नसणारया मला मग ते उन्हाचंच झाड वाटू लागतं.. आत कालवाकालव होते.. माझ्या आतली सायंकाळ गहीवरून येते, अचानक जोम चढतो, आतला अंधार मी ओढून काढते, घडी घालते अन गाडीच्या डीक्कीत टाकून देते...मनातल्या पेरलेल्या आशांना मग पालवी फुटू लागते.. मी झाडाजवळ येते तांबडं पिवळं उन उन तोडून गोळा करते..एकात एक घालून मोठी लांब शाल विणते अन आतबाहेर पांघरून घेते..गाडी सुरू करून रस्त्याला लागते तोवर मनातल्या झाडाला स्वर्णरंग चढत जातो..बहर येतो..पोचेपर्यंत सुर्य मावळला असतो..मनातले ऊन्हाचे झाड अजून तांबड फुटून डोलत असतं..डोलणार असतं


उद्या अंधाराचं झाड नजरेस पडेपर्यंत तरी दिलासा असतो..रात्र झाली तरी उन्ह झडणार नसतं...

(C)रश्मी पदवाड मदनकर
28 March 18
#ऊन्हाचंझाड #ललित
#MyClick

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...