Thursday 29 March 2018

प्रिय कविता ..

प्रिय कविते !

एक दिवस अचानक तू भेटलीस, आणि आयुष्य पालटलं.
रुक्ष, कोरड्या रखरखत्या मातीवर कुणीतरी पाणी घालावं, घालत राहावं आणि एकदिवस आत आत गाडल्या गेलेल्या एखाद्या पेराला पालवी फुटू लागावी तसेच काहीसे होऊ लागले. भरकटलेल्या सुन्न पायवाटेवर भेटलीस तू मला आणि हात धरून शब्दालंकाराने शृंगारलेल्या मखमली, रेशमी, तलम भावस्पर्शाच्या स्वप्नील दुनियेत घेऊन आलीस.

कविते ... तू प्रसवलंयस मला
खरं सांगू मी नाही तुला जन्म घातला, तुझ्या येण्यानं माझ्यातल्या कवियित्रीचा जन्म झालाय. मी नाही तुला नाव दिलं..तूच मला नाव मिळवून दिलंस. मी नाही ओळख तुझी तूच माझी ओळख झालीयेस.
मी नाही ठरवत तू कसं असावस, तू असतेच मुळी अस्तित्वात फक्त तुझे स्वरूप एकत्र तेवढे बांधायचे असते. मग तूच ठरवतेस तुझी शैली..तुझा छंद-बंध, आणि ते कुणी कागदावर उतरवावे हि निवडही तुझीच असते.

मी नाही तू निवडतेस मला ..आईच्या वात्सल्याने माझा हात धरतेस, गिरवायला लावतेस आणि तुला हवी तशी काळे निळे वस्त्र लेवून अवतरत जाते कागदावर. एखाद्या अप्सरेने प्रगट व्हावे तितकेच चमत्कारिक असते तुझे पूर्ण रूप. तुझ्या प्रगटीकरणात मी तर फक्त निमित्तमात्र.

तुझ्या विखुरल्या रुपाला एकत्र बांधायला तू माझ्यावरच विश्वास का ठेवावास  ..?

कारण ..कविते ..

माझं आहे त्याहून अधिक तुझं प्रेम जडलंय माझ्यावर.. तुझं पूर्ण रूप साकारण्याआत तू मला आई म्हणून जन्माला घातलेलं आणि मानलेलं असतेस.. माझ्यातल्या लेखनाचा दर्जा न तपासता, माझीच लेखनकुस प्रसवून घेण्यासाठी तू निवडलेली असतेस  . .. मी मात्र ..
मी फार खुजी आहे तुझ्यापुढे .. तू अवतारल्यावरही मी तुझ्यातल्या श्रेष्ठ निकृष्टाच्या खुणा शोधत राहते एक एक चूक काढून ओरबाडून लेखन संस्काराच्या नावाखाली तुझे रूप मला हवे तसे सोलत-फोडत राहते. मी इतकी खुजी असते कि इतके केल्यावरही तुझे अंतिम स्वरूप पाहून ठरवते तुला माझे नाव जोडायचे कि बोळा करून कचऱ्याचा डबा दाखवायचा...

प्रिये  ...

तू फार फार मोठ्या मनाची आहेस ....

मी तुझी सतत आस मनात पेटत ठेवते. तुझ्या येण्याचे डोहाळे झेलते. क्वचित कधी प्रसवपीडाही सह्ते...तुही येतांना तावून सुलाखून निघालेली असतेस,  पण जितके सहज तू मला निर्माती म्हणून स्वीकारतेस तितकं सहज मी तुला माझी निर्माती म्हणून कधीच स्वीकारत नाही, मला तो कमीपणा घ्यायचा नसतो...

कविते ...
तू गुरु असतेस माझी ...

तुझ्या निर्मितीच्या काळात मी कल्पनेतला ब्रह्मांड पालथा घालत अनुभूतीच्या हिंदोळ्यावर रममाण होत, न घेतलेल्या अनुभवांच्याही शब्दांची नक्षी चितारत असते, तेव्हा न शिकलेल्या न पाहिलेल्या न वाचलेल्या किती गोष्टींचं ज्ञान तू सहज माझ्या बालबुद्धीच्या पदरी पाडत राहते. कुठलाही बडेजाव न आणता मला समृद्ध अधिक समृद्ध करीत राहते.

सखे  .. कधी जिवलग असतेस तू ..

दैनंदिन धावपळीच्या, संसाराच्या पसाऱ्यात भावनांची गळचेपी झाली कि आतात घालमेल होते, मनाच्या अनंत, अनादी, अथांग खोल खोल रुतलेल्या तळात साचलेल्या विचारांचा डोह खळवळतो गाळ हलतो आणी मनात कोलाहल होतो तेव्हा मी भोवतालच्या पोकळीत निराधार उभी, नजर फिरवते तेव्हा तू डोळे मिचकवत खंबीर आधाराचे स्मित पसरवत उभी असतेस शेजारी. मी डोळा ओला थेंब आतच वीरवते, हातातली दिवसभराची काम संपवते आणि गुडूप अंधाऱ्या रात्री हळूच तुझ्या कुशीत शिरते तेव्हा माझे हुंदके, उमाळे अश्रूंच्या आवेगाने भिजवत राहतात तुला रात्रभर...मी शब्द शब्द तुझ्या हवाली करते आणि मोकळं करून घेते स्वतःला... कुठलाही प्रश्न न विचारता, कोणतेही दूषणं न लावता माझ्या मनातली सगळी जळमटं तू अंगाखांद्यावर ओढून घेतेस, माझा कोलाहल माझी घालमेल आता तुझी झालेली असते आणि तरीही तू प्रसन्न चित्त शांत हसत असते.

कविते..
फक्त तीन अक्षरी नाव ग तुझे. पण केवढ्या मोठ्या व्याप्तीच्या प्रगाढ संवेदनांचा भार पेलून धरलायेस खांद्यावर. तुझं ब्रह्मांडव्यापी रूप न्याहाळते तेव्हा.. मी स्वतःला जगासमोर सादर करते ते माझे अस्तित्व किती शुल्लक किती भासमयी आहे याची जाणीव होऊ लागते.

कविते...
तू फक्त देत राहणारी पूर्णा आहेस, आणि मी सतत तुझ्या कडून घेत राहणारी तरीही सतत अतृप्त, असमाधानी..
माझी झोळी तुझ्यासमोर सतत फाटकी ...

कविते ...
माझ्यावरची तुझी माया तू कधीही कमी होऊ देऊ नकोस, तुझ्या कवेत असणारी माझी जागा कधीही कमी करू नकोस. तुझी कृपादृष्टी अशीच कायम ठेव, तुझा आशीर्वादाचा हात माझ्या माथी ठेव. आणि मरणाच्या दारी पाऊल ठेवेपर्यंत तुझी साथ कायम ठेव .. तू आज आहेस तशीच राहा .. अंतरात्म्यात मुरलेली ..रंध्रारंध्रात सामावलेली.
इतकेच मागणे ..

कविते तुला कविता दिनाच्या शुभेच्छा !!  

तुझीच
रश्मी पदवाड मदनकर
२१मार्च २११८




No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...