काही दिवसांआधी सोशल नेटवर्किंग वरून फिरणारी एक व्हिडीओक्लिप घरोघरी दारोदारी चर्चेचा विषय ठरली होती. ''अभ्यास घेतांना शुल्लक प्रश्नासाठी मारणारी आई'' (
ती आईच होती का? असा प्रश्न विचारू नये ते गृहीतच धरायचं आहे).....तर, फार फार बिचाऱ्या मुलाला (
मूल बिचारं होतं का? :O अहो काय विचारताय .. हा काय प्रश्न झाला होय ? मूल बिचारच असतं...सरळमार्गी, आईचं सगळं सगळं ऐकणारं, अजिबात बदमाशी न करणारं, खोड्या-बिड्या नावालाही न करणारं अन अजिबात जराही शिक्षा करण्यास पात्र नसलेलं असंच मूल ते होतं असंच गृहीत धरायचंच आहे) मारणारी हि आई फार फार 'क्रूर' होती (
दोन चापट्यात हे कसं कळालं हे विचारूच नये .. ते पण गृहीत धरायचंच आहे) तर अश्या बिचाऱ्या मुलाच्या क्रूर आईची कहाणी शिव्यांच्या वाखोलीत गावभर-शहरभर-जगभर पसरली. .. त्या आईचा थाटात शालजोडतला उदो उदो झाला सगळीकडे...त्या एकट्या बिचाऱ्या लेकरासाठी कित्तिजन कळवळले वगैरे ... आणि मला काय काय आठवलं म्हणून सांगू (
हो हो मी पण पाषाणहृदयीच आहे ... हळहळ व्यक्त नाही केली म्हणून ना .. बरं... मानलं) तर प्रथम कोण आठवली सांगू ...
.
श्यामची आई आठवते ? श्याम पोहायला जात नाही, माळ्यावर लपून बसतो म्हणून शिंपटी शिंपटीने बडव बडव बडवून काढणारी श्यामची आई...पोहऱ्यात उडी घेतली नाहीस तर घरात येऊ नकोस असं सांगणारी आई. बडवणाऱ्या आया असतात का नाही त्या तर चेटकिणी असतात. तेव्हा सोशल मीडिया असता तर काय कहर झाला असता.. आणि असा बडवतांनाच व्हिडीओ वायरल झाला असता तर श्यामचा कधीच साने गुरुजी झाला नसता.
माझी आई फार शिकलेली नव्हती, पण शिकले नाही कि आयुष्यात काय काय कसोटींना तोंड द्यावं लागतं हे अनुभवानं जाणून होती. म्हणून आम्ही भावंडांनी खूप शिकावं यासाठी आयुष्यभर खस्ता खाऊन ती प्रयत्न करीत राहिली. आमचे अभ्यासातून लक्ष उडतंय असं लक्षात आलं कि ती तिच्या परीने नवनवे फंडे वापरीत असे. आयुष्यभर कधी कधी कुठे कुठे कमी शिक्षणाचा त्रास झाला. शिक्षण घेतले असते तर आकांक्षा कश्या पुऱ्या करता आल्या असत्या हे सतत बडबडत याच्या त्याच्या उदाहरणाने सांगत असायची. आमच्या शिक्षणासाठी, अभ्यासासाठी लागणाऱ्या सगळ्या तडजोडी करायला ती तयार असे. अट एकच..अभ्यास करा, खूप शिका मोठे व्हा. यात कुठे उणीव दिसली कि प्रसंगी बेदम मारायचीही. लहानपणी आम्ही आईच्या हातचा भरपूर मार खाल्लाय, एकदा तर सगळी तयारी झाल्यावर शाळेत जात नाही म्हंटलं म्हणून भरलेली वॉटरबॅग पाठीत हाणली होती. भावाला शिक्षणापेक्षा खेळात जास्त रस. तो बॉल-बॅटमिंटनचा चॅम्पियन होता.
प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि कॉम्पिटिशन एवढाच त्याला कळायचं, अभ्यासात अजिबात रस नसायचा. खेळण्यात तो इतका दंग राहायचा कि परीक्षेच्या दिवसातही तासंतास रॅकेट रिपेअर करत बसायचा, स्वतःची तर स्वतःची मित्रांचीही रॅकेट घरी आणून ठेवायचा. घरात पसारा करून गावभऱ्याच्या रॅकेट शिवत (रिपेअर) बसायचा. एकदा निकाल अत्यंत वाईट आला आणि आईने त्याच्याच हातची रॅकेट घेऊन त्याच्या पाठीत हाणली. आईचा बेत लक्षात आल्याने त्याने वेळेत पळ काढला होता म्हणून अर्धी पाठीत बसली अन खाडकन रॅकेट तुटली. होय, लोखंडी दांडा असलेली रॅकेट तुटली. आता हे सगळं आठवून आम्ही खूप हसतो....पण हे दिवस आयुष्यात आले नसते तर ?? आईने आमचा अभ्यास आमचं शिक्षण इतकं गांभीर्यानं घेतलाच नसतं तर ??
आज आम्ही आहोत तिथे असतो ?...खरं सांगू नसतो...कधीच नसतो.
आता कधी कधी असं वाटत तेव्हा सोशल मीडिया असता तर काय झालं असतं ? आईचा हा एक एक शॉट कॅमेरात कैद करून फेसबुक ट्विटरवर पडला असता तर. माझी आई डाकीण, आतंकवादी, राक्षसीण काय काय ठरली असती ? लोकांनी तिला भरचौकात फाशी द्यायची मागणी केली असती. एवढच काय हजारो लोकांनी हजारदा तिला शाब्दिक फाशी देऊन, प्रचंड हेळसांड करून मेल्याहून मेल करून सोडल असतं. आमच्या लहानपणी हे घडलं असतं तर मग पुढे आम्ही घडलो असतो का ?
माझे आजोबा भिक्षुकी करायचे. घरी ६ भावंडं आणि परिस्थिती अतिशय दरिद्री, दयनीय. भिक्षुकी करून आलेल्या शेर-दोन शेर तांदळात ८ जणांचं कुटुंब दोन वेळचं पोट भरायचे. माझे बाबा तर म्हणे लहानपणी बकरीच्या उसन्या ताकावर जगले. तेव्हा अशीच दयनीय परिस्थिती पुढे आपल्या मुलांची होऊ नये म्हणून त्यांनी खूप शिकावं हि आजीची इच्छा होती. तसे आजोबा फार देवभोळे होते पण आमची आजी मात्र त्यावेळी ४ वर्ग शिकलेली आणि स्वभावाने जरा जाळ मिरचीच. शिक्षणाचे महत्व प्रचंड होते तिला. तेव्हा त्या काळातही अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही चार मुली आणि दोन मुलं या सगळ्यांनी शिकावं म्हणून तिने कडक शिस्तीत राहून प्रयत्न केले. बाबा सांगतात अभ्यास करायचे नाही म्हणून कंबरेला दोरखंड बांधून काका आणि बाबांना आजीने कितीदा विहिरीत सोडले होते. नाकातोंडात पाणी गेल्यावर अभ्यास करायचे कबुल केल्यावरच ती बाहेर काढायची. अश्याच कडक शिस्त मुलींनाही. रात्र रात्र बसून कंदिलाच्या उजेडात अभ्यास करावा लागे. आजीचा धाकच तास होता. या भावंडांनी पुढे समाजाला, कुटुंबाला अभिमान वाटावा असे कितीतरी सृजन घडवून आणले. अनेक समाजाभिमुख कार्य केले. इतका मार खाऊनही या सर्वांनाच त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम आहे.
काय होतंय आपल्याला ?? सहज हाताशी व्यक्त होण्याची माध्यम आहेत म्हणून नको तिथे व्यक्त व्हायला लागलोय आणि व्यक्त होण्याची गरज आहे तिथे बोबडी वळवून गप्प बसतोय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय म्हणतांना नेमकी अभिव्यक्ती काय याची भूल पडत चाललीय. सद्सद विवेक बुद्धीचा अकाल पडतोय आणि या सोशल मीडियावर दाटीवाटीने चालणाऱ्या गर्दीचा भाग व्हायला आमची सगळी धडपड चाललीय का असं दिसायला लागत?
व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही. वैचारिक वाद विवादाचे वारे वाहत राहायलाही हरकत नाही पण, आपण व्यक्त झाल्यानंतर त्या विचारांचा फक्त आजच्या बौद्धिक गटाच्या विचारांच्या स्पंदनावर परिणाम होत नाही याचे दूरगामी परिणाम उद्याच्या पिढीवर नकळत घडत असतात याचा साधा आपण विचारही करतांना दिसत नाही.
(क्रमशः)