Thursday, 31 July 2014

स्केटिंग वरून विश्वविक्रमी झेप !!

















" आज कुछ तुफानी करते है " किंवा मग "डर के आगे जीत है " तसे पाहिले तर नुसत्या जाहिराती; पण अगदी शब्दशः असे वागणारे आणि विक्रमी दौड मारणारे आपल्यातच कुठेतरी दडलेले असतात...गरज असते नजर उचलून बघण्याची....हल्लीच नागपूरच्या इंडियन स्केटिंग अकादमीच्या २३ चम्पिअन्सने पायाला चाक बांधून म्हणजेच स्केटिंग वरून कन्याकुमारी ते नागपूर प्रत्यक्षात २००० किलोमीटरचा प्रवास पार पाडला....केवळ अकरा दिवसात हा प्रवास यशस्वीपणे पार पाडणाऱ्या या चमूच्या विक्रमाची नोंद आता जागतिक स्तरावरील 'लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया बुक' मध्ये करण्यात येणार आहे....

विश्वविक्रम घडवून आणणाऱ्या या विक्रमवीरांचा साहसी प्रवास कसा घडला..कोणकोणत्या टप्प्यातून...कोणत्या संकटातून यांना तावून सुलाखून निघावं लागलं, कश्या स्वरूपाच्या अडचणींना तोंड द्याव लागलं याचाच आढावा घ्यायला मी या चमुंना भेटले..यांना भेटणे म्हणजे खरच एक पर्वणी होती. वय वर्ष ११ ते २५ वयोगटातली हि मंडळी त्यांचे अनुभव मांडतांना प्रचंड उत्साही होते...त्यांचे थरारक अनुभव त्यांच्याच भारावून जाणारया शब्दात ऐकणे सुद्धा जणू थरारच होता जो मी अनुभवत होते ...अनेक घटना मन हादरवून टाकणाऱ्या मेंदू सुन्न करणाऱ्या...काही दुखद तर काही आनंदून सोडणाऱ्या...या प्रवासात या मुलांचे किरकोळ अपघात झाले, शारीरिक इजा झाल्यात, मानसिक दडपण आले, अनेक संकट आ वासून उभे होते...या सर्वांतून यांना पार जाव लागलं पण कौतुकाची बाब म्हणजे हि मुल कुठल्याच क्षणी खचली नाहीत...आताही त्यांच्या बोलण्यात त्यांनी केलेल्या साहसी कृत्याच्या अभिमानाची झळक जाणवत नव्हती तर जाणवत होता तो त्यांचा ओथम्बुन वाहणारा आनंद....

या विक्रमी मोहिमेचे सूत्रधार होते इंडियन स्केटिंग अकादमीचे कोच श्री गजेंद्र बनसोड..गजेंद्र बनसोड हे मागल्या अनेक वर्षांपासून मुलांना स्केटिंग चे नवनवे टेक्निक शिकवण्यात गुंतले आहेत..या मुलांसोबत मिळून काहीतरी नवीन करून दाखवण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी या आधी सुद्धा केले आहेत..पण यावेळी काहीतरी 'धाडसी' अविश्वसनीय अस करून दाखवायचं यांच्या मनात होतं आणि 'चाह है तो राह है' या उक्ती नुसार मार्ग सापडत गेले...कुठल्याश्या एका प्रसंगात नागपूर महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्री दयाशंकर तिवारी यांचेशी भेट झाली...योगायोगाने स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती निमित्त्य काहीतरी वेगळे करायचे मानस यांच्या मनात देखील होते..तसे त्यांनी बोलून दाखवले...स्वामी विवेकानंदाची समाधीस्थळ असणारे कन्याकुमारी या पवित्र स्थळापासून ते आपल्या नागपूर पर्यंतचा प्रवास स्केटिंग वरून करायचा अशी कल्पना गजेंद्र बनसोड यांनी मांडली आणि संपूर्ण कार्यक्रमाची जवाबदारी स्वीकारून दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम संपूर्ण तयारीनिशी सोबतीला उभे राहिले...

ते क्षण आठवून गजेंद्र बनसोड म्हणतात "हे सगळं जुळून आल तो क्षण आनंदाचा होता पण हरकून जाऊन चालणार नव्हतं..आणखी बरीच काम होती बरेच चालेन्जेस होते, लोकांचे टोमणे सुरु झाले होते..कुणालाही या मोहिमेच्या यशस्वीतेवर विश्वास नव्हता..मला अनेकांनी मुर्खात काढले..पण मला हे चाल्लेंज स्वीकारून यशस्वी करूनच दाखवायचे होते आणि त्यासाठी कुठल्याही अग्निदिव्याला सामोरे जावे लागले असते तरी आता मी त्याला तयार होतो" मग सुरु झाली रोज १५० ते २०० किलोमीटर ची प्रवासी प्रक्टिस...मुलांची स्ट्रेन्थ वाढावी म्हणून पालकांचे प्रयत्न सुद्धा सुरु होतेच...प्रक्टिस बरोबरच काही मुख्य जबाबदारया सुद्धा पारखून घ्यायच्या होत्या त्यासाठी म्हणून मग दयाशंकर तिवारी गजेंद्र बनसोड आणि काही पालकांची एक चमू मार्ग निश्चिती, थांबे, जेवणाची सोय, संरक्षणाची माध्यमे, परवानगी या सर्व तयारी करण्यास कन्याकुमारीला जाउन आले...मनाशी खुणगाठ पक्की असल्याने आता सर्व अडचणींना दूर सारून सगळ निट ठरलं होतं...पण अजूनही एक मुख्य अडचण होती ती म्हणजे पालकांचा विश्वास संपादन आणि या मोहिमेशी जुळलेल्या त्या साहसी बहाद्दूर मुलांचे मनोबल खचू न देणे...हे प्रयत्न पूर्वक करत राहावे लागले...त्यातही एका खेळाडूचा या दरम्यान अपघात झाला त्याच्या हाताला इजा झाली आणि त्याचे येणे टळले..अश्याही प्रतिकूल परिस्थितीमधून इतर मुलांना मानसिक स्थैर्य देत मोहिमेसाठी तयार केले गेले....

शेवटी तो दिवस उगवला...२३ विक्रमवीर, श्री दयाशंकर तिवारी आणि त्यांची टीम, पालकव्रुंद, डॉक्टर्स आणि कॅटरिंग असा एकूण ५५ जणांचा ताफा बाय रोड कन्याकुमारीला पोचला...संरक्षणाच्या दृष्टीने मुलांबरोबर प्रवास करता यावा म्हणून काही पालकांच्या दुचाकी गाड्या ट्रान्सपोर्ट ने पुढे पाठवण्यात आल्या होत्या...एक तारखेला पोचून रात्रभर्याच्या विश्रांती नंतर लगेच दुसरे दिवशी म्हणजे दिनांक २ जानेवारी २०१3 रोजी सकाळी ८ वाजता कन्याकुमारीच्या (तामिळनाडू) मंदिरासमोरून आमदारांनी हिरवी झेंडी देताच विश्वविक्रमाच्या दिशेने पहिले पाउल टाकत वैदर्भीय झेंडा रोवण्यास उत्सुक होत सुरुवात झाली....पहिल्या दिवसाचा अनुभव सांगतांना स्वप्नील समर्थ हरखून जात सांगतो.."पहिल्या दिवशी कशाचाही अंदाज नव्हता..कुठलीही पर्वा न करता स्केटिंग करत पुढे जात राहायचं एवढच आमच्या ध्यानात होतं..५०किलोमीटर चा पहिला पाडाव पार झाल्यावर आमच्या लक्षात आले समुद्रसपाटीच्या तप्त उन्हाची सवय नसल्यामुळे सगळ्याच स्केटर ची हाता पायाची कातडी चक्क सोलून निघाली होती....चेहेरे काळवंडले होते,आणि अतिशय वेदना सहन करायला लागल्या होत्या पण त्यावरही खचून न जाता आम्ही सोल्युशन शोधले आणि पुढे निघालो"

या विक्रमवीरांच्या चमूत प्रणय, सौरभ, चैतन्य हे ११-१२ वर्ष वयाचे चिमुकले होते आणि वैष्णवी देवल नावाची एकमेव मुलगी ती सुद्धा १२ वर्षाची..हि लहान मंडळी असूनही यांचे मनोबल मात्र वाखण्याजोगे होते...गोल्ड मेडलीस्ट आकाश साठवणे सांगतो "प्रवासात प्रचंड गरम वारा होता विरुध्द दिशेने वाहणारा, मागे ओढणारा, गती वाढू देण्यास अडसर निर्माण करणारा पण आमच्या सर्वांचाच उत्साह या सर्वांना पुरून उरणारा होता" पालकही सांगू लागले..या प्रवासात बरीच लोकं भेटलीत..कित्येक गावातून, शहरांमधून, राज्यांतून प्रवास अविरत चालूच होता..लोक स्तिमित होऊन बघत होते, मदतीला म्हणून विचारात होते, त्यांचा आनंद बघण्यासारखा असायचा..कोणी गाड्यांवर उभे राहून फोटो शूट करायचे तर कोणी घरापर्यंत चला म्हणून आग्रह धरायचे..एका ठिकाणी एका उत्साही व्यक्तीने तर चक्क या धावत्या मुलांना नोटा वाटल्या.. चारुदत्त आणि लालसिंग म्हणाले "वेगवेगळ्या राज्यातून प्रवास घडतांना देखील आम्हाला कधीही भाषेचा अडसर जाणवला नाही भेटणाऱ्या सगळ्यांच्या भावना इतक्या उत्कट होत्या कि हृदयापासून हृदयापर्यंत आपसूक पोचत होते"

काही अनुभव तर अनाकलनीय आहेत हेद्राबाद मध्ये प्रवेश झाला आणि लक्षात आले कि भडकावू भाषण प्रकरणात अकबरुद्दिन ओवैसी यांना अटक करण्यात आली होती आणि म्हणून त्या संपूर्ण परिसरात तणाव होता पोलिस बंदोबस्त, दंगे, जाळपोळ आणि बरेच काही..याच वेळेस निर्मल येथून प्रवास करायचा होता सगळेच चिंतेने ग्रासले होते...काहीही अपरिमित घडू नये म्हणून काळजीत पडले होते पण स्केटर्स येताच साऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले, सगळीकडे आनंद पसरला आणि क्षणात तणावपूर्ण वातावरण निवळले गेले... याक्षणात जाती-धर्म असे बिनबुडाचे भेदच संपले होते.

प्रत्येक गाव शहराच्या सीमेवर यांचे स्वागत केले गेले यांना अक्षरशः डोक्यावर घेतले भरभरून प्रेम यांच्या झोळीत टाकत गेले..आणि म्हणूनच पुढच्या प्रवासासाठीची उर्जा आपसूकच साठत गेली...या स्केटर्स बरोबर पालकांच्या दुचाकी पण प्रवास करत होत्या..दुसर्या बाजूने पाहिले तर या पालकांनी सुद्धा दुचाकीने २००० किलोमीटरचा प्रवासी विक्रमच पार पाडला आहे..सोबत काही स्त्री-पालक त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सर्वांच्याच काळजीत मग्न होत्या मुलांना एनर्जी ड्रिंक बनवून दे तर त्यांच्या जखमांवर मलम पट्टी करू दे त्यासाठी सतत सज्ज राहिल्या..... मोठ्या मुलांनी लहानांची काळजी घेतली तर लहानांनी मोठ्यांना प्रेमाचा आधार दिला या सर्वांतून एक जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं तेच खरतर लाख मोलाचं आहे....नागपूर महानगर पालिकेने या कामी दिलेले सहकार्य तर विसरता येण्या जोगेच नाही.....

अश्यापद्धतीने २ जानेवारी ते ११ जानेवारी असा दहा दिवसांचा हा चाकांवरचा विश्वविक्रमी प्रवास फुलांच्या वर्षावात, रंगीत प्रकाशाच्या झोतात आणि नागपूर करांच्या प्रेमळ सहवासात गांधीबागेत येउन यशस्वीपणे पूर्ण झाला....त्यानंतर अनेक सत्कार, अवार्ड, बक्षिसं आणि विक्रमाच्या नोंदी होत राहिले पुढेही होत राहतील पण प्रवासा दरम्यान घेतलेले अनुभव, लुटलेला आनंद, आणि विविध प्रांतीय विविध भाषिक लोकांशी जुळलेले बंध अनमोल आहेत आणि हृदयाच्या कुपीत सदैव जपून ठेवले जातील. असे भारलेले वाक्य शेवटच्या क्षणी सर्वच पालक आणि खेळाडूंनी काढले...

संपूर्ण भारतात अजूनही एवढ्या धाडसाची विश्वविक्रमी मोहीम राबव्ण्यासाठीचे प्रयत्न कोणीही केलेले नव्हते गजेंद्र बनसोड यांनी हे पहिले पाउल उचलले आणि असा हा साहसी विक्रम वैदर्भीय गुणाच्या आपल्या नागपुरी मुलांनी करून दाखवला...यांची शारीरिक- मानसिक तयारी करवून घेणारे यांचे कोच, त्यांचे मनोबल जपणारे आणि त्यांच्या पाठी उभे असणारे त्यांचे पालक आणि यांच्यावर विश्वास दाखवून त्यांचे गुण ओळखून त्यांना सहकार्य देणारी नागपूर महानगर पालिका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व साहसी विक्रमवीर या सर्वांचेच आपणा सर्वांच्या वतीने कौतुक मिश्रित अभिनंदन .....








सहभागी खेळाडू :-
१) स्वप्नील समर्थ २) आकाश साठवणे ३) चारुदत्त बांते ४) महेश लोणारे ५) वैष्णवी देवल
६) अमित इंगळे ७) लालसिंग यादव ८) प्रणय अहेर ९)सौरभ दवे १०) नितीश कुमार ११) पवन दंदे
१२) परेश भांडारकर १३) राहुल निखारे १४) सागर चावडे १५) परेश चौहान १६) आदित्य परमार
१७) दिपक चौहान १८) धीरज चावडे १९) विशाल बांगरे २०) चैतन्य देशमुख २१) सैयद असलम अली
२२) क्रिष्णा राठे







(वरील बातमी दैनिक सकाळच्या युवा पानावर प्रकाशित झाली आहे )






Friday, 18 July 2014

आत्मपरीक्षण



खरतर आता म्हणता येईल काळ खूप पुढे गेलाय.… पुढे??…. कि दूर?
सामाजिक अडचणी समस्या कधी नव्हत्या हो? होत्याच ...पूर्वीही होत्या आजही आहेत, पण समस्येकडे पाहण्याचे दृष्टीकोन आणि समस्यांना तोंड देण्याच्या आपल्या पद्धती प्रचंड बदलल्यात. खरतर समस्यांची वर्गवारी करण्यातच आपण चुकतोय कुठेतरी. शिक्षणाची टक्केवारी भलेही वाढत जात असेल परंतु आमची बुद्धिवादी समजूतदारीची संकल्पना फारच संकुचित होत चालली आहे. जाणीव बोथट होत चाललेल्या आहेत. आपल्याला जगण्यासाठी काय महत्वाचे आहे हे अजूनही आम्हाला कळलेले नाही. आम्हाला काय हवंय हे आम्हाला माहितीच नाही. पिढ्यान पिढ्या धर्म, जाती, श्रद्धा आणि त्यातून फोफावणारा विसंगतवाद या काही गोष्टी एका बोचक्यात बांधून बिंबवण्यात आल्या मनावर आणि आम्ही सुद्धा ते बोचकं आमच्या शेंड्याला बांधून घासत ओढत चालत आहोत. आमच्या आदल्या पिढीने ते आमच्या शेंड्याला बांधले आम्ही पुढच्या पिढीच्या शेंड्याला बांधू. पण आमच्या मागच्या पिढीचे अन आमच्या पिढीचे तरी काय बर भलं झालय यातून हे थांबून विचार करण्याची सद्सद विवेक बुद्धी ना आधी होती न आज अजून कुणाला सुचलेली आहे.

'धर्म' हा एकच शब्द अनेकांचे मुडदे पाडण्यास भारी. तथाकथित सनातनी असू दे नाहीतर 'सेक्युलरिज्म' ची टिमकी वाजवणारे सांप्रदायिक बुरखाधारी... दोघांचाही हेतू एकच धर्माच्या नावावर वाटण्या.....
आणि आम्ही काय करतो?
आम्ही वाटले जातो, कापले जातो, छाटले-जाळले जातो आणि मग आमच्या मुडद्यांचे पण धार्मिक राजकारण केले जाते. आशचर्य तर हे आहे कि हे आपण बेमालूम पने होऊ देत असतो. करणारही काय म्हणा यामागेही दडपलेली काही कारणे आहेच…. महत्वाची कारणे
धर्माला .. किंबहूना दंभिकतेला मिळालेली राजकीय प्रतिष्ठा


- कायद्याची भीती नसणे
- समाजातली उदासीनता

या पूर्वीही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणारे समाज सुधारक घडलेच कि, त्यांना विरोधही व्हायचा दगड मारले जायचे, चिखलफेक व्हायचा पण विरोध खचितच गोळ्या झाडून व्हायचा आज स्वतःला सुशिक्षित बुद्धिवादी समजणारा समाज वैचारिक विरोधासाठी यांची वैचारिक क्षमता किंवा बुद्धिमत्ता इतकी कमी पडावी कि त्यासाठी हत्यारांचा आसरा घ्यावा लागावा आणि वरून धर्माच्या नावाने उदोउदो…. अहो कोणत्या धर्माची शिकवण आहे हि? कोणता धर्म जीव घेऊन धर्म निभवा असे शिकवतो?
म्हणजेच न आम्ही धड आमचा धर्म पाळू शकतोय ना माणुसकी… मग कशासाठी आलोय आपण इथे?

थोडं थांबून विचार करूया …. आपण काय करतोय?
आपल्या आई बहिणींची अब्रू गाजर उचलून खावे इतकी स्वस्थ झाली आहे
रोजच्या आवश्यक जीवनाला लागणाऱ्या आपल्या मुलभुत गरजा मात्र आवाक्याबाहेर महाग... आणि आपण अजूनही गप्प बसलो आहोत.
आमच्या मतांसाठी आम्हालाच वेठीस धरले जाते आमचे राजकारण खेळले जाते … आम्ही गप्प.
आमचे हवे तसे वैचारिक मागासीकरण केले जाते किंवा सहेतुक त्यापासून दूर ठेवले जाते … आम्ही स्वतःस सुशिक्षित म्हणवून घेणारे मुग गिळून गप्प च असतो.
आमच्या कष्टाच्या पैशांचे काळ्यात विलीनीकरण होते, भ्रष्टाचार होतो आम्ही थंड
आमचे देश बांधव सीमेवर बळी पडतात …. आणि आम्ही …

आणि मग कधीतरी अचानक धर्माच्या नावावर कोणीतरी एखादे वाक्य बोलून जातात आणि सुन्न पडलेल्या आमच्या सर्व जाणीवा, इतर वेळी झोपलेला आत्मसन्मान, वैचारिक अभिमान खडखडून जागा होतो.

हो … धर्माचा नशाच काही और असतो … नाही?.

कुणाच्या उपाशी पोटापेक्षाही गरजेचा , जीवापेक्षाही महान, एखाद्याच्या दुखापेक्षाही मोठा.

आमच्या पानातली भाकरी ओढणार्याला आम्ही माफ करतो, आमच्या पोरींची अब्रू लुटणाऱ्या नराधमांसाठी फक्त शाब्दिक मार पण आमच्या धर्मावर केवळ बोट ठेवला तो संपला ….

काय हवंय आपल्याला? कशासाठी आलोय आपण इथे? आपल्या खर्या गरजा खर्या मागण्या काय आहे, एकदा या सर्वांवर पुनर्विचार करण्याची वेळ आलेली आहे….आत्मपरीक्षण …बुद्धीला मनाला पटत नाही ते नाही करणार हा एक संकल्प घेऊया … मी,माझं नि माझ्यासाठी ही वृत्ती जरा दूर सारुया. धर्मांधतेच्या खोल अंधारातून अलगद बाहेर पडून आपल्या खऱ्या गरजांसाठी तेवढ्याच पोटतिडकीने लढता येईल का? थोडा प्रयत्न तरी करूया.... स्वतःसाठी नाही तर निदान आपल्या पुढल्या पिढीसाठी तरी सुधारणेला जरा वाव ठेऊया, पटतंय का बघा








Wednesday, 16 July 2014

पाऊस मन ..

खरं सांगू पाऊस मला नको नको वाटतो
तुझी आठवण होऊन पुन्हा डोळ्यामध्ये दाटतो
पावसाचं हे असंच असतं तुझ्यासारखाच वागतो
दिवसा स्वप्नी रमतो आणि रात्र रात्र जागतो.. 

पाऊस पाऊस होतं मन, झिरपत राहतो डोळ्यातून
आतून भिजलं असलं तरी, चेहेऱ्यावरती कोवळं उन
जुन्या काही सरी होत्या मनात आभाळ भरून
वाहता वाहता वाहून गेल्या, गेले दिवस सरून

पुन्हा फिरून उजाडतं डोळे होतात कोरडे ठाण
ओल्या सुक्या वेलीवरचं गळतं पुन्हा एकच पान
ओठातल्या शब्दांनाही मिळत नाही तुझे कान
पाऊस पाऊस म्हणत म्हणत, सुकत जातं सारं रान

खरं सांगू पाऊस मला आता भिजवत नाही
चांदण ओले स्पर्श सुद्धा रात्री निजवत नाही
गंध भरल्या फुलांनीही हृदय उमलत नाही
पावसा तू नकोच येऊ, तुझं येण सोसवत नाही

तुझं येणं सोसवत नाही !!!

नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...!!!



स्त्रियांच्या अनुषंगाने पाहिले तर सध्या सामाजिक वातावरण अतिशय गढूळ झालेले दिसत आहे...नुसते बघत राहून बदलाची अपेक्षा करत बसने; परिस्थिती सध्या यापलीकडे वळसा घालून पोचलेली आहे. आता बदल अनिर्वार्य आहे यापुढे एकतर आपण आपल्या आवडीचा मार्ग बदल म्हणून निवडायचा आहे किंवा परिस्थिती तिच्या अनुषंगाने आपल्याला बदलायला भाग पाडेल.... अजूनही वेळ आहे, अजूनही जरुरी नाही परिस्थितीच्या ओघानेच वाहवत गेले पाहिजे. दुसरा कुठला तरी जास्त चांगला आणि सामाजिक परिस्थितीला पोषक असा ऑप्शन असेल तर कठीण आणि दूरचा असला तरी आवर्जून तो मार्ग निवडायला हवा. प्रत्येकवेळी आपल्या पुरता सोपा मार्ग तात्पुरता सोयीचा असू शकतो पण पुढे हीच सोय मोठ्या प्रमाणात गैरसोय घेऊन येईल आणि मग परत परिस्थितीचा पालट आपल्यालाच परवडणारा राहणार नाही.....


मला अजूनही आठवतं ....वर्षभरापूर्वी मुंबईला लोकल ने प्रवास करतांना एक गोड चिमुकली तिच्या आई कडे गजरा हवा म्हणून हट्ट करत होती. तसे तिच्या आईने डोळे वटारले. पुढे पैंजण,ब्रेसलेट विकणारी आली तशी चीमुक्लीची वळवळ परत सुरु झाली हे सर्व बघून मी जरा हसले तशी तिची आई सांगू लागली ...पहा ना कॉन्वेंट मधे मुलीना बांगड़या, गजरे, मेंदी, पैंजण अलाऊ करत नाहित, कानातलेपण अगदि छोटेसे सोन्याचे चालतात....सोन्याचे कानातले 2,3 वेळा कोणीतरी काढुन घेतले...कोणावरही विश्वास ठेवावा वाटत नाही अगदी पाळणाघरातल्या लोकांवर पण नाही,.तिला कामवालीने स्कूलबस मध्ये बसवले की कामवालीला लगेच मला ऑफिस ला फोन करुन सांगायला लावते,,मुलीला मी अजिबात न लाजता आपलं शरीर, पुरुषांच्या नजरा, लोकांचे अनावश्यक स्पर्श, गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो सारं सांगितलंय, शाळेचा शिपाई, बस चा ड्राइवर, आजुबाजुचे दादा, चाँकलेट देणारे काका … सारं सारं समजावलं !. एक सांगु.. अगदि तिला एकटं असतांना मी तीच्या वडिलांसोबत सुद्धा एकटं सोडत नाही .माणसाच्या मनाचा काय भरोसा? भीती वाटते सारखी, तिला दिवसभर मी नसते म्हणुन कराटे क्लास, डान्स क्लास, स्केटिंग, स्विमिंग अश्या ठिकाणी बिझी ठेवते. कामावरुन येऊन मी तासभर तिच्यासोबत खेळतें,! मुलीची जात आहे जपलं पाहिजे ! हल्ली खुप काळजी वाटते" एवढ़यात तिचं स्टेशन आलं आणि ती उतरली.....ट्रेन धावू लागली आणि माझे विचारचक्र सुद्धा गती घेऊ लागले..चिमुकलीचा तो निरागस चेहेरा डोळ्यासमोरून हलत नव्हता ..किती कठीण आहे हे सगळं. मलाच कळेना काय करावं. त्या मुलीला जपणाऱया आईचं कौतुक करावं की त्या झाकोळलेल्या कळीची दया करावी.... या 8 वर्षाच्या अपुऱया वयात आपल्याच लोकांबद्दल, आजू-बाजूच्या परिसराबद्दल पर्यायाने जगाबद्दल किती अविश्वास पेरला जातोयं! त्या चिमुकल्या वयात खेळायला- बागडायला संपूर्ण अवकाश मोकळं असायला हवं खरतर ...सगळीकडून लाड होणारे वय, कुठेही जगाचे हेवे-दावे न समजणारे वय...शंका, भीती, चूक-अचूक कसलाही नामशेष मनात राहायला जागा आहेच कुठे या चीटूकल्या मनात ...आणि सामाजिक वातावरण गढूळ झालंय यात त्या निरागस जीवाचा काय दोष?

पण... पोरीसाठी जीव तुटणाऱ्या त्या आईचा तरी काय दोष??

मुलीची अब्रू हि तिच्या शरीराच्या एका छोट्या भागावर अवलंबून आहे असे मानणारा आपला समाज...आणि जन्मभर त्याचीच काळजी करत सुटलेला पण त्या शरीरात असलेल्या मनाचं काय? शरीर स्पर्शाने बाटले तरी मनावर जन्म भरयाचा परिणाम होणारच असतो.....फक्त 'स्पर्शामुळे' नाही तर हि समाजमान्य बाब नाही आता समाज काय म्हणेल आपल्याला हिनवेल या भीतीपोटी पण शरीराला स्पर्श होऊ नये म्हणून त्यासाठी जपणूक होतांनाही मनावर परिणाम होत आहेच ना...क्षणाक्षणाला ते तुटते आहे, दुखते आहे, मोकळं राहायला आनंदी राहायला झुरते आहेच ना??..... ...मग परिस्थिती गढूळ झालीय म्हणून एका निश्चल-निष्पाप जीवाला कोंडून ठेवणे, दाबून ठेवणे हा उपाय आहे काय?...कोणीतरी बाहेर मुलीच्या मनाचे तुकडे करू नये म्हणून आपणच तिच्या मनाला वेगळ्या मार्गाने मारत नाहीयोत का?? आणि हे सर्व अगदी जन्मापासून ..का तर मुलगी आहे म्हणून....हा मार्ग आपण का स्वीकारला?? या समस्येच्या उत्तरादाखल दुसरे कोणतेच ऑप्शन दुसरे मार्ग नाहीच आहेत का ?? कि आपल्यालाच हा मार्ग जास्त सोयीचा वाटतो?


समस्या अनेक आहेत, तसे आपल्या मनात साठलेले प्रश्न देखील अनेक आहेत....पण नुसते प्रश्न उपस्थित करून कसे चालेल...प्रश्न निर्माण झाला आहे तर उत्तर शोधायलाच हवे...प्रत्येक पिढी सामोरचे प्रश्न वेगळे असतात आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती सुद्धा वेगवेगळी ...शेजारच्या घरी मुलगी दुखावली किंवा शेजारच्या मुलाने कुणाची तरी मुलगी दुखावली तर 'मला काय त्याचे' हे कुठल्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही किंवा स्वयंकेंद्री झाल्याने लागलेल्या आगेतून आपण आपले घर बचावले एवढीच भावना उपयोगाची नाही आग पसरणार असेल तर त्याची झळ तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोचणारच....आसपासच्या घटनांचे आपल्यापासून अलिप्त राहणे सुद्धा आपल्याला झेपणारे नाही...तेव्हा वेळीच जागे झालेले बरे...प्रश्नांची उत्तर शोधायला किंवा पर्याय म्हणून तरी एक नवी पिढी उभी करायला हवी आणि जशी प्रत्येक स्त्री एक संसार उभा करते तसे तिने पोषक समाज घडवून आणायला हाथभार लावायला हवा ....प्रत्येक घरात शिवाजी जन्माला यावा अस वाटत असेल तर प्रत्येक आईला आधी जिजाऊ म्हणून जन्म घ्यावा लागेल...


स्त्री हि जन्मदात्री आहे. जन्मदात्री म्हणजे नर किंवा मादी जन्म देणारी नाही, तर नर किंवा मादीच्या माध्यमातून 'माणूस' जन्माला घालणारी. संस्काराचं बीज पेरून पोषक, समंजस पिढी घडवणारी....स्त्री ने मनाशी ठरवले तर काय नाही होणार ? पदराला गाठ बांधून पदर खोचून तयार होन्याचीच काय ती वाट आहे.......मुलगी मुलगा भेद न करता एकमेकांबद्दल आदर, बाहेरील शारीरिक आवरण बघून आकर्षित होऊ नका तर त्या आवरणाच्या आतल्या खर्या माणुसरुपी मनाला आकर्षित व्हा, त्यावर प्रेम करा हि पहिली शिकवण आपण आपल्या घरून मुलांना देऊया ...मुलीकडे 'वासना' या दृष्टीकोनाने बघणाऱ्या आपल्या पुढल्या पिढीतला 'पुरुषी दृष्टीकोन' चेंज करायचा पूर्ण प्रयत्न करूया एवढेच नाही तर मुलगा हा निव्वळ बलात्कारी किंवा दृष्ट असतो असेही नाही त्याच्या हृदयात देखील बापासारखे आणि भावासारखे निर्मळ एक मन असते हे मुलींना समजून सांगूया...उद्याच्या तरुण पिढीच्या प्रेम आणि मैत्रीच्या व्याख्या बदलण्यास मदत करूया. शरीराच्या पलीकडे मन जुळणे आणि नाती टिकवणे हाच खरा सौख्याचा गाभा आहे हे या पिढीत ठासून भविष्यासाठी पेरणी करता येईल असे काहीतरी करून दाखवण्याची वेळ आता आलेली आहे .....चला सख्यांनो नर आणि मादी नाही त्यापलीकडचा माणूस घडवूया...



स्त्री प्रवास .... एक अनुत्तरीत प्रश्न !!

 स्त्री प्रवास … कुठून सुरु झाला हा प्रवास? माझंच जगणं मला जगू द्या, ते असे ओरबाडून संपवू नका, यासाठी तळमळीने मागणी करण्याचा प्रवास? कधी ठासून, कधी रडून, कधी ओरडून तर कधी मंचावर उभे राहून ताठ मानेने …तरीही मुसमुसतच विचारतेय ती.   
स्त्री म्हणून होणारे अत्याचार माहिती आहे साऱ्यांना, दिसतंय ते पण कुठे संपेल, अंत आहे का ह्याचा … आणि शेवटी मिळेल का तिचं तिला हक्काचं जिनं ?… या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाचकडे नाही. …. ते वर्षानुवर्ष अनुत्तरीतच. 

महाभारतातली पाच पांडवांची बायको द्रौपदी, रामायण मधल्या रामाची आई कौसल्या, बायको सीता, लक्ष्मणाची बायको उर्मिला, किंवा मग रावणाची बायको मंदोदरी  …. आई गांधारी किंवा कौरवांच्या बायका तरी सुखी होत्या का हो ? देवकी -यशोदा कि मग राधा…. मीरा तरी ? 
हे सगळं पुराण समजून सोडून दिले तरी मग इतिहास तरी मागे आहे का ? सावित्री बाई फुले, अहिल्या होळकर …. आत्ताच्या सिंधुताई सपकाळ? 
आजही प्रवास सुरूच आहे. त्याला अंतच नाही. क्लारा झेटकिन ते ऑंग सान सू कि ,झाशीची राणी तेअफगान ची मीना केश्वार कंवल , माया त्यागी ते ज्योतीसिंग पांडे, अजूनही वाट बिकटच आहे. आजही स्त्री लढतेच आहे स्वतःच्या अस्तित्वासाठी, जगण्यासाठी … 

आजही 'युसुफ्जाई मलाला' अंगावर गोळ्या झेलते. मारणारा तिचं वय बघत नाही तिचे म्हणणे समजून तर दूर ऐकूनही घेत नाही. ती फक्त स्त्री आहे आणि स्त्रियांसाठी आवाज उचलतेय एवढंच पुरे …तिचा जीव घ्यायला … पण ती तगली- जगली अजून लढतेय …. बलात्कार पिडीत 'अरुणा शानबाग' गेल्या ३७ वर्षांपासून मानसिक, शारीरिक सर्वच स्तरावर खचून गेलीय पण धुकधुकी आहे अजून जीवात एवढंच काय ते शिल्लक  …तिचा आरोपी जेल मधून सुटून रुजलाय परत समाजात, संसार थाटलाय त्यानं…. पण हि रोज मरून जगते आहे. मरण येत नाही तोवर जिवंत राहणार आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचल्यावर समोर असलेले जगणे मरणप्राय आहे म्हणून दया मृत्यु मागणारी 'सोनाली मुखर्जी'…. कुरूप चेहेरा लपवत तडफडत जगतेच आहे … ती काय किंवा मग लष्कराचे अनिर्बंध अधिकार कमी करा म्हणून गेली तेरा वर्षे उपोषणावर असणारी अन्न नाकारणारी तरीही अजूनही अन्यायाला बळी पडणारी 'इरोम शर्मिला' काय. …'तस्लिमा नसरीन' सारखी गाजलेली लेखिका सुद्धा देशोधडीला लागते … वर्षानुवर्ष जीव मुठीत घेऊन इथे तिथे लपत पळत राहते …. 

'फुलन देवी' चा कित्तेक दशका आधीचा बलात्कार असू दे कि आजची 'निर्भया'…. तंदूर मध्ये जाळली गेलेली नैना साहनी किंवा मग शिवानी भटनागर, प्रियदर्शनी मट्टू, जेसिका लाल किंवा आरुषी तलवार ……… गर्भाशयातच भ्रूण हत्या, बलात्कार, ऑनर किलिंग, अ‍ॅसिड अटेक, हुंडाबळी आणि काय काय …. जन्मापासून ते मरेपर्यंत भीत भीत जगतांना निदान एका दिवसाचं भयमुक्त जगणं शोधू पाहणारी कालची स्त्री आणि आजचीही स्त्री … 

शेतात राबणारी गरीब, कार्यालयात सेवा देणारी उच्च शिक्षित, घरात खेळणारी चिमुरडी, शाळेत-महाविद्यालयात जाणाऱ्या युवा…. रस्त्यात, बस मध्ये, ट्रेन मध्ये, शाळेत, शेजारी, कार्यालयात, सासरी, माहेरी आपल्या माणसांत, परक्यांमध्ये कुठेतरी निर्धास्त, नि:संदेह, निर्विवाद जाऊ शकेल. न अडखळता मोकळा श्वास घेऊ शकेल अशी परिस्थिती आहे का अजून ? एवढ्या वर्षांपासून नाहीच अजून …पण का ? 
हिंदू, मुस्लिम, इसाई धर्म कुठलाही असू दे … भारत, अफगान, अमेरिका, पाकिस्तान देश कोणताही असू दे …. दंगे होऊ दे, आर्थिक संकट येऊ दे, महायुद्धे होऊ दे , धर्मयुद्ध होऊ दे सर्वात आधी बळी पडते ती 'स्त्री' जात.

काय होईल व्यासपीठ देऊन …. भाषण करून, प्रश्न मांडून ? काय होईल मागण्या करून ?
वर्षानुवर्ष ह्याच समस्या आहेत …. ह्याच अडचणी आहेत …कालही तिची जगण्याची तगमग होतीच आजही आहे. कधीतरी परिस्थिती बदलेल म्हणून तिने अशाही सोडलेली नाही. …….

आजही स्त्रिया स्वप्न बघतात त्या आदर्श समाजाची …. जेव्हा स्त्रियांना शरीरापलीकडे एक भावना म्हणून बघायची आणि आदराने वागवायची बुद्धी आपल्या समाजात रुजेल. स्त्रियांचा आदर, त्यांचा आत्मसम्मान जेव्हा मना-मनातून आपसूक जपला जाइल. हि जागा, हे वातावरण आणि इथल्या प्रत्येक गोष्टीवर तिचाही समान वाटा असेल.  आणि असा आंतरिक बदल जेव्हा घडेल, तेंव्हा महिलांचा आदर करण्यासाठी वर्षातला एखादा विशिष्ट दिवस साजरा करण्याची गरजही उरणार नाही.



(प्रस्तुत ललित २३ sept १४ रोजी दैनिक सकाळच्या fast track पानावर प्रकाशित झाले आहे)  


Sunday, 6 July 2014

२४/७ ऑनलाईन



पिढी दर पिढी बदलत जाणारे विचार, वृत्ती, बुद्धीमत्ता ....कधी कधी अचंभित करणारे असतात . पूर्वी Generation gap मध्ये खरच Gap असायच. मग त्यातले बदल सुद्धा साहजिक आणि समजण्यासारखे होते ....पण हल्ली जस जशी टेक्नोलॉजी अपडेट होत जाते तस तशी आत्ताच येऊन गेलेली मागची टेक्नोलोजी मागच्या पिढी सारखी गणली जाते ....अगदी आत्ता आत्ता च आमच्या पिढीला कम्प्युटर पिढी म्हणून 'हुश्शार' असे काहीसे संबोधन मिळाले तेव्हा ऐकून अशी कॉलर वर यायची....पण आजच्या कोलेज मुलांना पाहून कम्प्युटर युग सुद्धा खूप मागे पडले असे वाटू लागले.....आजचे युग हे 'सोशल नेट्वर्किंग' चे. २४/७ एकमेकांशी जुळून राहण्याचे. खूप नशीबवान आहेत आजच्या पिढीतली मुलं खरतर . नुसते कम्प्युटर युग नाही तर आजच्या पिढीने तंत्रज्ञानातील अत्युच्च मजल गाठलेले सगळे टेक्निक्स डोळ्यासमोर पाहिलेत, बदल अनुभवलेत आणि प्रत्यक्षात त्या सर्वांचा उपयोग करून घेतला ......कोणतेही बदल हे चांगल्या उद्देशाने घडून आलेले असतात...सर्व प्रथम नजरेसमोर असते ती एकमेव मानव जात आणि तिची सोय. पूर्वी बदल सोयीसाठी व्हायचे. नवीन इंन्वेन्षण सुद्धा सोयीसाठी केले जायचे....आजही तसेच आहे खरतर, पण बदल झालाय तो आपल्या मानसिकतेत..गरज किंवा सोय यापेक्षा जास्त भौतिक सुख, मज्जा, आणि देखावा या गोष्टींनी आपल्या मानसिकतेची कमाल जागा व्यापून धरली आहे....भौतिक सुख मिळवणं किंवा एन्जोय, लग्जरी या गोष्टी चुकीच्या आहेत असे माझे अजिब्बात म्हणणे नाही.....मात्र आयुष्य हे फक्त याचसाठी आहे असे समजणे मात्र चुकीचे.

आजच्या पिढीला मिळालेल्या सर्व सुखसोयी या त्यांच्या गरज पूर्ततेसाठी आहेत....खरतर गरजेपेक्षा जास्तच आहे त्याचा उपयोग सोयीसाठी व्हावा हि किमान अपेक्षा....पण होतं काय कि प्रत्येक गोष्टीकडे सुखवस्तू आणि मज्जा म्हणून बघण्याचा आपला दृष्टीकोन कधीतरी आपल्यालाच भारी पडू शकतो हि दूरदृष्टी मात्र दूर दूर पर्यंत नसणारी हि आजची पिढी. आपल्याला लक्षात न येणाऱ्या काही गोष्टी सहज चालता बोलता लक्षात आणून देण्याच्या छोट्याश्या प्रयत्नात इथे काही उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करते.


आज सगळ्यात जवळच वाटणारं काही असेल ते आहे 'सोशल नेटवर्क साईट्स'. जवळच्या-दूरच्या मित्रांशी जुळून राहायचं उत्तम साधन, व्यक्त व्हायला एक सर्वोत्तम Platform...रोजच्या घडामोडी सांगायला आणि मित्रांच्या घडामोडी जाणून घ्यायचे जवळचे ठिकाण. इथे रडता येतं-हसता येतं ..रुसवा-फुगवा आणता येतो आणि घालवता देखील येतो...माहितीची देवाण घेवाण, तुमच्या अंगी असलेल्या कलात्मक गुणांचे प्रदर्शन देखील येथे करता येते. तुम्ही आहात तसे इथे दिसू शकता किंवा यापेक्षा वेगळे देखील...दिवसातला किती काळ काय काय करता याचं सगळं गणित आपल्या कळत-नकळत इथे उमटत असतं ....आपल्या खऱ्या आवडी-निवडी, आपली भाषा शैली, आणि सगळ्यात ठळक उभारून बाहेर पडते ते आपले विचार आणि आपला स्वभाव......हे सगळं कळत असतं आपल्याला पण इथे कोणाला कशाची काळजी नाही.....सगळं कसं बिंदास...हे सगळं घडत असतांना आपलं भविष्य घडवायची आपली कसरत देखील चालू असते....शिक्षण, त्यासाठी कोलेज क्लासेस , रात्र रात्र जागून केलेला अभ्यास, दूर दूर धावत पळत पूर्ण केलेले क्लासेस, टेस्ट, एक्जाम, सन-उत्सव त्याग करून हि सर्व खटाटोप असते भविष्याच्या तरतुदीची...भविष्याची तरतूद सफल ठरली तर आयुष्य सुखाचं जाणार असतं .....हि जाणीव मनात ठाण धरून असते....ते स्वप्न, ती आकांक्षा फोल ठरू नये म्हणून वाटेल ते करायला तयार असलेले आपण .....कधीतरी असेच एखाद्या intarview ला जातो, महत्वाची आहे हि नौकरी मिळाली तर आयुष्य बदलणार सगळी स्वप्न पूर्ण होणार असे सगळे दिवास्वप्न डोळ्यात साठवून आपण खुर्चीत बसतो आणि …आणि …

उत्तर देण्याची गरजच पडत नाही.… आपली मुलाखत घेण्यास समोर बसलेल्या महोदयांना आपल्या बद्दल इंथभुत माहिती आहे.  तुम्हाला सतत फिरायला आवडतं, मागल्या वर्षीचे दोन विषय निघायला त्रास झालेला, अमका कि तमका विषय साला डोक्यातच शिरत नाही, आठवड्यात कितींदा पिक्चर बघता, सलमानसाठी किंवा कटरिना साठी रात्रंदिवस झुरता, वडिलांशी खटका उडाला, कामाचा अभ्यासाचा प्रचंड कंटाळा येतो. रिलेशनशिप स्टेटस सतत बदलता दिवसातले २४/७ ओन्लाइन असता अगदी अर्ध्या रात्री सुद्धा… हुश्श्…


अस सगळं माहिती असणाऱ्याने तुम्हाला का म्हणून नौकरी वर ठेवावं ?? नाहीच ठेवणार तो  … सगळ्या स्वप्नांची क्षणार्धात राख झाली ना? कुठून बरे कळले हे सर्व त्यांना …. जादू बिदू येते कि काय? उम्म्म्म्ह ,,,, तुम्ही स्वतःच सांगितलय ते त्यांना अगदी स्पष्ट किंवा जरा जास्तच लाउड.….

सोशल नेटवर्क वर आपण वावरत असतांना आपले सगळे सिक्रेट्स उघड करून ठेवत असतांना आपल्या भावितव्याचे भान असायला हवे. लग्न ठरतांना सुद्धा आपले सोशल नेट्वर्किंग तपासले जाऊ शकते. नौकरी आणि लग्न हा जन्माचाच प्रश्न असतो. आणि तुटपुंज्या, थिल्लर सोशल नेट्वर्किंग सारख्या टाईमपास साईट मुळे यावर परिणाम होऊ नये हि काळजी घेतली गेलीच पाहिजे. …शेवटी आयुष्य म्हणजे वर्च्युवल जग नव्हे आपल्या आयुष्याचे सुख दुःख प्रत्यक्षच समोर वाढलेले दिसणार आहेत आणि ते तसेच प्रत्यक्ष फेसही करावे लागणार आहेत …तेव्हा जरा विसावू या वळणावर आणि विचार करूया थोडं भान राखूनच आयुष्याला पुढे जाऊ या. पटतंय का बघा ……




(प्रस्तुत लेख सकाळ वृत्तपत्राच्या 'युवा' या विशेष पानावर प्रकाशित झाला आहे)


शाणु ....!!

'हेल्लो … श्रेयस, श्रेयस मी … मी बोलतेय  …श्रावणी, हे बघ फोन ठेऊ नकोस प्लीज '

'…… हम्म   '

'अरे तनुल बद्दल काही कळलं का ? हेलो …ह … ह … हेलो श्रेयस'

श्रावणी पुन्हा मुसमुसू लागली ' सांगा रे कुणीतरी काहीतरी मला… माझ्या एवढ्याश्या गुन्ह्याची एवढी मोठी शिक्षा नका देऊ मला'
बराच वेळ कॉट वर बसून पायात डोकं खुपसून हुंदके देत रडत राहिली  … काही वेळ गेला असेल … जरा भानावर आली

 तोंडावर उतरलेले केस मनगटाने मागे सारले, तळव्याने डोळे पुसले, नाकावारुन उलटा हात फिरवला आणि परत लगबगीने ती तनुलचा नंबर डायल करू लागली. फोन कानाला लावला आणि वाजणारा फोन उचलला जाईल ह्याची ती डोळे बंद करून वाट बघू लागली. पण नो रिप्लाय.  
तिने नंबर रिडायल केला 'आणि उजवा पाय जागीच हलवत 'तनुल प्लीज रे प्लीज एकदा फोन उचल, शपथ आहे तुला, उचल रे नको जीव घेउस' पुटपुटू लागली. पण काहीच उपयोग झाला नाही.  डोळ्यातून पुन्हा आसवं ओघळू लागले.
भरलेल्या डोळ्याने पुसट दिसणाऱ्या नावांच्या यादीत ती आणखी एक नाव शोधू लागली. नाव दिसताच तिने नंबर डायल केला समोरून फोन उचलल्याचे लक्षात येताच ती आवाज सावरत बोलु लागली

 ' रावी हे बघ ऐक एकदा माझे…हे बघ मला राहवत नाहीये गं , तू तरी समजून घे, अक्खी रात्र पालटली आता दुपार झालीय पण तनुल चा काहीच पत्ता नाही… काहीतर बोल गं '

 ' हे बघ श्रावणी या विषयाला काहीच अर्थ नाहीये आता … जे व्हायचं ते होऊन गेलंय'

 ' अस नको म्हणूस ना ग … प्लीज … माझ्यासाठी एकदा तू … हेलो हेलो … रावी… हेलो रावी'

ती पुन्हा हुंदके देऊन रडू लागली. हातातला फोन तिने बेड वर फेकून दिला … रडत रडत खाली बसली आणि भिंती लगत डोकं मागे टेकून शून्यात ध्यान लावून बसून राहिली तशीच कितीतरी वेळ … डोळ्यातून अश्रू वाहत राहिले तसेच .डोळे सताड उघडे …

दरवाजा वाजला … तिची पापणी सुद्धा हलली नाही… दरवाजा जोरजोरात वाजू लागला. ती नाही हलली जागची

आईने आवाज दिला बराच अन बाहेर ये अशी ताकीद देऊ लागली….

विजेच्या ताकदीने श्रावणी उठली जागची…  झपझप पावले टाकत दाराजवळ आली, झर्रकन हात कडी जवळ नेत कडी उघडली आणि हवेच्या गतीने दार उघडलं  …. आई भयचकित होऊन दारात उभी होती. श्रावणीने लालेलाल अश्या भरल्या डोळ्याने काळीज चिरत जाणारी करारी पण रागीट नजर टाकली आईवर …. काही सेकंद तसेच खिळलेले …. आणि आईला काही कळायच्या आत तिने तेच दार प्रचंड वेगाने भिरकावले बंद करण्याकडे …. खाडड  असा आवाज झाला आणि ते पुन्हा त्याच वेगाने सुरु होण्याआधी तिने दुसऱ्या हाताने लगेच कडी लावून घेतली. दाराच्या पलीकडल्या आईची काय मनःस्थिती झाली असेल ह्याची जणू तिला जराही पर्वा नव्हती.

जेवढ्या वेगाने गेली तेवढ्याच संथपणे ती हुंदके देत कॉट जवळ आली. विखुरलेले केस हाताने वर करून तिने फोन उचलला आणि पुन्हा श्रेयस ला फोन लावला. फोन उचलला गेला हे कळताच ती रडतच बोलू लागली

 'श्रेयस ऐक रे एकदा फोन ठेवू नकोस … प्लीज जीव जाईल माझा '
 'काय बोलायचं शिल्लक ठेव्लायेस श्रावणी ? आणि का ऐकायचं तुझं? कोण आहेस तू ?'
'श्रेयस अरे मी मैत्रीण आहे तुझी निदान आजपर्यंत मैत्रीच्या खातर तरी …'
 'मैत्री~ ~ मैत्री …. तू बोल्तेयेस हे श्रावणी ?'
 'श्रेयस अरे चुकले रे मी, माझा नाईलाज झालेला आई- बाबांसमोर, त्यांच्या बोलण्यात आले. त्यांचा त्यांच्या त्या सो कॉल्ड समाजाचा विचार केला ,…. आणि … आणि '
'आणि तनुल ला चक्क तुझ्या घरच्या लोकांसमोर अपमानित केलंस, तुझ्या आईने नको नको ते काय काय घालून पाडून नाही बोलून घेतलं त्याला….  आणि तू … तू गप्प होतीस ? घरच्यांनी अपमानित केलं म्हणून नाही ग तो दुखावला … तुझं वागणं … तुझं वागणं दुखावून गेलं त्याला, जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्याशिवाय काहीही सुचायचं नाही त्याला तुझ्या सुखासाठी, चैनीसाठी पैसा हवाय त्याला म्हणून नौकरी साठी धडपडत राहिला तो … तीच जगण्याचं एकमात्र माध्यम असणारी त्याची जिवलग त्याला ऐन वेळेवर निघून जा सांगते?? मी माझ्या पालकांच्या शब्दाबाहेर नाही अस बोलते…. तुझा माझा संबंध नाही यापुढे … मला विसरून जा म्हणते?? …. कसं , कसं जमलं गं हे सर्व तुला? '

 'श्रेयस अरे मला कळलंच नाही रे हे सर्व कसं घडून गेलं, मी घाबरले होते… त्याच्या जीवाला काही नको व्हायला होतं मला …  मला वाटलं तनुल सावरेल स्वतःला … पण काल संध्याकाळी हे सगळं घडल्यापासूनच त्याचा काहीच पता नाहीये, तो फोनही उचलत नाहीये, त्याच्याशिवाय जगण्याचे हे काही तास मी मरण यातना सहन करतेय…. माझा तनुल मला परत कर रे … सांग एकदा तो कुठे आहे ? सुखरूप आहे तो बोल एकदा … एकदाच हवं तर'

'अगं जा~~ गं, तुझ्या कुठल्याच शब्दांवर आता विश्वास ठेवावा वाटत नाही…. फक्त तनुलचंच नाही माझं अन ओवीचहि मन तोडलंय तू… तनुल चे अश्रू बघवले नाही आम्हाला त्याला एकांत हवा होता म्हणूनच त्याला तसेच सोडून निघून आलोय आम्ही सकाळी तृष्णेवरून …. त्यानंतर तर त्याने आमचाही फोन उचलला नाहीये. …… हेल्लो … ह … हेल्लो श्रावणी'

श्रावणी ने फोन ठेवला होता … तिला आता निव्वळ तृष्णा दिसत होती. अंगावरल्या घरच्याच कुर्त्यावर तिने नुसताच स्कार्फ ओढून घेतला, खोलीच्या दाराबाहेर पडतांना टेबल वरच्या गाडीची किल्ली उचलुन घेतली आणि 'कुठे निघालीस' अस विचारणाऱ्या आईच्या एकही शब्दाला उत्तर न देता धावतच घराबाहेर पडली.

'तृष्णा'  तनुल-श्रावणीचा आवडता स्पोट. एका चौकोर तलावाच्या मध्यभागी हिरवाई असणारी बाग, छोटेखानी बेटंच जणू … तिथल्या पुलावरील तालावाशेजारच्या झाडांच्या सावलीतल्या दगडांवर बसायला फार आवडायचं तनुल ला…श्रावणी ची वाट बघत आणि ती उशीरा आल्यावरही न रागावता तिचा हात हातात घेऊन तासान तास  बसायचा तो तिथे.

 तो पूल ते एकावर एक रचलेले दगड श्रावणीच्या डोळ्यासमोर गिरक्या घेऊ लागले.  १५ KM दूर … पण श्रावणी च्या डोळ्यांना आणि गाडीच्या चाकांना आज वेग लागला होता. दोघांनाही काही केल्या थांबता येईना…. तृष्णेवर  पोचायला लागेल तेवढा संपूर्ण वेळ तिच्या भरलेल्या डोळ्यासमोर तनुल दिसत राहिला, आपल्या चेहेर्यावर एक स्मित दिसावं म्हणून धडपडणारा तनुल…. सालस -समंजस-हुशार तनुल, मित्रांमधला लाडका तनुल … आई-बाबांनी एवढा अपमान केल्यावरही एका शब्दानेही त्यांना उलट न बोलणारा तनुल …. मी आई बाबांचं ऐकायचं ठरवलंय अस सांगितल्यावर मौन झालेला आणि दुखावला गेलेला तनुल.'

ती तृष्णेवर पोचली तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. दिवसभर तापलेलं उन्ह उतरणीला आलेलं. पश्चिमेला जरा जरा तांबड फुटलं होतं. आणि तृष्णे वरून वाहणाऱ्या वाऱ्यांत जरा गारवा जाणवत होता…या कशातही लक्ष नसणाऱ्या श्रावणी चे डोळे फक्त तनुल ला शोधत होते. मिळेल त्या जागेवर गाडी पार्क करून ती धावतंच आत शिरली. पुलापर्यंत जायला आणखी पाच मिनिट लागणार होते. तेवढा त्राणही आता तिच्यात उरला नव्हता. ती पोचली पुलावर तिची नजर भिरभिर शोधत राहिली तनुल ला …. पण नाही … नाही दिसला तनुल. नजर जाइल तिथपर्यंत शोध घेऊन झाला आणि श्रावणीचे उरले सुरले सगळेच धैर्य खचले. ती गुढग्यांवर मट्टकन  खाली बसली …. आणि 'तनुल~~ ' अशी आर्त हाक घालून हुंदके देऊन रडू लागली. वातावरणात प्रचंड शांतता, पाण्यावरून वाहणाऱ्या हवेचा हलकासा हुंकार आणि हुंदक्याचा आवाज ……….

……… शाणु

श्रावणी च्या कानावर शब्द पडलेत तिने मान उचलली …. पुढ्यात तनुल उभा होता. त्याला बघून ती अधिकच हुंदके देऊन रडू लागली.

तनुलच्या डोळ्यातूनही टपकन थेंब ओघळला गालावर …. त्याने दोन्ही हात पुढे केले अन भरल्या डोळ्याने स्मित दिले तिला …

क्षणाचाही विलंब न करता श्रावणी धावतच कुशीत शिरली त्याच्या …….                

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...