Monday, 3 February 2025

काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही कामे शोधून काढून ती करण्यासाठी हजारो कारणे हजारो पर्याय माहिती असतात. असे असणारे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करत, त्यातून ज्ञानवर्धन करत अनुभवसंपन्न होत पुढे जाणारी माणसे भेटली की फार बरं वाटतं. काम न करणाऱ्यासाठी कामचं सापडत नाहीत आणि काम करणाऱ्यासाठी कामाची वानवा नसते. आमच्या ऑफिसला एक सिनिअर आहेत, त्यांच्या उच्चभ्रू एरियात पहाटे पहाटे एक मुलगा येतो कामाला, त्याच्याकडे त्या एकाच मोहोल्ल्यातली ७-८ घरे आहेत. त्याचं काम त्यांच्या घरातील कुत्र्यांना सकाळी फिरवून आणण्याचं आहे. एका कुत्र्याला फिरवून आणायला १५ मिनिटे लागतात, या हिशोबाने २ तासात तो एका मोहोल्ल्यातले काम संपवतो. पगार आहे प्रत्येकी २००० रुपये महिना. रोजच्या दोन तासांच्या कामात तो १५००० रुपये महिना कमावतो. त्यानंतरच्या वेळेत तो कदाचित दुसऱ्या मोहोल्ल्यात हेच काम करत असावा किंवा दुसरी कामे. असाच आमच्या इमारतीत एक मुलगा येतो. त्याची ना कुठली कंपनी आहे ना कुठला ब्रँड. वन मॅन कंपनी. तो कार धुवायचे काम करतो. प्रत्येकाकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. त्यात डीप क्लिनिंग, वॉटरल्स वॉश असे अनेक प्रकार आहेत.. त्याच्याकडे सध्या २०-२२ घरे आहेत म्हणे जिथे त्याला नियमित जावे लागते. एका घरचे २-३ हजार रुपये महिना मिळत असावेत असा अंदाज धरला तरी ४० हजाराच्या घरात त्याची मिळकत असावी.

मुंबईला आमच्या सोसायटीत एक वयस्कर काका यायचे. फार दुरून लोकलने यायचे त्यांच्या हातात दोन मोठ्या पिशव्या असायच्या. एका दिवशी एका एरियात असे ते आठवडाभर सात वेगवेगळ्या एरियात फिरायचे. त्यांच्या पिशवीत सकाळचा लागणार नास्ता असायचा. म्हणजे सहा इडल्या आणि छाटणीचे पॅकेट, तसेच ढोकळ्याचे, ठेपल्याचे, उपमा, अप्पे, सँडविच. शिवाय अंडी, दही, फरसाण, चकल्या, शेव वगैरे असायचे. सकाळच्या नोकरीच्या घाईत असणारे अनेक जण पटापट पॅकेट उचलायचे. सकाळी ७ ला आलेले काका सकाळी १० वाजता दोन्ही पिशव्या घडी घालून गावाकडे परतायचे.

महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतून नोकरीनिमित्त काम केल्यावर त्या त्या संस्थांशी अजूनही जुळून काम करते आहे. अनेकदा महिला काहीतरी हाताला काम हवे म्हणून विचारायला येतात. पायलीचे अनेक काम खरतर आजही उपलब्ध असतात त्यासाठीचे प्रशिक्षण देखील मोफत असते; त्यात उदबत्ती बनवणे, कागदाचे लिफाफे बनवून दुकानांना देणे, गृह उद्योग सारख्या गोष्टी असतात. मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हा महिलांना अशी छोटीमोठी कामे करायला लाज वाटते. मला आठवतं आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा भिजवलेली आणि मोड आलेली कडधान्ये बाजारात विकायला असायची. त्या विकणाऱ्या बायका अशी दहा भांडी मांडून दहा प्रकारची कडधान्ये विकायची. नोकरीपेक्षा बायकांना अशी आयती भिजवलेली मोड आलेली कडधान्ये, निवडलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा मिळणार असतील तर त्या अनेकदा जास्तीचे पैसे द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अनेकींना हे करायचे सुचवले तेव्हा ''ही अशी कामे आम्ही करणार?'' असा अविर्भाव होता. कामाची पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र काम करणार ते टेबलावर बसूनच उच्च पदाचेच असे अनेकींना वाटत असते, भलेही त्यासाठीची पात्रता त्यासाठी लागणारे स्किल आपण कधीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नसेल.

मागे आणखी एक किस्सा ऐकला होता, हायवेवर असणाऱ्या ढाब्यांना लागणारे सोललेले लसूण, आल्याचे लच्छे एकेक किलोचे पॅकेट तयार करून ग्रामीण भागातील काही महिला त्यांना पुरवत असे. किती सोपे आहे.. रोज एका हॉटेलला एक किलो. पाच-सहा हॉटेलला तेवढेच. केवळ लसूण सोलून द्यायचा हा व्यवहार आहे आणि त्याबदल्यात जी काही मेहनत लागेल त्याचे पैसे मिळेल.. कुणाला बरं जमणार नाही हा व्यवसाय.

आमच्याकडे रोज एक भाजी विकणारा २२-२३ वर्षांचा चुणचुणीत उत्साही मुलगा येतो.. तो संध्याकाळी ठेलाभर सिजनल भाजी किंवा फळे (कोणतेही एकच) विकायला वेगवेगळ्या मोहोल्ल्यात फिरतो. त्याच्या कामाची यूएसपी म्हणजे तो त्याचे ग्राहक असणाऱ्या महिलांशी तो अत्यंत आदराने, प्रेमाने आपुलकीने वागतो. सगळ्या त्यांच्या ताई, वाहिनी, आत्या, मावशी झाल्या आहेत. कुठली वेगळी भाजी बाजारात आली कि ''ले जातो ना दीदी, तुमको पसंद है करके मै लाया खास, पैसे भी मत दो. तुम खाओगे तो मेरा पेट भरेंगा'' म्हणतो. कधी दोन काकड्या उचलून एखादीच्या पिशवीत घालतो. ''तुम्हारे लिये नही, ये मेरे भांजे के लिये दे रहा, उसको खिलाओ, धष्टपुष्ट बनाव'' म्हणतो. बायका चक्क दिवसभर त्याची वाट पाहतात पण दुसरीकडून भाजी घेत नाहीत. दिवसभरात त्याचा ठेला रिकामा होतो.

नोकरी पाण्याविषयी बेरोजगार असल्याचे लोकं जेव्हा बोलतात आणि तुम्ही त्यांना काही पर्याय सुचवता तेव्हा ते न करण्याचे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. लोकांना निकामी बसणं आवडतं पण मिळालेले काम कधी अंतर दूर पडतं म्हणून, कधी बॅकऑफीसचेच काम हवे म्हणून, कधी एरिया चांगला नाहीये म्हणून, कधी वेळा सोयीच्या नाही म्हणून, कधी हाताशी गाडी नाही म्हणून गमावणे ते पसंत करतात पण कुठलीही लाज न बाळगता जरा जास्तीचे कष्ट घेऊन जे मिळेल त्या कामातून ज्ञान आणि अनुभव वाढवून घेऊन पुढे हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे खरंच विरळा असतात.

Rashmi Padwad Madankar



Saturday, 1 February 2025

माझी शाळा

 शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.

मी शाळेत आली तेव्हा रेशीमबागेच्या संघाच्या इमारतीत ही शाळा भरत होती. लांबलचक कित्येक खोल्यांची भव्य इमारत, मोठाले दोन मैदान आणि स्मृती भवनाचे शांत सुंदर पवित्र वातावरण आम्हाला या काळात लाभले. पुढे मी सातव्या वर्गात असताना नंदनवन येथील स्वतःच्या इमारतीत शाळा शिफ्ट झाली. इथेही चार मजली मोठी इमारत होती. पुढे आमच्यासमोरच त्याच प्रांगणात दुसऱ्या इमारतीचे बांधकाम देखील सुरु झाले. आता केशवनगर शाळेची इमारत त्याच प्रांगणात चारही बाजूने चौकोनी बांधली गेली आहे. म्हणजे ज्या शाळेने आम्हाला मोठे होताना घडताना पाहिले; त्याच शाळेला आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठी होताना घडताना याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले आहे.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी जवळजवळ २७-२८ वर्षानंतर शाळेला जवळून आतबाहेर न्याहाळता आले. बराच बदल झाला आहे पण तो वरवरचा आहे. मुळात शाळा तशीच आहे जशी ती मनात घर करून बसली आहे. या शाळेने खूप काही दिले. मुख्य म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करून दिला ज्यावर आम्ही आज पाय रोवून, तग धरून घट्ट उभे आहोत. सकाळी सात वाजता त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक पाचपोर सरांनी शिकवलेल्या प्रार्थना-ध्यान साधनेने होणारी दिवसाची सुरुवात व्हायची. त्या साधनेचे महत्त्व आज या टप्प्यावर येऊन कळले आहे. वर्गशिक्षिका वझलवार मॅडमने केवळ जीवशास्त्र शिकवले नव्हते, आयुष्याला वळण देण्याचे कठोर कार्य त्यांनी अत्यंत मृदूपणे केले होते. शारीरिक शिक्षणाच्या केचे सरांनी शिस्त अंगात भिनवली. त्यांचा दरारा असा होता की त्यांच्या मेन गेटवर झालेल्या केवळ प्रवेशाने देखील अक्खी इमारत चिडीचूप होऊन जायची. सरांच्या मार्गदर्शनात कित्येक खेळात प्राविण्य मिळवले, कित्येक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता आले.. त्यांच्यामुळे आत्मविश्वास दुणावला. मुजुमदार बाईंनी शिकवलेलं संस्कृत असेल किंवा भाकरे सरांनी शिकवलेलं गणित.. आजही बुद्धीची ताकद नाही ते विसरण्याची, इतके ते पक्के मांड मांडून बुद्धीत घट्ट बसले आहे. धर्माधिकारी मॅडमने विज्ञानाबरोबर कलेत गती मिळवून दिली. दंताळे (कुलकर्णी) मॅडम, मलिये मॅडम तारे मॅडम या सगळ्यांनीच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. यावेळी कार्यक्रमात आजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या त्या त्या वेळच्या अनेक गमतीजमती सांगण्याची संधी मिळाली. त्यांना मी अनेक किस्से सांगू शकले, त्यातून आम्हा सगळ्यांच्या घडण्याचा प्रवास मला सांगता आला. आणि हे क्षण, हे प्रसंग, हे शिक्षण, ज्ञान, कला आणि शिस्त या शाळेने आम्हाला दिली, आमचा पाया मजबूत केला, म्हणूनच जमिनीवर घट्ट उभे राहूनही आम्हाला आकाशात भरारी घेण्याचे बळ मिळाले असल्याची कबुली मला देता आली, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे, एकूणएक शिक्षकाचे, इतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्यासोबत शिकणाऱ्या त्यावेळच्या माझ्या सहविद्यार्थ्यांचे, ज्यांनी ज्यांनी या घडण्यात योगदान दिले त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता आले.
हा अतिशय आनंदाचा दिवस होता. मी माझ्या वर्गखोलीत माझ्या बाकावर जाऊन बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणित लॅब, विज्ञान लॅब, ग्रंथालय पाहिले. जुन्या-नव्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नव्या कार्यकारिणीची ओळख झाली. मिलिंद भाकरे सरांनी नव्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य कलांचा आस्वाद घेता आला; आणि विद्यार्थी ते मार्गदर्शक पाहुनी म्हणून जाण्याच्या या योगामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणारे एक वर्तुळ पूर्ण झाले.

वेड्या माणसांच्या गोष्टी -

 वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे



हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत देखील पैशांच्या स्वरूपात घ्यायची नाही हे ठरवून तो पुढल्या प्रवासाला निघाला. भारतातले एकूण १८ राज्य आणि ३ देश आणि अवघे ४ वर्ष त्याने सायकलवर पालथे घातले. मार्गात कुणी राहायला जागा दिली तर राहायचे, पोटापुरते अन्न दिले तर खायचे...आणि मिळाले नाही तर ? या आहे आणि नाहीच्या मधलाच हा प्रवास होता. या प्रवासात त्याने कुठला अनुभव घेतला नसेल ?? कोव्हीड काळात कित्येक गावातून हाकलून लावले असताना वेशीवरच्या मंदिरात रात्र काढण्यापासून ते गावाबाहेर मंदिर नाही म्हणून स्मशानात भर पावसात पूर आलेला असताना निथळत राहून आजच डुबून मृत्यू येईल की काय याची वाट पाहण्यात काढलेली रात्र. अनेकांच्या घरी एका रात्रीचा आसरा घेण्यासाठी विनवणी करण्यापासून ते अनेकांच्या मनात कायम घर करण्यापर्यंतचा प्रवास. ४ दिवस पोटात अन्न गेलेले नसताना, भुकेने पोट तोडत असताना, आता जिवंत राहणे शक्य नाही असे वाटत असताना भिक्षा मागण्याखेरीज उपाय नसताना नाईलाजाने पसरलेला हात ते कुठेतरी कुणाच्यातरी घरी प्रेमाने आग्रहाने पोट तुडुंब भरेपर्यंत अन्न आणि प्रेम मिळवण्याचा प्रवास. प्रवास वरवर स्वतःपासून सुरु होऊन स्वतःच्याच खोलवर आत आत घेऊन जाणारा, प्रगल्भ करून सोडणार प्रवास.

कौटुंबिक वादातून निराशेने ग्रासलेल्या विशालने मनात अतीव दुःख घेऊन घर सोडले होते. विशालला नेपाळला गेल्यावर एका जोडप्याने दत्तक घेतले. तिथे त्याने नेपाळ प्रवासातले एक वर्ष त्यांच्या सोबत घालवला. बांगलादेशात ऐन दंगे सुरु असताना प्रवास केला. ओडिसा आसाम नागालँड सारख्या ठिकाणचे अनुभव ते छत्तीसगढ मधल्या गावांमध्ये प्रत्यक्ष नक्सल गावांत राहण्याचा अनुभव. एकेक माणसांच्या हजारो कथा त्याच्या गाठोड्यात जमा झाल्या आहेत. आयुष्यभर जगल्यावरही घेता येणार नाही असे सगळे अनुभव चार वर्षाच्या सलग सायकल प्रवासातून घेऊन परत आलेला विशाल. या जगात ''प्रेम'' ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हे सांगणारा विशाल. जाताना असलेला आणि आता परतलेला विशाल अंतर्बाह्य बदलला आहे. आता तो लवकरच पुन्हा प्रवासावर निघणार आहे. आजवरच्या प्रवासातून फक्त घेत आलो आता ते परत करण्यासाठी प्रवास करायचा आहे असे तो म्हणतो. आम्ही एकाच प्रदेशातले एकाच शहरातले असताना पूर्वी त्याची माझी भेट नव्हती, ओळख नव्हती. ३ वर्षांआधी तो दूरवर प्रवासात असताना त्याला तिथे कुणीतरी माझी ओळख सांगितली. आम्ही फोनवर बोललो आणि मला त्याचे अनुभव ऐकत राहण्याचे वेडच लागले. तो जिथे कुठे जायचा तिथले किस्से फोनवरून सांगत राहायचा. पुढे दोन वर्षांपूर्वी ''अनलॉक'' दिवाळी अंकात त्याची विशेष स्टोरी आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हापासून विशाल कधी परत येतो आणि भेटतो, कधी त्याला मुलाला, कुटुंबाला जवळच्या मित्रपरिवाराला भेटवते असे झाले होते. अखेर तो दिवस उगवला. २५ डिसेंबर ख्रिसमसच्या संध्याकाळी हा असा एक सांताक्लॉज भेटला आणि त्याचे अनुभव ऐकण्याची, गप्पांची अशी मैफल सजली की ५ तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आले नाही. त्याने घेतलेले अनुभव आणि त्यातून त्याला मिळालेलं ज्ञान अनुभूती खरोखर समृद्ध करणारे आहेत हे मात्र निश्चित.

Wednesday, 25 December 2024

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई...
आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!!
खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वातावरणात पसरलेले धुके, हवेत पसरलेला गारवा आणि मनात भरून उरलेला आजवरच्या डिसेंबर आठवणींचा मंद मंद गंध. ''जाडो कि नरम धूप और आंगण में लेटकर....'' वगैरे आठवाचे दिवस. यंदाचे वर्ष मात्र अशा स्वप्नील वातावरणाचे नाही. यंदा ऐन थंडीत थरथरत्या हाताने अग्नी द्यावी लागलेल्या सासऱ्यांच्या स्मृतींचे तर ऐन डिसेंबरमध्ये अचानक झटकन निघून गेलेल्या दोन जिवापासच्या मैत्रिणीना आक्रंदत हाक मारत जाणाऱ्या क्षणाक्षणाच्या हिशोबाचे.
गेल्या महिन्याच्या शेवटाला दीर्घ आजारपणाने सासरे सोडून गेले. मागे सोडून गेले भरलेपुरले कुटुंब आणि अनेक छोट्याछोट्या गोष्टी. त्यांची पुस्तके, वेगवेगळ्या रंगाच्या पेनांचे सेट, दैनिक हिशोब लिहिण्याची सवय असल्याने हिशोबाच्या भरलेल्या अगणित डायऱ्या.. त्यांचा पंचा, काही रुमाल, त्यांचे हौसेने शिवलेले सूट आणि पैसे ठेवायची पर्सपेक्षा जराशी मोठी अशी बॅग. सासुआई गेल्या होत्या तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी आम्ही सगळ्या घरातल्या स्त्रियांनी त्यांची एकेक साडी ठेवून घेतली होती. बाबूजींच्या आठवणीतले काय ठेवावे बरे... मला पुस्तके पुरे आहेत पण इतरांच्या हिस्श्याला तेही नाही. कारण पुस्तके काही फार कुणाला नको असतात. त्यांच्या दैनंदिन खर्चाच्या हिशोबाने भरलेल्या डायऱ्या देखील खरतर आयुष्याचे गणित शिकवणाऱ्या. भूतकाळातून आजच्या या क्षणापर्यंत पोचण्याच्या त्या पाऊलखुणाच तर आहेत. मार्गातले सगळे खाचखळगे, अडथळे, खड्डे, पोकळी या सगळ्यांचा जणू ब्लू प्रिंटच. नीट वाचले तर एकेका पानावर तो महिना कुठल्या आणि किती अडचणींचा होता किंवा आनंदाचा; त्या त्या वेळेच्या भावना त्या त्या पानांवर शिंपडलेल्या दिसतील आणि इतिहास बोलका होईल. शिवाय आता उरलेत त्यांची तत्त्व, त्यांचे सत्व आणि आम्हा सगळ्यांना देऊन गेलेले भरभरून आशीर्वाद. निघून गेलेली माणसेही खूप काही ठेवून गेलेली असतात. घेतले तर ओंजळ भरून जाईल, तरीही त्यांच्या विना सगळंच अपुरं राहील अशी स्थिती.. आपण मात्र घेतानाही कमी पडतो.

Rashmi Paraskar
रश्मी गेली. गेली म्हणजे काय ? म्हणजे तिच्या घरी गेलो की ती दिसणार नाही. खरंच दिसणार नाही ? तिचं वावरणारं शरीर कदाचित दिसणार नाही पण तिच्या घरातल्या कोपऱ्याकोपऱ्यात तिनं जीव ओतून ठेवलाय त्यात तर ती दिसत राहणार आहे. एकेक वस्तू हौशीनं घेतलेली, खूप निगुतीनं सजवलेली. कणाकणात तिचा श्वास जाणवेल इतकी ती भिनली आहे त्या घरात. रश्मीच्या घराबाहेर गुलाबी-जांभळ्या कांचनच्या फुलांचं झाड आहे. सुरुवातीला म्हणजे आठ-नऊ वर्षांआधी तिच्या घराचा पत्ता पटकन सापडायचा नाही. मग रश्मीच्या घराची खून म्हणजे ते लगडलेलं कांचनच्या फुलांचं झाड. मुख्य रस्त्यापासून तिच्या घराच्या गल्लीत नुसतं वाकून पाहिलं तरी ती सगळी फुलं आनंदाने डोलताना दिसायची. रश्मीचं घर आणि कांचनची फुलं हे समीकरण इतकं दाट डोक्यात बसलं की नंतर जिथेजिथे कांचनची ती गुलाबी-जांभळी फुलं दिसतील तिथे रश्मीच आठवत राहणार. म्हणूनच मी तिला 'कांचनच्या फुला' म्हणत असे. तिची माझी ओळख नऊ वर्षांआधी सकाळ कार्यालयातली. तेव्हा मी ''मी'' नावाच्या पुरवणीची सहाय्यक संपादक म्हणून काम पाहत होते. त्यात तिचे लेख यायचे. आधी ते घेण्यासाठी, नंतर विषयांवर चर्चा म्हणून बोलणं व्हायचं. मी ''तनिष्का'' साठी महिलांच्या सक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करते आहे माहिती झाल्यावर महिलांच्या नेटवर्कच्या मदतीच्या निमित्ताने नंतर छान मैत्री झाली. खूप कामे एकत्र केली. सगळ्या जगात ''मी टू'' गाजत असताना आम्ही नागपुरात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला. आकाशवाणी, रेडिओ, बातम्यांसाठी काम केले. उमरेडच्या बलात्कार प्रकरणात आमच्या उमरेडच्या महिलांच्या नेटवर्कची चांगली मदत झाली. आम्ही एकत्र फुटाळा तलावावर आंदोलन-निदर्शने केली. विद्यार्थ्यांसाठी काम केले. दोनेक महिन्याआधी रेल्वे ऑफिसला जाऊन चंद्रपूरला जाणाऱ्या रोज अपडाऊन करणाऱ्या महिलांना ट्रेनच्या वेळेत झालेल्या बदलांचा त्रास होता. त्या वेळा बदलण्यात यश मिळाले. या सगळ्या स्मृतीत रश्मी जिवंत आहे. तिने केलेल्या मी करत असलेल्या अनेक लिखाणाच्या बाबत आम्ही फार गहिरी चर्चा करत असू. त्यावेळी तिच्या विचारांनी माझ्यात आणलेल्या बदलांत ती जिवंत आहे. माझ्या तब्येतीच्या काळजीपोटी ज्या कळवळीने ती मला रागवत असे...मी स्वतःची काळजी घ्यावी म्हणून ज्या पोटतिडकीने मला समजावत असे तिची ती आत्मीयता मरून जाऊ शकत नाही. माझ्याशी मैत्री झाल्यावर कामाच्या निमित्ताने नंतर ज्या ज्या माणसांशी मी तिची ओळख करून दिली त्या सगळ्यांशीही तिने फार जिव्हाळ्याचे संबंध जपले. ती प्रत्येक मैत्रीण तिच्या जाण्यानं गहिवरते आहे.
Supriya Ayyar
सुप्रिया ताईंचे काय बोलावे. त्यांचे ममत्व जवळून लाभले हे सुदैव. त्यांचे घर माझ्या ऑफिसच्या जवळ त्यामुळे अनेकदा कुठकुठल्या निमित्ताने त्यांच्या घरी जाणे होतंच राहायचे. त्यांना माझ्या लिखाणाचे किती कौतुक होते काय सांगू. पुस्तक वाचून झाले तेव्हा हळव्या मनाने गालावरून हात फिरवत एक गुणी लेखिका सापडली म्हणत जवळ घेतले होते. माझ्या पुस्तक प्रकाशनाला अध्यक्ष होत्या.. तेव्हाही खूप खूप भरभरून बोलल्या होत्या. माझ्या मागे कुणाकुणाला कौतुक सांगायच्या ते पोचायचे माझ्यापर्यंत तेव्हा फार आदर वाटायचा त्यांचा. स्वतःलाच मिरवत बसण्याचा जमाना असताना कोण कुणाचे मागे इतके कौतुक करत बसते बरं? अभिव्यक्तीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमात सोबत होतो तेव्हा त्यांच्यातली विनयशीलता रुजुता अनुभवली. वर्धेच्या साहित्य संमेलनात जाताना आणि एकदा अभिव्यक्तीच्या एका कार्यक्रमासाठी असे दोनवेळा एकत्र प्रवास केला. तेव्हा त्यांना आम्हा तरुणाईसोबत तरुण होताना पाहिले. अगदी मस्ती करत आम्हा सर्वांना खळखळून हसवले त्यांनी. गेल्या वर्षी माझ्या दिवाळी अंकाच्या संपादक व्हाल का विचारले तेव्हा नम्रपणे म्हणाल्या सगळी मेहनत तू करणार मग मला का इतका मान देते. पण माझा आग्रह बालहट्ट समजून मोडला नाही त्यांनी, हसत स्वीकारला. सगळ्या प्रोसेसमध्ये पूर्ण ऊर्जेने सोबत राहिल्या. एकेक लेख, सगळ्या कथा कविता जातीने वाचल्या. तासनतास चर्चा करायचो आम्ही. त्या मृदू भाषेत बदल सुचवायच्या. अगदी अंकांना मिळालेल्या पुरस्कारांसाठी देखील सगळं क्रेडिट मलाच देऊन तोंडभरून कौतुक करत राहायच्या, खूप लाड केले त्यांनी माझे. मी त्यांना भेटायला जाणार म्हंटले की मी घाईत असते नेहमी, हे माहिती होते त्यांना मग आधीच माझ्यासाठी वाटीत खायला तयार करून ठेवायच्या.. मला फेणी आवडली म्हणून दुसऱ्यावेळी घरी न्यायला काढून ठेवली. म्हणजे मला पळवाटच ठेवायच्या नाहीत.. इतका जीव लावायच्या. माझ्या कामांबाबत सखोल विचारायच्या माझी धावपळ पाहून त्यांना त्यांचे नोकरी करतानाचे दिवस आठवायचे, त्या किस्से शेअर करायच्या, आम्ही रंगून जायचो...
किती बोलावं आणि कायकाय ?
ही जाणारी जिवापासची माणसे त्यांनी दिलेल्या अनुभवांतून आपल्याला आलेल्या अनुभूतीमधून मनात खोलवर शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे हे सगळे आता नाहीत हे कुणी कितीही पटवून दिले तरी ते आहेत हे पटवून द्यायला, दाखवायला निदान माझ्याकडे तरी हजार जागा आहेत. माणूस म्हणजे केवळ शरीर असू शकत नाही... शरीरापलीकडे तो जसा वागतो, जे वाटतो, जिथे जिथे अस्तित्व सांडत राहतो, जीव ओतत राहतो, तितका तितका शिल्लक उरतो. मनामनात शिरून राहतो तेवढाच खरा माणूस असतो बाकी सगळं वरवर चिकटलेले पापुद्रे....
आणि हे जे काही उरलेले असते हे कधीच संपत नाही, संपूच शकत नाही.

Wednesday, 11 December 2024

मनातले काही


सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर्यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण ही जाणीव खूप खोलवर उद्विग्न करणारी, विचार करायला भाग पाडते आहे.
एक अत्यंत हुशार, प्रगाढ वाचन करणारे, सर्व विषयांचा व्यासंग असणारे, कलेची-साहित्याची आवड असणारे, आयुष्यभर प्रचंड काम करून आभाळभर अनुभव गाठीशी जमा करून प्रगल्भ झालेले एक व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबातून कमी झाले. नातवंडांना हे संचित देऊ शकणारे असे व्यक्तिमत्व जगभर शोधले तरी आता सापडणार नाही; ही अशी हानी काही केल्या भरून येत नसते. माणूस म्हातारे झाले म्हणून, खूप आजारी होते म्हणून ते वेदनेतून सुटले, सद्गतील लागले हे एक समाधान मानून घेतले तरी कुटुंबात एक जी दरी निर्माण होते ती दुसऱ्या कुणाहीमुळे भरणारी नसते. प्रत्येकाचे एकमेव स्थान आहे आपल्या आयुष्यात हे तो माणूस निघून गेल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवू लागते.
माझ्याबाबत सांगायचे झाले तर; सासरे ज्यांना आम्ही सगळेच बाबूजी म्हणायचो, ते आणि सासूबाई आमच्याकडे मुंबईला राहायला यायचे तेव्हा घराला अधिकच घरपण यायचे. माझ्या मुलाच्या वाट्याला आजी-आजोबा यावे म्हणून मला नेहमीच त्यांची ओढ असायची. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते.जगातल्या कुठल्याही विषयावर आम्हाला एकमेकांशी चर्चा करायला आवडत असे. अगदी आजचा कांद्याचा बाजारभाव ते उद्याचा देशाचा राष्ट्रपती ते पुढले महायुद्ध अशा कुठल्याही गोष्टीवर आम्ही मोकळी चर्चा करू शकायचो. त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व मुलांमध्ये मी एकमेव सरकारी क्षेत्रात काम करते याचा कोण अभिमान होता त्यांना... माझ्या लिखाणाचे कौतुक तर एवढे की मी स्वतः कधी केले नसेल पण ते वृत्तपत्रातली माझ्या लेखांची कात्रणे काढून साठवून ठेवत असत, मी लिहिलेली पुस्तके तर त्यांना त्यांच्या समवयस्क मित्रांमध्ये अभिमानाने मिरवण्याचे साधन वाटायचे. अगदी माझे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा ते कित्येकांना कौतुकाने दाखवत राहायचे. बारा वर्षांआधी वडील गेल्यानंतरही वडील नाहीत असे कधी वाटलेच नाही. बाबूजींच्या जाण्याने मात्र ते प्रकर्षाने जाणवले..पण माझ्यापेक्षा नवऱ्याचे दुःख जास्त मोठे आहे कारण त्याची आई नव्हती आणि आता वडीलही नाहीत. आई-वडील दोन्ही नसणाऱ्यांच्या आयुष्यातून माहेरपणाची घरपणाची लक्झरी झटक्यात निघून जाते.. कितीही नातेवाईक असू द्या आणि कितीही वय असले तरी मग पोरकेपणा येतोच वाट्याला.
जगण्याच्या अनेक अनुभवातून हे सगळं स्वीकारण्याची मानसिकता तयार होत असली तरी, त्यात्या वेळी येणाऱ्या या भावना ज्याच्या त्यालाच कळत असतात. सांत्वना तेवढ्यापुरत्याच दिलासा देतात; म्हणून जुन्या माणसांना जपले पाहिजे... त्यांचा सहवास जेवढा होऊ शकेल तितका अनुभवून घेतला पाहिजे. कारण त्यांच्या जाण्यानंतर ते कितीही हवेहवेसे वाटले तरी ते फिरून परत येत नाहीत आणि त्यांच्या सोबतीचे क्षण पुन्हा मिळत नाहीत हेच शाश्वत सत्य आहे.

Tuesday, 19 March 2024

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...


काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली
ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली !

झाडाचे जाडे खोड खोलले, सोलले, रंगवले
घराच्या दृश्य भागात निगुतीने सजवले.

इतर फांद्यांचा कोंडा केला, चुलीत घातला  
चुलीवरच्या चविष्ट मटणावर मग यथेच्छ ताव मारला.

मी म्हणाले,
अहो दादा, तुम्ही झाडे तोडायला नको होती
पक्ष्यांची घरटी अशी मोडायला नको होती
बाग बघा कशी ओकीबोकी झाली
परिसरातली आपल्या हो रयाच गेली...रयाच गेली

दादा म्हणाले
ताई जरा इकडे या, मी काय म्हणतो कान देऊन ऐका..  

तुम्हाला नसेल माहित, मी पर्यावरणवादी आहे
तुम्हाला नसेल माहित मी पर्यावरणवादी आहे
आणि काय सांगू अहो, निसर्गाच्या बाबतीत जरा जास्तच दर्दी आहे...

तशी माझी नजर पारखी आहे बरे
निसर्गात दिसतात मला चमचमते हिरे
हिऱ्यांना पेहेलू   पाडल्याशिवाय चमक येते होय?
आणि हिऱ्यांशिवाय सौन्दर्याची मजा येते होय ??  

वृक्षारोपण तर मी दरवर्षीच करतो..  
आणि त्या वाढत्या वृक्षामध्येच सौन्दर्य घेरतो.

काय माहित वृक्षाला त्याची जागा कुठे असते
बघा आमच्या बंगल्यात कसा पठ्ठा शोभून दिसते

उभे राहून झाड थकले होते फार
म्हणून आम्हीच झालो त्याचा तारणहार

मी म्हणलं
बस झाले थांबा! तुमचे म्हणणे पटले
रजा द्या आता, तुमच्यासमोर हात टेकले
तुमच्यासमोर हात टेकले !  

 

 



Thursday, 15 February 2024

चिमुकल्या देशाची रोमहर्षक कहाणी -

 


खाली फोटोत दिसतोय तो एक अक्खा देश आहे. जगातला सगळ्यात छोटा देश. हा देश आहे जो उत्तर समुद्रात, इंग्लंडच्या किनाऱ्यापासून सुमारे 12 मैलांवर दूर स्थित आहे. या देशाची संख्या एकेकाळी ५० होती आता आहे फक्त २७ माणसे.

या छोट्याश्या देशाची कहाणी देखील तशीच अजिब आणि रोमहर्षक आहे. पॅडी रॉय बेट्स एक निवृत्त ब्रिटीश सैन्य अधिकारी यांनी 1967 मध्ये त्यांच्या कुटुंबासह एचएम फोर्ट रफ्सजवळील एक निरुपयोगी नौदलाचा किल्ला ताब्यात घेतला जो एकेकाळी लष्करी किल्ला म्हणून वापरला जात होता आणि त्याला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले.

असा देश निर्माण करण्याची कल्पना एका वेडातून साकार झाली, पॅडी ह्यांनी त्यांच्या बायकोला वाढदिवसाची भेट द्यायला म्हणून हे पाऊल उचलले होते. पुढे त्यावर फार वाद निर्माण झाला आणि पुढे शिक्कामोर्तब झाले. 1966 साली ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला, बेट्सने एक पडीत टॉवर घेतली आणि ती प्लॅटफॉर्मवर नेली. मग, ग्रॅपलिंग हुक, दोरी आणि त्याच्या बुद्धीचा वापर करून, तो प्लॅटफॉर्मच्यावर चढला आणि त्यावर हक्क घोषित केला. तो म्हणाला होता कि त्याने आपल्या पत्नीसाठी हा किल्ला भेट म्हणून जिंकला आहे.

गिफ्ट म्हणजे त्यात बायकोला आवडण्यासारखे खरतर काहीही नव्हते.. मात्र पॅडीच्या डोक्यात भविष्यासाठी काही वेगळ्या योजना होत्या. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला खरतर दोन काँक्रीटच्या खांबांवर उभारलेला तुटका-फुटका फोर्ड म्हणजे हिज मॅजेस्टीज फोर्ड (HMF) एक रफ टॉवर होते जे टेम्सचे रक्षण करणारी चौकी म्हणून कार्यरत होती. ५ टॉवरपैकी हाही एक टॉवर होता. हे दोन पोकळ काँक्रिट टॉवर्सच्या वर समुद्रापासून सुमारे 60 फूट उंचीवर असलेल्या दोन टेनिस कोर्टच्या आकाराचे होते. त्यावेळी यावर शंभरहून अधिक ब्रिटिश सैनिक संपूर्ण शस्त्रांसह तैनात असत.




1950 च्या दशकाच्या उत्तरार्धात, जर्मनच्या पराभवानंतर ब्रिटिश आर्मीने हा किल्ला सोडला आणि त्यानंतर अनेक वर्ष त्यांना ह्याचा विसर पडला. हीच संधी साधून पदी रॉयने त्यावर स्वतःचा दावा ठोकला. मुळात रॉय बेट्स हा एक कर्मठ माणूस होता ज्याने प्रथम स्पॅनिश गृहयुद्धात आणि नंतर WWII दरम्यान उत्तर आफ्रिका, मध्य पूर्व आणि इटलीमध्ये 15 वर्षांचा असल्यापासून लष्कर सेवा केली होती. तो कुठल्याही संकटांना घाबरत नसे. उलट  रॉय बेट्सला नोकरशहांनी काय करावे हे जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तो जिद्दीला पेटला आणि न घाबरता त्याने या किल्ल्यावर मालकीचा दावा ठोकला पुढेही सरकारच्या इशाऱ्यांकडे धमक्यांकडे दुर्लक्ष करत तो त्याच्या या छोट्याश्या देशासाठी काम करीत राहिला आणि परिणामी सीलँडची प्रतिष्ठा जगभरात वाढत गेली.

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका रेडिओ स्टेशनच्या अधिकारशाहीने आणि ती मोडून काढण्याच्या पॅडीच्या जिद्दीमुळे. त्या वेळी, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) हे एकमेव कायदेशीर रेडिओ स्टेशन होते आणि रॉयल चार्टरमुळे लोक काय ऐकू शकतात आणि काय ऐकू शकत नाहीत यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण होते. त्यांना आव्हान देत बेट्सने या रिकाम्या पडलेल्या, पडीक किल्ल्यावर त्याचे पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केले, लोकांना आवडेल ते संगीत ऐकता याय्ला पाहिजे एवढाच त्याचा हेतू होता. मात्र सरकारने त्याच्या कामात अडथळे आणून त्याचे रेडिओ स्टेशन इतरांपर्यंत पोचू नये अशी सोया केली. त्यानंतर बेट्स ती जागा सोडून निघून जाईल असे ब्रिटिशांना वाटले. मात्र झाले काहीतरी वेगळेच. पॅडीने त्या किल्ल्यावरच स्वतंत्र देशाचा दावा ठोकला.

असे म्हटले जाते की एका रात्री मित्रांसोबत आणि पत्नीसोबत गप्पा मारत असताना बेट्सने निश्चय केला आणि 2 सप्टेंबर 1967 रोजी किल्ल्याला “प्रिन्सिपॅलिटी ऑफ सीलँड” असे नाव दिले. तो त्याच्या पत्नीचा वाढदिवस होता. काही काळानंतर त्याचे कुटुंब त्याच्याबरोबर या जगातल्या सर्वात लहान देशात राहायला गेले
सफोकच्या किनाऱ्यापासून अवघ्या सात मैलांवर, सागरात असलेल्या या अपरिचित सार्वभौमत्वाच्या स्थापनेने यूके सरकारचे लक्ष वेधून घेतले. देशभर खळबळ माजली.  ब्रिटीश पुढारी अधिकारी या घटनेमुळे अस्वस्थ झाले. त्यांनी सीलँडचे वर्णन "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बेट म्हणून मान्यता नसलेल्या संरचनेवर बेकायदेशीर कब्जा" असे केले..आणि त्यांनी उर्वरित चार चौक्या उद्धवस्त केल्या जेणेकरून पुन्हा कोणी असा दावा ठोकू नये. दुसरीकडे, बेट्स सर्व संकटांना सामना करायला तयार आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम होते की सीलँड हा त्याचा स्वतःचा देश आहे तो त्यांनी संघर्षाने जिंकला आहे आणि तो त्याचा योग्य नेता आहे.

1978 मध्ये, अलेक्झांडर गॉटफ्रीड अचेनबॅच नावाच्या एका पश्चिम जर्मन व्यावसायिकाने स्वत: ला सीलँडचे "पंतप्रधान" घोषित केले आणि सत्तापालट केला.
कौटुंबिक आणीबाणीचा सामना टाळण्यासाठी बेट्सने कुटुंबासह सीलँड सोडले होते आणि त्याच्या अनुपस्थितीत, अचेनबॅच आणि काही जर्मन आणि डच भाडोत्रींनी हा किल्ला म्हणजे नवा देश ताब्यात घेतला.

त्यांनी बेट्सचा मुलगा प्रिन्स मायकेलला ओलीस ठेवले आणि त्याला चार दिवस कोंडून ठेवले. बेट्सने त्वरीत राज्य परत घेण्यासाठी माणसांना एकत्र आणलं. एक संघ तयार केला. युद्धदरम्यान अचेनबॅचच्या गटातील बरेच लोक पळून गेले, परंतु बेट्सने अचेनबॅचला ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा यूकेच्या राजदूताने बेट्सशी वाटाघाटी केली तेव्हा कुठे त्याने शेवटी अचेनबॅकची सुटका केली.

1980 च्या दशकात, ब्रिटीश सरकारने सीलँडच्या दाव्यांची कोणतीही वैधता काढून टाकण्यासाठी आपल्या प्रादेशिक अधिकारांचा विस्तार केला. तरीसुद्धा, बेट्सने सीलँड हा स्वतंत्र देश असल्याचे ठामपणे सांगत असून राहिला. सीलँडचे चलन, पासपोर्ट आणि स्टॅम्प जारी करणे ही प्रक्रिया त्याने अधिक प्रखर केली. स्वतःचा ध्वज देखील त्याने तयार केला. दुर्दैवाने, 1990 च्या दशकात, लोकांनी काही गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी वापरल्यामुळे सीलँडला त्याचे पासपोर्ट मात्र रद्द करावे लागले.

2006 मध्ये प्लॅटफॉर्मवर विध्वंसक आग लागली आणि मुख्य पॉवर जनरेटरचा नाश झाला, अनेकदा अनेक संकटं आलीत. सीलँडवर यूके सरकारकडून भाडोत्री आक्रमण आणि सतत धमक्या आल्या, परंतु ते ठाम राहिले, ही लोकं डगमगली नाहीत. सीलँड आजही तेथे आहे आणि मायकेल बेट्स आणि त्यांचे कुटुंब सीलँडच्या कल्याणात गुंतलेले आहेत आणि ते स्वतंत्र देश म्हणून चालवतात. त्यांनी प्लॅटफॉर्मवर पूर्णवेळ सुरक्षा देखील स्थापित केली आहे.




या स्वतंत्र रियासतची वेबसाइट देखील आहे आणि खर्चाला मदत करण्यासाठी नाणी, पॅचेस आणि टी-शर्ट यांसारखी स्मृतिचिन्हे ते विकतात. आश्चर्यकारकपणे, समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा लहान संरचनेने 50 वर्षांहून अधिक काळ त्याचे सार्वभौमत्व टिकवून ठेवले आहे हे आश्चर्य आहे.
दुसरे महायुद्ध सुरु झाले तेव्हा रक्षक किल्ला म्हणून सुरू झालेला एक पडीक टॉवर पुढे एक कौटुंबिक प्रकल्प आणि त्याही पुढे जाऊन एक स्वतंत्र राष्ट्र बनला. खडतर भूतकाळ असूनही, सीलँड कधीच डगमगला नाही. तो देश अजूनही सुरूच आहे आणि जगभरातील सर्वात लहान देश म्हणून अनौपचारिकरित्या का होईना तो ओळखला जातो; आणि आजही ह्या देशाचा रोमांचक इतिहास जगभरातल्या लोकांना आकर्षित करीत राहतो..

Thursday, 25 January 2024

जगातील सर्वात घाणेरडा माणूस-अमो हाजीचा आंघोळ केल्याने मृत्यू -

 #IntrestingStory #worldsdirtiestman #Iran

सध्या थंडीचे दिवस आहेत आणि फेसबुकवर अनेकदा अनेकजण आंघोळ न करण्यावरून जोक करताना दिसतात. म्हणजे या दिवसात रोज रोज आंघोळ केली नाही तरी फार फरक पडत नाही अशी जवळ जवळ मान्यता असल्यासारखे लोक बोलतात. कुणी गमतीने म्हणतात आज आंघोळीची गोळी घेतलीय. कुणी म्हणतात अंगावर चार थेम्ब शिंपडून घ्यावे. बर्‍याच लोकांनी त्यांच्या आयुष्यात अशी वेळ देखील अनुभवली असेल जेव्हा आंघोळ करणे हे सर्वोच्च प्राधान्य नव्हते. त्याहून महत्वाची कामे होती, आजारपण वगैरे.

आंघोळीशिवाय काही दिवस चालूही शकत असेल पण जेव्हा तुम्हाला एक आठवडा किंवा त्याहून अधिक काळ आंघोळीशिवाय होतो तेव्हा गोष्टी थोड्या चिंताजनक आणि दुर्गंधीयुक्त होऊ लागतात, आणि अश्यात एखाद्याने वर्षभर आंघोळ केली नाही तर काय होईल ? अनेक वर्ष ? किंवा अगदी 67 संपूर्ण वर्षे?

#अमोहाजी या नावाने ओळखल्या जाणार्‍या इराणी माणसाची ही जीवनपद्धती होती, ज्याला “जगातील सर्वात घाणेरडा माणूस” म्हणूनही ओळखले जाते.


अमो हाजी (20 ऑगस्ट, 1928 - 23 ऑक्टोबर, 2022) यांनी आपले संपूर्ण आयुष्य इराणमधील देझ गाह गावात व्यतीत केले. त्याचे खरे नाव माहित नाही, आणि त्याचे अमो हाजी हे प्रत्यक्षात एक टोपणनाव आहे ज्याचे भाषांतर "जुना टाइमर" असे आहे.




अर्ध्या शतकाहून अधिक काळ, अमौ हाजी एक संन्यासी म्हणून जगला, जो कधीही आंघोळ करत नव्हता, हाजी शहराच्या काठावर एका सिंडर ब्लॉकच्या झोपडीत राहत होता, तो रस्त्यावरच जेवायचा आणि पाईपमधून जनावरांचे शेण काढायचे काम करायचा. अमो हाजीच्या सुरुवातीच्या जीवनाबद्दल फारसे माहिती नाही, परंतु त्याने घोषित केले की त्याने हृदयविकाराचा त्रास सहन केल्यानंतर संन्यासी म्हणून आपले जीवन सुरू केले आहे. आंघोळ न करण्याचे त्याचे कारण म्हणजे साबण आणि पाण्याने शरीर धुतल्याने रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळे लवकर मरण येते असे तो म्हणत. हा विश्वास इतका दृढ होता की त्याने 60 वर्षांहून अधिक काळ आंघोळ केली नाही, त्याची त्वचा धूळ, माती आणि अगदी पिकलेल्या जखमांनी भरलेली असायची. अमौ हाजी हा गावकऱ्यांसाठी अतिशय ओळखीचा माणूस होता. अनेक दशके अंग न धुतल्यामुळे त्याची त्वचा जवळजवळ एकसमान राखाडी-तपकिरी रंगाची झाली होती आणि त्याचे केस विचित्र दिसायचे. तो अंघोळ करत नसला तरी त्याचे हे जगावेगळे सौंदर्य टिकविण्यासाठी तो त्याचे डोके आणि दाढीचे केस आगीत जाळून टाकण्यासाठी ओळखला जात असे. त्याच्या आंघोळीची भीती ही एकमेव गोष्ट अमो हाजीला इतर समाजापासून वेगळे ठरवणारी नव्हती, तर त्याचा आहार आणि छंद देखील विचित्र-आणि घृणास्पद-लक्ष वेधण्यासाठी पुरेसे होते. आंघोळ करताना हाजीला पाण्याची भीती वाटायची, पण पाणी पिण्याच्या बाबतीत तसे नव्हते. हायड्रेटेड राहण्यासाठी तो अनेकदा न धुतलेल्या, घाणेरड्या टिन डब्यातून मिळेल तिथून दिवसातून ५ लिटर पाणी प्यायचा. कुणीही देऊ केलेले अन्न तो नाकारायचा आणि स्वतः शोधून ताजे कच्चे अन्न, कच्चे मांस, कधीकधी अगदी सडलेले मांस तो खात असे. त्याला स्मोकिंग आवडत असे त्याच्याजवळ असलेल्या एका पुरातन पाईपमध्ये तो प्राण्यांची वाळलेली विष्ठा टाकून स्मोक करायचा आणि एकावेळी अनेक सिगारेट ओढत असल्याचे त्याचे फोटो देखील उपलब्ध आहेत.






सगळ्यात अषाचार्याची गोष्ट म्हणजे हाजी अविश्वसनीयरित्या 94 वर्षांचे आयुष्य जगला आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंतिम तपासणीत त्याला कुठलाही रोग नसल्याचे आणि त्यांची तब्येत चांगली असल्याचे घोषित करण्यात आले..आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गलिच्छ वापर, घाण पाणी आणि कुजलेले मांस अमो हाजीला कधीच आजारी बनवत नव्हते . मरेपर्यंत तो निरोगी होता. त्याला खरोखर आजारी बनवले असेल ते म्हणजे त्याचे इतक्या काळातील पहिले स्नान. वयाच्या 94 व्या वर्षी, काही गावकऱ्यांनी दयाळू दृष्टीकोन दाखवला आणि अमो हाजीला 67 वर्षांमध्ये आग्रहाने त्याची पहिली आंघोळ घातली.आंघोळीनंतर तो आजारी पडला आणि काही महिन्यातच त्याचे निधन झाले.

त्याच्या मृत्यूपूर्वी, तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील पॅरासिटोलॉजीचे प्रोफेसर डॉ. घोलामरेझा मोलावी यांनी हाजी यांच्यावर चाचण्या केल्या होत्या, ज्यामुळे त्याची अशी जीवनशैली असूनही त्यांच्या दीर्घायुष्याची आणि चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली शोधण्यात आली होती. डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की अमौ हाजी इतकी वर्षे अस्वच्छ परिस्थितीत राहिल्यामुळे खूप मजबूत रोगप्रतिकारक शक्ती विकसित करू शकला, या मजबूत रोगप्रतिकारक शक्तीने त्याला अत्यंत अविश्वसनीय परिस्थितीतही निरोगी राहण्यास मदत केली.




एकंदरीत, अमौ हाजी एक निरुपद्रवी माणूस होता ज्याला कधीही नियमात जगण्यात किंवा स्वच्छतेत रस नव्हता. 67 वर्षांतील त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आंघोळीमुळे त्याचा मृत्यू झाला की नाही याची खात्री नाही, परंतु हे लक्षात येतंय की तो खूप दीर्घ आणि स्वतःच्या नियमांवर एक आनंदी, मनोरंजक जीवन जगला.

Rashmi Padwad Madankar

Sunday, 31 December 2023

टाइम बँक

 




एक सुंदर संकल्पना वाचनात आली, अतिशय आवडली आणि पटली देखील. 

असं म्हणतात आपला देश हा सध्या सगळ्यात तरुण असणारा देश आहे. दुसरे आजही कुटुंबव्यवस्थेवर आपला विश्वास असल्याने टोकाची वाईट परिस्थिती आपल्या देशात उद्भवली नाहीये आणि निकटच्या काळात उद्भवणाराही नाही, तरीही मी वाचलेली ही व्यवस्था एक चांगली संकल्पना आहे. इतर देशांची  स्थिती याबाबत जरा वाईट आहे. बहुतांश देशात कुटुंबसंस्थाच ढासळलेली असल्याने अमाप पैसे असूनही तिथे एकाकी राहणाऱ्या माणसांची त्यात वृद्धावस्थेत किंवा आजारी असल्यावर त्यांची सुश्रुषा करणारी माणसे त्यांना मिळणं दुरापास्त झाले आहे. त्यामुळे तिथे सुरु झालेली ही व्यवस्था अनेक दृष्टीने आपल्या देशातही करता येण्यासारखी आहे. आपण काय चांगले ते घेत जावे... तर, 


स्विझर्लंडमध्ये तिथल्या सरकारच्या माध्यमातून 'टाइम बँक' ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे ''वेळ खाते'' (Time Account) सुरु करावे लागते. या खात्यात तुमच्या वेळेचा लेखाजोखा जमा राहतो. 


स्विझर्लंडमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने या संकल्पनेबाबत तिचा अनुभव सांगितला...  


स्वित्झर्लंडमध्ये शिकत असताना मी माझ्या शाळेजवळ एक घर भाड्याने घेतले. घरमालकीण, क्रिस्टीना, एक ६५ वर्षांची अविवाहित महिला होती जिने सेवानिवृत्त होण्यापूर्वी माध्यमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. स्वित्झर्लंडला पेन्शन व्यवस्था खूप चांगली आहे, त्याला त्याच्या नंतरच्या वर्षांत अन्न आणि निवारा बद्दल काळजी करावी लागत नाही, इतकी रक्कम मिळते. एके दिवशी मला कळले की तिला एका ८७ वर्षांच्या अविवाहित वृद्धाची काळजी घेण्यासाठी नोकरी मिळाली आहे. मी त्या महिलेला विचारले की या वयात कशाला दगदग, अराम करा. पैशासाठी हे करण्याची गरज नाही ? तिच्या उत्तराने मला आश्चर्य वाटले: "मी पैशासाठी काम करत नाही, परंतु मी माझा वेळ 'टाइम बँकेत' जमा करते आहे, आणि जेव्हा मी माझ्या म्हातारपणात चालू शकणार नाही, किंवा मला फार गरज असेल तेव्हा मी ते परत घेऊ शकते."


"टाईम बँक" या संकल्पनेबद्दल मी पहिल्यांदा ऐकले, तेव्हा मी खूप उत्सुक होते आणि घरमालकाला सविस्तर विचारले. "टाइम बँक" ही संकल्पना स्विस फेडरल मिनिस्ट्री ऑफ सोशल सिक्युरिटीने विकसित केलेला वृद्धापकाळातील पेन्शन कार्यक्रम आहे. लोक वृद्धांची काळजी घेण्यासाठी 'वेळ' देतात, पर्यायाने खात्यात वेळेची बचत करतात आणि ते वृद्ध झाल्यावर किंवा आजारी पडल्यावर किंवा काळजी घेण्याची गरज असताना ते खात्यातून काढून घेऊ शकतात.


आता हे खाते कोण काढू शकतात ह्याच्या अटी फार गमतीशीर आहेत... अर्जदार निरोगी, संवाद साधण्यात चांगला आणि प्रेमाने परिपूर्ण असावा. त्यांना दररोज मदतीची गरज असलेल्या वृद्धांची काळजी घ्यावी लागते. त्यांचे 'सेवा तास' सामाजिक सुरक्षा प्रणालीमधील वैयक्तिक 'वेळ' खात्यांमध्ये जमा केले जातात. माझी घरमालकीण आठवड्यातून दोनदा कामावर जायची, प्रत्येक वेळी दोन तास गरजूंच्या सेवेत घालवायची, म्हातार्‍यांना मदत करायची, त्यांच्यासाठी खरेदी करायची, त्यांच्या खोल्या साफ करायची, त्यांना उन्हात नेऊन फिरवून आणायची, त्यांच्याशी गप्पा मारायची.


नियमानुसार, एक वर्षाच्या सेवेनंतर, “टाइम बँक” सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या तासांची गणना करते आणि त्याला “टाइम बँक कार्ड” जारी करते. जेव्हा तिला तिची काळजी घेण्यासाठी कोणाची गरज असते तेव्हा ती "व्याजासह वेळ" काढण्यासाठी तिचे "टाइम बँक कार्ड" वापरू शकते. माहितीच्या पडताळणीनंतर, "टाइम बँक" रुग्णालयात किंवा तिच्या घरी तिची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवकांना नियुक्त करते.


एके दिवशी, मी कॉलेजला  आणि घरमालकिणीने फोन केला आणि म्हणाली की, ती खिडक्या पुसताना स्टूलवरून पडली. मी त्वरीत सुट्टी घेऊन तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले. त्यांचा पाय मोडला होता, ज्यामुळे त्यांना चालणे शक्य होणार नव्हते. जेव्हा मी तिला सांभाळण्यासाठी माझ्या कॉलेजमधून सुट्टीघेण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मला तिची काळजी करण्याची गरज नाही, कारण तिने आधीच "टाइम बँक" कडे विनंती सबमिट केली आहे. दोन तासांपेक्षाही कमी वेळात "टाइम बँक" ने एका नर्सिंग कर्मचाऱ्याला घरमालकिणीची काळजी घेण्यासाठी पाठवले.


पुढचा महिनाभर, देखभाल कर्मचाऱ्याने घरमालकाची रोज काळजी घेतली, तिच्याशी बोलून, तिचे हवेनको ते सगळं बघून, तिच्यासाठी स्वादिष्ट स्वयंपाक बनवून तिची सुश्रुषा केली. केअरटेकरच्या सेवेमुळे घरमालकीण लवकरच ठणठणीत झाली. सावरल्यानंतर तीच पुन्हा "कामावर" देखील जायला लागली. ती म्हणाली की ती अजूनही निरोगी आहे आणि त्यामुळे भविष्यासाठी "टाइम बँक" मध्ये अधिक वेळ वाचवण्याचा तिचा हेतू आहे.


आज, स्वित्झर्लंडमध्ये, वृद्धापकाळाला आधार देण्यासाठी "टाइम बँक" वापरणे ही एक सामान्य प्रथा बनली आहे. यामुळे देशाच्या पेन्शनवरील खर्चात बचत तर होतेच पण इतर सामाजिक समस्याही सुटतात. अनेक स्विस नागरिक या प्रकारच्या वृद्धापकाळाच्या टाइम पेन्शनला खूप पाठिंबा देतात.


स्विस पेन्शन ऑर्गनायझेशनने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की निम्म्याहून अधिक स्विस लोकांना या प्रकारच्या वृद्धाश्रम सेवांमध्ये सहभागी व्हायचे आहे. स्विस सरकारने "टाइम बँक" पेन्शन योजनांना समर्थन देण्यासाठी कायदा देखील मंजूर केला. सध्या, आशियाई देशांमध्ये घरी एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांची संख्या वाढत आहे आणि ती हळूहळू एक सामाजिक समस्या बनत चालली आहे. स्वित्झर्लंड शैलीतील "टाइम बँक" पेन्शन आपल्यासाठी देखील एक चांगला पर्याय असू शकतो.. 


तुम्हाला काय वाटतं ? 


@रश्मी पदवाड मदनकर



माँ भारती

 भूषणकुमार उपाध्याय ह्यांची एक अतिशय आवडलेली कविता..


वेदमंत्रों की ध्वनि में हूँ।

उपनिषदों की वाणी में हूँ।।

गीता का विश्वरूप मेरा तन है।

पतंजलि का योग मेरा मन है।।

भक्त प्रह्लाद ध्रुव के नमन में हूँ।

षड् दर्शनों  के अमर श्रवण में हूँ।।


पुराणों की मोहक कथाओं में हूँ।

दुखी मानव की व्यथाओं में हूँ।।

राम के धनुष का अमोघ वाण हूँ।

कृष्ण का सुदर्शन चक्र महान हूँ।।


लिच्छवी का गणतंत्र हूँ।

राजा पौरुष यथा स्वतंत्र हूँ।।


बुद्ध की करुणा हूँ।

महावीर की धारणा हूँ।।

नानक का संदेश हूँ।

सूफ़ियों का देश हूँ।।


गिरिजाघर की प्रार्थना हूँ।

पारसियों की अग्नि याचना हूँ।।


सर्वे भवन्तु सुखिनः का घोष हूँ।

मानव सभ्यता का प्रदोष हूँ।।

चरक का आयुर्वेद हूँ।

कालिदास का रस संवेद हूँ।।


भरत के नाट्य शास्त्र का संवाद हूँ।

शंकर मंडन मिश्र का विवाद हूँ।।

पाणिनि का व्याकरण हूँ।

आर्यभट्ट का खगोल जागरण  हूँ।।


शिवलिंग अनंत हूँ।

माँ दुर्गा दिगंत हूँ।।

शंकर के त्रिशूल का दुर्धर प्रहार हूँ।

दुष्ट दानव राक्षसों का संहार हूँ।।


उत्तर में हिम का अखंड विस्तार हूँ।

दक्षिण में जलधि का संचार हूँ।


अर्जुन का निष्काम कर्म हूँ।

चाणक्य का राष्ट्र धर्म हूँ।।

शास्त्र की पुकार हूँ।

शस्त्र की झंकार हूँ।

ज्ञान का आलोक हूँ।

विज्ञान का विलोक हूँ।


गंगा का पावन प्रवाह हूँ।

अनेक कल्पों का गवाह हूँ।।

लोक कल्याण की भावना से ओत प्रोत हूँ।

वसुधैव कुटुम्बकम् का प्राचीन स्रोत हूँ।।


माँ भारती के मन का मीत हूँ।

सत्यमेव जयते का गीत हूँ।।

( डॉ भूषण कुमार उपाध्याय, भा पो से, से. नि.)

Friday, 22 December 2023

सक्तीची ''पाळी''



आमच्या लहानपणी आईच्या काळात, म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांआधी मासिक पाळी आलेल्या महिलेला तू मंदिरात यायचे नाही किंवा कोणत्याच शुभकार्यात उपस्थित राहायचे नाही असे सांगितले जायचे, अश्या कार्यातून ''सक्तीची रजा'' तिला मिळालेली असायची. तोवर तिचा घरात वावर, किंवा घरकामात सूट वगैरे कुटुंबीयांनी मान्य केलेली होती. त्याही पूर्वी म्हणजे आजीच्या वगैरे काळात तर तिला कुठेच जाण्याची परवानगी नव्हती. अगदी परसात, पडवीत, अंगणात, तिनेच सावरलेल्या तिच्या हक्काच्या स्वयंपाक घरात देखील नाही. तिच्या हाताने केलेला स्वयंपाक देखील ग्रहण करायचे नाकारले जायचे. तिला एखाद्या कोपऱ्यात गुपचूप बसून राहावे लागायचे. ही ''सक्तीची विश्रांती'' होती.

महाराष्ट्राच्या मराठवाड्यात उसतोडणीला जाणाऱ्या महिलांना मासिक पाळीच्या दिवसात काम करू दिले जात नाही म्हणून तेथील कामगार महिलांनी गर्भाशयच काढून टाकण्याचा 'सक्तीचा' मार्ग निवडला आता त्याला अनेक वर्ष होतायेत. अशा महिलांचा वाढता आकडा आता चिंताजनक झाला आहे, त्याचे प्रतिकूल परिणाम आता दृश्य स्वरूपात दिसू लागले.. पण अजूनही त्यावर ठोस तोडगा काही निघालेला नाही. हे प्रकरण भयंकर आहे. पाळी आलेल्या बाईला काम द्यायचे नाही हे कोण ठरवतं, तर मुकादम. पाळी येणारच नसलेल्या महिलेला नवऱ्यासह कामावर ठेवायचे हे कोण ठरवतं - मुकादम. आणि काम हवे असेल तर गर्भाशय काढून टाका हा सल्ला सुद्धा देतो मुकादम, ऐकतो नवरा आणि भोगते स्त्री... सक्तीची रजा, सक्तीचे काम, सक्तीचा सल्ला, सक्तीचा भोग.

जपानी सरकारच्या अनेक कंपनीबरोबर, वर्षभर केलेल्या एका सर्वेक्षणात असे आढळून आले की त्या वर्षभरात केवळ 0.9% महिला कर्मचार्‍यांनी मासिक पाळीमुळे होणाऱ्या त्रासामुळे रजेसाठी अर्ज केला होता. इतर महिला स्वखुशीने कामावर हजर होत्या. त्या वर्षी सरसकट १००% महिलांना मासिक पाळीत सक्तीची रजा घ्यावयास सांगितले असते तर ०.९% महिलांशिवाय इतर महिलांवर तो सक्तीचा न्याय ठरला असता काय कि अन्याय ठरला असता ? किंवा त्यांना त्यांच्या कार्यापासून, कर्तव्य निभावण्यापासून वंचित ठेवले गेले असा त्याचा अर्थ काढता आला असता का ?

हे सगळे प्रश्न उपस्थित होण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे, नुकतंच राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज कुमार झा यांनी राज्यसभेत महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या त्रासाचा विचार करून पगारी रजा देण्याबाबत सरकार काय प्रयत्न करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. यानंतर केंद्रीय महिला व बालविकासमंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना मासिक पाळीत पगारी रजा देण्याच्या मागणीला विरोध केला. तसेच मासिक पाळी येणं हे काही अपंगत्व नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर मासिक पाळीच्या काळात त्रास होणाऱ्या महिलांना पगारी रजा मिळण्याच्या विषयावर घमासान सुरू आहे. असं असलं तरी महिलांना मासिक पाळीच्या काळात पगारी रजा मिळावी ही मागणी पहिल्यांदाच झालेली नाही. याआधीही ही मागणी झाली. जगाच्या वेगवेगळ्या देशात यावर उहापोह देखील झाला, त्यावर मतभेद झाले. पण तोडगा मात्र आजतागायत कुठेही निघालेला नाही.


जागतिक इतिहास :
औपचारिक मासिक पाळीच्या रजेची कल्पना सुमारे एक शतकापूर्वी सोव्हिएत रशियामध्ये उद्भवली, जेव्हा मासिक पाळी असलेल्या स्त्रियांना 1920 आणि 30 च्या दशकात त्यांच्या पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पगाराच्या श्रमातून मुक्त करून सक्तीच्या रजेवर पाठवायला सुरुवात झाली. त्यानंतर 1920 च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानमधील कामगार संघटनांमध्ये या कल्पनेने जोर धरला आणि अखेरीस 1947 मध्ये जपान देशाच्या कायद्यात हा अंतर्भूत झाला. जपानमधील या निर्णयामागील विचार काही प्रमाणात महिलांच्या प्रजननक्षमतेच्या सिद्धांतांवर आधारित आहे, युनियनने चेतावणी दिली आहे की दीर्घ तास आणि खराब स्वच्छताविषयक परिस्थिती त्यांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेस हानी पोहोचवू शकते, म्हणून या काळात त्यांना सक्तीची विश्रांती देण्यात यावी. म्हणजे ह्यातही महिलांच्या आरोग्याविषयी, तिला होणाऱ्या त्रासासाठी किंवा तिच्या स्वतःच्या मर्जीसाठी नव्हे तर, ही सक्तीची रजा तिने पुढल्या पिढीला जन्म घालताना काही कसूर सुटू नये या स्वार्थी विचाराभोवती फिरणारा आहे.

काही देशात अशा योजना करण्यात आल्या की, मासिक पाळीच्या दिवसात महिलांना सुट्टी घेता येईल मात्र त्यांच्या कामाचे तास नंतरच्या काळात त्यांनी ज्यादा काम करून भरून काढायचे आहेत. तिथे मात्र एक वेगळी अडचण निर्माण झाली.. तेथील पुरुषांना आपल्यालाही महिन्याला चार सुट्ट्या जास्त मिळाव्या असे वाटू लागले आणि दुसऱ्या बाजूला मासिक पाळी जास्त वेदनादायी आहे की, पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी द्यावे लागणारे जास्तीचे तास त्रासदायक आहेत हा भेद करणं महिलांना कठीण झालं. अखेर या सगळ्याला महिलाच बळी पडताहेत या विचारला अधिक बळकटी येऊ लागली.

2016 साली चार इटालियन खासदारांनी दरमहा तीन दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेचा प्रस्ताव संसदेत मांडला होता, जो पुढे अयशस्वी झाला. तो अयशस्वी होण्यामागे महिलांचाच सहभाग जास्त होता कारण त्यांना काळजी वाटत होती की आधीच नोकऱ्यांवर पुरुषी वर्चस्व असतांना आणि नोकरी पेशात महिलांचे प्रमाण अत्यंत कमी असताना, नियुक्ती होण्याआधीच महिला कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे प्रमाण या एका कारणाने वाढीस लागेल. ट्रेंटो विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या सहाय्यक प्राध्यापिका डॅनिएला पियाझालुंगा तेव्हा म्हणाल्या, “माझ्यासह—बहुतेक लोकांना असे वाटले की यामुळे स्त्रियांना अधिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागेल.”

आणखी एक २०१४ साली केलेला सरकारी सर्वे असेही सांगतो कि ०.८ % महिलांना सोडले तर इतर महिला पाळीच्या काळातील त्रासाबद्दल सुट्टी घेऊ शकल्या नाही कारण त्यांना त्यांच्या वरिष्ठांना ते पटवून देणे फार कठीण वाटले किंवा वरिष्ठांमध्ये या बाबतची जागृतता आणि समजूतदारपणाची उणीव भासली.

मासिक पाळीच्या रजेचा जगभरातील नियोक्त्यांद्वारे स्वीकार केला जात असताना, यूएसमध्ये या कल्पनेला फारसा फायदा झाला नाही. हेल्थ केअर फॉर वुमन इंटरनॅशनल या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या 600 अमेरिकन लोकांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की जवळजवळ निम्म्या प्रतिसादकर्त्यांना असे वाटते की मासिक पाळीच्या रजेचा परिणाम होईल. काहींनी चिंता व्यक्त केली की ज्यांना मासिक पाळी येतच नाही अशा लोकांसाठी हे धोरण अन्यायकारक असेल किंवा अशा सुट्ट्यांचा हिशेब कोण आणि कसा ठेवणार ? या रजेचा गैरवापर केला जाणार नाही ह्याची शाश्वती कशी दिली जाऊ शकते.

भारतात, फूड डिलिव्हरी स्टार्टअप Zomato ने २०२० या वर्षी कर्मचार्‍यांना वर्षातून 10 दिवसांपर्यंत सशुल्क मासिक पाळीच्या रजेची मुभा देण्यास सुरुवात केली आणि देशातील काही खाजगी कंपन्यांमध्ये सामील झाले ज्यांनी मासिक पाळीच्या संदर्भात भारताच्या दृढ निषिद्धांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की पॉलिसी ऑगस्ट 2020 मध्ये लाँच झाल्यापासून, 2,000 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी घेतलेल्या 621 महिला कर्मचाऱ्यांनी त्याचा वापर केला आहे. तरी अजूनही भारतासारख्या देशात महिला कर्मचार्‍यांना असे वाटते की त्यांची अनुपस्थिती मासिक पाळीशी संबंधित आहे ही अत्यंत खाजगी गोष्ट सार्वजनिकपणे उघड करावी लागणे हे देखील अन्यायकारक ठरू शकेल. दुसरे, महिलांना सुट्टी हवीय का ? की त्यांना कामात व्यस्त राहणे आवडते. हा जिचा तिचा निर्णय असू शकतो. जसे आरोग्याची समस्या असतानाही कामावर यावेच लागेल हे अन्यायकारक आहे तसेच फक्त पाळी आहे म्हणून कामावर येऊच नये हे देखील तिच्यालेखी अत्यंत बळजबरीचे आणि अन्यायकारक असू शकेल.


असे कायदे लागू करण्याआधी खरी गरज आहे ती काही पूर्वतयारी करण्याची, महिला करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी मासिक पाळी साक्षरता आणि त्याला पूरक अशी संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. कोणतीही धोरणे केवळ तेव्हाच प्रभावी होऊ शकतात जेव्हा कामाच्या ठिकाणी मासिक पाळी येत असलेल्यांसाठी विचारांचा समंजस मोठेपणा आणि त्यासाठी समर्थनाची स्पष्ट संस्कृती असेल. यामध्ये कामाच्या ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये मासिक पाळीच्या उत्पादनांचा पुरवठा करणे, स्वच्छता व आरोग्याविषयी आवश्यक संसाधनांची पूर्तता करणे आणि त्या त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार असलेल्या संघांना मासिक पाळी सारख्या विषयांवर कशी प्रतिक्रिया द्यायची आणि कसे समर्थन व सहयोग द्यावा याची समज आहे याची खात्री करणे अश्या गोष्टी समाविष्ट करता येतील.


खरतर महिलांना कोंडीत पकडण्याचे अनेक मार्ग आहेत. तिला दुय्यम स्थान देण्याच्या असंख्य प्रथा आहेत. त्यातली एक परंपरा आहे पाळी आलेल्या महिलेला बाजूला बसवणे, वेगळे समजणे, दूर लोटणे.. त्याला नाव काहीही दिले तरी. असे होऊ नये की प्रगतीची कास धरताना आपला प्रवास उलट्या दिशेने होऊ लागेल. मला अनेकदा हा प्रश्न पडतो, महिलांबाबतचे अनेक नियम पुरुषांना का ठरवावे वाटतात किंवा ते ठरवताना किती स्त्रियांचा सहभाग, मत, निर्णय घेतले, मान्य केले जातात ? तिच्या बाबतीत तिला काय हवंय, काय करायचंय हे तिचे तिने ठरवायला, निर्णय घ्यायला आणि त्यावर अंमल करायला ती समर्थ आहे आणि सक्षमही. गरज आहे ती तिच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याची आणि त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी तिच्या पाठीशी उभे राहून तिला स्वातंत्र्य देण्याची.

भारतात हा कायदा निघालाच तर यातल्या किती मुद्द्यांवर विचार केला जाईल हे बघण्यासारखे असणार आहे..
तूर्तास सुट्टी द्यायची की द्यायची नाही या वर्चस्ववादी वादापेक्षा ''पाळीत तिला सुट्टी घ्यायची असेल तर अडवणूक नको आणि नको असेल तर बळजबरी नको असा कायदा निघत नाही तोवर वाट बघूया...


रश्मी पदवाड मदनकर
7720001132


(आजच्या तरुण भारत आकांक्षा पुरवणीत प्रकाशित कव्हर स्टोरी)



Featured post

काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही ...