सासरे जाऊन अर्धा महिना उलटला. खरतर ते गेले हे स्वीकारायला आणि आता ते कधीच दिसणार नाहीत यावर विश्वास ठेवायला मन तयारच नाही. समस्त कुटुंबाचा आधारवड होते ते. आमच्या कुटुंबातील जुन्या खोडांपैकी हे शेवटचे खोड होते. सासऱ्यांचे सगळे भाऊ, सासूआईंचे सगळे भाऊ याआधीच गेलेत, माझे व माझ्या जाऊचे वडीलही आधीच गेलेत आणि माझ्या नंदांचे सासरेही गेलेत. या सगळ्या घरादारातल्या स्त्रिया मात्र अजून खमक्या आहेत; नातवंडांच्या पतवंडांचा वाढीव संसार सांभाळत जगत आहेत. चाळीशीपार मध्यवयात पोचलेल्या सगळ्यांचा हा अनुभव असेल की एकेक करत निघून जाते आहे; एक पिढी आता संपते आहे. दुसर्यांसाठी जगत स्वत:चे जीवन संपवणारी पिढी, मान मर्यादा वडीलकीची आब राखणारी, कमी पैशातही तडजोड करून, तरीही सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारी, सोबत घेऊन चालणारी पिढी आता संपते आहे. ते होते.. आहेत तोपर्यंत आपण अजूनही लहान असण्याचे आतून येणारे फीलिंग कायम आहे.. ही डोक्यावर हात ठेवून असणारी माणसे जसजशी जाऊ लागतात तसतशी ही फीलिंग मंदावत जाणार. जबाबदारीची जाणीव वाढत जाणार आणि हळूहळू आपल्याला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे; हे विधिलिखित टळणारे नाही.. पण ही जाणीव खूप खोलवर उद्विग्न करणारी, विचार करायला भाग पाडते आहे.
एक अत्यंत हुशार, प्रगाढ वाचन करणारे, सर्व विषयांचा व्यासंग असणारे, कलेची-साहित्याची आवड असणारे, आयुष्यभर प्रचंड काम करून आभाळभर अनुभव गाठीशी जमा करून प्रगल्भ झालेले एक व्यक्तिमत्व आमच्या कुटुंबातून कमी झाले. नातवंडांना हे संचित देऊ शकणारे असे व्यक्तिमत्व जगभर शोधले तरी आता सापडणार नाही; ही अशी हानी काही केल्या भरून येत नसते. माणूस म्हातारे झाले म्हणून, खूप आजारी होते म्हणून ते वेदनेतून सुटले, सद्गतील लागले हे एक समाधान मानून घेतले तरी कुटुंबात एक जी दरी निर्माण होते ती दुसऱ्या कुणाहीमुळे भरणारी नसते. प्रत्येकाचे एकमेव स्थान आहे आपल्या आयुष्यात हे तो माणूस निघून गेल्यावर अधिक प्रकर्षाने जाणवू लागते.
माझ्याबाबत सांगायचे झाले तर; सासरे ज्यांना आम्ही सगळेच बाबूजी म्हणायचो, ते आणि सासूबाई आमच्याकडे मुंबईला राहायला यायचे तेव्हा घराला अधिकच घरपण यायचे. माझ्या मुलाच्या वाट्याला आजी-आजोबा यावे म्हणून मला नेहमीच त्यांची ओढ असायची. त्यांचे माझ्यावर विशेष प्रेम होते.जगातल्या कुठल्याही विषयावर आम्हाला एकमेकांशी चर्चा करायला आवडत असे. अगदी आजचा कांद्याचा बाजारभाव ते उद्याचा देशाचा राष्ट्रपती ते पुढले महायुद्ध अशा कुठल्याही गोष्टीवर आम्ही मोकळी चर्चा करू शकायचो. त्यांच्यानंतर त्यांच्या सर्व मुलांमध्ये मी एकमेव सरकारी क्षेत्रात काम करते याचा कोण अभिमान होता त्यांना... माझ्या लिखाणाचे कौतुक तर एवढे की मी स्वतः कधी केले नसेल पण ते वृत्तपत्रातली माझ्या लेखांची कात्रणे काढून साठवून ठेवत असत, मी लिहिलेली पुस्तके तर त्यांना त्यांच्या समवयस्क मित्रांमध्ये अभिमानाने मिरवण्याचे साधन वाटायचे. अगदी माझे व्हिजिटिंग कार्ड सुद्धा ते कित्येकांना कौतुकाने दाखवत राहायचे. बारा वर्षांआधी वडील गेल्यानंतरही वडील नाहीत असे कधी वाटलेच नाही. बाबूजींच्या जाण्याने मात्र ते प्रकर्षाने जाणवले..पण माझ्यापेक्षा नवऱ्याचे दुःख जास्त मोठे आहे कारण त्याची आई नव्हती आणि आता वडीलही नाहीत. आई-वडील दोन्ही नसणाऱ्यांच्या आयुष्यातून माहेरपणाची घरपणाची लक्झरी झटक्यात निघून जाते.. कितीही नातेवाईक असू द्या आणि कितीही वय असले तरी मग पोरकेपणा येतोच वाट्याला.
जगण्याच्या अनेक अनुभवातून हे सगळं स्वीकारण्याची मानसिकता तयार होत असली तरी, त्यात्या वेळी येणाऱ्या या भावना ज्याच्या त्यालाच कळत असतात. सांत्वना तेवढ्यापुरत्याच दिलासा देतात; म्हणून जुन्या माणसांना जपले पाहिजे... त्यांचा सहवास जेवढा होऊ शकेल तितका अनुभवून घेतला पाहिजे. कारण त्यांच्या जाण्यानंतर ते कितीही हवेहवेसे वाटले तरी ते फिरून परत येत नाहीत आणि त्यांच्या सोबतीचे क्षण पुन्हा मिळत नाहीत हेच शाश्वत सत्य आहे.
No comments:
Post a Comment