वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे
हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत देखील पैशांच्या स्वरूपात घ्यायची नाही हे ठरवून तो पुढल्या प्रवासाला निघाला. भारतातले एकूण १८ राज्य आणि ३ देश आणि अवघे ४ वर्ष त्याने सायकलवर पालथे घातले. मार्गात कुणी राहायला जागा दिली तर राहायचे, पोटापुरते अन्न दिले तर खायचे...आणि मिळाले नाही तर ? या आहे आणि नाहीच्या मधलाच हा प्रवास होता. या प्रवासात त्याने कुठला अनुभव घेतला नसेल ?? कोव्हीड काळात कित्येक गावातून हाकलून लावले असताना वेशीवरच्या मंदिरात रात्र काढण्यापासून ते गावाबाहेर मंदिर नाही म्हणून स्मशानात भर पावसात पूर आलेला असताना निथळत राहून आजच डुबून मृत्यू येईल की काय याची वाट पाहण्यात काढलेली रात्र. अनेकांच्या घरी एका रात्रीचा आसरा घेण्यासाठी विनवणी करण्यापासून ते अनेकांच्या मनात कायम घर करण्यापर्यंतचा प्रवास. ४ दिवस पोटात अन्न गेलेले नसताना, भुकेने पोट तोडत असताना, आता जिवंत राहणे शक्य नाही असे वाटत असताना भिक्षा मागण्याखेरीज उपाय नसताना नाईलाजाने पसरलेला हात ते कुठेतरी कुणाच्यातरी घरी प्रेमाने आग्रहाने पोट तुडुंब भरेपर्यंत अन्न आणि प्रेम मिळवण्याचा प्रवास. प्रवास वरवर स्वतःपासून सुरु होऊन स्वतःच्याच खोलवर आत आत घेऊन जाणारा, प्रगल्भ करून सोडणार प्रवास.
कौटुंबिक वादातून निराशेने ग्रासलेल्या विशालने मनात अतीव दुःख घेऊन घर सोडले होते. विशालला नेपाळला गेल्यावर एका जोडप्याने दत्तक घेतले. तिथे त्याने नेपाळ प्रवासातले एक वर्ष त्यांच्या सोबत घालवला. बांगलादेशात ऐन दंगे सुरु असताना प्रवास केला. ओडिसा आसाम नागालँड सारख्या ठिकाणचे अनुभव ते छत्तीसगढ मधल्या गावांमध्ये प्रत्यक्ष नक्सल गावांत राहण्याचा अनुभव. एकेक माणसांच्या हजारो कथा त्याच्या गाठोड्यात जमा झाल्या आहेत. आयुष्यभर जगल्यावरही घेता येणार नाही असे सगळे अनुभव चार वर्षाच्या सलग सायकल प्रवासातून घेऊन परत आलेला विशाल. या जगात ''प्रेम'' ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हे सांगणारा विशाल. जाताना असलेला आणि आता परतलेला विशाल अंतर्बाह्य बदलला आहे. आता तो लवकरच पुन्हा प्रवासावर निघणार आहे. आजवरच्या प्रवासातून फक्त घेत आलो आता ते परत करण्यासाठी प्रवास करायचा आहे असे तो म्हणतो. आम्ही एकाच प्रदेशातले एकाच शहरातले असताना पूर्वी त्याची माझी भेट नव्हती, ओळख नव्हती. ३ वर्षांआधी तो दूरवर प्रवासात असताना त्याला तिथे कुणीतरी माझी ओळख सांगितली. आम्ही फोनवर बोललो आणि मला त्याचे अनुभव ऐकत राहण्याचे वेडच लागले. तो जिथे कुठे जायचा तिथले किस्से फोनवरून सांगत राहायचा. पुढे दोन वर्षांपूर्वी ''अनलॉक'' दिवाळी अंकात त्याची विशेष स्टोरी आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हापासून विशाल कधी परत येतो आणि भेटतो, कधी त्याला मुलाला, कुटुंबाला जवळच्या मित्रपरिवाराला भेटवते असे झाले होते. अखेर तो दिवस उगवला. २५ डिसेंबर ख्रिसमसच्या संध्याकाळी हा असा एक सांताक्लॉज भेटला आणि त्याचे अनुभव ऐकण्याची, गप्पांची अशी मैफल सजली की ५ तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आले नाही. त्याने घेतलेले अनुभव आणि त्यातून त्याला मिळालेलं ज्ञान अनुभूती खरोखर समृद्ध करणारे आहेत हे मात्र निश्चित.
No comments:
Post a Comment