Saturday, 1 February 2025

माझी शाळा

 शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.

मी शाळेत आली तेव्हा रेशीमबागेच्या संघाच्या इमारतीत ही शाळा भरत होती. लांबलचक कित्येक खोल्यांची भव्य इमारत, मोठाले दोन मैदान आणि स्मृती भवनाचे शांत सुंदर पवित्र वातावरण आम्हाला या काळात लाभले. पुढे मी सातव्या वर्गात असताना नंदनवन येथील स्वतःच्या इमारतीत शाळा शिफ्ट झाली. इथेही चार मजली मोठी इमारत होती. पुढे आमच्यासमोरच त्याच प्रांगणात दुसऱ्या इमारतीचे बांधकाम देखील सुरु झाले. आता केशवनगर शाळेची इमारत त्याच प्रांगणात चारही बाजूने चौकोनी बांधली गेली आहे. म्हणजे ज्या शाळेने आम्हाला मोठे होताना घडताना पाहिले; त्याच शाळेला आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठी होताना घडताना याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले आहे.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी जवळजवळ २७-२८ वर्षानंतर शाळेला जवळून आतबाहेर न्याहाळता आले. बराच बदल झाला आहे पण तो वरवरचा आहे. मुळात शाळा तशीच आहे जशी ती मनात घर करून बसली आहे. या शाळेने खूप काही दिले. मुख्य म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करून दिला ज्यावर आम्ही आज पाय रोवून, तग धरून घट्ट उभे आहोत. सकाळी सात वाजता त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक पाचपोर सरांनी शिकवलेल्या प्रार्थना-ध्यान साधनेने होणारी दिवसाची सुरुवात व्हायची. त्या साधनेचे महत्त्व आज या टप्प्यावर येऊन कळले आहे. वर्गशिक्षिका वझलवार मॅडमने केवळ जीवशास्त्र शिकवले नव्हते, आयुष्याला वळण देण्याचे कठोर कार्य त्यांनी अत्यंत मृदूपणे केले होते. शारीरिक शिक्षणाच्या केचे सरांनी शिस्त अंगात भिनवली. त्यांचा दरारा असा होता की त्यांच्या मेन गेटवर झालेल्या केवळ प्रवेशाने देखील अक्खी इमारत चिडीचूप होऊन जायची. सरांच्या मार्गदर्शनात कित्येक खेळात प्राविण्य मिळवले, कित्येक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता आले.. त्यांच्यामुळे आत्मविश्वास दुणावला. मुजुमदार बाईंनी शिकवलेलं संस्कृत असेल किंवा भाकरे सरांनी शिकवलेलं गणित.. आजही बुद्धीची ताकद नाही ते विसरण्याची, इतके ते पक्के मांड मांडून बुद्धीत घट्ट बसले आहे. धर्माधिकारी मॅडमने विज्ञानाबरोबर कलेत गती मिळवून दिली. दंताळे (कुलकर्णी) मॅडम, मलिये मॅडम तारे मॅडम या सगळ्यांनीच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. यावेळी कार्यक्रमात आजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या त्या त्या वेळच्या अनेक गमतीजमती सांगण्याची संधी मिळाली. त्यांना मी अनेक किस्से सांगू शकले, त्यातून आम्हा सगळ्यांच्या घडण्याचा प्रवास मला सांगता आला. आणि हे क्षण, हे प्रसंग, हे शिक्षण, ज्ञान, कला आणि शिस्त या शाळेने आम्हाला दिली, आमचा पाया मजबूत केला, म्हणूनच जमिनीवर घट्ट उभे राहूनही आम्हाला आकाशात भरारी घेण्याचे बळ मिळाले असल्याची कबुली मला देता आली, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे, एकूणएक शिक्षकाचे, इतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्यासोबत शिकणाऱ्या त्यावेळच्या माझ्या सहविद्यार्थ्यांचे, ज्यांनी ज्यांनी या घडण्यात योगदान दिले त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता आले.
हा अतिशय आनंदाचा दिवस होता. मी माझ्या वर्गखोलीत माझ्या बाकावर जाऊन बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणित लॅब, विज्ञान लॅब, ग्रंथालय पाहिले. जुन्या-नव्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नव्या कार्यकारिणीची ओळख झाली. मिलिंद भाकरे सरांनी नव्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य कलांचा आस्वाद घेता आला; आणि विद्यार्थी ते मार्गदर्शक पाहुनी म्हणून जाण्याच्या या योगामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणारे एक वर्तुळ पूर्ण झाले.

No comments:

Post a Comment

Featured post

माझी शाळा

  शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे...