Wednesday, 24 December 2025

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

 #मुखपृष्ठ

#कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची.
पण ही फक्त एका व्यक्तीची कथा नाही. ही कहाणी आहे एका आयुष्याची....होरपळत, तावून-सुलाखून, वेदनांतून घडत अखेर स्वतःचं अस्तित्व उजळवून टाकणाऱ्या
एका ताऱ्यासारख्या जीवनप्रवासाची. आणि तितक्याच ठळकपणे, आपण जगत असलेल्या या काळाची… या एराची.
हा असा काळ आहे जिथे काही माणसांची असंवेदनशीलता इतर काही माणसांच्या आयुष्याची वाताहत करतात. ज्या समुदायाचा भारतीय इतिहास सांगतो की ते कधी राजाश्रय प्राप्त होते, आदराने आणि प्रतिष्ठेने.. नवरत्नातील रत्न म्हणून राजमहाली वावरत होते. तोच समुदाय आज उपेक्षित का झाला असेल बरं ? कुठे, कधी आणि कसे आपण समाज म्हणून चुकलो की ज्यांना कधी सन्मान मिळत होता, त्यांना आज दारोदार टाळ्या वाजवत फिरण्याची अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली?
आपल्या नाकारण्याची किंमत या समुदायाला कोणकोणत्या यातनांतून मोजावी लागते, हे जर आपण संवेदनशील नजरेने समजून घेतले, तर खूप काही बदलू शकते... आणि हा बदल दोन्ही बाजूंना समाधान देणारा ठरेल याची खात्रीही वाटते.
#कायांतर या कादंबरीच्या माध्यमातून हे समजून घेणं अधिक सोपं होईल असं प्रामाणिकपणे वाटतं.
माझ्या मनाला खोलवर स्पर्श करून गेलेल्या एका ट्रान्सजेंडर महिलेच्या आयुष्याचा हा लेखाजोखा आहे..पण जसाच्या तसा नाही; तर तिच्यासह या समुदायातील इतर अनेक घटकांचे, त्यांच्या वेगळ्या जगण्याचे, अनुभवांचे, संघर्षांचे आणि जगण्यातल्या सूक्ष्म कंगोऱ्यांचे संवेदनशील चित्रण यात गुंफले आहे.
वास्तववादी आशय असलेली ही चरित्रात्मक कादंबरी
वाचकांच्या मनात स्थान मिळवेल, त्यांना विचार करायला भाग पाडेल आणि कदाचित थोडं अधिक माणूसही बनवेल अशी मनापासून आशा आहे.



''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने...

 समाजात #तृतीयपंथी व्यक्तींविषयी काळानुसार असंख्य #कथा निर्माण होत गेल्या... काही अफवा, काही अर्धसत्य तर काही पूर्वग्रहांनी ग्रसित. या कथांनी त्यांच्या भोवती एक धूसर, अंधुक वलय निर्माण केलं. परंतु त्या धुक्याच्या पलीकडे, जरा जवळून पाहिलं की कळतं; हा समुदाय अतिशय भावनाशील-संवेदनशील आणि माणुसकीच्या नात्यांना मायेने जपणारा आहे. #नव्या_येऊ_घातलेल्या_पुस्तकाच्या_निमित्ताने

भूक भागवण्याचा आणि जिवंत राहण्याच्या संघर्षात अनेक तृतीयपंथीना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते, आयुष्यभर नरकात भोगाव्या इतक्या दुःखयातना भोगाव्या लागतात. हे सगळं फक्त एवढ्यासाठी कारण समाज त्यांना स्वीकारत नाही.. हे किती दुर्दैवी आहे. आज या बाबत दोन्ही बाजूने जागृती होत असली, बदल घडत असला तरी पूर्ण परिवर्तन घडायला अनेक युगे जावी लागणार आहेत. माझं येऊ घातलेलं हे नवं पुस्तक #कायांतर लिहीत असताना, अनेक तृतीयपंथींच्या भेटी घेतल्या आणि मनाला स्पर्शून जाणारे, हृदय पिळवटून टाकतील असे अनुभव ऐकायला मिळाले. ते ऐकताना आपण कुठल्यातरी वेगळ्याच जगाच्या कहाण्या ऐकत आहोत असे वाटू लागते; कारण आपल्या जगात, आपल्या भोवताल सगळं आलबेल असतं; किमान या स्तरावरचा संघर्ष तरी नसतो. इतकं सगळं भोगुनही, आयुष्याला झुंज देणाऱ्या या व्यक्तींच्या डोळ्यांत एक वेगळंच तेज दिसतं, तावून सुलाखून, संघर्षांनी घणाघात घालून पैलू पडलेलं. स्वतःच्या अंगांगावर घाव झेलून सोलून निघालेलं पण तरीही इतरांच्या वेदना ओळखणारं. स्वतःच्या जखमा दडवूनही इतरांच्या दुःखाना आधार देण्याची त्यांची तयारी असते, कसलाही संकोच न बाळगता ते सदैव तत्पर असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून त्यांना वारंवार दूर ठेवण्यात आलं, तरीही संकटाच्या क्षणी त्याच माणसांच्या मदतीसाठी ते पुढे येताना दिसतात; कुठे वाद निर्माण झाला तर तेच शांततेचा दिवा पेटवतात; कुणी अडचणीत सापडलं तर हात धरून सांभाळून उभं करतात. त्यांचं वागणं ही केवळ मदत करण्याची कृती नसते; ती त्यांच्या मनातील खोलवर वाहणाऱ्या मानवतेची प्रकट रूपं असतात. जगाने त्यांच्याभोवती गैरसमजांच्या चौकटी उभ्या उभ्या केल्या, पण त्यांनी माणुसकीतील ऊब कधीच गमावली नाही. उलट, परिस्थिती तापली की तेच शांततेचा शिडकावा करून लोकांना एकत्र आणणारे ठरतात.
यांच्याबाबत अनेक सत्य आहेत. त्यातले काही अनुभव ''कायांतर'' कादंबरीच्या निमित्ताने तुमच्याशी शेअर करावे वाटतात, (या कथा पुस्तकात नाहीत.. पुस्तकात एक वेगळीच अधिक गहिरी सत्यकथा आहे. आता पोस्ट करत असलेल्या कथा केवळ या समुदायांना मानवंदना देण्यासाठी)
२०१५ च्या चेन्नई पुरात संपूर्ण शहर पाण्यात बुडालं होतं. हजारो लोक घरी अडकले होते. वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार, भीती आणि अनिश्चितता वाढत होती. अशा कठीण वेळी मदतीसाठी कोण येईल याचीच शंका आणि धास्ती अनेकांच्या मनात होती.
पण समाजाकडून अनेकदा उपेक्षित ठरवलेला तृतीयपंथी समुदाय मात्र सर्वांत आधी मदतीला पुढे आला होता. प्रत्यक्ष पुराच्या पाण्यात उतरून कित्येकांचे जीव त्यांनी वाचवले होते. स्वतःंच्या छोट्या-छोट्या घरात जागा कमी असताना देखील, अनेक ट्रान्सजेंडर महिलांनी पुरग्रस्तांना आसरा दिला. पाणी, अन्न, कपडे जे काही त्यांच्या हाताशी होतं ते त्यांनी इतरांना वाटून दिलं होतं. काहीजण पावसात भिजत, गुडघाभर पाण्यातून चालत अडकलेल्या कुटुंबांपर्यंत पोहोचले. कुणाच्या हातात औषधं होती, कुणी अन्न घेऊन पोचलं होतं, तर LGBTQ+ समूहांनी एकत्र येऊन, मिळेल तसं साहित्य जमवून पुरग्रस्तांपर्यंत पोचवलं.
या समुदायाला स्वतःलाच राहत छावण्यांमध्ये अनेकदा जागा मिळत नव्हती. तरीही त्यांनी स्वतःच्या अडचणींपेक्षा इतरांच्या संकटाला प्राधान्य दिलं. त्या दिवसांत तृतीयपंथी समुदायाने खऱ्या अर्थाने मानवतेचं काम केलं. भीती आणि गोंधळाच्या काळात त्यांनी दाखवून दिलं, माणसाची ओळख, रूप किंवा नावाने नाही, तर त्याच्या माणूसपणाच्या कर्माने आणि कृतीने केली जाते. त्यांची मदत, त्यांची संवेदनशीलता आणि संकटातही धैर्याने उभं राहण्याची ताकद हे सगळं समाजाने मान्य करायलाच हवं. कारण खऱ्या मानवतेचा अर्थ मोठ्या शब्दांत नसतो, तो अशा लोकांच्या छोट्या पण मनाला भिडणाऱ्या कृतींमध्ये असतो.



तृतीयपंथी समाजाकडे वर्षानुवर्षे एकाच नजरेतून पाहण्याची आपली सवय झाली आहे. पण कधीतरी तो चष्मा बदलून पाहण्याची गरज आहे. कारण या समुदायाकडे शिकण्यासारखं, समजून घेण्यासारखं आणि मनापासून स्वीकारण्यासारखं खूप काही आहे. आपण समाज म्हणून त्यांना नाकारण्यासाठी हजार कारणं सहज शोधतो; त्यांच्या चुका मोठ्या करून पाहतो, पण त्यांच्या चांगुलपणाकडे पाहण्याइतपत थांबत नाही. उलट, त्यांच्या मनातील माणुसकी, त्यांची निस्वार्थ मदत, त्यांचं निरपेक्ष प्रेम याकडे लक्ष दिलं तर त्यांना स्वीकारण्याचीही अनेक कारणं आपल्याला सापडतील. हा दिवस आपण केव्हा मान्य करू, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने माणूस म्हणून मोठे ठरू.


रश्मी पदवाड मदनकर

Tuesday, 23 December 2025

मानवतेचा खरा अर्थ दाखवणारा तृतीयपंथी समुदाय


२०१४ चा काळ होता… २३ ऑक्टोबर 2014. ती दिवाळीची रात्र होती. दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात त्या दिवशी हवा काहीतरी वेगळीच जाणवत होती. सकाळपासूनच गल्लीबोळांत कुजबुज वाढत होती, लहानमोठे वाद ऐकू येऊ लागले. रस्त्यांवर तणावपूर्ण चेहरे फिरत होते. जणू काही अदृश्य ठिणगी हवेत पेट घेण्याचीच वाट पाहत होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला आणि शहरावर अंधार पसरू लागला तशी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. दिल्ली अचानक थरथरली… कुठेतरी दगडफेक झाली, एखाद्या गल्लीत भांडण पेटलं, दुसऱ्या टोकाला जमाव एकत्र येऊ लागला आणि क्षणभरात संपूर्ण परिसरात सांप्रदायिक दंगल उसळली.



लोक धावाधाव करू लागले; दुकाने, कार्यालयांचे दरवाजे झटापट करत बंद करू लागली. कुठे हाका, कुठे किंकाळ्या, काही घरांच्या खिडक्यांमधून रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्या मोबाईलवर अफवा, कुठे भीतीची लाट… हवा धुराने आणि भयाने भरून गेली होती. पोलीस पुरेसे नव्हते, नेते दिसत नव्हते आणि संपूर्ण परिसर तोडाफोडीच्या, जळायच्या मार्गावर उभा होता. जमाव गटागटाने एकमेकांना मारण्याच्या कापून टाकण्याच्या उद्देशाने धावून येत होते. बायका, लहान मुले धास्तावल्या होत्या. या सगळ्या तणावात किती आणि कोणकोण घायाळ होतील कित्येकांचे जीव जातील याची भीती मनामनात साठून राहिली होती.



आणि तेव्हा पुढे आले… समाजाने उपेक्षित, वाळीत टाकलेली, टाकाऊ मानलेली ती माणसे...१५ तृतीयपंथी !
ब्लॉक ३५ च्या कोपऱ्यावरून दगड आणि शस्त्र घेऊन पुढे येणारा एक जमाव दिसताच, लोक घाबरून पळू लागली. आसपासच्या परिसरात माणसे घराची दारं बंद करू लागले. बाहेर उघड्यावर असणाऱ्या माणसांचे आता काही खरे नाही असे वाटत असतानाही, त्या वेळी १५ तृतीयपंथी बहिणी मात्र पळून गेल्या नाहीत.
नाही.
त्या उलट त्या रौद्र जमावासमोर जाऊन ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हात वर करत शांततेची विनंती केली, रागाने पेटलेल्या जमावाशी संवाद साधला. त्यांच्या शब्दांना मान मिळतो की नाही हा प्रश्न नव्हता, त्या क्षणी काहीही करून त्यांना फक्त रक्तपात थांबवायचा होता, माणसे वाचवायची होती. परिसर शांत करायचा होता, लोकांना सुरक्षित ठेवायचं होतं.
त्यांची नेता किन्नर लैला शाह (35) मोठ्या आवाजात म्हणाली: “भांडणानं कुणाचं घर वाचणार नाही… परत फिरा! शांतता ठेवा!” त्यांचा आवाज प्रामाणिक होता, धाडसी होता. त्या आवाजात काळजीपूर्ण दरारा होता. डोळ्यात धगधगती आग होती, निश्चय होता; कदाचित म्हणूनच जमावाची पाऊलं तिथेच थांबली.
त्या भयंकर रात्रीत त्यांनी एक आशेचा दिवा सुलगावला होता.. त्या रात्री त्यांनी काही घरांत घुसून दडून बसलेल्या भीतीने धास्तावलेल्या महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. रडणाऱ्या मुलांना सांभाळलं. दोन्ही समुदायातील लोकांशी संवाद साधून गैरसमज कमी केले. गल्लीबोळात उभं राहून तणाव कमी होईपर्यंत जागरण केलं. आजही दिल्लीचे लोक म्हणतात की त्या १५ बहिणी त्या दिवशी नसत्या तर तो परिसर अनेक दिवस जळत राहिला असता.

ही केवळ एक धाडसाची गोष्ट नाही ही मानवतेची कहाणी आहे.. ज्यांना समाज धुडकावून लावतो, लोकांच्या लेखी ज्यांची किंमत शून्य आहे, ज्यांचा उल्लेख देखील कित्येकांना आजही अपमानास्पद वाटतो. त्याच लोकांनी त्या दिवशी दिल्ली वाचवण्यासाठी सर्वांत मोठी भूमिका निभावली होती. ज्यांच्या शेजारी उभे राहणेही लोक टाळतात, ज्यांना तुच्छतेची वागणूक देतात त्याच तृतीयपंथींनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता, हजारो लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली.
त्यांनी सिद्ध केलं "माणुसकीच्या मार्गाने चालण्यासाठी माणसांनी निर्माण केलेल्या चौकटीत जन्म नसला तरी; मानवता लिंगावर अवलंबून नसते... तर माणुसकी निभवायला जे हृदय लागते ते हृदय त्यांच्याकडे आहे... अतूट, निर्भय, नि:स्वार्थ.''
पण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येतं ? अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....
“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,
हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”
या ओळी ज्या वेदना दिसतात, त्या आजही आपल्या समाजातील तृतीयपंथी समुदायाच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात. समाजाकडून सतत वंचना, गैरसमज आणि उपेक्षा कित्येकदा तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केला जाणारा अन्याय सहन करूनही, फक्त “माणूस” म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्यांची अविरत झुंज चालू असते. पण या सर्व अडचणी संघर्ष झेलत जगतानाही तेच अनेकदा माणुसकीचे सर्वात मोठे उदाहरण बनून समोर येतात, त्याच समाजासाठी धावून येतात. त्यांच्या प्रयत्नांची दखल म्हणून त्यांना पुरस्कारांची अपेक्षा नसते.. फक्त दोन प्रेमाचे, आदराचे शब्दही त्यांना पुरे असतात. पण आपलीच झोळी अनेकदा इतकी फाटकी असते की इतके साधे शब्दही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धजावत नाही..
माझ्या नव्या येऊ घातलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यांच्या या अविरत संघर्षाला आणि मानवी मूल्यांना शब्दरूपातील विनम्र मानवंदना अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न…


रश्मी पदवाड मदनकर

Wednesday, 3 December 2025

From wheels to wings ...

 From wheels to wings .... A symbol of freedom beyond limitations; the iconic wheelchair grave in Salt Lake, America.

काहीतरी वाचत शोधत राहिलं की काहीतरी सापडत राहतं... कधी मनाला भावणारं, तर कधी बुद्धीला खाद्य देणारं. असच काहीतरी सापडलं आणि शेअर करावं वाटलं. प्रेमाला कुठलीच मर्यादा नसते म्हणतात, आणि ते प्रेम अपत्याबद्दल असेल तर ते मर्यादेच्याही पलीकडे कितीतरी व्यापक होऊन बसतं. परवा एका वेगळ्या कारणासाठी काही संदर्भ शोधत होते... तेव्हा एक व्हिडिओ पाहण्यात आला; त्यात अतिशय सुंदर स्मारक शिळा नजरेस पडली. खूप आकर्षित केले त्या मूर्तीने. संपूर्ण स्मशानभूमीत ते एकमेव थडगे किंवा स्मारक (Grave) होते.. जे लक्ष आकर्षित करत होते. आपल्या प्रिय मुलाच्या मृत्यूनंतर त्या वडिलांनी ज्या भावनेने ते बनवले होते तेही विशेष आहे. ते थडगे आहे मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसन याचे. ते पाहून माहिती काढल्यावाचून राहवले नाही.



मॅथ्यू स्टॅनफर्ड रोबिसनचा जन्म २३ सप्टेंबर १९८८ मध्ये झाला होता, जन्मतःच गंभीर आणि कधीही बरे न होणारे अपंगत्व घेऊन तो जन्माला आला.. तो जन्मापासूनच अंध आणि पंगु होता. जन्मानंतर तो काही तासच जिवंत राहील, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता; परंतु तो जवळपास ११ वर्षे धैर्याने आयुष्य जगला. या काळात त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासोबत जगलेल्या एकेक क्षणाचे महत्त्व समजून ते क्षण जतन केले आणि त्याच्या मृत्यूनंतर देखील त्यांनी त्याच्या स्मृतींना अमरत्व देण्यासाठी असे रूप दिले कि ते आजही प्रत्येक पाहणाऱ्याला भावुक करून जातं.

मॅथ्यू १० वर्ष जगला पण पूर्णकाळ व्हीलचेअरवर बसून.. त्याची अनेक स्वप्ने होती जी त्याला कधीच पूर्ण करता आली नाहीत. कारण तो बंधनात होता... बंधन शरीराचं, वेदनेचं, अपंगत्वाचं. त्याचे आई-वडील त्याला फार जपत असले तरी त्याचा मृत्यू मात्र अटळ होता; आणि खरतर हा मृत्यूचं त्याची सुटका करू शकणार होता. या अपंग शरीरापासून, ते देत असलेल्या दुःखापासून आणि त्या व्हीलचेअरपासून मृत्यूचं त्याला स्वतंत्र करू शकणार होता. अखेर तो दिवस उगवला. १९९९ मध्ये मॅथ्यूच्या निधनानंतर, त्यांचे वडील अर्नेस्ट रोबिसन आणि चुलत बहीण सूझन कॉर्निश यांनी मॅथ्यूच्या स्मरणार्थ अत्यंत हृदयस्पर्शी असे एक शिल्प तयार केले. या शिल्पामध्ये मॅथ्यू आपल्या व्हीलचेअरवरून उडत स्वर्गाकडे झेपावत असल्याचे दिसते. सॉल्ट लेक सिटी स्मशानभूमी येथे उभारलेले हे स्मारक दिव्यांगच काय प्रत्येक पाहणाऱ्या व्यक्तींकरिता आकर्षणाचा, प्रेरणेचा स्रोत आहे. मॅथ्यूच्या पालकांनी १९९३ मध्ये 'ऍबिलिटी फाउंडेशन' ची देखील स्थापना केली. या संस्थेमार्फत गरजू लोकांना सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. त्यांच्या संकेतस्थळावर मॅथ्यूच्या स्मारकाची प्रतिकृती व इतर स्मरणिकाही विक्रीस उपलब्ध आहेत.


गम्मत

 NBT च्या राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात झालेल्या मुलाखतीत विशाखाने एक प्रश्न विचारला... 

“तुम्हाला लिखाणासाठी प्रेरित करणारा एखादा गमतीशीर किस्सा सांगा ना. काहीतरी मजेशीर घडले असेल, ज्यातून काहीतरी लेखणीत उतरले असेल?”

असा प्रश्न आला की खरतर मीच गोंधळते. कारण मी लिहिते ते बहुतांश गंभीर, वास्तविकतेत घडलेल्या घटनांमधून, आणि त्या अनुभवांतून मनात निर्माण झालेल्या उद्विग्नतेतून व कोलाहलातून जन्माला आलेलं असतं. माझ्या लिखाणाचा संबंध हा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून केलेल्या कामाशी, अभ्यासाशी आणि संवादांशी आहे. त्यामुळे त्या लिखाणामागे गमतीदार किस्सा असण्याची शक्यता फारच कमी. उलटपक्षी गंभीर घटना अधिक असतात. 

गम्मत असेल तर ती लिहिण्यानंतर किंवा लिखाणाच्या प्रक्रियेदरम्यान घडणाऱ्या प्रसंगांत असते. संवेदनशील विषयांवर लिहिल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जी गम्मत असते, किंवा गंभीर मुद्द्यांबाबत लोकांच्या उथळ समजुतींशी सामना झाला की जी विडंबनात्मक मजा जाणवते तीच खरी मजेशीर असते. एकाच व्यक्तीत दिसणारे दोन विरुद्ध चेहरे, दोन विरोधी विचार… हे पाहताना मात्र मला खरी गंमत वाटते.

अशा अनेक “गंभीर गमतीजमती” सतत माझ्यासोबत घडत असतात, आणि त्यांची उदाहरणे सांगताना नेहमीच हशा पिकतो. एरवी सतत मिश्किली, विनोद, मस्ती करणाऱ्या माझ्याकडे लिहिण्यासाठी प्रेरणादायी असा अगदीच गमतीदार एकही किस्सा नाही, याचे आश्चर्य मात्र श्रोत्यांसह मला स्वतःलाही वाटत राहते. हीही एक गंमतच तर आहे 😀😀

वाईब्ज -


एक मराठी चित्रपट येऊन गेलाय ''अगंबाई, अरेच्चा'' या चित्रपटातल्या नायकाला स्त्रियांच्या मनातल्या गोष्टी ऐकायला येत असे. बरेचदा हे असे काहीतरी विचित्र माझ्याबाबत घडतं असं मला नेहमी फार स्ट्रॉन्गली वाटतं. म्हणजे माझ्या अवतीभोवती असणाऱ्या माणसांचे वाईब्ज माझ्यापर्यंत फार थेट आणि  प्रखरपणे पोचतात आणि ते फार स्पष्ट मला जाणवतात. म्हणजे पुढला व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करतो, वरवर काहीही दाखवत असला तरी मनात काय भावना काय विचार बाळगतो.. समोर हसून बोलणारा आपल्या मागे गेल्यावर काय बरळतो ते आपोआप माझ्यापर्यंत पोचतं. याचे अनेक उदाहरण आहेत.. आश्चर्यात पाडणारे, अचंभित करून सोडणारे अनुभव आले आहेत. म्हणतात ना ''Actions can be seen, but vibes are felt; and what is felt stays longer than what is seen.'' म्हणजे एखाद्या नात्यात-मैत्रीत फार चांगलं चाललेलं असतं.. एखाद्या काळात त्या नात्यात काहीतरी जाणवायला लागतं. इथे आपल्याबाबतीत काहीतरी चांगलं नाहीये, काहीतरी चुकीचं घडत असल्याचा आभास होतो. पुढला मात्र सगळं आलबेल असल्याचा दिखावा करण्यात अधिक चांगला वागू लागतो.. काळ पुढे सरकतो तसतशा गोष्टी स्पष्ट होऊ लागतात आणि एकदिवस समोरच्या माणसाचा मुखवटा उतरतो. त्याने आपल्याबाबत काहीतरी फार वाईट करण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्यासाठी भरपूर वेळ घेतलेला असतो आणि हा तोच काळ असतो ज्यावेळी आपल्याला ते वाईब्ज जाणवले होते. संकेत मिळाले होते. बरेचदा तर मी समोरच्याला हे सांगितलेही आहे की मला तुमच्याकडून चांगले वाईब्ज येत नाहीयेत. पुढला ते गमतीत घेतो; पण मी बरोबरच होते हे काळ सिद्ध करतो. बरेचदा अनेक लोकांपासून दूर होण्याचे हे एक कारण ठरते. म्हणतात ना, ज्या गोष्टी तुम्हाला दिसत नाहीत त्या गोष्टी तुमचा देव (निसर्ग, ब्रह्मांड, सुपर पावर काहीही म्हणा) पाहत असतो आणि म्हणून तो तुम्हाला तुमच्यासाठी योग्य नसणाऱ्या काही माणसांपासून दूर करतो. हे असेच अगदी या उलटही. जी माणसे खरोखर आपल्या बाबतीत प्रामाणिक भावना बाळगून असतात. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठलाही भेद नसतो. जे आतबाहेरून एकसमान असतात आणि खरोखर आपल्यावर मनापासून प्रेम करत असतात त्यांचे हेतू खूप शुद्ध असतात; अश्यांचे ते शुद्ध, प्रामाणिक, प्रेमाचे वाईब्ज आपल्यापर्यंत थेट येतात आणि आतवर पोचत असतात आणि म्हणून त्या माणसांबद्दल अधिक आदर, प्रेम आणि ओढ वाढत जात असते. त्यांची मैत्री त्यांचा सहवास हवाहवा वाटत असतो. अशी मैत्री कधीच कुठल्याच कारणाने दुरावू शकत नाही.. दुरावण्याचे एकच कारण असू शकते ते म्हणजे अंर्तमनातले खरेखुरे भाव बदलेल तेव्हा, त्यात नकारात्मक भाव निर्माण होतील तेव्हा ते पुढ्ल्यापर्यंतही आपोआप पोचतील हे निश्चित. Sometimes a silent vibe reveals more truth than a thousand spoken words or actions.

शेवटी सगळं वाइब्जवरच येऊन ठरतं.
तुम्ही कितीही चांगलं बोललात, हसलात, वागलात – पण जर मनात राग, मत्सर, स्वार्थ किंवा कपट असेल, तर ते लपवताच येत नाही. शब्दांनी पडदा टाकता येतो, पण ऊर्जा आणि भावनांचं सत्य नेहमी प्रकट होतंच.म्हणून कदाचित, नाती जपताना शब्दांपेक्षा भावना शुद्ध ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण माणसांच्या आठवणीत तुमचं रूप, तुमचे कपडे, तुमची आर्थिक स्थिती नाही तर तुमच्या वाइब्ज राहतात...तुम्ही त्यांना कशी जाणीव करून दिली ते. Vibes are the soul’s language; they whisper what actions cannot explain. जिथे चांगले वाइब्ज मिळतात, तिथे मन शांत होतं जिथे नकारात्मक वाइब्ज असतात, तिथे मन नकळत दूर जायला लागतं. खरं तर, हे वाइब्ज म्हणजे विश्वाचा तुमच्याशी बोलण्याचा एक मार्गच आहे. फक्त आपण त्याला ऐकायचं आणि मानायचं, कोणाला जवळ करायचं आणि कोणाला हळूच सोडून द्यायचं हे वाइब्ज हा निसर्गाचा संकेतच देत असतो..जे काळानुरूप अकळतात.. आणि जे झाले ते योग्यच होते हा विश्वास पटायला लागतो.  







Featured post

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्...