Tuesday, 23 December 2025

मानवतेचा खरा अर्थ दाखवणारा तृतीयपंथी समुदाय


२०१४ चा काळ होता… २३ ऑक्टोबर 2014. ती दिवाळीची रात्र होती. दिल्लीच्या त्रिलोकपुरी परिसरात त्या दिवशी हवा काहीतरी वेगळीच जाणवत होती. सकाळपासूनच गल्लीबोळांत कुजबुज वाढत होती, लहानमोठे वाद ऐकू येऊ लागले. रस्त्यांवर तणावपूर्ण चेहरे फिरत होते. जणू काही अदृश्य ठिणगी हवेत पेट घेण्याचीच वाट पाहत होती. संध्याकाळी सूर्य मावळायला लागला आणि शहरावर अंधार पसरू लागला तशी परिस्थिती अचानक हाताबाहेर गेली. दिल्ली अचानक थरथरली… कुठेतरी दगडफेक झाली, एखाद्या गल्लीत भांडण पेटलं, दुसऱ्या टोकाला जमाव एकत्र येऊ लागला आणि क्षणभरात संपूर्ण परिसरात सांप्रदायिक दंगल उसळली.



लोक धावाधाव करू लागले; दुकाने, कार्यालयांचे दरवाजे झटापट करत बंद करू लागली. कुठे हाका, कुठे किंकाळ्या, काही घरांच्या खिडक्यांमधून रडणाऱ्या स्त्रियांचे आवाज ऐकू येत होते. कुणाच्या मोबाईलवर अफवा, कुठे भीतीची लाट… हवा धुराने आणि भयाने भरून गेली होती. पोलीस पुरेसे नव्हते, नेते दिसत नव्हते आणि संपूर्ण परिसर तोडाफोडीच्या, जळायच्या मार्गावर उभा होता. जमाव गटागटाने एकमेकांना मारण्याच्या कापून टाकण्याच्या उद्देशाने धावून येत होते. बायका, लहान मुले धास्तावल्या होत्या. या सगळ्या तणावात किती आणि कोणकोण घायाळ होतील कित्येकांचे जीव जातील याची भीती मनामनात साठून राहिली होती.



आणि तेव्हा पुढे आले… समाजाने उपेक्षित, वाळीत टाकलेली, टाकाऊ मानलेली ती माणसे...१५ तृतीयपंथी !
ब्लॉक ३५ च्या कोपऱ्यावरून दगड आणि शस्त्र घेऊन पुढे येणारा एक जमाव दिसताच, लोक घाबरून पळू लागली. आसपासच्या परिसरात माणसे घराची दारं बंद करू लागले. बाहेर उघड्यावर असणाऱ्या माणसांचे आता काही खरे नाही असे वाटत असतानाही, त्या वेळी १५ तृतीयपंथी बहिणी मात्र पळून गेल्या नाहीत.
नाही.
त्या उलट त्या रौद्र जमावासमोर जाऊन ठामपणे उभ्या राहिल्या. त्यांनी हात वर करत शांततेची विनंती केली, रागाने पेटलेल्या जमावाशी संवाद साधला. त्यांच्या शब्दांना मान मिळतो की नाही हा प्रश्न नव्हता, त्या क्षणी काहीही करून त्यांना फक्त रक्तपात थांबवायचा होता, माणसे वाचवायची होती. परिसर शांत करायचा होता, लोकांना सुरक्षित ठेवायचं होतं.
त्यांची नेता किन्नर लैला शाह (35) मोठ्या आवाजात म्हणाली: “भांडणानं कुणाचं घर वाचणार नाही… परत फिरा! शांतता ठेवा!” त्यांचा आवाज प्रामाणिक होता, धाडसी होता. त्या आवाजात काळजीपूर्ण दरारा होता. डोळ्यात धगधगती आग होती, निश्चय होता; कदाचित म्हणूनच जमावाची पाऊलं तिथेच थांबली.
त्या भयंकर रात्रीत त्यांनी एक आशेचा दिवा सुलगावला होता.. त्या रात्री त्यांनी काही घरांत घुसून दडून बसलेल्या भीतीने धास्तावलेल्या महिलांना सुरक्षित बाहेर काढलं. रडणाऱ्या मुलांना सांभाळलं. दोन्ही समुदायातील लोकांशी संवाद साधून गैरसमज कमी केले. गल्लीबोळात उभं राहून तणाव कमी होईपर्यंत जागरण केलं. आजही दिल्लीचे लोक म्हणतात की त्या १५ बहिणी त्या दिवशी नसत्या तर तो परिसर अनेक दिवस जळत राहिला असता.

ही केवळ एक धाडसाची गोष्ट नाही ही मानवतेची कहाणी आहे.. ज्यांना समाज धुडकावून लावतो, लोकांच्या लेखी ज्यांची किंमत शून्य आहे, ज्यांचा उल्लेख देखील कित्येकांना आजही अपमानास्पद वाटतो. त्याच लोकांनी त्या दिवशी दिल्ली वाचवण्यासाठी सर्वांत मोठी भूमिका निभावली होती. ज्यांच्या शेजारी उभे राहणेही लोक टाळतात, ज्यांना तुच्छतेची वागणूक देतात त्याच तृतीयपंथींनी स्वतःच्या सुरक्षेचा विचार न करता, हजारो लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली.
त्यांनी सिद्ध केलं "माणुसकीच्या मार्गाने चालण्यासाठी माणसांनी निर्माण केलेल्या चौकटीत जन्म नसला तरी; मानवता लिंगावर अवलंबून नसते... तर माणुसकी निभवायला जे हृदय लागते ते हृदय त्यांच्याकडे आहे... अतूट, निर्भय, नि:स्वार्थ.''
पण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाट्याला काय येतं ? अशावेळी फ़िराक़ गोरखपुरी यांचे शब्द आठवतात....
“हर ज़ोर-ए-ज़माने का सहा हमने बड़ी मुश्किल से,
हम लोग मगर आदमी कहलाए बड़ी मुश्किल से…”
या ओळी ज्या वेदना दिसतात, त्या आजही आपल्या समाजातील तृतीयपंथी समुदायाच्या संघर्षांना तंतोतंत लागू पडतात. समाजाकडून सतत वंचना, गैरसमज आणि उपेक्षा कित्येकदा तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केला जाणारा अन्याय सहन करूनही, फक्त “माणूस” म्हणून ओळख मिळवण्यासाठी त्यांची अविरत झुंज चालू असते. पण या सर्व अडचणी संघर्ष झेलत जगतानाही तेच अनेकदा माणुसकीचे सर्वात मोठे उदाहरण बनून समोर येतात, त्याच समाजासाठी धावून येतात. त्यांच्या प्रयत्नांची दखल म्हणून त्यांना पुरस्कारांची अपेक्षा नसते.. फक्त दोन प्रेमाचे, आदराचे शब्दही त्यांना पुरे असतात. पण आपलीच झोळी अनेकदा इतकी फाटकी असते की इतके साधे शब्दही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धजावत नाही..
माझ्या नव्या येऊ घातलेल्या पुस्तकाच्या निमित्ताने, त्यांच्या या अविरत संघर्षाला आणि मानवी मूल्यांना शब्दरूपातील विनम्र मानवंदना अर्पण करण्याचा हा छोटासा प्रयत्न…


रश्मी पदवाड मदनकर

No comments:

Post a Comment

Featured post

एका ‘T’ची कहाणी - कायांतर

  #मुखपृष्ठ #कायांतर ही केवळ एक कादंबरी नाही; ती आहे एका ‘T’ची कहाणी...LGBTQAI++ समुदायातील ‘T’, म्हणजेच ट्रान्सजेंडरची. पण ही फक्त एका व्...