Monday, 18 August 2025

 एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते

आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे परत येतं, याउलट असेही की जे जे मिळवलेलं असतं...स्वतःच्या कष्टाने, कर्माने किंवा ओरबाडून देखील; ते कधीतरी कुठेतरी कोणत्यातरी रूपात तुम्हाला परत करावं लागतं. त्याच व्यक्तीला करावं लागेल असंही नाही; पण ते परतावं लागतं हे निश्चित. कर्माचा सिद्धांत म्हणा किंवा जगण्याचे नियम. आयुष्य जसजसं पुढं जात राहतं आणि जाणीवा प्रखर होतात तसतसे हे अनुभव अधिकच ठळकपणे प्रखर स्वरूपात जाणवायला लागतात.
हल्ली मला एक गोड आठवण सतत येत असते, माझा मुलगा ओम आठ महिन्यांचा असताना आम्ही नागपूरहून मुंबईला शिफ्ट झालो आणि तो दोन अडीच वर्षांचा असताना मी मुंबईत जॉब जॉईन केला होता. माझ्या सिनिअर असणाऱ्या मॅडमचा या अडीच वर्षांच्या ओमवर फार जीव जडला होता. त्याचे त्या लाड पुरवायच्या, फोनवर त्याच्याशी बोलत बसायच्या. त्या कुठेही बाहेर गेल्या की त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायच्या. कधी गिफ्ट्स कधी खाऊ. हा सिलसिला काही वर्षे निरंतर चालू होता. त्यावेळी त्यांचा मुलगा टीनेज होता. आता माझा मुलगा टिनेज आहे. माझ्याकडे एक मदतनीस आहे जिचा मुलगा ५ वर्षांचा आहे, नाव आहे जय. सध्या आम्हा दोघांचं छान सूत जुळलं आहे. त्याला त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या असतात. अभ्यासातलं यश शेअर करायचं असतं ... आणि त्याबदल्यात हक्कानं काय हवं ते मागून घ्यायचं असतं. माझ्या सांगण्यावर तो मोबाईल सोडून पुस्तकं वाचत बसतो, तेवढ्यासाठी मी त्याच्यासाठी छानछान चित्र असणारी पुस्तकं शोधात असते. तो चित्रही काढतो. फार लांब गप्पा चालतात आमच्या. सध्या त्याला लग्न करायचं आहे म्हणतो; त्यासाठी मुलगी पाहायला सांगितले आहे. फार गम्मत येते या विषयावर.. लग्न का तर लग्नात छान छान कपडे घालायला मिळतात आणि खूप सारे पदार्थ खाता येतात म्हणून. पण लग्न केले की नोकरी करून मुलीला, घराला सांभाळावे लागते असे त्याला सांगितल्यावर ''मैं जल्दी जल्दी पढाई खतम करके, जल्दी ही नोकरी कर लुंगा, लेकिन आप लडकी धुंडो'' असे तो सांगतो. त्याला समजावतानाच खळखळून हसूनही घेतो. सुट्टीच्या दिवशी तो त्याच्या आईसोबत घरी आलेला असला की आमच्या गप्पा अशा रंगात येतात. ''इस बार मैं क्लास का मॉनिटर बनूंगा फिर आप मुझे लकडी कि बॅट लेकर देना... मेरे पास बॉल है'' असे हक्काने सांगणे असते. त्याला पक्का प्रॉमिस म्हंटले की तो खरोखर मॉनिटर बनून दाखवतो आणि आम्ही त्याच्यासाठी छान बॅट जी आधीच आणून ठेवलेली असते ती मस्ती करत देतो... कधी चांगले मार्क आणले म्हणून गिफ्ट, कधी चीज सँडविच आवडतं म्हणून ते बनवून दिले की मग त्या चिमण्याच्या चेहेऱ्यावर दिसणारा आनंद अवर्णनीय-अविस्मरणीय असतो. या आठवणी आहेत.. जय उद्या मोठा होईल या गमती संपतील कदाचित, उद्या तो असा नियमित येईल न येईल; पण या आठवणी कायम स्मरणात राहणार आहेत.. त्याच्याही आणि आमच्याही. त्याला मोठे होताना पाहण्यात आनंद आहे. अगदी अगदी तसाच जसा कधीतरी मुंबईतल्या मॅडमला माझ्या लेकासाठी असे क्षण जगताना होत असे. आनंदाचे असे हे देणेघेणे वेगवेगळ्या माध्यमातून अखंड चालू राहावे. आनंद घेता घेता आनंद देणाऱ्याचे हात होत राहावे...



Thursday, 22 May 2025

रागातून जागृतीकडे : आधुनिक स्त्रीचा आत्मभानाचा प्रवास !



परंपरेनं स्त्रियांकडे नेहमीच नियमपालक, चारित्र्यसंपन्न आणि सामाजिक चौकटीत वावरणाऱ्या व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं आहे. स्त्रियांबाबत त्यांच्यातील सहनशीलता, त्याग आणि समर्पण या गुणांचंच पूजन करण्यात आलं. मात्र, गेल्या काही दशकांत हे चित्र बदलताना दिसत आहे. गुन्हेगारी क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग वाढतो आहे, आणि ही बाब केवळ जागतिक पातळीवरच नव्हे, तर भारतातही प्रकर्षाने जाणवते आहे. अलीकडच्या काळात महिलांद्वारे केलेल्या गुन्ह्यांच्या बातम्या सतत चर्चेचा विषय ठरत आहेत. वृत्तपत्रांपासून ते टीव्ही आणि सोशल मीडियापर्यंत अशा घटना सतत झळकत राहतात; जणू त्या नव्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब आहेत.

गेल्या वर्षातही अनेक धक्कादायक घटनांनी समाजाला हादरवून टाकलं आहे. काही स्त्रियांनी आई असून आपल्या मुलांचाच जीव घेतला; तर काहींनी जोडीदाराला किंवा कुटुंबीयांना क्रूरतेनं ठार केलं. जेथे प्रेम, सान्निध्य आणि विश्वास असायला हवा, तिथेच छळ, हिंसा आणि मृत्यू घडताना आपण पाहिले. हे पाहून अंतर्मन अस्वस्थ होतं. या घटनांचा मागोवा घेताना, एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो... अशा गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होण्यामागचं, वाढीला लागण्याचं कारण काय आहे? हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो सामाजिक, मानसिक आणि भावनिक घटकांशी संबंधित आहे. कदाचित वर्षानुवर्षे दडपलेला राग, अन्याय, भावनिक ताणतणाव, किंवा सामाजिक अपेक्षांचं दडपण या सगळ्यांचा स्फोट अशा स्वरूपात होत असेल का ? या प्रश्नांवर केवळ चर्चाच नव्हे, तर सखोल विचार, समाजशास्त्रीय विश्लेषण आणि मानसशास्त्रीय समज आवश्यक आहे. कारण ही फक्त गुन्हेगारी नव्हे; तर ही बदलत्या समाजाच्या वेदनेचा प्रारंभ तर नसेल अशी चिंता वाटू लागली आहे.


विकसनशील सामाजिक भूमिका, वाढते स्थलांतर, व्यवसायांमधील परिवर्तन, महिला मुक्तीची चळवळ, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वायत्तता; या सगळ्यांमुळे आजच्या काळातील स्त्रियांना विविध क्षेत्रांत सहभागी होण्याच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. संधी मिळाल्या की आत्मविश्वास वाढतो, आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण झालेली व्यक्ती नव्या दिशांकडे आकर्षित होते. मात्र या आकर्षणाला एक वेगळीही दिशा मिळत आहे; काही स्त्रिया गुन्हेगारीच्या वाटेवर वळताना दिसत आहेत. एकेकाळी केवळ पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या गुन्हेगारी जगतात आता महिलांची संख्याही वाढताना दिसतेय. ही वाढ इतकी स्पष्ट आहे की, तिच्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. महिलांकडून होत असलेले गुन्हे आता फक्त किरकोळ स्वरूपाचे उरलेले नाहीत. त्या अनेक गंभीर, हिंसक आणि अप्रचलित गुन्ह्यांमध्येही सक्रिय सहभागी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे गुन्ह्यांचा स्वरूप अधिक व्यापक आणि धोकादायक होत चालले आहे.

मग प्रश्न उभा राहतो की, महिलांमध्ये अचानक गुन्हे करण्याची उर्मी का वाढते आहे? हा संताप कुठून निर्माण होतो आहे? हे फक्त सामाजिक बदलांचे परिणाम आहेत की वर्षानुवर्षे साचलेल्या असंतोषाचा उद्रेक? की स्वातंत्र्याचा अर्थ चुकीचे समजण्याची लक्षणं? या प्रश्नांवर विचार होणे आणि त्याचे सखोल विश्लेषण होणे आज अत्यावश्यक झाले आहे.

महिलांचा राग आणि संताप हे काही अलीकडील घटक नाहीत. इतिहास, पुराणकथा आणि लोककथांमध्ये या भावना वारंवार उमटताना आपल्याला दिसतात. परंतु, अलीकडच्या काळात या भावना अधिक स्पष्ट, ठाम आणि प्रखर स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. समाजमाध्यमे आणि विविध सार्वजनिक मंचांवर, विशेषतः अवहेलनेच्या आणि अश्लीलतेच्या छटांनी युक्त भाषेत, हा राग अधिक ठळकपणे समोर येतो. अनेकदा हा संताप अपरिपक्व, भावनाशून्य आणि बेपर्वा वाटतो. परंतु, हे दुर्लक्ष करता येणार नाही की अनेक पिढ्यांपासून स्त्रियांमध्ये साठून राहिलेला, दाबलेला राग आता उफाळून येत आहे.

पूर्वी महिलांचा राग मुख्यतः साहित्य, सिनेमा किंवा नाट्यरूपांमधूनच व्यक्त होत असे. वास्तविक जीवनात त्याला फारसे स्थान नव्हते. त्याची दखल घेतली जात नव्हती, स्वीकार केला जात नव्हता. त्यामुळे हा दाबलेला संताप आता समाजमाध्यमांच्या मंचांवर अधिक तीव्र आणि आक्रमक रूपात व्यक्त होत आहे. त्यास तिथे एक प्रकारची अनुमती, संमती आणि सहानुभूती मिळत असल्याने, तो अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवते. मनोविज्ञानतज्ज्ञांचे मत आहे की, स्त्रिया अनेक पिढ्यांपासून अंतर्मनात रागाचे ओझे बाळगत जगत आहेत. दैनंदिन जीवनातील अन्याय, भेदभाव आणि अपमान यांच्या विरोधातील त्यांचा संताप आज चित्रपट, समाजमाध्यमांवरील रील्स, संगीत, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीच्या विविध माध्यमांतून ठळकपणे प्रकट होत आहे. तथापि, प्रत्यक्ष जीवनात या रागाला समाजाकडून आवश्यक ती मान्यता, समजून घेणे आणि गांभीर्याने विचार करणे याचा अभाव जाणवतो. या भावनांवर सखोल मंथन होऊन, त्या समजून घेत योग्य उपाययोजना केल्या जात नाहीत हीच यातली खरी शोकांतिका आहे.

या पार्श्वभूमीवर काही मूलभूत प्रश्न समोर येतात —
समाज या भावना समजून घेईल का?
या रागाला योग्य दिशा देण्याची संधी स्त्रियांना मिळेल का?
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा आवाज केवळ अभिव्यक्त होण्यापुरताच मर्यादित राहील, की परिवर्तन घडवण्यासाठी आधार बनेल?


आपल्या समाजाची एक मोठी समस्या अशी आहे की, मोकळेपणाने बोलणारी, खळखळून हसणारी, आनंदी राहणारी स्त्री समाजाला खटकते. स्त्रियांनी अल्पभाषी राहावे, नम्र, संयमी वर्तन करावे हे ‘बाळकडू’ तिला लहानपणापासूनच दिले जाते. उघडपणे हसणारी, स्पष्ट बोलणारी स्त्री सहजपणे चरित्रहीन ठरवली जाते. मुलगी जन्मल्यापासून तिच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रिया तिने दबलेल्या, पिचलेल्या, कुचंबणा झालेल्या अवस्थेत जगताना तिला दिसतात. अशा वातावरणात तिच्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांचा निचरा होण्यासाठी कोणीही नसते; न व्यक्त होण्यासाठी माणसं, न समजून घेणारा समाज. आणि हे चक्र पिढ्यानपिढ्या सुरूच राहिलं आहे. राग हा भाव नेहमी एखाद्या गोष्टीच्या रक्षणाशी जोडलेला असतो. पण समाजाने हा रक्षणाचा अधिकार, हा संताप व्यक्त करण्याचा हक्क आजपर्यंत फक्त पुरुषांसाठी राखून ठेवला होता. स्त्रियांनी राग व्यक्त केला, तर तो "अस्वीकार्य" मानला गेला. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र हळूहळू बदलू लागले आहे. स्त्रियांच्या हातात आता सोशल मिडिया, साहित्य, कला यासारखी प्रभावी माध्यमं आली आहेत. या माध्यमांतून त्यांच्या मनात वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत ... कधी सौम्य, तर कधी प्रखर उद्रेकाच्या रूपाने. हा बदल केवळ अभिव्यक्तीपुरता मर्यादित न राहता, समाजाला स्त्रियांच्या अनुभवांकडे नव्या दृष्टीने पाहायला लावेल, अशी अपेक्षा आहे.

स्त्रियांचा राग हा एक अत्यंत वैयक्तिक अनुभव असला तरी, सध्याच्या काळात तो सामूहिक अनुभव देखील बनत चालला आहे. सामाजिक प्लॅटफॉर्मवरून म्हणा किंवा अभिव्यक्त होण्याच्या उर्मीतून आता स्त्रिया स्वतः एकमेकींशी ते शेअर करताना दिसतात. पूर्वी ज्या रागासाठी लाज वाटायची, त्याच रागासाठी आता एकजूट होऊन समर्थन तयार होत आहे. महिलांमध्ये एक नव्या प्रकारची जागरूकता आणि एकात्मता दिसून येत आहे, जिचामुळे त्यांच्या रागाची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची व स्वीकार करण्याची त्यांना आपसूकच परवानगी मिळत आहे.

ब्रिटिश गायिका आणि गीतकार पालोमा फेथ यांचं गाणं "लेबर" सध्या अत्यंत लोकप्रिय झालं आहे. या गाण्यात स्त्रियांच्या संतापाची तीव्र आणि थेट अभिव्यक्ती आहे. सुमारे ३५,००० रील्समध्ये या गाण्याचा साउंडट्रॅक वापरण्यात आला आहे. हे गाणं, हे रील्स, आणि अशा कथा हे दाखवतात की आता महिलांचा राग दाबून ठेवला जात नाही; तो जगासमोर स्पष्टपणे, निर्भीडपणे व्यक्त केला जातो आहे.

खरं तर, रागाचा उद्रेक तोच क्षण असतो, जेव्हा स्त्री सहनशीलतेच्या सीमारेषेवर येऊन पोहोचते... जेव्हा तिच्या भावना, अस्तित्व आणि ओळख सातत्याने दुर्लक्षित केल्या जातात. पूर्वी केवळ सहन करणाऱ्या स्त्रिया आता बोलू लागल्या आहेत, व्यक्त होऊ लागल्या आहेत आणि समाजबदल घडवण्यासाठी पुढे येत आहेत. हा राग आता केवळ भावनिक उद्रेक न राहता, कृतीशीलता, आत्मभान आणि सामर्थ्य यांचं योग्य रूप धारण करू लागला आहे. तो दडपशाहीच्या कोंडमाऱ्यातून बाहेर पडून समाजपरिवर्तनाची नांदी ठरू लागला आहे. महत्त्वाचं म्हणजे, हा राग जोपर्यंत सकारात्मकता आणि बांधिलकीच्या दिशेने मार्गक्रमण करतो, तोपर्यंत समाजात खोलवर आणि स्थायिक परिवर्तन घडवण्याची परिणामकारक क्षमता त्याच्यात असते. कारण असा राग विध्वंसक नसून, सृजनशील असतो... स्वतःसाठी नव्हे, तर व्यापक सामाजिक हितासाठी प्रेरित असतो. परंतु हाच संताप जर अराजक व विध्वंसाच्या मार्गाला लागला, तर तो त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजासाठीही घातक ठरतो.

गेल्या काही दशकांतील चित्रपटांचा मागोवा घेतला, तर लक्षात येतं की स्त्रियांच्या अंतर्मुख संतापाला पडद्यावर आवाज मिळू लागला आहे. हा राग आक्रमक नसला, तरी तो गंभीर आणि गहिरा आहे, खोल आहे. दैनंदिन लहानसहान अपमान, अन्याय, दुर्लक्ष आणि दमित भूमिका यांचा हळूहळू साचणारा असंतोष आहे. मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' आणि त्याचाच हिंदी रीमेक 'मिसेस' (2025), 'थप्पड' (2020), पगलट (2021) या चित्रपटांनी हाच शांत, पण सतत उफाळणारा स्त्रियांचा संताप दाखवला आहे. त्यातील नायिकांच्या संतप्त नजरा, मौन विद्रोह, आणि शेवटी एका कृतीतून होणारा नात्यांचा किंवा चौकटींचा भंग; हे सर्व आजच्या समाजातील स्त्रियांच्या अंतर्गत लढ्याचं प्रतिनिधित्व करतं. तरीही, खरतर या आधुनिक चित्रपटांमधील राग तुलनेने सौम्य वाटतो, विशेषतः पूर्वीच्या काही चित्रपटांतील रौद्र रूपाच्या तुलनेत. उदाहरणार्थ, स्मिता पाटीलच्या मिर्च मसाला (1987) चित्रपटातील अंतिम दृश्य ! एक अश्रुत पण आगीने पेटलेला संताप जेव्हा उफाळून येतो तेव्हा तो सूड नसतो तो स्वसंरक्षणासाठी उचललेले अंतिम पाऊल असते. मिरची फॅक्टरीत येणारा क्रूर अत्याचारी सुभेदार जेव्हा सहनशीलतेची पराकाष्टा झालेल्या सोनाबाईला पकडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा फॅक्टरीतील सर्व महिला एकत्र येतात आणि ताज्या लाल मिरच्यांच्या मसाल्याने त्याच्यावर हल्ला करतात. या हल्ल्यात सुभेदार घायाळ होतो. ते दृश्य म्हणजे स्त्रियांच्या संयमाच्या सीमेला पार केल्यानंतर झालेला उद्रेक ... एक प्रतीकात्मक विस्फोट ! 'मदर इंडिया' (1957) मध्ये तर नायिका स्वतःच्या मुलाला गोळी घालते. कर्तव्य आणि नैतिकतेच्या संघर्षात तिला स्वीकारावा लागलेला हा क्रूर निर्णय असतो.

मर्दानी, मॉम, कहाणी, गुलाब गँग आणि बँडिट क्वीन हे चित्रपट आधुनिक स्त्रीच्या रागाला केवळ भावनात्मक प्रतिक्रिया म्हणून न दाखवता, त्यामागील परिपक्वता, अन्यायाविरोधातील झुंज, सूडाची भावना आणि अन्यायी समाजरचनेविरोधात घेतलेली ठाम भूमिका दाखवतात. हे चित्रपट स्त्रीचा राग म्हणजे दुबळेपणाची नाही तर दृढ प्रतिकाराची, आत्मभानाची आणि न्यायाच्या शोधातील प्रवृत्तीची अभिव्यक्ती आहे हे अधोरेखित करतात. मात्र, असा प्रतिकार नेहमीच हिंसक असायला हवा, असे नाही. राग व्यक्त करण्याची किंवा सूड उगवण्याची दिशा सकारात्मक आणि सृजनात्मकदेखील असू शकते, याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आहेत. अनेक अशा स्त्रिया आहेत, ज्या संकटांनी उद्ध्वस्त झाल्यानंतरही पाषाणाच्या छाताडावर एखादे हिरवे कोंब फुटावे तशा जगल्या तगल्या आणि पाय रोवून उभ्या राहिल्या, नव्या उमेदीनं आयुष्य घडवलं आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरल्या. काहींनी बेघर अवस्थेतून स्वतःचं विश्व उभं केलं, तर काहींनी शिक्षण, व्यवसाय, समाजसेवा यामध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्यांच्या जिद्दीने, आत्मविश्वासाने आणि न झुकणाऱ्या वृत्तीने त्या अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत.

''स्त्रीने ठरवले तर ती काहीही करू शकते'' असे एक वाक्य सर्वश्रुत आहे पण हे ''काहीही'' म्हणजे शब्दशः काहीही नव्हे. ते म्हणजे सृजन, सर्जन, उत्पत्ती आणि कल्पकतेच्या अंगाने काहीही करणे असते. स्त्रीराग केवळ विद्रूपतेचा, दुःखाचा अथवा तक्रारीचा उद्रेक असू नये; तो परिवर्तनाची बीजं घेऊन येणारा, एक सृजनशील उर्जेचा प्रवाह असायला हवा. कारण हीच स्त्रीची मूळ प्रवृत्ती, महत्वाचा स्वभावधर्म आहे. राग येणे साहजिक असले तरी; जेव्हा या रागाला योग्य दिशा, समजूतदार व्यासपीठ आणि स्वीकार करणारा प्रगल्भ समाज लाभतो, तेव्हा तो संहारक न राहता समाज परिवर्तनाचा प्रेरणास्त्रोत बानू शकतो. म्हणूनच एक समाज म्हणून आजच्या काळात सर्वांत मोठी गरज आहे, ती स्त्रीच्या रागाकडे संवेदनशीलतेने, समजूतदारपणे आणि सहानुभूतीने पाहण्याची. अशा रागाला योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक ऊर्जा दिली, तर तो फक्त विरोध न राहता परिवर्तनाचे साधन बनू शकतो असा विश्वास वाटतो.







रश्मी पदवाड मदनकर
rashmi.aum15@gmail.com

Saturday, 17 May 2025

हायब्रिस्टोफिलिया समुदाय: गुन्हेगारांप्रती आकर्षण आणि नैतिक गुंतागुंत -


याकुब मेनन 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी असूनही, काही व्यक्तींनी आणि संघटनांनी त्याच्या शिक्षेविरोधात सहानुभूतीने युक्तिवाद केला. त्याच्या शिक्षेपूर्वी अनेक नागरिकांनी त्याला बुद्धिमान, प्रतिष्ठित चार्टर्ड अकाउंटंट म्हणून गौरवले. त्याच्याबद्दलची सहवेदना, सहानुभूती, आणि गुन्ह्याच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न या गोष्टी स्टॉकहोम सिंड्रोम आणि हायब्रिस्टोफिलिया या दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या सामाजिक छटा दाखवतात.

चार्ल्स शोभराज, ज्याला "द सर्पेंट" आणि "बिकिनी किलर" म्हणून ओळखले जाते, हा एक कुख्यात फ्रेंच-भारतीय व्हिएतनामी सिरियल किलर आहे. त्याने 1970 च्या दशकात आशियातील विविध देशांमध्ये अनेक पर्यटकांची हत्या केली, शोभराजच्या गुन्हेगारी कारकीर्दीचे मानसशास्त्रीय विश्लेषण केल्यास, तो एक सायकोपॅथिक व्यक्तिमत्व होता, ज्याला इतरांच्या वेदनेत आनंद मिळत असे. त्याची आकर्षकता आणि चातुर्यामुळे तो लोकांना फसवण्यात यशस्वी होत असे. त्याच्या गुन्ह्यांमुळे त्याला 'द सर्पेंट' हे टोपणनाव मिळाले, कारण तो आपल्या शिकारांभोवती जाळे विणत असे. चार्ल्स शोभराज हे हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय संकल्पनेचं एक ठोस आणि उल्लेखनीय उदाहरण मानलं जाऊ शकतं विशेषतः त्याच्या गुन्हेगारी इतिहासाच्या पार्श्वभूमीवरही अनेक स्त्रिया त्याच्याकडे आकर्षित झाल्या, प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या आणि काहींनी तर त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये, शोभराजने नेपाळमधील नीहिता बिस्वास हिच्याशी विवाह केला. ती त्याच्यापेक्षा 44 वर्षांनी लहान होती, आणि शोभराज तुरुंगात असतानाच दोघे भेटले. त्याचे सगळे गुन्हे माहिती असताना नीहिताने त्याच्यावर प्रेम असल्याचं खुलेपणाने जाहीर केलं आणि त्याची निर्दोषता सिद्ध करण्यासाठीही प्रयत्न केले.

रिचर्ड रामिरेझ हा अमेरिकेतील अत्यंत क्रूर आणि भयावह सिरीयल किलर होता, ज्याला "नाईट स्टॉकर" म्हणून ओळखले जाते. 1984 ते 1985 दरम्यान कॅलिफोर्नियामध्ये त्याने बलात्कार, हत्या, चोरी आणि अत्याचार यांसारखे अनेक गुन्हे केले. त्याच्या विकृत आणि सैतानी प्रवृत्तीमुळे संपूर्ण अमेरिका हादरली होती. तरीसुद्धा, रामिरेझ तुरुंगात गेल्यानंतर हजारो महिलांनी त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं, त्याला प्रेमपत्रं पाठवली, आणि त्याच्या सैतानी व्यक्तिमत्त्वाला "आकर्षक" म्हटलं. 1996 मध्ये, डोरीन लिओय नावाच्या एका पत्रकार महिलेने त्याच्याशी तुरुंगात विवाह केला. ही घटना हायब्रिस्टोफिलिया या मानसशास्त्रीय विकृतीचं अत्यंत स्पष्ट उदाहरण आहे ... जिथे स्त्रिया गंभीर गुन्हेगारांच्या क्रौर्याऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होतात.

भारतातील पंजाब आणि हरियाणा राज्यांतील शेतकरी आणि अर्धिया (कमिशन एजंट) यांच्यातील संबंध स्टॉकहोम सिंड्रोमच्या उदाहरणासारखे आहेत. अर्धिया शेतकऱ्यांना पिकांची खरेदी आणि अनौपचारिक कर्ज देतात, ज्यामुळे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून राहतात. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत विक्री करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना विरोध केला जातो, कारण अर्धिया यांच्या माध्यमातून त्यांना तात्पुरती सुरक्षितता आणि आधार मिळतो. या संबंधांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात शोषण होऊनही अर्धिया यांच्याबद्दल प्रेमाचे नाते आणि विश्वास दिसून येतो, जे स्टॉकहोम सिंड्रोमचे मोठे लक्षण आहे.

सोशल मीडियावरील हायब्रिस्टोफिलिया समुदाय:
आजच्या युगात सोशल मीडियाचा मानवी वर्तनावर खोलवर परिणाम होत आहे. ही केवळ माहितीच्या देवाण-घेवाणीची जागा राहिलेली नसून, व्यक्ती आपल्या ओळखी, मतमतांतरे आणि भावना खुलेपणाने मांडताना दिसतात. या डिजिटल विश्वात एक आगळावेगळा आणि वादग्रस्त समुदाय पुढे येताना दिसतो आहे, तो म्हणजे "हायब्रिस्टोफिलिया समुदाय". या समुदायातील व्यक्ती गंभीर गुन्हेगारांप्रती प्रेम, आकर्षण वा सहानुभूती व्यक्त करतात. ही भावना केवळ वैयक्तिक मानसिक विचलन नसून, सोशल मीडियाच्या प्रभावाखाली सामूहिक ओळखीचं आणि उपसंस्कृतीचं रूप घेत आहे.

हायब्रिस्टोफिलिया म्हणजे काय?
हायब्रिस्टोफिलिया ही एक विशिष्ट मानसशास्त्रीय अवस्था आहे, जिथे एखाद्या व्यक्तीला बलात्कार, खून, दहशतवादी कृत्ये, नक्सलवाद किंवा अन्य गंभीर गुन्हे करणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती किंवा भावनिक काहीवेळा लैंगिक आकर्षण देखील निर्माण होते. हे आकर्षण अनेकदा इतके तीव्र असते की काही महिला (बहुतेक वेळा) तुरुंगात असलेल्या गुन्हेगारांशीदेखील विवाह करण्याचा निर्णय घेतात. उदाहरणार्थ, चार्ल्स शोभराज, अबू सालेम, टेड बंडी, रिचर्ड रामिरेझ आणि जेफ्री डाहमर हे अत्यंत गंभीर गुन्हेगार असूनही, त्यांच्या भोवती एक मोठा प्रेम, आकर्षण आणि भक्तिभाव व्यक्त करणारा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या गोष्टी मर्यादित वैयक्तिक होत्या तोवर ठीक होतं; पण सोशल मीडियावर अशा गुन्हेगारांची स्तुती करणाऱ्या पोस्ट्स, त्यांना निरपराध दाखवण्याची लगबग, त्यासाठी होणारी अस्वस्थता तडफड आणि त्या तडफडीचे विक्षिप्त पद्धतीने केलेले सादरीकरण हायब्रिस्टोफिलियाच्या समाजमाध्यमांवरील रुग्णांच्या दृश्य रूपाची साक्ष देतात.

सोशल मिडिया ही केवळ संवादाची जागा नाही, ती आता एक ओळख साकारण्याची जागा आहे असे समजले जाते. TikTok, Instagram, Tumblr, Reddit यांसारख्या प्लॅटफॉर्म्सवर लोक अनेकदा गुन्हेगारांविषयी आकर्षण व्यक्त करताना स्वतःची एक खास 'डार्क फॅन' ओळख निर्माण करतात. हे आकर्षण अनेक वेळा गुन्हेगाराच्या "वैयक्तिक बाजू" ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. उदाहरणार्थ, "तो गुन्हेगार आहे, पण त्याच्या डोळ्यात प्रेम आहे", "त्याची बालपणाची वेदना कुणी समजून घेतली नाही म्हणून बिचारा असा झाला", वगैरे.
अशा लोकांच्या नैतिकतेचा गोंधळ उडालेला असतो. या अशा मानसिक डिस्टर्ब् समुदायांमध्ये एक प्रकारची 'नैतिक तडजोड' (moral negotiation) दिसून येते. हे लोक वारंवार सांगतात की ते गुन्ह्यांना पाठिंबा देत नाहीत, पण गुन्हेगार म्हणून व्यक्तीमध्ये त्यांना काही "खास" दिसतं किंवा हा मानवी दयामायेचा मुद्दा आहे पण हीच मानवीयता किंवा दयामाया त्यांना त्या अन्यायाला बळी पडलेल्यांबद्दल किंवा अत्याचारग्रस्त माणसांबद्दल वाटत नसते. तेव्हा यांचा मानवतेचा बुरखा उघडा पडतो. काही वेळा हे आकर्षण केवळ व्यक्तिमत्त्व, रूप, किंवा प्रसिद्धीशी संबंधित देखील असते. असे असते तेव्हा ते अधिक मानसिक आजाराशी संबंधित असते.
हायब्रिस्टोफिलिया समुदाय अनेक वेळा सोशल मिडियावर गुन्हेगारांचे फोटो, त्यांच्या कुटुंबाचे फोटो, कोर्ट फूटेज, किंवा जुन्या मुलाखती वापरून त्यांचं 'एस्थेटिक रूपांतर' करतात. गडद संगीत, ब्लर फिल्टर्स, रोमँटिक कोट्स यांद्वारे गुन्हेगाराची प्रतिमा एखाद्या प्रेमळ, दयाळू, कुटुंबवत्सल व्यक्तींसारखी सादर केली जाते. यामुळे गुन्हेगारांची भीतीदायक प्रतिमा लुप्त होते आणि त्या जागी एक "आकर्षक विरोधाभास" उभा राहतो.

या समुदायांबाबत समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात काहींना हे मनोरंजक वाटते, तर काहींना हे 'अतिशय चिंताजनक' वाटते. गुन्हेगारांविषयी सहानुभूती निर्माण होणं हे ''गुन्हेगारीचे सामान्यीकरण'' होणे असू शकते, जे समाजासाठी घातक आहे. विशेषतः जेव्हा पीडितांच्या वेदना दुर्लक्षित केल्या जातात आणि त्या ऐवजी गुन्हेगारांचे महिमामंडन केले जाते तेव्हा ते अधिकच गंभीर स्वरूपाचे असते.

हायब्रिस्टोफिलिया समुदाय हे सोशल मिडियाच्या काळात निर्माण झालेलं एक गुंतागुंतीचं, नैतिकदृष्ट्या गंडलेलं, आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या साशंक असलेलं क्षेत्र आहे. या समुदायातील लोक फक्त गुन्हेगारांवर प्रेम करत नाहीत, ते सोशल मिडियाद्वारे त्या गुन्हेगाराशी स्वतःची ओळख वाढवणे, त्याच्या विचारसरणीशी सुसंगत वागणे आणि भरकटलेल्या भावनिक गरजा एनकेन पद्धतीने पूर्ण करून घेण्यासाठी असे वागत असतात. ही गोष्ट फक्त मानसशास्त्राच्या दृष्टीने नव्हे, तर समाजशास्त्र, डिजिटल माध्यमांचे विश्लेषण, आणि नैतिकता या सर्व अंगांनी अभ्यासण्यासारखी आहे. जरासे स्वतःच्या आत वाकून पाहण्याची तेवढी गरज आहे.

✍🏻 रश्मी पदवाड मदनकर

(१७ मे २०२५ रोजी तरुण भारत आकांक्षा पुरवणीत कव्हर स्टोरी प्रकाशित)





Friday, 9 May 2025

Operation Sindoor!

तुम्हाला माहिती आहे का ? २०१७ पर्यंत भारतात महिलांना थेट युद्धावर जाण्याचा अधिकार नव्हता. युद्धसंबंधी निर्णय घेण्याची संधीही त्यांना दिली जात नव्हती. या विषमतेविरुद्ध त्यांचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू होता. तेव्हा महिलांना लष्करात केवळ सहाय्यक भूमिका, जसे की सैनिकांच्या शस्त्रास्त्रांची तयारी, वैद्यकीय सेवा या क्षेत्रांपुरतीच मर्यादित संधी दिली जात असे. लष्करासारख्या पारंपरिकपणे पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात महिलांना दीर्घकाळ पूर्णतः वगळण्यात आले होते. मात्र, आता त्या युद्धाच्या मोहिमांमध्ये नेतृत्व करताना दिसत आहेत, हे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक पाऊल आहे. २०१७ मध्ये भावना कांत ही भारतीय हवाई दलातील पहिली महिला ऑपरेशनल फायटर पायलट ठरली. ती युद्धाच्या मोहिमांवर लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला वैमानिक बनली. त्याच वर्षी सब लेफ्टनंट शिवांगी हिने भारतीय नौदलात सर्विलन्स विमान उडवणारी पहिली महिला पायलट होण्याचा मान मिळवला. २०२० पर्यंत महिलांना लष्करात कायमस्वरूपी नियुक्ती (Permanent Commission) देण्यात येत नव्हती. मात्र २०२० मध्ये भारतीय लष्कर आणि त्यानंतर नौदलामध्येही महिला अधिकाऱ्यांना हे अधिकार मंजूर करण्यात आले. हा निर्णय महिलांच्या दीर्घकालीन संघर्षाचा विजय ठरला. गेल्या दशकभरात महिलांनी लष्करी क्षेत्रात केवळ आपली उपस्थिती सिद्ध केली नाही, तर कर्तृत्व, नेतृत्व आणि सामर्थ्यही प्रभावीपणे सादर केले आहे. आज हा बदल सुरू झाला आहे, आणि 'समान संधी' ही आता केवळ संकल्पना न राहता प्रत्यक्ष वास्तवात उतरू लागली आहे. ही बदलाची सुरुवात आहे आणि ही आशा आता वास्तव होताना दिसत आहे. 

 ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ एक लष्करी कारवाईचं नाव नाही, तर ते भारताच्या महिला सैनिकांच्या शौर्याचं, जिद्दीचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक आहे. या नावात एक गहन अर्थ दडलेला आहे... ‘सिंदूर’ या शब्दात नुसताच सौंदर्याचा नव्हे, तर त्याग, निष्ठा आणि सन्मानाचा अर्थही अंतर्भूत आहे. आणि या संकल्पनेला साजेसं नेतृत्व केलं दोन महिलांनी... विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी. पहलगाममध्ये ज्यांच्या डोळ्यांसमोर त्यांच्या सहचाऱ्यांना निर्दयपणे मारलं गेलं, ज्यांना ‘महिला आहेत’ म्हणून दुर्लक्षित म्हणून जिवंत ठेवलं गेलं, त्याच महिलांनी हा प्रतिशोध उचलला. "स्त्रियांना केवळ पुढाऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम आहे, त्यांच्यात दुसरी क्षमताच नाही" या अत्यंत हीन समजुतीला त्यांनी खणखणीत उत्तर दिलं. हा फक्त बदला नव्हता, तर एक इशारा आहे की भारताच्या महिला आता मागे राहिलेल्या नाहीत. महिलेच्या वेदनेचा महिलांनीच घेतलेला बदला, महिलांनीच दिलेला संदेश, आणि महिलांनीच मांडलेली कारवाईची रूपरेषा हे सगळं फक्त प्रेरणादायी नाही, तर ऐतिहासिक आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक आणि प्रभावी हवाई व क्षेपणास्त्र हल्ले केले. या यशस्वी कारवाईत भारतीय लष्कराच्या शौर्याचं जितकं योगदान होतं, तितकंच महत्त्वाचं होतं महिलांच्या नेतृत्वाचं. या प्रेस ब्रीफिंगमध्ये महिलांनी जे आत्मविश्वासाने सांगितलं, त्याने केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारतीय लष्कराची प्रतिष्ठा उंचावली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे सन्मान, शक्ती आणि समतेचा संगम. हे केवळ एक मिशन नव्हतं हे भारताच्या महिला सैनिकांचं धगधगतं उत्तर आहे. कोण आहेत या दोघी ? विंग कमांडर व्योमिका सिंग विंग कमांडर व्योमिका सिंग भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग शाखेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या तपशीलांची माहिती दिली. या ऑपरेशनमध्ये त्यांनी भारतीय हवाई दलाच्या Rafale आणि Su-30MKI लढाऊ विमानांचा वापर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील नौ ठिकाणी सुस्पष्ट आणि प्रभावी हल्ले केले, ज्यात अंदाजे ७० दहशतवादी ठार झाले आहेत. कर्नल सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी भारतीय लष्कराच्या सिग्नल कोर्प्समध्ये अधिकारी आहेत. ऑपरेशन सिंदूरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये त्यांनी भारतीय लष्कराच्या भूमिकेची स्पष्टता दिली. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मिशनमध्येही सहभाग घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय लष्करी अनुभवाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

 रश्मी पदवाड मदनकर

Monday, 3 February 2025

काही माणसांना कामे न करण्यासाठी जसे हजार बहाणे ज्ञात असतात आणि ते त्याचा खुबीने उपयोग करून घेतात; तसेच अनेकांना परिस्थिती प्रतिकूल असतानाही कामे शोधून काढून ती करण्यासाठी हजारो कारणे हजारो पर्याय माहिती असतात. असे असणारे आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता कष्ट करत, त्यातून ज्ञानवर्धन करत अनुभवसंपन्न होत पुढे जाणारी माणसे भेटली की फार बरं वाटतं. काम न करणाऱ्यासाठी कामचं सापडत नाहीत आणि काम करणाऱ्यासाठी कामाची वानवा नसते. आमच्या ऑफिसला एक सिनिअर आहेत, त्यांच्या उच्चभ्रू एरियात पहाटे पहाटे एक मुलगा येतो कामाला, त्याच्याकडे त्या एकाच मोहोल्ल्यातली ७-८ घरे आहेत. त्याचं काम त्यांच्या घरातील कुत्र्यांना सकाळी फिरवून आणण्याचं आहे. एका कुत्र्याला फिरवून आणायला १५ मिनिटे लागतात, या हिशोबाने २ तासात तो एका मोहोल्ल्यातले काम संपवतो. पगार आहे प्रत्येकी २००० रुपये महिना. रोजच्या दोन तासांच्या कामात तो १५००० रुपये महिना कमावतो. त्यानंतरच्या वेळेत तो कदाचित दुसऱ्या मोहोल्ल्यात हेच काम करत असावा किंवा दुसरी कामे. असाच आमच्या इमारतीत एक मुलगा येतो. त्याची ना कुठली कंपनी आहे ना कुठला ब्रँड. वन मॅन कंपनी. तो कार धुवायचे काम करतो. प्रत्येकाकडे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा. त्यात डीप क्लिनिंग, वॉटरल्स वॉश असे अनेक प्रकार आहेत.. त्याच्याकडे सध्या २०-२२ घरे आहेत म्हणे जिथे त्याला नियमित जावे लागते. एका घरचे २-३ हजार रुपये महिना मिळत असावेत असा अंदाज धरला तरी ४० हजाराच्या घरात त्याची मिळकत असावी.

मुंबईला आमच्या सोसायटीत एक वयस्कर काका यायचे. फार दुरून लोकलने यायचे त्यांच्या हातात दोन मोठ्या पिशव्या असायच्या. एका दिवशी एका एरियात असे ते आठवडाभर सात वेगवेगळ्या एरियात फिरायचे. त्यांच्या पिशवीत सकाळचा लागणार नास्ता असायचा. म्हणजे सहा इडल्या आणि छाटणीचे पॅकेट, तसेच ढोकळ्याचे, ठेपल्याचे, उपमा, अप्पे, सँडविच. शिवाय अंडी, दही, फरसाण, चकल्या, शेव वगैरे असायचे. सकाळच्या नोकरीच्या घाईत असणारे अनेक जण पटापट पॅकेट उचलायचे. सकाळी ७ ला आलेले काका सकाळी १० वाजता दोन्ही पिशव्या घडी घालून गावाकडे परतायचे.

महिलांना औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतून नोकरीनिमित्त काम केल्यावर त्या त्या संस्थांशी अजूनही जुळून काम करते आहे. अनेकदा महिला काहीतरी हाताला काम हवे म्हणून विचारायला येतात. पायलीचे अनेक काम खरतर आजही उपलब्ध असतात त्यासाठीचे प्रशिक्षण देखील मोफत असते; त्यात उदबत्ती बनवणे, कागदाचे लिफाफे बनवून दुकानांना देणे, गृह उद्योग सारख्या गोष्टी असतात. मात्र प्रत्यक्ष काम करायची वेळ येते तेव्हा महिलांना अशी छोटीमोठी कामे करायला लाज वाटते. मला आठवतं आम्ही मुंबईला राहायचो तेव्हा भिजवलेली आणि मोड आलेली कडधान्ये बाजारात विकायला असायची. त्या विकणाऱ्या बायका अशी दहा भांडी मांडून दहा प्रकारची कडधान्ये विकायची. नोकरीपेक्षा बायकांना अशी आयती भिजवलेली मोड आलेली कडधान्ये, निवडलेल्या भाज्या, तोडलेल्या शेंगा मिळणार असतील तर त्या अनेकदा जास्तीचे पैसे द्यायलाही मागेपुढे पाहत नाही. अनेकींना हे करायचे सुचवले तेव्हा ''ही अशी कामे आम्ही करणार?'' असा अविर्भाव होता. कामाची पैशांची प्रचंड गरज आहे. मात्र काम करणार ते टेबलावर बसूनच उच्च पदाचेच असे अनेकींना वाटत असते, भलेही त्यासाठीची पात्रता त्यासाठी लागणारे स्किल आपण कधीच आत्मसात करण्याचा प्रयत्न केला नसेल.

मागे आणखी एक किस्सा ऐकला होता, हायवेवर असणाऱ्या ढाब्यांना लागणारे सोललेले लसूण, आल्याचे लच्छे एकेक किलोचे पॅकेट तयार करून ग्रामीण भागातील काही महिला त्यांना पुरवत असे. किती सोपे आहे.. रोज एका हॉटेलला एक किलो. पाच-सहा हॉटेलला तेवढेच. केवळ लसूण सोलून द्यायचा हा व्यवहार आहे आणि त्याबदल्यात जी काही मेहनत लागेल त्याचे पैसे मिळेल.. कुणाला बरं जमणार नाही हा व्यवसाय.

आमच्याकडे रोज एक भाजी विकणारा २२-२३ वर्षांचा चुणचुणीत उत्साही मुलगा येतो.. तो संध्याकाळी ठेलाभर सिजनल भाजी किंवा फळे (कोणतेही एकच) विकायला वेगवेगळ्या मोहोल्ल्यात फिरतो. त्याच्या कामाची यूएसपी म्हणजे तो त्याचे ग्राहक असणाऱ्या महिलांशी तो अत्यंत आदराने, प्रेमाने आपुलकीने वागतो. सगळ्या त्यांच्या ताई, वाहिनी, आत्या, मावशी झाल्या आहेत. कुठली वेगळी भाजी बाजारात आली कि ''ले जातो ना दीदी, तुमको पसंद है करके मै लाया खास, पैसे भी मत दो. तुम खाओगे तो मेरा पेट भरेंगा'' म्हणतो. कधी दोन काकड्या उचलून एखादीच्या पिशवीत घालतो. ''तुम्हारे लिये नही, ये मेरे भांजे के लिये दे रहा, उसको खिलाओ, धष्टपुष्ट बनाव'' म्हणतो. बायका चक्क दिवसभर त्याची वाट पाहतात पण दुसरीकडून भाजी घेत नाहीत. दिवसभरात त्याचा ठेला रिकामा होतो.

नोकरी पाण्याविषयी बेरोजगार असल्याचे लोकं जेव्हा बोलतात आणि तुम्ही त्यांना काही पर्याय सुचवता तेव्हा ते न करण्याचे त्यांच्याकडे अनेक कारणं असतात. लोकांना निकामी बसणं आवडतं पण मिळालेले काम कधी अंतर दूर पडतं म्हणून, कधी बॅकऑफीसचेच काम हवे म्हणून, कधी एरिया चांगला नाहीये म्हणून, कधी वेळा सोयीच्या नाही म्हणून, कधी हाताशी गाडी नाही म्हणून गमावणे ते पसंत करतात पण कुठलीही लाज न बाळगता जरा जास्तीचे कष्ट घेऊन जे मिळेल त्या कामातून ज्ञान आणि अनुभव वाढवून घेऊन पुढे हवे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी माणसे खरंच विरळा असतात.

Rashmi Padwad Madankar



Saturday, 1 February 2025

माझी शाळा

 शाळा म्हणजे केवढा जिव्हाळ्याचा विषय असतो. ज्या शाळेच्या अंगाखांद्यावर खेळत-शिकत, पडत-झडत उभे राहून; आहे त्या उंचीवर पोचलो असतो त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्याची संधी मिळत असेल तर त्यासारखा आनंद कुठला असेल. माझी शाळा म्हणजे नागपूरची प्रथितयश शाळा ''केशवनगर हायस्कुल''. शाळेच्या या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची उदघाटक म्हणून जाण्याची संधी आमचे आवडते गणिताचे शिक्षक आणि आताचे मुख्याध्यापक श्री मिलिंद भाकरे सर यांच्यामुळे मिळाली. ते सगळ्या माजी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असतात, त्यांच्याशी कनेक्टेड असतात. सरांनी या आधीही कार्यक्रमांना अतिथी म्हणून बोलावले पण माझ्याच काहीतरी अडचणींमुळे जाता आले नाही. यावेळी मात्र ही संधी मला गमवायची नव्हती. कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत पाय ठेवला आणि शाळेतले अनेक वर्ष, तेव्हाचे क्षण भरभर डोळ्यासमोरून सरकत गेले. तशा दोन प्रकारच्या शाळा असतात, एक शिकवणारी दुसरी घडवणारी. खरतर अनेक शाळांमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान दिलं जातं तर एखाद्याच शाळेत ज्ञानासोबत संस्कारही दिले जातात, आपली संस्कृती, नीतिमत्ता शिकवली जाते, मातीचं ऋण, समाजाचं देणं, देशप्रेम या सगळ्या गोष्टी अंगात रुजवल्या जातात. कला, खेळ, संस्काराच्या माध्यमातून चारित्र्य घडवलं जातं. अशाच दुर्मिळ झालेल्या शाळांमध्ये अजूनही आपल्या मूळ तत्वांवर कायम राहून मुलांना घडवत असलेली शाळा म्हणजे माझी केशवनगर शाळा.

मी शाळेत आली तेव्हा रेशीमबागेच्या संघाच्या इमारतीत ही शाळा भरत होती. लांबलचक कित्येक खोल्यांची भव्य इमारत, मोठाले दोन मैदान आणि स्मृती भवनाचे शांत सुंदर पवित्र वातावरण आम्हाला या काळात लाभले. पुढे मी सातव्या वर्गात असताना नंदनवन येथील स्वतःच्या इमारतीत शाळा शिफ्ट झाली. इथेही चार मजली मोठी इमारत होती. पुढे आमच्यासमोरच त्याच प्रांगणात दुसऱ्या इमारतीचे बांधकाम देखील सुरु झाले. आता केशवनगर शाळेची इमारत त्याच प्रांगणात चारही बाजूने चौकोनी बांधली गेली आहे. म्हणजे ज्या शाळेने आम्हाला मोठे होताना घडताना पाहिले; त्याच शाळेला आमच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी देखील मोठी होताना घडताना याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले आहे.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी जवळजवळ २७-२८ वर्षानंतर शाळेला जवळून आतबाहेर न्याहाळता आले. बराच बदल झाला आहे पण तो वरवरचा आहे. मुळात शाळा तशीच आहे जशी ती मनात घर करून बसली आहे. या शाळेने खूप काही दिले. मुख्य म्हणजे आयुष्याचा पाया मजबूत करून दिला ज्यावर आम्ही आज पाय रोवून, तग धरून घट्ट उभे आहोत. सकाळी सात वाजता त्यावेळचे आमचे मुख्याध्यापक पाचपोर सरांनी शिकवलेल्या प्रार्थना-ध्यान साधनेने होणारी दिवसाची सुरुवात व्हायची. त्या साधनेचे महत्त्व आज या टप्प्यावर येऊन कळले आहे. वर्गशिक्षिका वझलवार मॅडमने केवळ जीवशास्त्र शिकवले नव्हते, आयुष्याला वळण देण्याचे कठोर कार्य त्यांनी अत्यंत मृदूपणे केले होते. शारीरिक शिक्षणाच्या केचे सरांनी शिस्त अंगात भिनवली. त्यांचा दरारा असा होता की त्यांच्या मेन गेटवर झालेल्या केवळ प्रवेशाने देखील अक्खी इमारत चिडीचूप होऊन जायची. सरांच्या मार्गदर्शनात कित्येक खेळात प्राविण्य मिळवले, कित्येक राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय कार्यक्रमात सहभागी होता आले.. त्यांच्यामुळे आत्मविश्वास दुणावला. मुजुमदार बाईंनी शिकवलेलं संस्कृत असेल किंवा भाकरे सरांनी शिकवलेलं गणित.. आजही बुद्धीची ताकद नाही ते विसरण्याची, इतके ते पक्के मांड मांडून बुद्धीत घट्ट बसले आहे. धर्माधिकारी मॅडमने विज्ञानाबरोबर कलेत गती मिळवून दिली. दंताळे (कुलकर्णी) मॅडम, मलिये मॅडम तारे मॅडम या सगळ्यांनीच आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला. यावेळी कार्यक्रमात आजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना आमच्या त्या त्या वेळच्या अनेक गमतीजमती सांगण्याची संधी मिळाली. त्यांना मी अनेक किस्से सांगू शकले, त्यातून आम्हा सगळ्यांच्या घडण्याचा प्रवास मला सांगता आला. आणि हे क्षण, हे प्रसंग, हे शिक्षण, ज्ञान, कला आणि शिस्त या शाळेने आम्हाला दिली, आमचा पाया मजबूत केला, म्हणूनच जमिनीवर घट्ट उभे राहूनही आम्हाला आकाशात भरारी घेण्याचे बळ मिळाले असल्याची कबुली मला देता आली, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेचे, एकूणएक शिक्षकाचे, इतर कर्मचाऱ्यांचे आणि माझ्यासोबत शिकणाऱ्या त्यावेळच्या माझ्या सहविद्यार्थ्यांचे, ज्यांनी ज्यांनी या घडण्यात योगदान दिले त्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करता आले.
हा अतिशय आनंदाचा दिवस होता. मी माझ्या वर्गखोलीत माझ्या बाकावर जाऊन बसले होते. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गणित लॅब, विज्ञान लॅब, ग्रंथालय पाहिले. जुन्या-नव्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या भेटी-गाठी झाल्या. नव्या कार्यकारिणीची ओळख झाली. मिलिंद भाकरे सरांनी नव्या उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांचे नृत्य, नाट्य कलांचा आस्वाद घेता आला; आणि विद्यार्थी ते मार्गदर्शक पाहुनी म्हणून जाण्याच्या या योगामुळे अनेक वर्षांपासून वाट पाहणारे एक वर्तुळ पूर्ण झाले.

वेड्या माणसांच्या गोष्टी -

 वेड्या माणसांच्या गोष्टी - #भेटलेलीमाणसे



हा आहे विशाल टेकाडे ! त्याच्या नावात जो विशाल शब्द आहे तो त्याने सार्थक करून दाखवला आहे. विशाल चार वर्षांपूर्वी आयुष्य शोधायला म्हणजे "सर्च ऑफ लाईफ'' मिशनसाठी सायकल प्रवासावर निघाला होता. कुठे जायचे कसे जायचे काहीही डोक्यात नव्हते.. घरातून बाहेर पडल्यावर टप्प्याटप्प्यावर मार्ग सापडत गेला.. मदत मिळत गेली, माणसे भेटत गेली आणि त्याचा एकट्याचा कारवा अखंड पुढे पुढे सरकत राहिला. अंगावर एक ड्रेस आणि एक पिशवीत, एक जुना मोबाईल आणि चार्जर घेऊन तो निघाला होता. निघताना खिशात दहा हजार रुपये होते पण प्रवासात सुरुवातीलाच आयुष्याचा पहिला धडा मिळाला. एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने, समाजसेवकाने सांगितले. ''आयुष्य असे शोधून सापडत नसते रे. लग्झरी सोबत घेऊन फिरलास तर कधीच आयुष्य सापडणार नाही, जोपर्यंत रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वाताहत होत नाही तोपर्यंत आयुष्य कळत नसते'' हे वाक्य मनाला लागले आणि त्या क्षणात निर्णय घेऊन सोबत आणलेली सगळी रक्कम त्याने संस्थेला दान केली. यापुढचा सगळा प्रवास शून्य पैसे घेऊन करायचा. रस्त्यात लागणारी मदत देखील पैशांच्या स्वरूपात घ्यायची नाही हे ठरवून तो पुढल्या प्रवासाला निघाला. भारतातले एकूण १८ राज्य आणि ३ देश आणि अवघे ४ वर्ष त्याने सायकलवर पालथे घातले. मार्गात कुणी राहायला जागा दिली तर राहायचे, पोटापुरते अन्न दिले तर खायचे...आणि मिळाले नाही तर ? या आहे आणि नाहीच्या मधलाच हा प्रवास होता. या प्रवासात त्याने कुठला अनुभव घेतला नसेल ?? कोव्हीड काळात कित्येक गावातून हाकलून लावले असताना वेशीवरच्या मंदिरात रात्र काढण्यापासून ते गावाबाहेर मंदिर नाही म्हणून स्मशानात भर पावसात पूर आलेला असताना निथळत राहून आजच डुबून मृत्यू येईल की काय याची वाट पाहण्यात काढलेली रात्र. अनेकांच्या घरी एका रात्रीचा आसरा घेण्यासाठी विनवणी करण्यापासून ते अनेकांच्या मनात कायम घर करण्यापर्यंतचा प्रवास. ४ दिवस पोटात अन्न गेलेले नसताना, भुकेने पोट तोडत असताना, आता जिवंत राहणे शक्य नाही असे वाटत असताना भिक्षा मागण्याखेरीज उपाय नसताना नाईलाजाने पसरलेला हात ते कुठेतरी कुणाच्यातरी घरी प्रेमाने आग्रहाने पोट तुडुंब भरेपर्यंत अन्न आणि प्रेम मिळवण्याचा प्रवास. प्रवास वरवर स्वतःपासून सुरु होऊन स्वतःच्याच खोलवर आत आत घेऊन जाणारा, प्रगल्भ करून सोडणार प्रवास.

कौटुंबिक वादातून निराशेने ग्रासलेल्या विशालने मनात अतीव दुःख घेऊन घर सोडले होते. विशालला नेपाळला गेल्यावर एका जोडप्याने दत्तक घेतले. तिथे त्याने नेपाळ प्रवासातले एक वर्ष त्यांच्या सोबत घालवला. बांगलादेशात ऐन दंगे सुरु असताना प्रवास केला. ओडिसा आसाम नागालँड सारख्या ठिकाणचे अनुभव ते छत्तीसगढ मधल्या गावांमध्ये प्रत्यक्ष नक्सल गावांत राहण्याचा अनुभव. एकेक माणसांच्या हजारो कथा त्याच्या गाठोड्यात जमा झाल्या आहेत. आयुष्यभर जगल्यावरही घेता येणार नाही असे सगळे अनुभव चार वर्षाच्या सलग सायकल प्रवासातून घेऊन परत आलेला विशाल. या जगात ''प्रेम'' ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे हे सांगणारा विशाल. जाताना असलेला आणि आता परतलेला विशाल अंतर्बाह्य बदलला आहे. आता तो लवकरच पुन्हा प्रवासावर निघणार आहे. आजवरच्या प्रवासातून फक्त घेत आलो आता ते परत करण्यासाठी प्रवास करायचा आहे असे तो म्हणतो. आम्ही एकाच प्रदेशातले एकाच शहरातले असताना पूर्वी त्याची माझी भेट नव्हती, ओळख नव्हती. ३ वर्षांआधी तो दूरवर प्रवासात असताना त्याला तिथे कुणीतरी माझी ओळख सांगितली. आम्ही फोनवर बोललो आणि मला त्याचे अनुभव ऐकत राहण्याचे वेडच लागले. तो जिथे कुठे जायचा तिथले किस्से फोनवरून सांगत राहायचा. पुढे दोन वर्षांपूर्वी ''अनलॉक'' दिवाळी अंकात त्याची विशेष स्टोरी आम्ही प्रकाशित केली होती. तेव्हापासून विशाल कधी परत येतो आणि भेटतो, कधी त्याला मुलाला, कुटुंबाला जवळच्या मित्रपरिवाराला भेटवते असे झाले होते. अखेर तो दिवस उगवला. २५ डिसेंबर ख्रिसमसच्या संध्याकाळी हा असा एक सांताक्लॉज भेटला आणि त्याचे अनुभव ऐकण्याची, गप्पांची अशी मैफल सजली की ५ तास कसे निघून गेले लक्षात सुद्धा आले नाही. त्याने घेतलेले अनुभव आणि त्यातून त्याला मिळालेलं ज्ञान अनुभूती खरोखर समृद्ध करणारे आहेत हे मात्र निश्चित.

Featured post

  एक वर्तुळ पूर्ण झालं ! #छोटी_छोटी_बाते आयुष्य स्वतःजवळ काहीच ठेवत नाही.. तुम्ही जे जे बरं-वाईट वाटून दिलेलं असतं ते ते कधीतरी तुमच्याकडे प...