Tuesday, 4 June 2019

ऑफिस दारातलं झाड ..



काही गोष्टी फार साध्या असतात पण का कुणास ठाऊक फार फार जिवापासच्या वाटतात. ओंजळीत साठवून ठेवाव्या कायमच्या इतक्या भावल्या असतात... भावल्या म्हंटल्यापेक्षा जीव गुंतलेल्या असतात. असे का व्हावे ह्याला मात्र उत्तरं नसत. असाच माझ्या मनातला एक हळवा कोपरा आहे, ऑफिस दारातलं झाड. फार चमत्कारिक वगैरे नसलं तरी विशेष मात्र आहे. त्याला सहसा पानं नसतातच, फक्त फांद्यांचा पसारा दिसतो.. पसारा कसला काळोख वारीत आकाशाकडे पसारलेला पिसाराच असतो जणू. त्याला सावली देता येत नाही.. उन्हाच्या काहिलीची वर्णी देणाऱ्या अगणित बाहू पसरून तो सताड उभा असतो.  त्याच्या आसपासची झाडं बहरून उमलून, पुन्हा कात टाकून, पुन्हा धारण केलेलं रूप मिरवीत डोलताना दिसतात. पण ऑफिस दारातलं झाड मात्र वर्षानुवर्ष सारखंच... पाना फुलांनी लगडलेली इतकी झाडे सोडून मलाही ह्याच झाडाची ओढ का लागावी हे एक गूढच आहे; आणि त्याहून अधिक ह्या वेड्या झाडाने सुद्धा माझ्यासारख्या वेगळ्या वेडपट वागण्याचे अनेकदा साक्षीदार होत राहावे हि कुठल्या ऋणानुबंधाची अंतःस्त अवस्था असेल हा प्रश्नच आहे. 

मग रोजरोज हे असं होतं.. ऑफीसमधून रोज अंधार पडल्यावर बाहेर पडताना एकच दृष्य दिसतं; ऑफीसदारातलं झाड अंधार लपेटून झाकोळून घेत असतं स्वतःला. काळ्या, करड्या, वाळक्या फांद्यांचं अंधार लपेटलेलं काळकभीन्न झाड.. कधी फार लक्ष जात नाही त्याकडे.. कधी गेलंच तर अंधाराचं झाड स्वतःला गडद करून घेतं अधिक... अंधाराचं काय ते अपृप ना ?.. आजूबाजूला पेटलेले दिवे अंधाराच्या झाडाला उजळवू शकत नाही. पण अंधार प्रकाशाच्या उघडमीटीचा हा काजवखेळ फारफार लोभस वाटत राहतो. हा पाहिलेला नजारा परतीच्या प्रवासभर साथ करतो. पोचता पोचता दिसू लागलेले वर रात्रीचे नक्षत्रांकित आभाळ लकलक करताना शुद्ध शुभ्र चांदनेही त्या नजाऱ्यासमोर फिके वाटायला लागतात. 

कलता दिवस पाहणं नसतच नशिबी..पण कधीतरी उतरणीचं ऊन पाहायची, अनुभवायची उर्मी होते.. नाहीच जमत..पण एखाद्यावेळी अंधार दाटण्याआधी निश्चयानं बाहेर पडावंच तर ऊन भलतंच खोडसाळ होत राहतं, ऑफीसदारातल्या झाडाचा आडोसा घेत लपंडाव मांडतं.. झाडही खुळावून वाकोल्या दाखवत अंगभर उन्ह पांघरून घेतं अन स्वर्णरंगानं तेजाळून निघतं...काळोखाच्या आधी उजळून आलेल्या संधीप्रकाशात मंद, मजेदार स्वप्नांसारख्या भासणाऱ्या नवख्या रंगीत जाणिवा, बदलत जाणारे आकार त्या अनुषंगाने गहिवरून आलेले नवे अनुभव आणि हे सगळं एकमेकांत मिसळत जाऊन अंतरात दाटून आलेली अनुभूती.. अश्या स्वप्नील स्वर्ण सायंकाळचा फारसा अनुभव नसणारया मला मग ते उन्हाचंच झाड वाटू लागतं.. आत कालवाकालव होते.. माझ्या आतली सायंकाळ गहीवरून येते, अचानक जोम चढतो, आतला आजवर साठवलेला अंधार मी ओढून काढते, घडी घालते अन गाडीच्या डीक्कीत टाकून देते...मनातल्या पेरलेल्या आशांना मग पालवी फुटू लागते.. मी झाडाजवळ येते तांबडं पिवळं उन उन तोडून गोळा करते..एकात एक घालून मोठी लांब शाल विणते अन आतबाहेर पांघरून घेते..गाडी सुरू करून रस्त्याला लागते तोवर मनातल्या झाडाला स्वर्णरंग चढत जातो..बहर येतो. पोचेपर्यंत सुर्य मावळला असतो..मनातले ऊन्हाचे झाड अजून तांबड फुटून डोलत असतं..डोलणार असतं. उद्या अंधाराचं झाड नजरेस पडेपर्यंत तरी दिलासा असतो..रात्र झाली तरी उन्ह झडणार नसतं...

मन पुन्हा कासावीस होतं ऑफिसदारातल्या अंधाराच्या झाडाच्या आठवणीनं अस्वस्थ होत राहतं. भोवतालचे आकार स्पष्ट होऊ लागतात. प्रकाशात पडणाऱ्या आपल्याच सावल्यांचे आकार पसरत जाऊन फुटतील हि भीती मनी दाटते आणि .. आणि काळोखात दिसणारे, मनाला भावले होते ते या दिवस उजेडी पुसले जाऊ नये म्हणून मी डोळे मिटून घेते... 



डोळे मिटून घेते...

रश्मी पदवाड मदनकर 

No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...