महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशाच्या सीमेवर वसलेले यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरीजामणी, मारेगाव, वनीसारखे तालुके आणि त्याच्या भोवताल वसलेली आदिवासी लोकांची वस्ती असलेली छोटी मोठी जवळ जवळ १२७ गावे. आदिवासी लोकांचा चरितार्थ येथे शेतीच्या भरवशावर चालतो. मिरची हे मुख्य पिक असलेला हा परिसर. हि गावे संपूर्ण भारतासाठी मिरचीची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या आदिवासी भागात जवळ जवळ ९९ टक्के अशिक्षिततेचा रेशो आहे. हि लोकं गावातून बाहेर पडत नाहीत म्हणून चौकटी बाहेरील ज्ञानाने येणारं शहाणपण, हुशारी यांच्या गावीही नाही. अजूनही हि लोकं आपल्यापेक्षा कितीतरी शतकं मागे जगत आहेत असं जाणवत राहतं.
इथे भारतभरातून व्यापारी येतात विशेषतः आंध्रमधून. … व्यापारासाठी आलेली लोकं भाव समजून घ्यायला, माल भरायला, पाठवायला आणि बाजारपेठेचे स्वरूप जाणायला म्हणून पंधरा दिवस, महिना महिना येथे मुक्काम करतात. अश्यात त्यांना या आदिवासी लोकांच्या पोड्यावरच (येथील आदिवासी लोकांच्या वस्तीला पोडे असे म्हणतात) राहावे लागते कारण अजूनही मागासलेल्या या भागात हॉटेल वगैरे मिळणे शक्य नाही. हे सुरुवातीच्या काळात आणि आता त्यांना तशी गरजही भासत नाही त्यांना पोडेच आवडायला लागलेत, का ते पुढे वाचून लक्षात येईलच … . तर …… पूर्वी हे व्यापारी इथे राहत असतांना त्यांना त्यांच्या सर्व गरजा पुरवायच्या असायच्या अश्यात त्यांच लक्ष असायचे ते त्या गावातील किंवा ते राहत असलेल्या त्या व्यापारी माणसाच्या घरातील अल्पवयीन मुलींवर. हे व्यापारी तेवढ्या काळात त्या मुलींबरोबर हवीतशी मज्जा करून निघून जात ते पुन्हा कधीही परत न येण्यासाठी. बाहेरहून आलेल्या व्यापाऱ्याच्या राहणीवर पैशांवर भूलायच्या या मुली… कारण गरीबीच तशी आहे आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे शिक्षण नसल्याने कोणत्याही गोष्टीची जागृकताच नाही या लोकांमध्ये मग संस्कार अन शिस्त या गोष्टी खूप दूर राहिल्यात. मुलींनी कसे वागावे बोलावे कुणाशी बोलावे कुणाशी बोलू नये असे शिक्षण बिक्षण तिथे नव्हतेच कधी…. परिणाम दिसू लागल्यावर जरा सावरलेत लोकं पण अजूनही समस्या कायम आहे…. आणि नुसती कायम नाहीये तर ज्या गतीने वाढत जातेय ती गती थांबवली नाहीतर त्याचे परिणाम पुढल्या १५-२० वर्षात भयंकर फना काढून पुढे येतील आणि मग ते सावरणं कठीण होऊन बसेल.
आधी दोन चार प्रकरणं सापडत असावी अशी. व्यापारी निघून गेल्यानंतर मुलगी गरोदर असल्याचे कळते पण आता जबाबदारी घेणारं कुणीही नसतं मागासलेपण इतके कि दवाखाने, औषधपाणी अश्या सर्व गोष्टींचा त्यांना स्पर्शही नाही. अंधश्रद्धा कुटून भरलेली. हळूहळू हि प्रकरणं वाढीला लागली. काही मातापित्यांनी त्या १४-१५ वर्षाच्या मुलींना घरातून हाकलून लावलं. मग ती तान्ह्या लेकराला घेऊन वेशीवर तंबू ठोकून, मातीची लेपलेली खोली बांधून राहू लागली. पोट भरायला काहीतरी करावं लागणार होतंच. काहीवेळेला पोट भरायचे साधन म्हणून, थोडा पैसा मिळतो म्हणून आणि काहीवेळेला एकटी आहे तिच्या मागे तिला वाचवणारं कोणीच नाही म्हणून पुन्हा पुन्हा तिच्यावर प्रसंग घडत राहिले आणि एकाचे दोन आणि दोनाचे चार चार पोरं घेऊन ती जगू लागली. कुमारी मातेचा असा हा वाढत जाणारा वंश. बरं हि सगळी पोरं अनौरस ज्यांना त्यांचा बाप माहितीच नाही. बाप माहिती नसणं हा मोठा मुद्दा नाही. पण आईचीही ओळख कुठे आहे. ती ठार अशिक्षित. जन्माच्या दाखल्यापासून ते जातीच्या प्रमाणपत्रापर्यंतचा एकही कागद नाही तिच्याकडे… कागद नाही मग सरकारी योजना मिळतील हि आशा तिथेच संपली मुळात अश्या काही योजना असतात हे ज्ञान सुद्धा तिला नाहीये. तिथे शिक्षण नाही जागृतता नाही. जगतांना आवश्यक असा एकही कागद त्यांच्याजवळ मिळणार नाही. अज्ञान इतके कि आपल्यासाठी काय चांगले काय वाईट ह्याची जाण नाही. त्यांच्या अज्ञानाचा बाहेरच्यांनी अनेकदा फायदाच घेतलाय. त्याची भीती त्यांच्या मनात बसलीय. ते सहसा कुणाला सहकार्य करत नाही. शासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही परत अनौरस मुलांची संख्या इतकी वाढत चाललीय कि त्यांच्यासाठी काही करायचे म्हंटले तरी सर्वात आधी अडथळा ठरतील ती शासन दरबारचे नियम यांचा जन्म सिध्द करणं आणि इतर गोष्टी करत बसायलाच कित्तेक वर्ष निघून जातील … आधार कार्ड , इलेक्शन कार्ड जातीचे प्रमाणपत्र जन्माचा दाखला …. असे काही असते हे सुद्धा तेथील लोकांना माहिती नाही ते समजून सांगणे सुद्धा कठीण ते करून घेणे तर दूरच.
मग शाळेत मुलांच्या दाखल्याचा प्रश्न तर फार फार दूर राहिलाय ….
हे असंच चालत राहिलं वर्षानुवर्ष शासनाचं त्या भागाकडे कधी लक्ष नव्हतंच, जणू हा भूखंड आपल्या नकाशावर नाहीचेय. प्रकरणं वाढत गेलीत. २०१० साली या कुमारीमातांचा आकडा ३५० च्या घरात होता आज तो १५०० वर पोचलाय आणि प्रत्येकीला निदान ३-४ मुलं. प्रत्येकीची हि अशीच कहाणी. तेथील लोकं सरावली आताशा या सर्व प्रकरणांना. व्यापारी आणि नवनवीन निर्माण होणाऱ्या कुमारी मातांच त्यांना आता विशेष वाटेनास झालंय आता कित्तेक आईवडील ह्या कुमारीमाता मुलींना घरीच ठेवतातही आणि त्यांच्या मुलांनाही सांभाळतात-वाढवतात. त्यांना भीती वाटते ती बाहेरून येणाऱ्या इतर लोकांची जी शासनाच्या नावाखाली, प्रशासनाच्या नावाखाली काही बातम्यांसाठी काही सिनेमांसाठी तर काही पुस्तक लिहायला इथून कहाणी घेऊन जातात… आश्वासनं देऊन जातात पण करत काहीच नाही. सगळे एकाच माळेचे मनी. आम्ही जगतोय तसे जगू द्या आम्हाला आमच्या परिस्थितीत तसेच सोडून द्या असे त्यांना वाटत राहते आणि म्हणून आपल्यासारखी लोकं तिथे गेलीत कि ते शंकेच्या नजरेने बघतात …एकही बोलायला तयार होत नाही.
एखादीच सरला तरतर चालत येते 'काऊन तुमी माया घरी कावून आलते जी इचाराले' असं समोरून येउन विचारते… बडबड करत आपल्याला तिच्या मागेमागे चालत तिच्या घरी घेऊन जाते. दोन माणसं सरळ झोपली कि बाजूला उभे राहायलाही जागा उरणार नाही इतक्याश्या त्या मातीच्या तुटक्या खोलीत आपण वाकून आत शिरतो तेव्हा उघडाबंब उपडा झोपलेला तीन वर्षाचा मुलगा कोपऱ्यात आईच्या फाटक्या साडीच्या पदराला धरून निजलेला दिसतो. दुसरा ५ वर्षाचा बाहेर अंगणात मातीत खेळतांना दिसतो. …. आणि तिथेच डाव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेली चूल आणि त्या शेजारी उपडी ठेवलेली मोजून काळी पडलेली दोन भांडी ….चूल सताड थंड पडलेली… गेल्या कित्तेक दिवसात हि चूल पेटलेली नाही हा मागमूस मनाला लागतो आणि रोजगार मिळवायला तिला काय खटपट करावी लागतेय ह्या तिच्या सतत चाललेल्या बडबडीकडे लक्षही न देता आपलेच डोळे कधी वाहायला लागतात कळत देखील नाही…दारिद्र्य दारिद्र्य म्हणतात ते हेच का ?… तुम्हाला जावं वाटत नाही आणि जावंही लागतं.…. ह्यांच्यासाठी काहीतरी करायचंच अशी मनाशी गाठ बांधून आपण बाहेर पडतो …. पण बाहेर पडतंच नाही…. खरतर पडताच येत नाही. गुंतून पडतो आणि गुंथाच होत जातो सारा. मनाचाही आणि विचाराचाही.
-रश्मी पदवाड मदनकर
-रश्मी पदवाड मदनकर
No comments:
Post a Comment