Thursday 21 February 2019



*मन अँप्यूट करता येईल का?*

डॉक्टरांनी विचारलं , "काय होतंय?"

हताश आवाजात मी उत्तरले,

"श्वास कोंडतो..
डोळे वाहत रहातात...
खूप भीती वाटते...
हातपाय लुळे पडलेत असं वाटत रहातं.."

"कधीपासून होतोय हा त्रास?"

"सगळ्यात पहिल्यांदा, किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा त्रास जाणवला होता.
तेव्हा काय करावं ?कुणाला सांगावं ?कळालं नाही.
मग कधीतरी आपोआपच त्रास थांबला.
आई म्हणायची खूप विचार नको करत जाऊ बाळा.
नंतरही कोलंबिया कोसळलं तेव्हा कितीतरी वेळ देवासमोर रडत बसले होते.

होस्टेलच्या रूममेट्स म्हणाल्या
'वेडी आहेस की काय तू?
हे सगळं चालणारच.
सोडून द्यायचं.
त्यात काय?"


नंतर वेळोवेळी कारणाकारणानं त्रास होत गेला.
काही कारणं लोकांना पटली...
काही नाही पटली..
मी रडत राहीले...
रात्रीचे प्रहर टक्क डोळ्यांनी पिंजत राहिले..


फिल ह्यूज गेला..


माळीण घडलं...


पाकीस्तानात कोवळी पोरं मारली गेली..


शुभम शहीद झाला...


सगळेजण जाती,धर्म,सीमा ह्या गोष्टींच्या आड लपत *क्याल्क्युलेटेड* शोक करत राहिले.


नवरा म्हणाला,
" वेडाबाई कशाचाही त्रास करून घेतेस.''


मी त्याच्या कुशीत अजूनच स्फुंदत राहिले...


मग बातम्या बघणं बंद केलं,
पेपर वाचणं बंद केलं..
तरीही त्रास होतोच हो डॉक्टर..


काय करु?"


डॉक्टर म्हणाले,
"हल्ली असा त्रास होणारे कमी रुग्ण सापडतात.
त्यांना मन नावाचा एक अनावश्यक अवयव असतो.
पूर्वी तो अवयव वापरला जायचा. पण आता माणूस(?) उत्क्रांत (?)
होत चाललाय नं तसा तो अवयवही अपेंडिक्स सारखा व्हेजेटेटिव अवयव झालाय.."


माझे डोळे आशेनं लुकलकले.


"मग आपण अपेंडिक्स काढून टाकता ऑपरेशनने. तसंच मनही काढून टाकता येईल का हो?
फार त्रास होतोय मला."


डॉक्टर खेदानं म्हणाले,
"दुर्दैवानं मन अँप्यूट नाही करता येत आम्हाला. मर्यादा पडतात. कायमस्वरूपी असा काही उपाय नाही त्यावर.."
निराश होऊन घरी आले...आणि *असिफा* तुझ्याबद्दल कळलं गं.


आता परत माझा
श्वास कोंडतो आहे...
भीती वाटते आहे...
डोळे वाहताहेत...
हातपाय लुळे पडतायत
फार त्रास होतोय..

तुम्हा कुणाच्या ओळखीत

मनाचं ऑपरेशन करणारा डॉक्टर असेल तर बघा हो.
मला खरंच खूप त्रास होतोय...


क्षमा (Kshama Goverdhan Shelar)

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...