(वृत्त - पादाकुलक वृत्त)
चित्र उमटते राजसख्याचे
मनडोहाच्या पटलावरती
अन मोहाचे बिंब उमटते
नवस्वप्नांच्या क्षितिजावरती
प्रेमाचे अन आनंदाचे
सूर जुळावे गीत म्हणावे
सांजवनातून उठेल काहूर
त्यासी गोजिरे मित म्हणावे
उन्हकोवळ्या दिवसाचे मग
सुरेख कातिल गीत लिहावे
रखरखणाऱ्या संध्याकाळी
स्वरात कोमल गात रहावे
मिठीत घेता दिठीत यावे
श्वासाचेही अत्तर व्हावे
प्रीतफुलांच्या शेजावानी
मखमाली आयुष्य जगावे
कशास द्यावे कोणी उत्तर
कशास कोणा प्रश्न पुसावे
हात घेउनी हातामध्ये
या प्रश्नांना उत्तरे द्यावे !
No comments:
Post a Comment