Thursday, 5 April 2018

झिरोमाईल !


प्रत्येक शहर गावाचा इतिहास असतो, भौगोलिक परिचय असतो तसंच प्रत्येक गाव-शहराचा त्याचा त्याचा एक स्वभाव असतो. विशिष्ट कॅरेक्टर असतं. आणि त्यानुसारच त्याच प्राक्तनही घडत जात असावं. असंच काहीसं माझ्या नागपूरचंही घडलं असावं .. ऐतिहासिक आहेच आहे, तेवढंच भौगोलिक नावलौकिक. देशातल्या कोणत्याही भाषेच्या, प्रांताच्या, संस्कृतीच्या कोणत्याही माणसांना स्वतःत सामावून घेण्याची, त्यांना समजून उमजून, सोबत घेऊन चालण्याची कुटुंबवत्सल वैशिष्ट्ये या शहराच्या दावणीला बांधली आहे. हे शहर फक्त माणसांना हृदयात जागा देत नाही..तर शहरच देशाच्या हृदयात म्हणजे केंद्रस्थानात वसलंय आणि शहरातील माणसं शहराच्या तर शहराच्या पण नकळत देशाच्या हृदयात वावरत असतात..स्वातंत्र्यापूर्वीच्या अखंड भारताचे प्रतीक म्हणून आज नागपुरातील झिरो माइलकडे बघितले जाते. हि याची विशेष ओळख.. देशाचा मध्यभाग..अर्थात हृदयस्थान. तुम्ही या शहरात उभे असता तेव्हा.. देशापासून शून्य अंतरावर असता. म्हणजे आत खूप आत मध्यात पोचले असता...मेडिटेशन करतांना विचारांच्या गतीचे आकलन करून दूर पोचलेल्या मनाला हजारो माईल पार करून ओढत मध्यात घेऊन यावं आणि अथक प्रयत्नांनी शून्यात ज्ञान लागावं...तेव्हा अध्यात्म दृष्टीने जिथे असतो ना आपण प्रत्यक्ष शहर आपल्याला तिथे घेऊन बसलंय... झिरो माईलला.
या झिरो माइल स्टोनचे स्वरूप चार घोडे आणि एक स्तंभ असे आहे. ते वाळूच्या दगडांनी बनले आहेत. १९०७ साली झिरो माइलचा स्तंभ उभारला, त्यावेळी घोडे नव्हते. नंतर राजस्थानातून चार घोडे तयार करून आणण्यात आले. चार दिशांचे प्रतीक म्हणून झिरो माइलपुढे हे घोडे ठेवण्यात आले आहेत. सीताबर्डी टी पॉईंटवर किल्ल्याच्या पायथ्याशी हा झिरो माईल आजही दिमाखात उभा आहे. मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच अलाहाबाद-त्रिवेंद्रम राष्ट्रीय महामार्ग क्र. सात या ठिकाणी परस्परांना छेदतात.
आयुष्यात कुणाच्यातरी हृदयात स्थान मिळावं म्हणून भावनिक मानसिक स्तरावर किती संघर्ष करीत असतो माणूस..एखाद्यानं आपल्याला हृदयात बसवावं आणि तिथून कधीच कमी करू नये..आपण त्याच्या हृदयाचा म्हणजे मनाचा कोपरा न कोपरा कॅप्चर करावा. मनावर अधिराज्य गाजवावं, तिथेच विहरावं, रंध्रारंध्रात सामावून हक्क गाजवावा: कुणाला बरं नको असेल हे ? माझं शहर मला रात्र-दिवस हेच सुख देत असतं..आणि बरेचदा मला या गोष्टीची जाणीवही नसते. या झिरो माईलनं मला देशाच्या हृदयात स्थान दिलयं. मी या हृदयात मनसोक्त विहरते. रंध्रारंध्रात शिरते आणि तरीही हे शहर मला त्याच्या शिरोताजच्या मुकुटमनीप्रमाणे जपत राहतं. माझ्या बाल्यावस्थेतून प्रगल्भतेकडे जाणारा प्रवास मी शहरात सुरु केला तो अजून सुरु आहे, माझे गंतव्य गाठण्याच्या मार्गात हे शहर मला वळणावळणावर हात धरून शिकवत असतं. झिरो माईलवर उभे राहून मी आयुष्याचा काळ घालवला.. मी इथले ऋतू पाहिले. श्रावणांच्या सरीचे धुंद कोसळणे याची देही याची डोळा अनुभवले, धो धो बरसणाऱ्या सरींचे दोर हातात धरून कल्पनेच्या हिंदोळ्यावर झुलले..या शहरावर सूर्याचीही विशेष कृपादृष्टी आहे..त्यालाही थेट हृदयात शिरायचे असते..मग हे शहर उन्हाळ्याच्या झळा सोसत ऊन्हाचा पदर डोक्यावर धरतं, आणि तावून सुलाखून निघण्याची अनुभूती देत राहतं. असं हे झिरोमाईल माझ्या आयुष्य पुस्तकातलं सोनेरी पान आहे. जे देशासाठी अथवा शहरासाठीच नव्हे तर प्रत्येकाच्या मनातला मानबिंदू आहे याचा अभिमान वाटतो.
रश्मी पदवाड मदनकर
३ एप्रिल १८
#ललित #झिरोमाईल
लेख पुढे वाढवणार आहे .. आजपुरता एवढाच
PC :- Shirish Sharma & Rohan Dhopate










No comments:

Post a Comment

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...