६०३ !
३०३ चा दरवाजा उघडाच होता, मी जरा वाकून पाहिले, कुणी दिसलं नाही म्हणून हाक मारली
'कुणी आहे का घरात ? '
नॅपकिनला हात पुसत कुणावर तरी धुसफुसत बडबडतच मिसेस चौरे बाहेर आल्या.
'कोण ~~ ?.... बोला.. कोण पायजेल ?'
हातातला घडी घातलेला टॉवेल पुढे करत, मी
'हा तुमचाय का ? आमच्या बाल्कनीत पडला होता '
त्यांनी डोळे फाकून खालून वरपर्यंत पाहीले अन नवलाचा खाक्या फेकत वरच्या पट्टीत 'तुम्ही ~~२०३ ला राहायला आलात त्या का ?'
'होय... म्हणजे आम्ही ना पुण्याहून ...' वाक्य अर्धच तोंडातच राहिलं, चौरे बाई त्याच पट्टीत परत बोलत्या झाल्या
'हम्म ..तरीच म्हणलं म्हाईत कसं नाही '
'अं ! तुमचा नाही का टॉवेल ?' मी जमेल तितक्या नम्रतेने.
तसेच डोळे फाकवुन मानेने इशारा करत 'ना~~ही, त्यावर नाव असेल बघा '
मी प्रश्नार्थक चेहेरा घेऊन त्यांच्या मुलखावेगळ्या हावभावपूर्ण चेहेऱ्याकडे बघत मक्ख उभी
'नाव असेल नाव, अहो... त्या टॉवेलच्या बॉर्डरवर नाव लिहिलंय का बघा...लिहिलंय का काय म्हणजे असेलच, आना हिकडं मीच बघते'
एवढं
बोलत त्यांनी हातातला टॉवेल अक्षरशः ओढून घेतला, भरभर घडी उकलली अन कडेवर
कोरलेल्या नावाची पट्टी चिमटीत धरत माझ्या पुढ्यात केली, पुन्हा डोळे
मोठाले करून 'हे बघा, काय म्हणले मी, म्हणले होते का नाही'
मी टॉवेल
हातात घेत 'होय कि, दत्तात्रय हरी लिमये स्पष्टच लिहिलंय, माझं लक्षच गेलं
नाही. सॉरी हो तुम्हाला त्रास दिला, अं~~ ! लिमये म्हणजे ६०३ नंबर
बहुतेक...होय ना?' मी अडखळतच.
'जाऊ दे नं बाई~~, उलट मीच तुझा त्रास वाचिवला, कुठूूून अक्कल आली आन तू पयला हिथं आली.. वाच~~ली '
'म्हणजे ?' मी अवाक.
'नवीन आहेस तू ..कळल तुला हळूहळू, जाऊ नकोस बाई तिकडं त्यांच्याकड.. खाली मुलं खेळायला असतील एखाद्याच्या हातानं दे पाठवून तसाच'
'पण का ?...नाही म्हणजे आता आलेच आहे इथवर तर वर जाऊन देऊन येते कि...' मी थबकत बोलले
पुन्हा
वरचा सुर कडाडला 'अगं वेड-बीड लागलाय का ?, जा कर बाई मनाचं, चांगलं
सांगतो त ऐकाचं नाई ना~~ ... या आजकालच्या मुली लय येडझव्या... कानामागून
आल्या आन आपल्यालच शिकवाल निघाल्या .......''
बडबडत आल्या त्या
मार्गाने तशाच घरात निघून गेल्या.. बडबडीचा आवाज मंद होत बंद होईपर्यंत मी
थिजल्यासारखी तिथेच उभी .. डोक्यात कालवाकालव .. काय असेल ६०३ मध्ये?
वळली.. आता खाली जावे परत कि वर जाऊन टॉवेल देऊन यावा लिमयेंना... कळेच ना ..
मंद
पायाने विचार करतच लिफ्टमध्ये शिरली आणि का कुणास ठाऊक ६०३ कडे घेऊन
जाणाऱ्या बटणेकडे हात गेलाच नाही.... सरळ ग्राउंड फ्लोअरला आली. ...
पार्किंगचा
प्रशस्थ लॉन्ज, पण गाड्या ठेवल्याने अवखळलेल्या जागेतही लहान मुलं खेळत
होतीत मजेत. कुणाला सांगता येईल म्हणून मी अंदाज घेत होती. तेवढ्यात
त्यातल्या एका साधारण १० वर्षाच्या माझ्या दिशेने धावत येणाऱ्या चुरचुरीत
मुलाला हात धरून थांबवले'
'ए ऐक ना, लिमयेंचा फ्लॅट माहितीये का रे तुला ?'
नाक फुरफुरत ..तो मक्ख ...
'हा ना टॉवेल आहे त्यांचा, आमच्या बाल्कनीत चुकून पडला रे, नेऊन देतोस का त्यांच्याकडे प्लिज'
विजेचा
धक्का लागावा तसा त्यानं हात झटकला, मानेला झटका दिला, लांब बाहीच्या
हातानं घामेजलेला चेहेरा सर्र्कन पुसला, अन पळून गेला चट्टकन...
आं..हे काय, शी बाई जाऊ दे.. मुलंच शेवटी .. म्हणत मीपण वाचमनकडे प्रस्थान केलं.
'उधर हम नाही जायेगा मॅडम, ओर कोई काम हो तो कबीबी बोलना.. करेंगे, पर इधर नई जायेंगे, बोल दे रा हूँ '
अरे देवा ! हे काय..असं का वागताय सारे. काय करायचं आता? मोठा प्रश्न.
आले परतून घरी...नकोच जायला उगाच का सगळे घाबरताहेत. काहीतरी असणार नक्की .. डोक्यात भुुंगा..
झाला गेला दिवस निघून गेला .. रात्री अमयला झाला सगळा प्रकार सांगितला.
फार
विचार न करता ''नको जाऊस गं, का उगाच रिस्क घ्यायची, न गेल्यानं काय
अडणारेय का. ज्याचा टॉवेल असेल तो येईल घ्यायला स्वतः असेल गरज तर. नाहीतर
काढ लादी पुसायला'' असं सांगून महाशय घोरायला लागले.
ह्याला मस्करी कसकाय सुचते कुठल्याही वेळी .. माझी उगाच धुसफूस
तसंही
अमय असाच आहे घुम्याच जरा... त्याला अश्या लहान-सहान गोष्टींवर विचार
करायला वेळ तरी कुठे आहे म्हणा. तो त्याच्या नोकरीच्या गुंत्यात सतत
गुरफटलेला असतो, मनातल्या मनात कसले कसले कॅल्क्युलेशन सोडवत सदैव
वास्तवाच्या पलीकडल्या चिंतेत अडकलेला आणि मी त्याच्या सोबत असल्यावरही
एकटेपणानं ग्रासलेली.. .. अशी सोबत दिसणारी, आनंदी भासणारी पण दोन वेगळ्या
ध्रुवावर राहत असलेली आम्ही दोन माणसे ..लोकं नवरा- बायको म्हणून ओळखतात
एवढंच... तो माणसांच्या भाऊगर्दीत व्यस्त आणि मी एकटेपणाने ग्रासलेल्या
विचारांत मग्न ..
.. आईचं घर, स्वतःच शहर, आपुलकीची माणसं आणि सगळं
सगळं सोडून, सगळी नाती तोडून मीच नाहीका आलेले ह्याच्यासोबत, प्रेमविवाह ना
आमचा... घरच्यांचा विरोध न जुमानता पळून जाऊन लग्न केलेलं..पहिले दोन वर्ष
मस्त गेले नव्या नवलाईत, स्वप्नील विश्वात वगैरे. नंतर संसाराचा गाडा खरा
कळू लागला. मायच्या माणसांची खरी जाणीव इथूनच सुरु झाली. गेल्या वर्षी आई
गेली तेव्हा बाबांनी निरोप सुद्धा कळवला नाही मला... कळाले तेव्हा
धायमोकलून रडताही आले नव्हते... कशी रडणार ..कुणाजवळ? माझं तोंड पाहायचं
नाही म्हणून बाबांनी शपथ घातली सगळ्यांना.. थोडक्यात पाणी सोडलं आमच्या
नावाने...एक नातं जपायला हजार नात्यांवर मीच आधी पाणी सोडलं होतं ना.. मग
दोष तरी कुणाला द्यायचा.. अमयला स्वतःला माझ्यासाठी वेळ नाही. नवीन शहरात
कुणी परिचित नाही. गणगोत आमच्याकडे ढुंकूनही बघत नाहीत..आणि ..आणि त्याहून
मोठं दुःख आत पोखरतंय ते म्हणजे अजून आयुष्याच सेटलमेंट नाही म्हणून मुलं
पण नकोयेत असा एकतर्फी निर्णय.. नाही फर्मान ठोकून अमय निर्धास्त जगतोय...
या सगळ्यात माझं काय झालंय ..
एकटी खूप एकटी पडलीय मी, दिवसभर
विचार करकरून डोक्याचा भुगा होतो. आई-बाबांची आठवण आठवण येते. माहेरपणाला
जीव आतुर होतो. आईपण हवं म्हणून कूस आसुसते. या विचारांनी दिवस दिवस
अश्रुने ओलावत राहतो. पण यावर उपाय काय. हे कधीतरी स्वीकारायला हवंच,
कर्माचे भोग म्हणत सवय करवून घेण्याचा अयशस्वी प्रयत्नही सुरूच राहतो ...
रात्र रात्र विचारांचे चक्र चालूच राहते...
त्यात आजची रात्र हे वेगळंच काय ते घडलंय ..
सगळी रात्र जागी .. विचारांच्या गर्तेत निघून गेली. त्या टॉवेलचा माझ्या डोक्यातून काही विचार निघेना.
हे एक कमी होतं कि काय दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडले, बाल्कनीत पुन्हा पेटीकोट येऊन पडला ..
अरेच्छा ! पुन्हा हे काय ? पण कालच्या गोष्टी आठवल्या आणि मी लगेच त्याच्या कडा तपासल्या.
'सुलक्षणा
दत्तात्रय लिमये' सुंदर कोरीव अक्षरात धाग्यानं लिहिलेलं..काही क्षण पाहतच
राहिले. माझं मन त्या धाग्यात त्या नावात गुंतत जात होतं जणू. काहीतरी
ओढतंय आपल्याला तिकडे असं जाणवत होतं,
पेटीकोट ...म्हणजे महिला आहे कुणीतरी...मनात येणारी निदान एक शंका एक भीती जरा कमी झाली होती...
दुपारपर्यंत
काम आटोपली जरा विश्रांती घ्यावी वाटली तर मन लागेना ... काय असेल ६०३
मध्ये, सगळेच दूर का पळतात नाव ऐकून. मनात घोळत राहिलं सतत. अन मी उठलेच
निर्धाराने. सोफ्यावर घडी घालून ठेवलेला टॉवेल आणि पेटोकोट उचलले पायात
चपला चढवल्या..अन लिफ्ट गाठली. .
थेट सहावा माळा
दारावर जुनाट, रंग उडालेल्या पाटीवर पुसट होत चाललेले पण नक्षीदार अक्षरात लिहिलेले 'दत्तात्रय हरी लिमये'
बाहेर दाराशेजारी लाकडाची मोडकळीला आलेली चपलेची रॅक..त्यात दोन जोड कोल्हापुरी चपला..
दारावर
सुरेख आकाराची अँटिक फील देणारी गणपतीची फ्रेम ... दाराच्या दुसऱ्या
बाजूला लांबलचक हिरवाकंच मनीप्लँट आणि छोटंसं तुळशीचं रोप. आणि विशेष
म्हणजे दारात घातलेली सुरेख कोरीव पांढरी रांगोळी, त्यावर हळद कुंकवाचा लाल
पिवळा ठिपका... किती प्रसन्न वातावरण..
जरा धास्ती रोडावली ... अन हिम्मत करून मी दारावर थाप दिलीच.
तीसेक सेकंड गेले असणार ... दाराच्या दोन्ही बाजूने प्रचंड शांतता .. अन मनाचा कोलाहलही.
दार
उघडले गेले..पुढ्यात सत्तरेक वर्षांच्या गोऱ्यापान, देखण्या, नीट नेटक्या,
केसांचा कापूस झालेल्या, निरागस भाव चेहेऱ्यावर असणाऱ्या आजीस्वरूप उभ्या.
काहीएक मिनिट मी त्यांच्याकडे अन त्या माझ्याकडे पाहत राहिल्या.
'हा टॉवेल अन पेटोकोट तुमचाय ना.. आमच्या बाल्कनीत पडले होते'
'अगंबाई,
उडून गेले असतील, मी घरातच शोधत राहिले बघ...ये ना ये घरात ये अशी बाहेर
उभी राहून काय बोलतेस' कापऱ्या आवाजातले ते आर्जवी शब्द ...
मी 'नाही नको, घरात काम पडलीयेत, येईन पुन्हा कधीतरी'
'थांब
ग, हातावर साखर देते, भरल्या घरातून असं जाऊ नये सवाष्णीनं' म्हणत
त्यांनी हात धरला अन सरळ आत ओढत घेऊन आल्या. ... नाही नको म्हणत नाईलाजानं
आत पाय ठेवावा लागला शेवटी.
नीट नेटकं घर. सामान अगदीच बेताचं पण
जागच्या जागी ठेवलेलं..सकाळी लावलेल्या तुपाच्या निरांजणीचा अन उदबत्तीचा
सुगंध अजून वातावरणात भरलेला. खिडकीतून कवडसा आत डोकावत होता, जमिनीवर
उन्हाचा पिवळा गालिचाच जणू. बाजूच्या खुर्चीत चादरीच्या कडेवर नावाची नक्षी
काढत आजी बसल्या असाव्या .. रंगीत धागे सुई चादरीवर तश्याच पसरून
पडलेल्या. भिंतीवर त्या वास्तू पुरुषाच्या तसबिरीवर हार अन कुंकवाचा टिळा.
छोटा पोर्टेबल रेडिओ होता शेजारी स्टूलवर.
मी
कुठल्याश्या भूतकालीन आठवणींच्या तंद्रीत डुंबत गेलेली..
त्या
लगबगीनं आत गेल्या बुंदीचा एक लाडू वाटीत घेऊन आल्या. आताच खा असा आग्रह.
माझ्या पुढ्यात बसून पाहत राहिल्या एकटक. .. अखंड प्रश्नांची सरबत्ती सुरूच
होती. काय करतेस, कुठे राहते, नवरा, मुलं .. माहेर-सासर आणि काय काय ..
चेहेऱ्यावर प्रचंड कुतूहल...मला फार फार अवघडल्यासारखं होत राहिलं. त्या
उठून बाजूला बसल्या माझा हात हातात घेतला कुरवाळू लागल्या...दोन्ही
गालावरून हात फिरवत तोच हात स्वतःच्या तोंडाजवळ नेऊन मुका घेऊ लागल्या. मी
फारच बिचकले, उठून उभी झाले, कालची लोकांच्या वागण्याचा संदर्भ लागतो कि
काय म्हणून मनात धास्तीने डोकं वर काढले .. मी येते म्हणून तशीच जायला
निघाले.
त्यांनी माझ्या चेहेऱ्यावरून हात फिरवला दोन्ही हातांची बोटं कानशिलावर नेऊन मोडली..
सुखी राहा ग माझ्या लेकरा..सुखी राहा म्हणत डोळ्यातून पाणी ओघळू लागले...
माझ्या जीवात कालवाकालव झाली.
मी त्यांचा हात धरला त्यांना बेडवर बसवले त्यांच्या शेजारी बसले अन विचारले 'काय झालंय, बरं नाहीये का तुम्हाला ?'
तश्या त्या फुटल्याच
'किती
वर्षांनी कुणीतरी माझ्या तब्बेतीबद्दल विचारतंय ग, माझ्या म्हातारीला
सगळ्यांनी या उंच इमारतीवर एकटं सोडून दिलंय, कुणी बोलायला नाही कि बघायला
नाही. माणसांचं दिसणं सुद्धा दुर्मिळ झालंय .. कुणीसुद्धा डोळ्यांनी दिसत
नाही. मानवी स्पर्श तर वर्ष वर्ष होत नाही? माणूस मांसासाठी आसुसतो
ग..निदान डोळ्याने तरी दिसावा'
तुमचं कुणीच नाहीये का ?- मी
'आभाचे
बाबा जाऊन १५ वर्ष झालीत, आभा माझी मुलगी, राहते शहरातच दहाएक किलोमीटरवर,
फार आजारी वगैरे असली कि ती येऊन जाते धावत पळत. पण तिचंही घर संसार आहे,
नोकरी आहे, मोठं कुटुंब आहे. ती तरी कुठे कुठे पाहणार? आठवड्यातून तिचा
ड्रॉयव्हर भाजी किराणा आणून देतो.. तेवढंच, दिवाळीला जाते तिच्याकडे दोन
दिवसासाठी ..पण वर्षभर ... खायला उठतं गं एवढं मोठं घर, कसं जगायचं तूच
सांग? मग असे टॉवेल, पेटीकोट, चादरी टाकते मुद्दाम लोकांच्या बाल्कनीत, ते
परत देण्याच्या निमित्तानं तरी कुणीतरी दिसेल डोळ्याला असं वाटत राहतं...
खूप व्यस्त आहात तुम्ही सगळे माहिती आहे गं माझा म्हातारीचा त्रासच आहे
सगळ्यांना पण काय करू ...मरण येत नाही तोपर्यंत जगायचं आहेच ना ..कसं जगू ?
माणसं लागतात गं आजूबाजूला, आसुसतं मन, माणसं लागतातच जगण्यासाठी''
माझे
शब्दच गोठले ... एकटेपण काय असतं भोगलंय मी..भोगतेय अजून माणसं लागतातच
जगण्यासाठी ती नाहीयेत हि जाणीवच तर त्रास देत होती इतके दिवस...
माणसे दुरावल्याचे सलणारे दुःख जरा निवळतांना दिसत होते
आज..माणसाला माणूस सापडलं होते...
माझेही डोळे भरून आले. सगळं सोडून बसलेच मग मी तासभर .. खूप गप्पा केल्या..हसलो अन रडलोही.
रोज दिवसभरातून एकदा तरी आजींना भेटून जायचं आपुलकीचा, जिव्हाळ्याचा स्पर्श देऊन घेऊन जायचा
ठाम ठरवलं मी...
दारातून बाहेर पडतांना अंगणातली रांगोळी ओलांडताना, तुळशीकडे पाहून मनोभावे हात जोडले...
६०३ चं गूढ आता पूर्ण उकललं होतं.. मला नवं ''माहेर'' मिळालं होतं...
रश्मी पदवाड मदनकर