Wednesday 10 January 2018

नागपूर मेट्रोचा प्रवास




भारताच्या मध्य भागात स्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे एक प्रमुख शहर म्हणजे 'नागपूर'. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर असले तरी प्राथमिक गरजांपासून ते आवश्यक विकासात्मक कार्यापर्यंतच्या मूलभूत गरजांसाठीही सतत उपेक्षा अनुभवलेल्या संघर्षाचा एक मोठा इतिहास अनुभवलेले हे शहर आहे. १८६७ साली नागपुरात रेल्वे सुरु झाल्यानंतर आठवणीत राहिलेला फार मोठा संरचनात्मक विकास म्हणून १५ जानेवारी १९२५ साली स्थापन झालेले नागपूर रेल्वे स्टेशन होते त्याला देखील आता ९२ वर्ष झाली. त्यानंतर सार्वजनिकक्षेत्रात एवढा मोठा संरचनात्मक बदल घडला नाही. पण 'देर आये दुरुस्त आये' या तत्वावर नागपूर प्रगतीच्या पायवाटेवर मार्गक्रमण करीत आहे. नागपूर मेट्रो या घडणाऱ्या इतिहासाचे जिवंत उदाहरण ठरणार आहे आणि आपण सर्व या इतिहासाचे साक्षी. सध्या शहरात प्रचंड वेगाने आर्थिक वृद्धीच्या माध्यमातून विकासात्मक बदल घडताहेत आणि त्यासोबतच प्राथमिक सुविधा, आरोग्य, शैक्षणिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणारे बदल वाखाणण्यासारखे आहेत. या बदलासोबत आम्हालाही बदलणे क्रमप्राप्त आहे.  शहरातील रहिवासी क्षेत्राची वाढत जाणारी व्याप्ती, आराखड्यानुसार होणार पुनर्विकास आणि रचनात्मक निर्मितीचा आलेख वाढतो आहे. हा विस्तार २१७ वर्ग किलोमीटर पर्यंत पसरतो आहे. सध्या शहरातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथल्या नागरिकांच्या प्रमाणात केवळ ९% आहे. शहरातील विकासाच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि भारत सरकारने नागपूरला 'मेट्रो' प्रकल्पाच्या स्वरूपात वरदानच दिले आहे. शहरातील कमकुवत असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि इतर वैयक्तिक वाहनांमुळे वाढत जाणारा पसारा वाहतुकीवर पडणारा ताण, छोट्या रस्त्यांमुळे होणारे अपघात, प्रदूषण, पार्किंग प्रश्न इत्यादींवर उपाय म्हणून, तसेच दळणवळणाच्या वाढत्या जाळ्यामुळे जुळत जाणाऱ्या गावखेड्याच्या सीमा आणि त्यातून  दिवसेंदिवस क्षेत्रफळाची व्याप्ती वाढत जाणाऱ्या नागपूरसाठी 'मेट्रोसेवा' अत्यावश्यक आहे असेच म्हणावे लागेल. या विचारातूनच संपूर्ण नागपूरवासीयांसाठी हि सुंदर भेट आम्ही घेऊन आलो आहे... हा विकास घडतांना याच्या प्रवासातली क्षणचित्रे टिपणे महत्वपूर्ण ठरणार आहेत.



महाराष्ट्र शासनाची विधीवत् मंजूरी २९ जानेवारी २०१४ ला  मिळाल्यानंतर  २० ऑगस्ट २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली व २१ आॉगस्ट २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले.
आणि नागपूर मेट्रोच्या महत्वाकांक्षी कार्याचा शुभारंभ झाला. या कामासाठी नागपूर सुधार प्रन्यास (NIT) या
नागपूरच्या विकासासाठी असलेल्या संस्थेची कार्यान्वयन संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली. १८ फेब्रुवारी २०१५ रोजी नागपूर कार्यालयाची स्थापना होऊन कामाला विधिवत सुरुवात झाली.  त्यानंतर सुरु झालेला आजपर्यंतचा नागपूर मेट्रोचा प्रवास अत्यंत अचंभित करणारा राहिलेला आहे. त्याच वर्षी २२ मार्च रोजी वेबसाईटचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. १६ मे ला जिओटेक्निकल सर्वेचा श्रीगणेशा झाला. पुढल्या काही दिवसात फ्रेंच चमूने नागपूर मेट्रो प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली आणि शहरभर 'माझीमेट्रो'चे फलक झळकू लागले. त्यानंतर सुरु झाली रूट ठरवण्याची सत्वपरीक्षा. प्रकल्पातील हा सगळ्यात कठीण काळ आणि काम होते. रूट ठरवण्याशिवायही त्या त्या ठिकाणच्या जागेची उपलब्धता, जमीन अधिग्रहण, रहिवाश्यांच्या अडचणी, जागेचा दर्जा अश्या अनेकानेक कसौटी आणि इतर गोष्टींचे परीक्षण करतांनाच मेट्रो टीमच्या कार्यक्षमतेचा कस लागत होता. या सगळ्या कसोटींना खरे उतरत जाणे याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि पुढे मार्ग मिळत गेले. हे सगळे करीत असतांना इथल्या नागरिकांशी संपर्क साधून त्यांचे मत जाणून घेणे महत्वाचे वाटू लागले आणि सोबत सोबत मेट्रो संवाद नावाने नागरिकांशी माहितीपूर्ण चर्चात्मक कार्यक्रमास शहरातल्या वेगवेगळ्या भागात करणे सुरु करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या शंकाचे निरसन आणि सल्लामसलत करण्यास सुरुवात झाली जी आजपावेतो सुरु आहे. या दरम्यान ३१ मे पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.. वित्तव्यवस्थेसाठी जुळलेल्या देशांची, जर्मन बँक, रशिया कंपनी,  ईआईबी, एएफडब्ल्यू टीमची  त्यासाठी भारतात नागपूर प्रकल्पाला भेट देणे सुरु होते. नागपुरात मेट्रोची आवश्यकता आणि दर्जेदार कामाची हमी त्यांना पटवून देणे हे या प्रकल्पाला लागणाऱ्या फायनान्सचे दरवाजे खुले होण्याचे मार्ग होते. एक एक दार उघडत गेले आणि मार्गातल्या अडचणी दूर होत गेल्या हे मा. श्री ब्रिजेश दीक्षित यांच्या कष्टाचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचेच हे फळ आहे. नागपूर मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची व्हावी म्हणून देशभरातील मेट्रो रेल्वेचे तसेच भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले गेले. भारत, अमेरिका आणि फ्रान्समधील एकूण चार कंपन्यांचा समूह असलेल्या कंपनीला सल्लागार (GC) म्हणून नियुक्त करण्यात आल्याने तांत्रिक मार्गदर्शनाची मेट्रोची बाजू आणखी भक्कम होत गेली. हि अनुभवी, टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञ, तज्ञ् मंडळी नागपूर मेट्रोच्या नवरत्नांपैकी एक महत्वाचा भाग आहे. शिवाय 5D अकादमीने सोन्यावर मुलामा चढवण्याचेच काम कायम ठेवले आहे.



दुसऱ्या बाजूने याच काळात at grade Section च्या खापरी ते एअरपोर्ट येथील प्रत्यक्ष ग्राउंड लेवलच्या कामाला सुरुवात झाली होती. डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वर्धा रोडवर देखील बॅरिकेट लावण्याचे आणि मिहान डेपोच्या बॉण्ड्रीवॉलचे काम देखील सुरु झाले. पुढल्या अवघ्या ३ महिन्यात फाऊंडेशन आणि पायलिंगचे काम पूर्ण होऊन वर्धा रोडचा पहिला पिलर उभा राहिला होता. पुढल्या दोनच महिन्यात १ किलोमीटरचे पिलर उभे करण्याचे महत्वाचे काम पूर्ण झाले,  हि गती थक्क करणारी होती..इथे थांबणे नव्हतेच उलट पुढे हि गती अधिकाधिक वाढती राहिली. तिसऱ्या बाजूने पर्यावरणाचं संरक्षणच नाही तर संवर्धन हा नागपूर मेट्रोच्या वचनबद्धतेचा एक महत्वपूर्ण भाग होता, या दृष्टीने प्रयत्नही सुरु झाले, या सुरुवातीच्या काळातच अंबाझरी जवळ 'लिटिल वूड' नावाने सुरु केलेल्या ३० हेक्टरच्या जमिनीवर छोटे जंगल तयार करून निसर्गाला पोषक ठरणारे ५४९६ झाडे लावायचे ध्येय देखील गाठले होते. येथे या वर्षभरातच आता झाडांची उंची चांगलीच वाढली असून झाडांना फुलं-फळं यायलाही सुरुवात झाली आहे. शिवाय मेट्रो उन्नती मार्गाच्या पिल्लरवर साकारलेले व्हर्टिकल गार्डन हा नागरिकांमध्ये आजही आकर्षणाचा विषय आहे.



हि सगळी कामे सुरु असतांना नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उभे होणे आणि जिज्ञासा जागृत होणे साहजिक होते. आताशा नागपूर मेट्रो प्रत्येकाला माझी मेट्रो वाटू लागली होती. ती कशी असेल कशी दिसेल याची उत्सुकता शिगेला पोचली होती. शिवाय त्याबद्दल इंथंभूत माहिती मिळण्याचे ठिकाण म्हणून आणि नागरिकांच्या मदतीसाठी काही विशेष युनिट उभे करण्यात आले. सोशल मीडियावरून मेट्रो बांधकामाच्या प्रगतीची संपूर्ण माहिती पुरवली जाऊ लागली नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज हळूहळू नागरिकांमध्ये चर्चेचा आणि नंतर आवडीचा विषय होत गेला दीड वर्षाच्या अत्यल्प कालखंडात फेसबुकने ३ लक्ष फॉलोवर्सचा आकडा पार केला जो आजही वाढता आहे.  सहयोग सेंटर, माहिती केंद्र, कंट्रोल सेंटर, QRT हि नागरिकांच्या मदतीसाठी उभारलेले युनीट रात्रंदिवस सेवेत गर्क आहेत. शिवाय मेट्रो संवाद, माझे स्टेशन माझे कॉलेज, आय सपोर्ट माझी मेट्रो या मोहीम, मेट्रो कामगारांना राखी बांधून रक्षाबंधन तर गणेशोत्सवात मंडळांबरोबर माहितीची देवाणघेवाण असे उपक्रम राबवले गेले.


२०१६ संपता संपता चारही रिचच्या कामाला बऱ्यापैकी वेग आला. प्रस्तावित गतीपेक्षाही ४ % पुढे काम चालू असतांना त्याची दखल मा. मुख्यमंत्रींनीं देखी माध्यम समूहासमोर घेतली. या कौतुकाच्या थापेने प्रोत्साहन मिळाले आणि चमू अधिक जोमाने काम करू लागली. २०१७ उजाडले.....मिहान ते खापरी आणि एअरपोर्ट पर्यंत ५.६ किमी रूट बसवण्याचे काम प्रगतीपथावर होते. काँकर वायाडक्टचे सौन्दर्य शहरभर नागरिकात उत्सुकतेचा बिंदू ठरत होता. वर्धा रोडच्या उन्नती मार्गाचे कार्य गतीने पुढे सरकत होते, हिंगणा रोड, सेंट्रल एव्हेन्यू सर्वच विभागात दृश्य स्वरूपात कामाची प्रगती उल्लेखनीय ठरत होती. बघता बघता नागपूर मेट्रोचा दुसरा फाउंडेशन डे उगवला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांच्या कसोटीवर खरे उतरत असल्याचा प्रत्यय त्यांच्या प्रतिक्रियेतून जाणवला...हे पुढल्या कामासाठी उत्साहवर्धक ठरले यात शंका नाही. २०१७ चा एप्रिल उगवताना ट्रायल रन याच वर्षी होणार असल्याचे संकेत अधिक तीव्र होऊ लागले. त्या दृष्टीने मिहान डेपोतही तयारी सुरु झाली. खापरी स्टेशन, एयरपोर्ट आणि न्यू एअरपोर्ट स्टेशनचे काम गतीने पुढे जाऊ लागले. ट्रॅकसाठी जागा तयार झाली, विजेचे खांब उभे झाले, जागतिक दर्जाची मटेरियल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरु करण्यात आली. हेंद्राबाद वरून याच दरम्यान मेट्रोचे कोच येण्यावर विचारमंथन सुरु होते. ....हे सगळं समांतर सुरु असतांना मुळात संवेदनशील असलेल्या  व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित सरांचं लक्ष कामगारांच्या आरोग्यासाठी कळवळु लागलं.  एप्रिल आणि मे महिना ४३ डिग्री तापमान आणि कष्ट करणारे कामगार हा 'हिटशॉक' सरांना साहवेना. मग कामगारांच्या कामाच्या वेळा बदलण्यात आल्या. दुपारच्या वेळी काम बंद ठेवून त्यांना विश्रांती देण्यात आली. शिवाय इतर वेळीहि पुरेपूर गार पाणी, लिंबू पाणी, विश्रांतीला कापडी शेड, कामाच्या ठिकाणावर छत्र्या अशी सोय करण्यात आली. आजही कामगारांच्या राहण्या खाण्याची, त्यांच्या आरोग्याची काळजी हा प्रायॉरीटीचा विषय आहे. 


मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सिग्नलिंग आणि कास्टिंग यार्डचे भूमिपूजन झाले. १ जूनला लांब पल्ल्याच्या ट्र्कमधून ५५० टन ‘Head Hardened Rail ' - (शीर्ष प्रबलित रूळ) रशिया येथून नागपूरला पोहोचले. हा नागपूरकरांसाठी उत्साहाचा दिवस होता. त्यानंतरच्या एक महिन्याच्या काळात आलेले रूळ बसवून, त्याच्या परीक्षणाचा काळ सुरु झाला. आता प्रतीक्षा होती ती रुळावरून मेट्रो धावतांना पाहण्याची. सगळ्या अडचणींवर मात करून अखेर २९ जुलै रोजी हैद्राबादहुन ३ डब्ब्यांचा मेट्रो संच रवाना झाला आणि नागपूरकरांच्या जीवात जीव आला ३ दिवसांनी २ ऑगस्ट रोजी नागपुरात प्रवेश करणाऱ्या मेट्रो कोचचे नागरिकांनी वाजत गाजत  ढोल ताशाच्या गजरात स्वागत केले. या दिवशी संपूर्ण शहर उत्सवी वातावरणात न्हाऊन निघाले होते. कोच मिहान डेपोत पोचले आणि पुढल्या सगळ्या परीक्षणांना सुरुवात झाली. काही काळ 'बुलंद' इंजिनच्या साहाय्याने कोच आणि रूटची चाचणी झाली. पण प्रस्तावित वेळेच्या अगोदरच काम पूर्ण करून ट्रॅक्शनच्या माध्यमाने नागपूर मेट्रो अत्यल्प काळात ट्रॅकवर धावती झाली..१९ सप्टेंबरला शेवटची चाचणी यशस्वी रित्या पार पडली. २३ सप्टेंबरला नागपूर येथे केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत नागपूरमेट्रो संबंधीत विविध कामांचा आढावा घेतला. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री ब्रिजेश दिक्षीत यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली..आणि अखेर नागपूरकरांना प्रतीक्षा असणारा ट्रायल रनचा दिवस उगवला...दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ३० सप्टेंबर २०१७ शनिवार रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझी मेट्रोला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. माझीमेट्रो रूटवरून धावतांना पाहणे हे प्रत्येक नागपूरकरांचे स्वप्न आहे. हे साकारताना आपण याचे साक्षी होत आहोत. नागपूर मेट्रो रेल्वे जागतिक दर्जाची व्हावी म्हणून देशभरातील मेट्रो रेल्वेचे तसेच भारतीय रेल्वेच्या तंत्रज्ञांचे सहकार्य घेतले जात आहे. नागपूर मेट्रो त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात या प्रवासात भरीव योगदान दिले, सहकार्य केले ...नागपूरवासियांना सुरक्षित, विश्वासार्ह, स्वच्छ, स्वस्त, तंत्रज्ञानाने समृद्ध, माहिती संसाधन संपन्न आणि पर्यावरणास पोषक सेवा उपलब्ध करून देण्यास नागपूर मेट्रो वचनबद्ध आहे. 



रश्मी पदवाड मदनकर
३० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...