Monday 1 January 2018

दुसरा अँगल ..


बरेचदा जे कानावर येतंय, जे दाखवलं जातंय तेच सत्य असतं असं नाही काही गोष्टींचा अँगल जरा चेंज करून पाहावा. अनेकदा जी हवा पसरते, जो धुरवडा उडवला जातो, ज्याचा कांगावा होतो तेच खरं असतं असं नाही. किंबहुना मी तर म्हणेन धूर दिसतोय तिथे आग असतेच पण ती लागलीय कि लावली गेलीय हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. जातीपातीच्या, धर्म-पंथाच्या चक्रव्युहात फसतोय आपण आणि फसवू बघणारे त्यावर त्यांची भाकरी भाजून घेत खुश आहेत. जसे एखादे शेजारी मुस्लिम राष्ट्र 'हितराष्ट्र' नाही म्हणून आपल्या शेजारी राहणाऱ्या मुस्लिम मित्राकडे शंकेच्या दृष्टीनं पाहणं योग्य नाही तसेच कुठेतरी कुणाची हत्या झाली म्हणून मरणारा एखाद्या विशिष्ट निम्न जातीचा होता फक्त आणि फक्त म्हणूनच मारला गेला असे समजणे सुद्धा योग्य नाही. एखाद्या धर्माकडे जातीकडे सतत शंकेच्या नजरेने पाहणे जसे योग्य नाही तसेच एखाद्या विशिष्ट जातीकडे धर्माकडे सतत बिचारे म्हणून दयाभावनेने पाहणे किती योग्य आहे ??
ज्या समाजाकडे शंकेने पाहिलं जातंय त्यांचा राजकारणासाठी फायदा घेतला जातो आणि ज्यांच्याकडे दयेच्या नजरेने सतत पहिले जाते त्याचाही फायदा घेतला जातो. पण याहून वाईट असतं ते या दोन्ही समाजाच्या विरुद्ध बाजूला उभ्या केलेल्या लोकांकडे त्यांचा दोष असला नसला तरी निर्माण होणार दृष्टिकोन. ते आपसूक आरोपींच्या पिंजऱ्यात उभे होतात आणि आरोप सिद्ध होण्याआत समाजात शिक्षा भोगतात. का? 
प्रत्येक घटनेला तीन बाजू असतात
१. एक अलीकडची म्हणजे जी दिसतेय पण उमजत नाहीये
२. एक जी कुठल्याश्या उद्देशाने दाखवली जातेय.
३ आणि तिसरी या दोहोंपलीकडची म्हणजेच सत्याची बाजू.
आपण बहुतांशी दुसऱ्या नंबरच्या विळख्यात फसतो. एक उदाहरण सांगते.

आमच्या मावशीच्या गावाशेजारचे गाव. मागे तिथे दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाला. दोन दिवस दोघीही बहिणी बेपता होत्या आणि तिसऱ्या दिवशी दोघींचाही मृतदेह एका नाल्यात आढळला. मधले दोन दिवस प्रिंट मिडिया, सोशल मिडिया या केसमध्ये अक्षरशः तुटून पडलेला. सगळीकडे शोककळा पसरली होती. त्या दोन मुलींना आधीच वडील नव्हते आणि आता मुलींचाही आधार गमावलेल्या आईचे वृत्तपत्रात छापून आलेले फोटो पाहून जीव कळवळून जायचा. मुलींचे मृतदेह सापडले तेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नाही हे निष्पन्न झाले आणि वेगळ्याच बातम्यांना पेव फुटले.……. बलात्कार नाही म्हणजे मग मारून टाकण्याचा उद्देश काय ?? मग काय दुसऱ्याच दिवशीच्या वृत्तपत्रांमधून मुली आणि मुलींचा परिवार निम्नजातीचा होता आणि म्हणून हे असे करण्यात आले किंवा घडले असे या घटनेला वळसा घालण्यात आला. ज्या गोष्टींचे, घटनांचे उत्तर सापडत नाही त्या सर्वांना चमत्कार, जादूटोणा, करणी नाहीतर जातधर्म अश्या वेष्टनात घालून त्याचे भांडवल करणे हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये फार फार पूर्वापार ते चालत आलंय. एका वर्गाचे दुसर्या वर्गावर आरोप प्रत्यारोप आणि अन्याय … फरक एवढाच कि खेळातले खेळाडू बदलले आहेत, पूर्वी यांच्यावर डाव असायचा आज त्यांच्यावर आहे एवढंच … असो
तर घटनेला आता वेगळं वळण आलं होतं…. काही राजकारणी, लोकप्रतिनिधी, बुद्धीवंतांच्या, विचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या सामाजिक चळवळींनाअचानक पेव फुटले…. अगदी वादळ यावे तसे वैचारिक वारे दूरदूर गतीने वाहू लागले. सर्वदूर तथाकथित उच्चवर्णीयांवर थु थु झाली अनेक दिवस विषय चघळून चघळून चोथा झाला आणि कधीतरी एकदिवस बंद पडला……. मग नवी केस, नवा विषय, नवे विचार आणि नवा चोथा होत राहिला, वारा विरला. इकडे जवळ जवळ चार महिन्यांनी केसचा निकाल बाहेर आला. 'आईच्या अवैध संबंधातून अडचण ठरलेल्या मुलींची हत्या करण्यात आली होती'. परंतु एव्हाना पाणी डोक्यावरून निघून गेलं होतं … प्रकरणाच्या वेळेस राजकीय नेते धरण्यावर बसले होते. मोर्चे निघाले होते. जगासमोर ओरडून ते समाजाचे रक्षक कसे आहेत हे सांगण्यात आले होते आणि पर्यायाने प्रकरण सर्वदूर राज्यभर गाजलं सुद्धा होतं. आता सत्य जगासमोर येणं म्हणजे नाच्चक्कि, गावाची बदनामी आणि प्रकरणामुळे होणार असणारे काही राजकीय फायदे त्यापासून वंचित होणे हे सगळं ओळखून प्रकरण दाबण्यात आले. आजही फ़ाइल मध्ये घटना जातपातीवरून घातपात असेच आहे. परंतु आतले सत्य जाणूनही जाणकारांना बोलताही येणार नाहीये.

अगदी अगदी ह्याच प्रकरणासारखे आणखी एक जागतिक लेवल ला गाजलेले प्रकरण आजही चघळले जाते. राजकारणात आजही हे उदाहरण देऊन त्यांच्यावरच्या अत्याचारांचे, अन्यायांचे पोवाडे गायले जातात पण त्या केसच्या मागे सुद्धा काही छुपी कारणे होतीत. तशी कारणे होतीत म्हणून त्यांना मारून टाकणे योग्य आहे असे नव्हे आणि नसणार कधीच… तसे समर्थन करणे शक्यंच नाही. पण हि केस कायदा हातात घेण्याची होती, कायद्यावर विश्वास न ठेवून स्वतःच सोक्षमोक्ष लावला म्हणून कठोरातली कठोर शिक्षा मिळावी आणि काही जीवांना संपवले म्हणून हत्या अशी कलमे लावली जाणे आणि त्यासाठी मग हवं तर फाशी सुद्धा शिक्षा म्हणून देणे. असे झाले असते तर ते जास्त वैधानिक आणि योग्य ठरले असते पण झाले त्याला जात-धर्माचा मुलामा चढवला गेला. नुसता इश्यू बनवला नाही तर कुठल्या कुठल्या माध्यमातून ते जगभर पसरवण्यात आले…. त्यातून जातीसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न झाला एवढंच नाही तर त्यावर कुणी कुणी आपल्या राजकीय भाकऱ्या भाजून घेतल्या. जे गेले त्यांना न्याय मिळाला काय? दोषींना शिक्षा मिळाली काय ? माहिती नाही, निर्दोष लोकं त्यातून सुटलेत का याच्याशी संबंध नाही. पण जाती धर्माच्या राजकारणातून संपूर्ण देशातल्या न्यायप्रणालीवर मात्र जबरदस्त दबाव आणला गेला. आजही त्यामागचे सत्य त्या गावच्या वेशीबाहेर निघू शकले नाही. जी लोक जातीच्या नावाने कुठकुठपर्यंत गाजले होते. देश विदेशातून सहानुभूतीच्या लाटा ज्यांच्या दिशेने वाहत होत्या त्या शक्तिशाली आणि प्रभावशाली लाटेत सत्य बोलणारे दोन चार लोक कुठे वाहून जातील जगाला कळणार सुद्धा नाही.

एका वर्गावर अत्याचार होतो म्हणजे ते निव्वळ अन्यायग्रस्त असतात आणि त्यांच्या हातून आरोप घडतंच नसतात असे नसते आणि दुसरा वर्ग मग निव्वळ अन्याय करणाराच असतो, हत्यारा असतो असेही नाही त्यांच्यावरही अन्याय होतो …. दोन्ही वर्गाचे प्रश्न सोडवण्याच्या प्रथांच जर इथे वेगवेगळ्या असतील आणि त्यानुसारच समाजमन पण बनत गेले असेल तर जाब कुठे विचारायचा. सतत पारडे झुक्तेच असायला हवे एकतर इकडे नाहीतर तिकडे. पारडे झुकतेय कि वाकतेय हे बघायला न्याय देवतेचे डोळे उघडे नको का ??
असो … हे होतंच राहणार… मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे खाणारच… राजकारणाची परिभाषाच ती होऊन बसलीय . पण प्रश्न आपला आहे. आपण काय विचार करतोय … पुन्हा वर म्हणाले तेच म्हणेन काही गोष्टींचा एंगल जरा चेंज करून पाहावा. जी हवा उठतेय बहुतांशी लोक जे म्हणताहेत तेच खरं असतं असं नाही.
कुठल्याही जाती धर्मांशी विशेष पुळका नाही किंवा कोणत्याही जाती-धर्माचा द्वेषही नाही पण बऱ्याच घटनांमध्ये नजरेसमोर आलेला दुसरा अँगल जो मला हादरवून गेला तोच इथे तुमच्याही समोर मांडावासा वाटला एवढंच.

No comments:

Post a Comment

Featured post

काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली...

 काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली... काल त्यांनी बागेतली दोन झाडे तोडली ज्यांनी परवा पर्यावरणावर घंटो भाषणे झोडली ! झाडाचे जाडे खोड खोलले,...