Sunday, 27 August 2017

जाणिवांची रात्र !

आसमंतभर पसरून वाट बघत राहिली,
दमली अन अखेर कलली संध्याकाळ
दिवसभर मनभर साठलेली उन्हं
उतरणीला तळमळत राहिली
पश्चिमेला फुटलेल्या तांबड्यात
न्हाऊन निघण्याची इच्छा विरली काळोखात
दिवेलागणीला तेवत राहण्याचे स्वप्नही
भंगत गेले संध्यासमयी.

अन अंधारून आले सारे ...
दिन दिन रात्र रात्र पालटत राहिले
 पुढे चंद्रही कले कलेने आवस होत गेला

 नेणिवेचा एक कोपरा उजळावा म्हणून जाणीव झाली
अन् कित्तेक भावनांची अशीच रात्र होत गेली ??

रश्मी मदनकर






निरंतर वाचन सुरू असतं..मिळेल तिथे मिळेल तसं, दिवसभरात कितीतरी विषय वाचनात येतात..एखादा प्रगल्भ विषय भावनिक स्पंदनं निर्माण करतो. एखादा संवेदनशील लेख अंतर्बाह्य हलवून जातो. एखाद वाक्यातली कोटीही विचार करायला भाग पाडते... एखादी कथा अंतर्मुख करते. एखादी कविता घोळत राहते मनात. त्यातून अनेक विषय सुचत जातात..आतल्या आत वैचारिक आंदोलनं..लाटांवर लाटा..आवर्तनं.. एकावर एक गाळ साचतो, अख्खा लेख तयार होतो..आतल्या आतच घुसमटत राहतो.. .. काठाशी येतो..बाहेर पडायला तडफडत राहतो...तगमग तळमळ !!!!!

वेळ हवा असतो एकांत हवा असतो..उतरवून टाकायचं असतं सारं शब्दात, मोकळं व्हायचं असतं...नाही जमत...दिवसभरात धावधाव धावून दमून भागून शिणलो कि लेखणीशीच हक्कानं प्रतारणा करता येते.


लेखणी रूसत नाही ...लेखणी समजून घेते.
विचार मात्र हटखोर असतात. आपण हात टेकले की सुचलेले विचार मान टाकतात...
मग पुन्हा नवा दिवस उगवतो, नवे वाचन सुरू होते.... नवे मनाचे मांडे मांडले जातात .. पुन्हा खेळ सुरु होतो.


काही विषय काही विचार लिखाण होण्याआधीच असे संपुष्टात येतात...कत्तल होतात...गाडले जातात.


'अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक मिथ' आहेय .....


रश्मी मदनकर / १५.०८.२०१७

Thursday, 24 August 2017

पत्र - १ - आतल्या मास्तरीण बाई


जीवाचा आकांत होतो कधी कधी. नेमकं काय हवंय आपल्याला हेच कळत नाही. सगळं असूनही अस्वस्थता पिच्छा का सोडत नसेल बरं ? प्रश्न आलाच होता डोक्यात कि आतल्या मास्तरीण बाई येऊन ठाकल्या. अलगद हसल्या अन बसल्याच सांगायला, म्हणाल्या  :



मने..
प्रश्न जगायचं कसं हा असतो आणि आपण अगदी जन्म झाल्यापासून जिवंत कसं राहायचं हेच शिकत असतो. जगायचं कसं हे शिकलोच नाही तर जिवंत राहण्याला अर्थच काय ?? नुसतच तगत राहायचं ..मरण ढकलत राहायचं पुढे पुढे? ... कि मग समरसून जगायचं मरण येईपर्यंत न धास्तावला न थांबता ...
आयुष्यात काही गोष्टी फार उशिरा कळतात ... अगदी आपल्या स्वतःच्या बाबतीतल्याही
आपल्याला नेमकं काय आवडतं, काय आवडत नाही, काय केलं कि आनंद मिळतो हे आधीच स्पष्ट कळलं तर सगळं कसं निवडून घेता येईल ना गं? खर सांगू ते कळतही पण पोटापाण्यासाठीच्या गरजेपोटी पैशांच्या मागे धावायच्या स्पर्धेत आपण इतके अडकतो कि, पोटाच्या भूकेपेक्षाही मनाची भूक खूप खोल आणि मोठी असते ह्याचा थांबून कधी विचारच करत नाही. पोटाला फार फार काय लागतं? पोटाची खळगी भरेल एवढं दोन वेळचं जेवण मिळालं कि झालं...ते भागतं ग कसंही,कुठेही ... मनाची खळगी मात्र इतकी सहज भरत नाही.  वास्तविक जगण्यासाठी अंतर्मनाचं समाधान, आत्म्याची तृप्ती जास्त महत्वाची हे कित्येकांना शेवटपर्यंत कळतंच नाही गं, किंवा ज्यांना कळतं तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.
मनाचं समाधान, सुख, आनंद, यश वगैरे सगळ्यांची मोजपट्टी-फुटपट्टी 'पैसा' हाच नसतो ना, पैसा साध्य नाहीये गं.  ते माध्यम असू शकतं फारफार तर एखाद दोन साध्य गाठता येईलही या माध्यमाने, पण सगळी साध्य गाठायला एकच माध्यम नाही ना लागत. वेगवेगळ्या गंतव्याला जायला वेगवेगळे मार्ग असतात अगं,  आपण एकाच माध्यमात गुंतून पडतो..साध्य देतो कोपऱ्यात ढकलून..माध्यम मिळवेपर्यंत साध्य काय होतं हे देखील विसरतो....मग सगळंच मुसळ्यात जातं ना राणी. अल्टिमेटली आपला हेतू काय आहे .. आपल्याला हवं ते कशासाठी मिळवायचंय ? मनाचा आनंद, समाधान, तृप्तीच ना ? आपण मिळवतोय काय 'पैसा'  ...
सगळं जवळ असूनही हि जी अस्वस्थता आहे ना .. हि तीच आहे ? सगळं जवळ असलेलं हवं होतं का आपल्याला हा कधी विचारच केला नाही ? जे हवं होतं त्यासाठी प्रयत्न केला का या प्रश्नाला उत्तर नाही ना तुझ्याकडे.
अस्वस्थता या न मिळालेल्या प्रश्नांची आहे.. उत्तर शोध आणि उपायही .. मी आहेच पाठीशी.

तुझ्याच
आतल्या मास्तरीण बाई

पत्र - 2 - आतल्या मास्तरीण बाई

आज सहज मोकळीक मिळाली म्हणून माझ्या आवडत्या खिडकीत येऊन बसले..खुश होते पण एकांत हवा होता, तंद्री लागली. चिंतन करता करता अनेक प्रश्नांची सरबत्तीच सुरु झाली आणि माझ्याच प्रश्नांच्या गुंत्यात मी गुंतत गेले..थोडी असहज होऊ लागले. अस्वस्थता वाढली. असे व्हावे आणि आतल्या मास्तरीण बाई अवतरणार नाही असे होणे नव्हतेच..त्या आल्या अन न लिहिलेले एक पत्र माझ्या हातात ठेवले.
****************************************


ए वेडे,
एखादा काळ मधून मधून येत असतो आयुष्यात जेव्हा गोतावळा नकोसा होतो. स्व-सहवास आवडायला लागतो. काही गुंते, काही बोचके असतात साठलेले त्यांना जरा मोकळा श्वास घेऊ द्यावा असं जाणवायला लागतं. मग आपण सारं या ओढून घेतलेल्या एकांतात उकलून पुढ्यात मांडून बसतो. कधी कधी या गाठोड्यातून किती प्रश्न बाहेर पडतात ना? कधीचे, कुठले-कुठले पत्ता नसतो. गाठोड्यातून पुढ्यात आणि पुढून मनात आलेले हे प्रश्न कुणा कुणाला विचारावे असं वाटत राहतं. पण फक्त विचारावं वाटतं, म्हणजे मला असे प्रश्न पडतात, पडू शकतात ही अशी माहिती म्हणून पुढल्याला द्यावी वाटते. प्रश्नांना अपेक्षित अशी उत्तर नकोच असतात. हाच तो प्रश्नांचा साठलेला गुंता-बोचका असतो ज्याच्या जवळ असण्याचाच मनाला आधार वाटत राहतो.
काही प्रश्न अनुत्तरीतच राहावीत असे का वाटत असावे..माहिती? त्या प्रश्नांवर सतत विचार करत राहणे त्यांना घोकत राहणे किंवा माझ्याकडे ही न सोडवता न साठवता येणारे प्रश्न आहेत..सलणारे पण तरीही गोड वाटणारे ही बाबच सुखद वगैरे वाटत असते. मनालाही खेळ लागतो गं - विरंगुळा. चुरगाळून कोड्याचा कागद फेकायचा आणि पुन्हा पुन्हा उचलून वाचायचा, पुन्हा कोडं सुटत नाही म्हणून पुन्हा फेकायचा असा गमतीदार खेळ खेळल्यासारखे आपणंच आपल्या मनाशी खेळत असतो. खोल एखाद्या जखमेच्या वेदना बराच काळ सहन करत राहिलो की त्या दुखण्याचीही सवय होते. त्या वेदनेचे भांडवल आपसूक आपल्या हातून होत जाते. नकळत चढलेली खपली नखाने कोरून आपण काढत राहतो. जखम भळभळत राहते. जखम होण्यापेक्षाही ती जखम बसल्यावर मधून मधून उमलणाऱ्या जखमेची आठवण अधिक वेदनादायी होत जाते. होतं ना गं असं? बरेचदा. खरं सांगू साथ कोण कशी देतंय याहून अधिक कुणीतरी साथ देतंय हे महत्वाचं होऊन बसतं. ती सोबत सुखद का दुःखद हा भाग काळासोबत गौण होत जातो आपल्या लेखी. हेच कारण असेल बहुदा. असू दे ना असेल काहीही कारण. पण असं होतं मात्र नक्की. काही प्रश्नांची उत्तरं माहिती असतात पण ती आपण आपल्याच हाताने हळूच बाजूला कोपऱ्यात सरकवून देतो, सगळ्यांच्या नकळत अगदी आपल्याही, आणि त्या प्रश्नाला प्रश्नच राहू देण्यात परम सुख मानतो. कारण उत्तरानंतर प्रश्न प्रश्न उरणार नसतो, तो उत्तर बनून भुर्रकन उडणार असतो. ते नको असतं आपल्याला. काही प्रश्नांना तर काही उत्तरांना आपणच आपले गृहीत धरून बसलेले असतो. हे जे काही आहे ते आपले आपल्यालाही अनपेक्षितच असतं. जे काही अपेक्षे अनपेक्षेच्या पलीकडचं घडत असतं ते इतकं सुंदर असतं की अनुत्तरित प्रश्नांची डोक्यावर चढलेली झिंग उतरूच नये असं वाटत राहते.
असो …
तर कधी कधी प्रश्नांचीच परीक्षा घ्यावी वाटते ती अशी..त्यात गैर तरी काय ?
तुझ्याच
आतल्या मास्तरीणबाई




Saturday, 12 August 2017

(कुठेतरी वाचलेलं - आवडलेलं)

कथा हा एक प्रवास असतो. सुरूवातीपासून शेवटपर्यंतचा. मधल्या काळात जे घडते ते कथानक असते. प्रत्येक लेखकाची लेखनशैली वेगळी असते, असावी. कथेची मांडणी कशी करावी, कशी असावी? या बद्धल रूढ नियम नाहित. कथा सहजगत्या उलगडत गेली तर ती वाचकांपर्यंत लवकर पोहचते. काही कथा वेगळ्या धाटणीच्या असतात, त्या पहिल्या वाचनात लवकर कळत नाहीत. त्यामधील ओळीमागचं, न लिहलेलंही समजून घ्यावं लागतं, काही जागा वाचकांसाठी सोडायच्या असतात. वाचकांना त्यांच्या आकलनाप्रमाणे त्यात रंग भरता येतात. एकच कथा अनेक वाचकांना वेगवेगळी अनुभूती देत असते. आकाशातल्या ढगांचे आकार प्रत्येकाला वेगळे दिसतात, तसंच हे.

कथा लेखन हे उस्फुर्त अंत:प्रवाही असावे. शब्दांचा कच्चा माल घेवून कथेची इमारत जरूर उभी राहू  शकते पण ती साहित्यकृती होवू शकत नाही. इकडची वीट तिकडे, तिकडचा दगड इकडे करून कथेचा तोल सावरला जाईलही पण ते शब्दांचे बांधकामच !

एका तंद्रीत कविता सुचते. एका तल्लीनतेत चित्रकार रेषांचे फटकारे मारत चित्राला जिवंत करत असतो. समाधी अवस्थेत जावून मुर्तीकार छिन्नी हाथोड्याने मुर्ती घडवत असतो. लेखनाचेही तसेच आहे. ठरवून लेखन होत नाही, ते आपोआप व्हावे लागते. लेखन हे अपत्य जन्मासारखे असते, लेखक त्याला फक्त जन्म देवू शकतो, ते कसले जन्माला येईल हे लेखकाच्याही हातात नसते.

लेखकाने लिहित जावे, वाचकांनी वाचत जावे, समिक्षकांनी त्याचे रसग्रहण करावे. वाचकांना काय आवडेल, काय आवडणार नाही ? याचा विचार लेखकाने लिहताना करू नये, लिहून मोकळे व्हावे. लिहण्याची वेळ साधावी. पुढचे वाचकांवर सोपवावे. वाचकानूनय सर्वात धोकेदायक ! मागणी तसा पुरवठा करत बसलो तर आपण यशस्वी उद्योजक नक्की होवू पण साहित्यिक होवू शकणार नाही. भले भले लेखक लोकप्रिय झालेले आहेत, त्यांची वाचक संख्या अफाट आहे तरी त्यांना साहित्यिक म्हणून ओळख नाही !

आपल्याला लेखक व्हायचेय की साहित्यिक याचा विचार करणे गरजेचे आहे !

लेखक :  संजन मोरे

Featured post

रेहने को सदा दुनिया में आता नहीं कोई... आप जैसे गये, वैसे भी जाता नहीं कोई..!! खरतर एरवी डिसेंबर महिना म्हणजे कसला गोडीगुलाबीचा वाटतो. वाताव...